Thursday 26 July 2018

व्रतस्थ (बालवाडी) गुरु : श्रीमती आक्का लेले


                                 वैनी, का रडवता लेकीला ? काय म्हणते?” हा आवाज कानी पडताच मी मागे वळून पाहिले. आक्का लेले मला विचारत होत्या. मी रोजच्या सारखी माझ्या मुलीची समजूत घालत होते. मी म्हणाले, “अहो काय करायच? तिला इतर मुलांसारखे शाळेत जायचे! ही मुलगी २॥ वर्षांची. हिला शाळेत कोण घेणार? माझा हा रोजचा परिपाठ आहे, तिची समजूत घालणे.” त्या लगेच म्हणाल्या, “मी घेऊन जाईन की तिला शाळेत. मी शाळेतच चालले आहे.” मी त्यांना म्हणाले, “अहो, तिला धड चालता येत नाही.” त्या म्हणाल्या, “त्यात काय ! मी तिला कडेवर घेईन.” लगेच आमचे कन्यारत्न खूष. पाटी- पेन्सिल, दप्तर, डबा वगैरे आयुधांसह सज्ज.

                                    रोज आक्का तिला घेऊन शाळेत जाऊ लागल्या आणि तिला शाळेची गोडी लागली. आपण ऐकतो की, मुले शाळेत जाताना रडतात, हटून बसतात, ऐन शाळेच्या वेळी त्यांच्या पोटांत दुखते, कधीतरी डोके दुखते म्हणतात. पण मला मात्र असा अनुव कधीच आला नाही, ह्याचे कारण शाळेची गोडी लावणाऱ्या आमच्या आक्का लेले’. इतकी वर्षे लोटली. माझ्या मुलीचे (अनुराधाचे) शिक्षण संपून ती आपल्या व्यवसायांत रमली.
                                           आक्कांची माझी बऱ्याच वर्षांत भेट-गाठ नाही. पण अधू-धून त्या माझ्या मनांत डोकवतात. त्यांचा विचार जरी माझ्या मनांत आला की, माझ्या मनःचक्षूसमोर त्यांची ठेंगणी- ठुसकी, सावळी, नीटनेटकी साधी व स्वच्छ सुती नऊ वारी पातळ नेसलेली, केसांचा अंबाडा घातलेली मुर्ति उभी रहाते. खर सांगायचे तर त्यांचे पूर्ण नाव ही त्याकाळात कुणाला माहित नव्हते. ‘त्यांचे शिक्षण किती झाले आहे ?’ हा प्रश्नही आमच्या मनात येत नसे. एवढेच माहित होते की त्या विवा आहेत व राणी वनमध्ये लहान मुलांना शिकवितात. त्या त्यांच्या दोन भावांमध्ये रहातात. त्यांचे भाऊही फार सज्जन व सरळमार्गी होते. हिण-भावांचे नाते अतुट कसे असावे ? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे लेले कुटुंब. आक्का तशा अबोल होत्या. कोणाशी मैत्रीचे संबंध त्यांनी जोडले नाहीत, पण कोणाशी वाद-विवाद केले नाहीत. स्वतःच्या दोन भावजयींशी त्या जुळवून घेत. त्या दोघी जावा आक्कांना मानाने वागवत असत. त्यांच्या घरांतून कोणाचे चढलेले आवाजही कधी ऐकू आले नाहीत. आक्का म्हणजे शांत सागर.

                             रोज सकाळी १०:४५  वाजता त्या शाळेत जावयास निघत त्यांच्या बरोबर आजूबाजूचा परिसरातली ४-५ छोटी मुले असत. त्यांत माझी मुलगी. एकवेळ घड्याळ चुकेल पण आक्कांची शाळेत जायची वेळ मात्र ठराविक. त्यांच्या जाण्या-येण्यावरुन लोक आपली घड्याळे लावत असत. ‘आपल काम बर की आपण रेहे आक्कांच्या जीवनाचे तत्त्व असावे.

