Wednesday 23 December 2015

‘ जगजेठी दत्तराया ’

                                (चाल : श्रीकृष्ण परमात्मा)
अविनाशी एक असशी
जगी तूची दत्तराया --- ॥धृ॥
वसतोसी गाणगपूरी
दिसतोसी औदुंबरी
वाडी गावी नरहरी
भरलासी त्रिभुवनीया -- ॥१॥
अविनाशी एक असशी
जगी तूची दत्तराया --- ॥धृ॥

सती अनसुयेपोटी
जन्म घेसी जगजेठी
तारावया जनासाठी
अवतरलासी सिद्धराया -- ॥२॥
अविनाशी एक असशी
जगी तूची दत्तराया --- ॥धृ॥

ह्या विकल्प संकल्पात
मन हेची बावरत
नसे शुद्धी चित्तात
अवधूत सावळीया -- ॥३॥
अविनाशी एक असशी
जगी तूची दत्तराया --- ॥धृ॥

कृपा करी गुरुनाथ
झणी पाजी बोधामृत
तव विश्रांती सदनांत
रंगवी राधेला या -- ४॥
अविनाशी एक असशी
जगी तूची दत्तराया --- ॥धृ॥
               ------ कै. राधाबाई आठवले

पूर्वीपासून श्रीगुरुचरित्र महिलांनी वाचू नये, हा प्रवाद आपल्याकडे आहे. माझ्या आजीच्या पोथीसंग्रहातील श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ आजही आमच्याकडे आहे. माझ्या आजी- आजोबांना मी पाहिलेले नाही, परंतु माझ्या बाबांच्या सांगण्यानुसार पोथी-पुराण, पूजा-अर्चा ह्यांपासून माझे आजोबा (कै. दत्तात्रय आठवले) कैक योजने दूर होते तर देवभोळ्या असलेल्या आजीला (कै. राधाबाई आठवले) पोथी पुराणे वाचून अक्षर ओळख झाली.
‘जगजेठी दत्तराया’ ह्या काव्यचित्रातून माझ्या आजीची व्यक्त होणारी दत्तभक्ती.
अनुराधा आठवले (घाणेकर), नासिक

Monday 21 December 2015

‘गीता साद घाली मना’


