Friday 24 June 2016

गवळण

गोपीनाथा आले आले, सोडूनिया काम रे
वृंदावनी वाजविसी वेणू जरा थांब रे ॥धृ॥
यमुनाबाई वाहे स्थिर। नादे लुब्धला समीर।
हालवेना तरुवर पुष्पे फळे पान रे॥ १॥
एक गोपी म्हणे, “माझ्या घरी आले पाहुणे
बहिणीचे पति माझे होती, सखे मेहुणे
स्वयंपाक करुनिया येता झाले, श्रम रे”॥२॥
एक गोपी म्हणे, “माझी सासू बहु तापट
कुंजवनी येत होते, मारुनिया करी पीठ
आता कैसी येऊं देवा, भजते तुझे नाम रे”॥ ३॥
एक गोपी म्हणे, “देवा मुरली नादे रंगली
तिच्या नादे आज माझी पतिसेवा भंगली
विडा करितां करितां आले, सुटला भाळी घाम रे”॥ ४॥
एक नारी माळीयाची जात होती सासरी
अवचित मुरलीचा नाद भरे अंतरी
द्राक्ष, केळी, अननस, उंबर, जांब रे॥ ५॥
वेडावल्या वेदशृती, खुंटे अनंताची मती

तेथे कृष्णाबाई किती चरणी घनःश्याम रे ऽ॥ ६॥

Tuesday 21 June 2016

प्रातः उपासना


म्हणे नंदप्रिया उठ हरि लवलाही। नभी भास्कर उदया येई॥
बघ गोठणची वत्से हंबरती गाई पयप्राशनाची त्या घाई।
घे पात्र करी धार काढी कृष्णा ही। मग धेनु चराया नेई।
दहीभाताची संगे शिदोरी घेई। हरि मुरली वाजवित जाई।
गोवर्धन अचल धरा रे, विमलार्जुन मुक्त करा रे।
हे तुजसाठी गोप पातले पाही। कशी निद्रा आली तुजला ही ----॥ १॥
घे श्रीरंगा काठी कांबळी काळा। घाली वैजयंती वनमाळा।
आज उशीर किती झाला तुजसी बाळा। नेस पितांबर हा पिवळा।
पदी वहाणा त्या घाली शीघ्र घननिळा। घे दांडूचेंडू गोपाळा।
हा समीर मंदगती वाहे। द्विज किलबील करीती  वाहे।
हरिपाठक उठले गा हे। रवीय  उपासी अर्ध्यदान तो देई।
झाली रक्त पूर्व दिशाही। म्हणे नंदप्रिया --॥ २॥
या गोपींनी घुसळण घुसळूनी बा रे।जाती यमुना जळ आणण्या रे।
बहु गडवडीने जाती विप्र स्नानारे। गुरुशिष्य पढ ती वेदा रे।
या मार्गाने कापडी जाती यात्रे। मनमोहना उघडी नेत्रे।
ही गवळण ही गवळण राधा द्वारी। आली शोभे बहु शृंगारी।
हे ऐकून उठे गिरीधारी। म्हणे कोठे ती कोठे राधा, आई।
मन रमले कृष्णापाई। म्हणे नंदप्रिया उठ हरि लवलाही। नभी -----

शब्दार्थ :-
धेनु= गाय  
पय= दूध
कापडी = खांद्यावर कावड घे ऊन तीर्थयात्रा करीत फिरणारा मनुष्य