                                 आक्का जन्मजात शिक्षक होत्या. मुलांचे मानसशास्त्रहा शब्द त्यांना माहितही नसेल, पण प्रत्यक्ष कृतीतून त्यांचे बालमानसशास्त्रावर आधारित अध्यापन दिसत असे. हसत-खेळत अध्यापन हा त्यांच्या अध्यापनाचा केंद्रबिंदू होता. मुलांना त्या अभिनयासह गाणी शिकवत, गोष्टी सांगत, श्लोक शिकवित, विवि खेळ शिकवित असत. अशा अनेक उपक्रमांतून मुलांवर चांगले संस्कार करण्याचे कार्य त्या करित असत. हल्लीच्या अभ्यासक्रमातून पाठांतर नाहीसे झालेले आहे. पाठांतरातून मुलांचे शब्दोच्चार सुधारतात, स्मरणशक्ती वाढते, शब्दसंपत्ती वाढते, ह्याची त्यांना जाणीव होती. हल्ली शिक्षकांचा समाजातर्फे, शासनाद्वारे आदर्श शिक्षकम्हणून सत्कार होतो. मला वाटते त्या काळी ही प्रथा नव्हती. आक्कांचा शासनातर्फे समाजाकडून सत्कार न होऊ देत, पण त्यांच्या सहवासांत आलेल्या विद्यार्थ्यांच्या इतकेच नव्हे तर पालकांच्या मनात त्यांनी मानाचे स्थान पटकाविले आहे.

                                विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण झाल्यावर; त्या अक्षर-ओळख,अंक-लेखन शिकवित असत. तसेच मुलांची पहिलीच्या अभ्यासक्रमाची तयारी आक्का करुन घेत असत. त्याकाळी जु. . रुंग्ठा हायस्कूलच्या आदर्श प्राथमिक शाळेत ह्या मुलांची पहिलीची परिक्षा घेतली जायची. स्वतः आक्का विद्यार्थ्यांना रांगेने नेऊन ह्या परिक्षेला बसवत असत. माझ्या मुलीचे शिक्षण ह्याच तऱ्हेने झाले. तिच्या वर्गातली सर्व मुले-मुली १लीची पास होऊन नव्या शाळेतील दुसरीत गेली. आम्हा पालकांना कोणताच त्रास झाला नाही.

                                  हल्ली आपण पहातो, शाळेत प्रवेशासाठी पालकांना किती खटपटी लटपटी कराव्या लागतात. काही ठिकाणी पालकांचे इंटरव्ह्यू, त्यानंतर डोनेशन त्यात वशिलेबाजी ---- ह्या सर्व चक्रातून फिरल्यावर बालकाचा नंबर लागून शाळा-प्रवेश. ‘मूल जन्माला येण्याआधी शाळेत प्रवेश घेऊन ठेवावा’, हा विनोदही सध्या प्रसिद्ध आहे.

                               माझ्यामते शिक्षक जन्माला यावा लागतो.कोणालाही शिक्षक होता येत नाही. शिकविणे ही कला आहे. ही कला ज्याला आत्मसात करता येते, तोच खरा शिक्षक. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या आक्का लेले.

पुष्कळवेळा वाटते, भारतात उत्तम शिक्षक निर्माण झाले तरच अभिमानाने म्हणू शकू भारत माझा महान.

श्रीमती प्रभा आठवले

माजी शिक्षिका, . . हायस्कूल, नाशिक

Monday 23 July 2018

माझी आत्या - एक समर्पित जीवन


                           

                          लेले आक्का, लेले बाई, आत्याबाईअशा अनेक नावांनी माझी आत्या प्रसिद्ध होती. कारण ती होतीच तशी, तिने आपले सगळे आयुष्य जणु दुसऱ्यासाठी समर्पित केले होते.

                              माझ्या आठवणींमध्ये माझी आत्या म्हणजे आमच्या घरातील एक सदस्यच होती. तिचे वेगळे असे घर नव्हते, कारण ती

विवा होती आणि माझ्या जन्माच्या आधीपासूनच आमच्या घरी ती रहात होती.

                             ती जरी भा - भावजयीमध्ये रहात होती, तरी तिचा भार तिने त्यांच्यावर कधी पडू दिला नाही. दि. १७ ऑगस्ट १९१५ रोजी जन्मलेल्या आत्याचे शिक्षण ७वी पर्यंत झाले होते. त्यामुळे राणी वनयेथे ती बालवाडी शिक्षिका म्हणून तिची नेमणूक झाली होती. नंतर तिला १लीचे वर्ग पण शिकविण्यास दिले गेले. काही वर्षे ती रिमांड-होमध्ये पण शिकविण्यास जात असे. तसेच आमच्या घराजवळील लहान मुलांच्या १ली ते ४थी पर्यंतच्या शिकविण्या ती घेत असे. तिने १९४० साली सृष्टी निरीक्षणम्हणून एक परिक्षा दिली होती. त्या परिक्षेत तिला ५०% मार्क मिळाले होते.