काहीतरी करायचे आहे, वाटे एक जाणीव ।
स्वकर्मी भासू नये, वाटतसे कोणतीच उणीव ॥
जन्म, काल, वेळ, कुळ नसे आपुल्या स्वाधीन ।
म्हणून म्हणती मानव जन्म असे केवळ पराधीन ॥
जन्म समयी लाभे मातेस मातृत्व, पित्यास पितृत्व  ।
तव अस्तित्वासाठी जपावे, सदैव तू सत्व॥
ईशदर्शन प्राप्तीचे साधन म्हणूनी करीशी भक्ती ।
ईश हा नसे दृश्य पण ती असे अचाट शक्ती ॥
पूजाअर्चाद्वारे न मागणे काही देवापाशी ।
म्हणून म्हणती ‘न मागे तयाची रमा होय दासी’ ॥
पूजा अर्चा उपासनेतून साधते मनाची एकाग्रता ।
स्वकर्मातून मिळते खचित मनाची नम्रता ॥
एकाग्री मन सांगे, सार चंचलता दूर दूर ।
मग जीवन मार्गी न राहील, कोणतीच हूरहूर ॥
दैनंदिन  आचार-विचार उच्चारातून प्रगटे स्वकर्म  ।
संस्काराचे शिंपण होता, स्वकर्म बने स्वधर्म ॥
धर्म दावितो सन्मार्गी समाजधारणा – प्रवृत्ती ।
समाजधारणेतून उत्कटते सामाजिक प्रवृत्ती ॥
धर्माचे थोतांड माजवून नको पोसू अहम् ।
सत्कर्म करुनी वर म्हणावे ‘इदं न मम’  ॥
नवससायातून ठेवू नये कधी अंधश्रद्धा ।
मनःशांतीस्तव सत्कर्मी ठेवावी अढळ श्रद्धा ॥
स्वधर्मातून पोसतो वाढतो स्व आवडीचा छंद ।
स्वकर्मातून लाभे सदैव अविरत नवनिर्मिती आनंद ॥
स्वकर्मे धरु नये, मनी फलाची आशा ।
असफल कर्मातून पदरी पडते, घोर निराशा  ॥
निराशेतून मनी भीषण उद्विग्नता प्राप्त होते ।
बदलता वातावरणी रुप होत्याचे नव्हते होते ॥
प्रयत्ने रगडिता वाळूचे तेलही गळे ।
सत्कर्मी लाभती सफलतेची फळे ॥
फलाशेतून स्वकर्माची निष्टा भंग पावते  ।
लाभासाठी चंचल मन अखंड धावते ॥
कुरुक्षेत्री महाभारत घडले कुटुंबकलहापायी ।
भाऊ बंदकीतून वैराची ठिणगी फुलते ठायी ठायी ॥
कलहसमयी समेट करण्या पुढे धावला भगवंत ।
सार्वभौम सत्तेची नशा, सत्तेस करी नाशिवंत ॥
भगवंत बोले, अर्जुनाशी “धरी रे शस्त्र हाती” ।
क्षात्रतेज जपण्या, विसर रक्ताची नाती ॥
आठव तुझा रणांगणी पराक्रमी गत इतिहास ।
आसक्तीपायी भ्याडमनी नको, स्वीकारु उपहास ॥
जगा त्रासूनी लोक स्वीकारती संन्यासधर्म ।
सर्वसंग परित्यागातून न सुटे कदापि स्वधर्म ॥
वनवासी अन्न –वस्त्र - निवारा गरजा न सुटती  ।
स्वरक्षणार्थ रानी भयभित चित्ती अनेक वाटा फुटती ॥
संन्यास नसून भासे हे निव्वळ संन्यास सोंग ।
आत्मवंचना का करतोस ? ही फसवी सोंग ढोंग ॥
प्रपंच करावा नेटका राहून प्रपंची ।
विरक्तीच्या गप्पा, करु नको पोपटपंची ॥
सावंतामाळी प्रपंची फुलवितो भाजीचा मळा ।
स्वकर्मातून नामस्मरणाचा गातो सुस्वर गळा ॥
नामयाची जनी अखंड करीते, कांडण- दळण ।
स्वकर्मातून नामस्मरणी लाविते, इंद्रिया- वळण ॥
स्वकर्म संपता ज्ञानदेव जाहले समाधीस्त ।
जन म्हणती जाहला ज्ञानसूर्याचा अस्त ॥
अस्त नसे हा स्वकर्मपूर्तीचा दिव्य संदेश ।
संदेश ह्या विश्वात व्यापून रहावा हाच आदेश ॥
मातृपितृ सेवेत गढला, पुंडलिक धुंद – दंग ।
प्रसन्न वदनी उभा ठाकला, वीटेवरी पांडूरंग ॥
गीतावचने सांगती, स्वकर्मयोगाची महती अगणित ।
स्वकर्मातून जीवनी सुटावे, जीवनाचे अवघड गणित ॥
धर्म कल्पना गाते, निव्वळ मानवतेची कवन ।
मानवधर्म एक, पण अनेक पंथ उद् घोषती संतवचन ॥
व्यक्ती व्यक्ती गणिक समाजी दिसे स्वधर्म अनेक  ।
सदाचार सोडून सत्तांध -मदांध वागती सोडून विवेक ॥
पैसा - पैसा करुनी जमविती अगणित मालमता  ।
मालमता हव्यासापोटी लाथाडती नीतिमत्ता ॥
लोकशाहीसाठी भल्या मारती लंब्या  बाता ।
सत्ता प्राप्त होता मारती मत्त गर्दभापरी लाथा ॥
मतासाठी केविलवाणे वदूनी होती सर्व लीन ।
स्वार्थासाठी सत्तांध बनूनी करीती जनता हीन – दीन ॥
ही नव्हे लोकशाही ही तर भासे हुकुमशाही ।
अनिर्बंध सत्तेसाठी बने ही पुरी घराणेशाही ॥
युद्धभूमी नव्हे ही तर कर्मभूमी बोले, श्रीकृष्ण परमात्मा ।
मनःशांतीस्तव रातंदिन तळमळे हरएक आत्मा  ॥
नको वाचन भगवद् गीता, नको करु नुसते पाठांतर  ।
संस्कारित कर्मापासून जीवात्म्याला दे ऊ नको अंतर ॥
गीता सांगे देह क्षणभंगूर असे आत्मा अमर ।
देहासक्तीपायी का उगीच माजवितो सदैव समर ॥
                       -----------प्रभा आठवले, नासिक


संदर्भ :- http://bhagawad-geeta.com/

Saturday 12 December 2015

स्मार्ट सिटी : नाशिक पार्श्वभूमी


                            ‘स्मार्ट सिटींचे शतक’ ह्या प्रक्लपाने येणाऱ्या संगणकीय युगाची नांदी देत, इसवी सन २०१५ आपला निरोप घेत आहे. २०१६ साली प्रवेश करणाऱ्या ह्या नवयुगाच्या दिंडी दरवाजात उभे असताना, सर्वसामान्य माणसाचे मन स्मार्ट सिटीतील महागाईच्या भस्मासूराने साशंक होते. स्मार्ट सिटीचे हे आव्हान पेलताना आपल्याकडे निधीची कमतरता व स्वयंभू तंत्रज्ञानाचा असलेला अभाव यांची प्रकर्षाने जाणीव होते.
                   कालचक्र हे अविरत फिरत असते. प्रत्येक गावाचा चेहरामोहरा त्या काळानुरुप बदलत असतो. आपल्या नाशिकने जलभूमी, नाशिक भूमी, मंत्रभूमी (नासिक तीर्थक्षेत्र), यंत्रभूमी (औद्योगिक क्षेत्र) अशी स्थित्यंतरे अनुभवलेली आहेत.
 १) जलभूमी :-
               ब्रह्मपुराणातील वर्णनानुसार तसेच भूगर्भ शास्त्राच्या अनुमानानुसार, सुमारे ६.८कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीतून ब्रह्मगिरी पर्वताची निर्मिती झालेली असावी. ह्या ज्वालामुखीचे ब्रह्मपुराणांत खूप सुंदर वर्णन आहे. ब्रह्मदेव सांगतो,”मी दंडकारण्यात केलेल्या यज्ञात, वर्षा ऋतू ब्रह्मगिरी पर्वतावरील कुशात (कुश= दर्भ= एक प्रकारचे गवत) ठेवला.”
ब्रह्मपुराणातील नोंदीनुसार, नाशिक क्षेत्री अरुणा व वरुणा ह्या दोन नद्यांचे संगमस्थान होते. ह्या संगमातून गंगा नदी आजची ‘दक्षिणवाहिनी गंगा’ उगम पावत होती.
{ ६.८ कोटीवर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीस सृष्टी निर्माण कर्त्या ब्रह्मदेवाचा यज्ञ म्हणणे सुयोग्य आहे.
ब्रह्म पुराण अध्याय ८९ श्लोक क्रमांक ४५ नुसार
अरुणावरुणानद्योर्गड्गायां संगमः शुभः।
देवानां तत्र तीर्थानामागतानां पृथक्पृथक्॥८९-४५॥
              ह्या श्लोकाचा अर्थ आहे, अरुणा व वरुणा ह्या नद्यांच्या संगमस्थानी गंगा नदीचा होणारा संगम शुभ आहे. त्या ठिकाणी त्या संगमस्थानी देव परत-परत येत असत. }
                    ‘नाशिक हे तळ्यांचे क्षेत्र होते’ असे मेरी (M.E.R.I.,Nashik) नासिक येथून सेवानिवृत्त झालेले भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. रत्नाकर पटवर्धन यांचे संशोधन सांगते.
२) नाशिक भूमी :-
                      अरुणा-वरुणा संगम असलेल्या ह्या जलभूमीतून  अरुणा नदी लुप्त झाली.
{  अरुणा नदी कशी लुप्त झाली ? हा पुरावा मिळालेला नाही.
    आजही नाशिकमध्ये १५ ते २० फूट खोलीवर पाणी लागते.
   ‘वरुणा नदी कुशावर्ती।‘ असे श्रीगुरुचरित्रकार अध्याय १५व्यात  
    सांगतात. }
                      पाणलोटाने वाहून आलेल्या प्रचंड मातीने नाशिक क्षेत्री टेकड्यांची निर्मिती झालेली असावी. नव शिखांमध्ये वसलेले क्षेत्र नाशिक हे नामकरण भूतकालीन टेकड्यांचे अस्तित्व दर्शविते.