                         घरातील सर्व वरची कामे ती करत असे. उदा. पिण्याचे पाणी भरणे, कपडे धुणे, कपड्यांना इस्त्री करणे. मला आठवते की, आम्हा सर्व भावडांच्या शाळेच्या युनिफॉर्मला १५ ऑगस्ट व २६ जानेवारी ह्या दिवशी ती इस्त्री करुन देत असे. तसेच वडील व काकांच्या कपड्यांना  आठवड्यात एकदा इस्त्री ती करत असे.

                        फावल्या वेळांत शिवण काम करत असे. आम्ही दोघी बहिणी व आमच्या चुलत दोन बहिणी ह्यांचे फ्रॉक कापड विकत आणून ती स्वतः शिवत असे. घरात दोघी वहिनी (माझी आई व काकू) असल्यामुळे स्वयंपाकाची वेळ तिच्यावर फारशी कधी आली नाही. परंतु अडचणीला मात्र ती स्वयंपाक करत असे. अशा तऱ्हेने ती कधीही रिकामी बसली नाही. आजारपण तिला माहित नव्हते.

                     आमच्या घरात आम्ही १३ माणसे रहात होतो. आम्ही सख्खे व चुलत मिळून ८ भावंडे, माझे आई-वडील काका-काकू व आमची आत्या  – ‘कै. पार्वती शंकर लिमये’.

                          माझ्या जन्मापासूनच ती आमच्या घरी होती. त्यामुळे असेल पण, आत्या  ही प्रत्येक घरी कुटुंबात असतेच, असा माझा समज होता. नवरा गेल्यानंतर ती भावांच्या आधाराने राहिली. तिला स्वतःचे मूल-बाळ नव्हते. तिची १ मुलगा व १ मुलगी अशी  दोन सावत्र मुले होती. तिचा सावत्र मुलगा वर्षातून एक-दोनदा तिला भेटायला यायचा. काही भेट-वस्तु, साडी वगैरे गरजेच्या वस्तू तिला देऊन जायचा. तो इंजिनिअर होता. पुण्याला मोठ्या पोस्टवर त्याला नोकरी होती. आता हयात आहे की नाही हे मला माहीत नाही.

                            सावत्र मुलीकडे मात्र ती जात असे. सावत्र मुलीची कोठुरला मोठी शेतीवाडी होती. तिचे कुटुंब पण मोठे होते. त्या मुलीचे आमच्या घराशी चांगले संबंध आहेत. लहानपणी आम्ही आत्यारोर सुट्टीत कोठुरला जात असू.

                             ती कधीही कुणाशी भांडली नाही. तिचा पूर्ण दिवस कामात व्यस्त असे. काही वर्षांनी शाळा वगैरे बंद झाल्यावर ती घरी कधीच स्वस्थ सली नाही. माझ्या मोठ्या चुलत भावाने गाई-म्हशींचा धंदा  सुरु केला. गाई म्हशींचे शेण काढणे, गोठा स्वच्छ ठेवणे ह्यासारखी कामे  तिने आनंदाने केली. ह्या कामात तिला कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही.

                                आज मला कळते की, तिने स्वतःसाठी कधीच काही घेतले नाही. नोकरी करीत होती तरी छान-छोकी केली नाही. स्वच्छ नऊवार पातळ, स्वतः शिवलेले पोलके, केसांचा अंबाडा, हातात फक्त घड्याळ - बस ह्या व्यतिरीक्त कुठलेही दागिने नाही की भारीतली साडी नाही. तिची रहाणी स्वच्छ व टापटीप होती.

                                   ती कधीही रिकाम्या हाताने नातेवाईकांकडे जात नसे. तिचा खाऊ ठरलेला असे. शेवपापडी, दहीवडे दत्त-जयंतीला पेढे, गोळ्या- बिस्किटे. आम्ही घारपुरे घाटाच्या बाजूला रहात होतो, तेव्हा ती रोज पायी रविवार कारंजा येथील तेल्या रामाच्या दर्शनाला जाई व घरी परताना घरच्या देवासाठी फुलपुडा घेऊन येत असे.

                      अशा ह्या शांत स्वभावाच्या कष्टाळू आणि प्रेमळ आत्याला मी कधीही विसरु शकत नाही.

सौ. सुरेखा खरे

इंदिरा नगर,नाशिक