                   नाशिक येथील मातीत CaCO3असल्याने ही काचसदृश्य चिकण माती आहे. मातीचे गंगापूर धरण तसेच जुन्या नाशिकमधील मातीचे वाडे नाशिकमध्ये आढळाणाऱ्या चिकण मातीचे पुरावे होत.
              पुराणातील उल्लेखानुसार, गौतम ऋषींनी गोदावरी नदीचा उगम शोधला. गौतम ऋषींच्या रुपाने जगाला  भूगर्भ शास्त्रज्ञ मिळाला, असे दिसते.
                    त्रिंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर पसरलेल्या लाव्हारसांत पावसाचे पाणी धरुन ठेवण्याची क्षमता आहे. ब्रह्मगिरी पर्वत शिखरावर गोदावरी व वैतरणा ह्या नद्यांचा उगम होतो.
 ३) नासिक :  तीर्थक्षेत्र
                          रामायणकाळात शूर्पणखेचे नाक (नासिका) लक्ष्मणाने कापल्याने नाशिकचे नाव ‘नासिक’ असे झाले असावे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे  क्षेत्र, तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावले.  विधीवत धर्मकृत्ये, तांब्या-पितळेची भांडी, शुद्ध नाशिक चांदी, द्राक्ष, कांदा तसेच नाशिकचा चिवडा अशा व्यवसायातून नाशिकची देशात ओळख निर्माण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा  स्वातंत्र्य सेनानी नाशिकने भारतभूमीला दिला.
                         स्वतंत्र भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे क्षात्रतेज भावी पिढीत निर्माण करण्यासाठी धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे  ह्यांनी  भोसला मिलिटरी स्कूलची नासिक तीर्थक्षेत्री स्थापना केली.
 ४) यंत्रभूमी (औद्योगिक क्षेत्र) :-
                   पद्मश्री बाबूभाई राठी, मामा शुक्ल, मामा अनगळ, बाबा वढावकर, प्रेमजीभाई वरीया अशा अनेक ज्ञात अज्ञात द्रष्ट्या नाशिककरांच्या प्रयत्नातून N.I.C.E. सातपूर नाशिक येथे औद्यौगिक क्षेत्र निर्माण झाले. त्रिंबकरोडवरील भोसला मिलिटरी स्कूल जवळील ह्या जागेवर पूर्वी माळरान होते. दुसऱ्या महायुद्ध काळात ब्रिटिशांनी सातपूर येथील माळरान असलेल्या टेकड्यांवर आफ्रिकन सैनिकांचे कॅम्प येथे उभारले होते.
                    त्रिंबक रोडवरील सातपूर तसेच जुन्या मुंबई आग्रा रोडवरील अंबड ह्या औद्योगिक वसाहतींनी नाशिकला जगाच्या नकाशात स्थान मिळवून दिले, तसेच नाशिककरांची रोजी रोटी निर्माण केली.
                मानवाच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ही त्याच्या व्यक्तिमत्त्वात असते. तशीच गावाच्या विकासाची गुरुकिल्ली ही त्या गावाला मिळालेल्या भौगोलिक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वात दडलेली असते.
                  प्रत्येक गावाला नाशिकप्रमाणे भौगोलिक,सांस्कृतिक  तसेच ऐतिहासिक वारसा मिळालेला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात हा अमूल्य ठेवा जपला गेला तर, ती गावे नुसती तांत्रिक न होता, रुबाबदार नगरी (Smart City)म्हणून जगाच्या नकाशात स्वतःचे स्थान मिळवतील.

॥जय गुरुदेवदत्त॥

Tuesday 24 November 2015

‘ वारसा श्रद्धेचा ‘




मी आहे गोदावरी।  जन्मुनी ब्रह्मेश्वरी।
डोकाविते गंगाद्वारी। मिळविते मोकळा श्वास चराचरी॥ १॥
{ त्रिंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावरील जटा मंदिर, गंगाद्वार ह्या ठिकाणी गोदावरी नदी उगम पावते. }
पृथ्वीमातेची मी लाडकी लेक। पुनरपि घेई गर्भसुख।
त्रिंबक जन्मातील हीच खरी मेख। अशी आहे मी द्विज एक॥ २॥
{ब्रह्मगिरी पर्वतशिखरावर उगम पावणारी गोदावरी नदी, भूमीगत होऊन त्रिंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडात प्रगट होते. }
नासिक क्षेत्री सायंशोभा। सिंह राशी दिसे पश्चिम नभा।
शुक्र गुरु युतीची विहंगम आभा। सिंहस्थ चाहुली दिसे खगोल सभा॥ ३॥
 { दि. १४ जुलै २०१५पूर्वी   (सिंहस्थापूर्वी)  संध्याकाळी पश्चिम दिशेला लालसर रंगाचा गुरु व तेजस्वी शुक्र यांची युती विलोभनीय आकाशात दिसत होती.}
ही खगोल भेट मिळे द्वादश संवत्सरी। समीप असे अमावस्येची शुभ रात्री।
धाव घेशी मानवा मम मंदिरी। मिळविण्या पुण्य कुंभ जन्मभरी॥ ४॥
{ दर बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थात, नाशिक येथील गोदावरी मातेचे मंदिर वर्षभर खूले असते. सिंहस्थ संपल्यावर हे मंदिर १२ वर्षे बंद ठेवण्याची प्रथा आहे.}
ब्रह्मांड पुराण मांडते मम जन्मकुंडली। कृतयुगी दोन  लक्ष वर्षे संपली।
अवतरले मी गंगा शंकरजटेतली।अनुबंधित मी अमृतमंथनवेळी ॥५॥
 {पुराणांमध्ये आढळणारे गोदावरी नदीविषयीचे  संदर्भ}
निघाला मला शोधण्या गौतम ऋषी। तया हातूनी गोहत्त्या घडली कशी।
नियती खेळी पडला फशी। जगीचा भूगर्भ शास्त्रज्ञ शशी॥ ६॥
{ संदर्भ :- श्रीगुरुचरित्र अध्याय १३ - www.shrigurucharitra.com}
श्रद्धा नयनी दिसले  गंगाद्वारीचे गंगावतरण।दाखवी कुशावर्तीचे पुनरागमन।
करीते मी राजमहेन्द्री समर्पण। प्रवाहिते मम जगीचे उद्धरण॥ ७॥
{ आंध्र प्रदेशातील राजा मुंड्री (मराठी नाव राजमहेंद्री) जवळील काकीनाडा येथे गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला  मिळते. }
गौतम ऋषीची होते मी वरदायिनी। श्रीगुरुचरित्रातील मी पाप क्षालनी।
सिंहस्थात समजतात मज पुण्य दायिनी। का करिता मम  जल प्रदुषणी॥ ८॥
{ ‘चराचरास उद्धारणारी गंगा’ असा  गौतम ऋषींनी गोदावरी नदीचा केलेला उल्लेख श्रीगुरुचरित्रांत आढळतो.
श्रीगुरुचरित्र काळात ‘गोदावरीत स्नान केल्याने पाप धुतले जाते’, अशी समाज मनाची धारणा दिसते.
नुकत्याच झालेल्या सिंहस्थ २०१५ मध्ये पुण्य प्राप्तीसाठी स्नान अशी श्रद्धा भाविकांमध्ये दिसली. }
गोहत्त्येतूनी लागला मम शोध। जलत्त्वातूनी घे जीवनी बोध।
सिंहस्थ आव्हाने होशील तू प्रबुद्ध। सिमेंट जंगल रोपणी होईन मी क्रुद्ध॥१०॥
{ गौतम ऋषींनी गोदावरी नदीचा उगम शोला अशी पुराण कथा आहे. नदीच्या उगम स्थानी तसेच दोन्ही तीरांवरील सिमेंटची जंगले, नदीला पाण्याचा स्त्रोत कसा पुरवणार ? हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यां व्यतिरिक्त इतर सर्व नद्यांना जमिनीत मुरणारे पावसाचे पाणी  पाण्याचा स्त्रोत पुरविते, असे भूगर्भ शास्त्र सांगते. }
जीवनी जीवन दान देई सरिता। पृथ्वीमातेच्या आम्ही दुहिता।
आमच्या जीवनी असे गुणभिन्नता। जलदान हिच आमुची ध्येय पूर्तता॥ ११॥
{ ‘गोदा स्नान, प्रवरा पान’ ही प्राचीन म्हण सांगते, गोदावरी नदीचे पाणी जड (Hard water) आहे तर प्रवरेचे पाणी पचनास सुलभ (Soft water)आहे. अशा प्रकारचे नैसर्गिक विविध गुणधर्म असलेल्या ह्या नद्या  कर्मयोगिनी आहेत. }
ऐकोनी गोदेचे हे संकिर्तन ।करावे जलसाक्षर सकल जन ।
    संवर्धताची पर्यावरण तंत्र ।मिळेल जगीचा स्मार्ट मंत्र ॥१२॥
{  सिंहस्थातील श्रद्धेचा महापूर संपून,  देशात सध्या स्मार्ट सिटीचे वारे वहात आहेत. गाव, शहर, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा स्थित्यंतरातून विकसीत होणाऱ्या स्थानांना स्मार्ट सिटीचे वे लागले दिसतात. गाव ते स्मार्ट सिटी अशी वाटचाल करणारा सर्वसामान्य भारतीय, वाडा संस्कृतीतून चाळीत, चाळीतून बंगलीत (चार खोल्यांच्या छोटेखानी बंगल्यात), नंतर फ्लॅट, फ्लॅट मधून रो हाऊस अशा बदलातून जात असताना, तुळशीचे रोप मात्र बरोबर घेऊन जाताना दिसतो. घरापुढे जागा असेल तर तुळशी वृंदावन, अन्यथा बाल्कनीच्या कठड्यावर डब्यात तुळस लावतो. }
पर्यावरणाकडे नेणारा हा  सांस्कृतिक वारसा जपल्यास, ‘स्मार्ट सिटीतील आर्ट’ उपभोगता येईल.
॥ ॐ श्रीगुरुदेवदत्त॥
                             ---------- अनुराधा आठवले (घाणेकर), नाशिक


Tuesday 17 November 2015

भारत-भूमी दर्शन (भाग १)


मना,त्वाचिरे नदी स्नान केले।
तयापासूनी प्रदुषण प्राप्त झाले ॥
विचारी मना तूच शोधूनी पाहे ।
तीर्थ संहिते जल शुद्ध वाहे ॥
नदी पाहिली की, नदीच्या वहात्या खळाखळत्या पाण्यात उतरावे, मनसोक्त आनंद घ्यावा, ह्या निर्भेळ आनंदाला पुण्यप्राप्तीची जोड असेल तर मनुष्य प्रदुषणाचा विचार न करता, निसर्ग स्नानाकडे धाव घेतो. ह्या स्नानातून त्या व्यक्तीला पुण्य मिळते की नदी प्रदुषणाचे पाप मिळते ?
         सुमारे ६००वर्षांपूर्वी श्रीनृसिंहसरस्वतींनी ‘गंगा स्वच्छता’ अभियानाची मुहुर्तमेढ केलेली दिसते. अध्याय १५ मध्ये श्रीगुरु आपल्या शिष्यांना तीर्थ यात्रेची सुरवात करताना, काशीला जाऊन गंगा नदीची चाकरी  करण्यास सांगतात.
श्रीगुरुंच्या नियमांनुसार, शिष्यांनी फक्त नदी संगमात स्नान करावे. दोन -तीन नद्यांच्या संगमातील भरपूर पाण्यात प्रदुषणाची मात्रा निश्चित कमी होते.
श्रीगुरुंनी ‘नदी उगम-स्नान तसेच समुद्र-स्नान करा’ असा संदेश शिष्यांना दिलेला नाही. निसर्गाच्या जलचक्राचे हे दोन्ही स्त्रोत प्रदुषणमुक्त ठेवणे, आजही गरजेचे आहे.
पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असलेल्या जलाशयांमध्ये श्रीगुरुंनी शिष्यांना स्नान करण्यास सांगितलेले आढळते.
‘खेकड्यांच्या प्रजनन काळात तसेच उन्हाळ्यात नदीचे बाष्पीभवन काळात नदीत स्नान करु नका’, ह्या श्रीगुरुंच्या संदेशातून निसर्ग संवर्ध श्रीगुरु आपल्याला भेटतात.
         २१व्या शतकात पर्यटनशास्त्र(  Tourism) पर्यावरण शास्त्र(  Environmental Science) भारत भूमीचा उपग्रहांद्वारे छायांकित झालेला भुगोल (Geography)अशी ज्ञानाची विविध दालने समृद्ध होत असताना,
केल्याने देशाटन, जाणिवे प्रदुषण
हा अनुभव येतो.
आसामच्या निसर्गरम्य प्रदेशात प्रवेश करताना, आपली आगगाडी ब्रह्मपुत्र नदीवरील मोठ्या पुलावरुन जात असते. ब्रह्मपुत्र नदीचे ते विशाल दर्शन डोळ्यात साठवित असताना, सहप्रवासी श्रद्धेने नदीमध्ये १-२ रुपयांची नाणी नदीला अर्पण करीत असतात. ब्रह्मपुत्रनदी दररोज किती नाण्यांचे प्रदुषण स्वतःबरोबर वाहून नेत असेल ?
ब्रह्मपुत्र नदीला प्राचीन काळापासून तिच्या भव्यतेमुळे नद (पुलिंगी) म्हणतात.
ब्रह्मपुत्र नदीच्या वेगवान प्रवाहात, सर्वसामान्य मनुष्य स्नानाचे पुण्य घ्यायला घाबरतो. परंतु ह्या नदीला नाणी-दान करुन प्रदुषणात भर टाकतो.
ब्रह्मपुत्र नदीपासून चार हात दूर रहाणारा माणूस, विदर्भातील लोणार सरोवर येथील सीता धारा ह्या छोट्या नदीच्या उगमात  यथेच्छ स्नान करतो. हे स्नान करताना   लोणार सरोवर ह्या नैसर्गिक ठेव्यास आपण धक्का पोहोचवित असतो ! हे त्या व्यक्तीच्या गावीही नसते.
संदर्भ:-
निसर्गदत्त लोणार सरोवर - जन्मकथा
निसर्गदत्त लोणार सरोवर -इतिहास (भाग २)
निसर्गदत्त लोणार सरोवर -वैज्ञानिक तीर्थक्षेत्र (भाग ३)
http://shrigurucharitrabodha.blogspot.in/2014/08/blog-post.html
१५ व्या शतकात परधर्मीय जुलमी राजवटीने सर्वसामान्य माणुस दबून गेला होता. अशा   प्रदेशांमध्ये   माणसातील स्फुलिंग जागृत करण्यासाठी, श्रीगुरुंनी आपल्या शिष्यांना पाठविलेले दिसते. त्यामुळे आसामची ब्रह्मपुत्र नदी, विदर्भातील लोणार सरोवर अशा अनेक ठिकाणांचा समावेश श्रीगुरुचरित्रांच्या ‘तीर्थ यात्रा निरुपण’ अध्यायात नसावा.

 तीर्थ संहितेतून घडणारे भारत दर्शन :-
श्रीगुरुचरित्र आशय अध्याय १५ -
http://media.wix.com/ugd/e49ced_8ed083387cf741edb333898c94db0f6c.pdf

                                ॥ श्रीगुरुदेवदत्त॥

Saturday 18 July 2015

‘आजची शिक्षण यत्ता ‘

पाहोनिया आजची शिक्षण यत्ता।
मिळेल कशी हो, उद्याची महासत्ता ?
मारुनी पाटी पेन्सिलवर बत्ता।
का विचारतो, सद्य शिक्षण यत्ता ?
शाळेत नसे पाढ्यांशी लढा।
कसा ओलांडावा, गणिती ओढा ?
पर्याय प्रश्नी नसे विषय रसग्रहण।
कसे मेंदूस मिळेल, ज्ञान संग्रहण ?
असे आमुचा संगणक साथी।
मारितो चाळीशी चवथीत माथी॥
चघळितो आम्ही शिक्षण व्यवस्था।
कुबेरसाहेब सांगती,  दुरावस्था॥
आचारोनी नित्य तयांचे भाषण।
स्विकाराल का, हे शिक्षण वाण ?
                            --------- अनुराधा आठवले (घाणेकर),
                                        नासिक,  दि १६ जुलै २०१५ 

Friday 12 June 2015

पूर्वग्रह दूषित शासक मनपरिवर्तन



२१ शतकातील सत्य घटना:-  राजकिय वर्चस्व असलेल्या घराने झोपडपट्टीत रहाणाऱ्या सज्जन मुलाला  ‘घरी काम करणाऱ्या मुलीला त्रास दिला’ ह्या खोट्या केसमध्ये अडकविण्याचा घाट घातला. ही घटना त्या परिसरातील काही मध्यमवर्गीय लोकांना आवडली नाही. त्यांनी निर्भीडपणे पोलीस अधिकाऱ्यास सत्य गोष्ट सांगितली. पूर्वग्रह दूषित अधिकारी कायद्याचे पालन कठोरपणे  करीत मुलाला जबरदस्त मारीत होते. परंतु मध्यमवर्गीय नागरिकांकडून संपूर्ण सत्य कळल्यावर, पोलीस अधिकाऱ्यानी त्या मध्यम वर्गीय नागरिकांना "तुम्ही आता निश्चिंत मनाने घरी जा", असे सांगितले व ते पोलीस अधिकारी पोलिस स्टेशनमधून बाहेर निघून गेले. रात्री १ वाजता पोलीस अधिकाऱ्याने त्या झोपडपट्टीवासीय मुलाला घरपोच पोहोचविले.
(श्रीगुरुचरित्र-अध्याय १४ :- श्रीगुरुंनी सायंदेवातील आत्मविश्वास जागृत करुन त्यास यवन अधिकाऱ्याकडे पाठविले. निरपराध सायंदेव निर्भीडपणे सामोरा आलेला पाहून, पूर्वग्रहदूषित यवन अधिकाऱ्याचे मनपरिवर्तन झाले.)

Wednesday 10 June 2015

अभ्यासू विद्यार्थ्यांची रस्सीखेच !

                  एकदा आर्य चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य यांच्यात मतभेद झाले. तेव्हा आर्य चाणक्य यांनी भर दरबारात प्रतिज्ञा केली की, “दुसरा चंद्रगुप्त मौर्य मी तयार करीन” आणि ते दरबार सोडून निघून गेले. ही इतिहासातील ऐकिव गोष्ट खरी असल्यास, आर्य चाणक्यांना ‘दुसरा चंद्रगुप्त मौर्य’ तयार करता आलेला नाही, असे इतिहासात दिसते. जसा चंद्रगुप्त मौर्यसारखा शिष्य जन्मावा लागतो, तसाच जन्मजात खेळाडू निर्माण होत असतो.

               खेळाडू विद्यार्थ्यांना दहावी-बारावी परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरते गुण देणे, खरोखरच योग्य आहे. परंतु अभ्यासू विद्यार्थ्यांची अभ्यास व खेळ अशी रस्सीखेच कशासाठी ?

Tuesday 9 June 2015

भावी पिढ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार ( ? )


नमस्कार,

 दहावीची परीक्षा नापास होणाऱ्यांना अकरावीत प्रवेश देणे अयोग्य आहे.
माननीय  शालेय शिक्षण मंत्री तसेच शिक्षण तज्ञ यांनी भावी पिढ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करावा, ही विनंति.

Thursday 28 May 2015

मनःशांती देणारी अनुभवसिद्ध 'श्रीगुरुचरित्र प्रार्थना'


 www.shrigurucharitra.com वरील प्रसारित श्रीगुरुचरित्र प्रार्थना लिंक
श्रवणिका (Audio MP 3 file)

श्रवणाक्षरी (Video MP4 file)

http://www.shrigurucharitra.com/amrutdhwani/prarthana.mp4



श्रीगुरुचरित्र प्रार्थनेतील प्रत्येक ओवीच्या आद्याक्षरातून निर्मित श्रीगुरु जयघोष :-
॥श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय॥
॥भीमा अमरजा संगमनिवासी राजाधिराज श्री गुरू महाराज की जय॥

॥अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त॥

                                                                       ॥श्रीगुरुदेवदत्त॥              

Saturday 16 May 2015

श्रीशनि जयंती : प्रश्नांकित शुभेच्छा

शनि शिंगणापूरी मनी वसती अनंत भाव
जनी म्हणती “ह्याला जीवन ऐसे नाव”॥ १॥

जन म्हणती शनिवार ‘शनि’ चा वार
कर्म न करता टाकती मजवरी भार॥ २ ॥

जीवनी अघटीत घडता म्हणती शनिचा कोप
स्वचूकांवर पांघरुण घालूनी चढवती मज टोप॥ ३॥

गावामल्या भव्य दगडा नाव दिले ‘शनी’
देवत्व अर्पिले पण भयभीत झाले मनी॥ ४॥

एकामागून असंख्य येऊनी करती नतमस्तक
हीच क्रिया अखंड चालू राहील शतकानुशतक॥ ५॥

दगडामधून साकारले दिले मज भव्य देवत्व
वेड्या जीवा, का तू पहातोस मम सत्त्व॥ ६॥

नावडे मज बंदिस्त हे असे जीवनी पारतंत्र्य
चराचरांतून व्यापता मज मिळे अमर्याद स्वातंत्र्य॥ ७॥

देव समजूनी मजवरी वर्षाव असे तेल सुमनाचा
कर्मकांडापायी जीवनी विचार का न करी सु-मनांचा॥ ८॥

माते पोटी जन्म माझा गमे मम नारी श्रेष्ठ
जनमानसी मानती पूजाविधीत पुरुष तो ज्येष्ठ॥ ९॥

भारतीय घटने बहाल केली स्त्री-पुरुष समता
मग मम पूजाविधीत का दिसते विषमता॥ १०॥

मम माता भगिनी हस्ती असे कोमल स्पर्श
पूजाअर्चासमयी का मानिती तो अस्पर्श॥ ११॥

कुकर्म करुनी कर जोडोनी धाव घेती दर्शनी
मज म्हणती,”धाव पाव रे बाप्पा तू शनी”॥ १२॥

पूजा-पाठ स्नाने करुनी होशील का तू शुर्चिभूत
विचारी मना, खरोखरच आहेस का मनी तू शुर्चिभूत॥ १३॥

ऐक गड्या, सांगतो तूज मनीची एक गोष्ट
राग नको मानू मित्रा, बोलतो जरी मी स्पष्ट॥ १४॥

पूजा अर्चा आरतीतून मनी मिळे तूज शांती
नको देऊ थारा कुविचारा, मग मिळे मनःशांती॥ १५॥

नको पाहू वळूनी मागे, चाल तू पुढेपुढे
जीवनी अखंड गिरव, तू माणुसकीचे धडे॥ १६॥

मानवता आणि विश्वबंधुता तत्वे थोर महान
ह्यातून भागेल तव ईश दर्शनाची तहान॥ १७ ॥

वेळ संपला जाऊन बसतो त्या पाषाण सिंहासनी
मम अस्तित्वाचा दैनंदिनी विचार कर तू मनोमनी॥ १८॥

दि. २६ मार्च २००६