Saturday 28 March 2015

॥ श्रीगुरुचरित्र शब्दार्थ चर्चा॥ - अध्याय बारावा - ओवी क्रमांक १२१


सव्य घालूनि मेरूसी। तीर्थें नवखंड क्षितीसी।
सांगता विस्तार बहुवसी।ऐक शिष्या नामकरणी॥१२-१२१॥     
गद्यरुप :-  
मेरुपर्वताच्या डाव्या बाजूने पृथ्वीवरील नऊ खंडातील तीर्थांना श्रीगुरु गेले.  या तीर्थयात्रेचा विस्तार सांगायला लागलो तर पुष्कळ होईल, नामकरणी शिष्या हे ऐक.

शब्दार्थ :-
 क्षिती=पृथ्वी
बहुवस= पुष्कळ
सव्य म्हणजे डावा हात आणि साचिन् म्हणजे त्याच्या उलट म्हणजे उजवा हात.
अर्जुनाला सव्यसाचिन् हे नाव होते. कारण तो दोन्ही हातांनी धनुष्य धरुन अचूक बाण मारण्यात पटाईत होता.

        ह्या ओवीत उल्लेख केलेल्या,  ‘मेरु’ पर्वताचा उल्लेख हिंदू, बुद्ध, जैन धर्मशास्त्रातील ‘विश्व उत्पत्तिशास्त्रात’ आढळतो. ह्या प्राचीन शास्त्रांनुसार भौतिक, तत्वज्ञान व आध्यात्मिक शास्त्रांचा केंद्रबिंदू ‘मेरु पर्वत’ आहे. ह्या  पर्वताला संस्कृत भाषेत ‘मेरु’, ‘सुमेरु’ तर पाली भाषेत ‘सीनेरु’ ह्या नावाने संबोधतात.
                     मेरु पर्वत हा विश्वाचा केंद्रबिंदू मानलेला आहे. ह्या पर्वताभोवती सूर्य आपल्या ग्रहांसहित फिरत असतो, असा प्राचीन संदर्भ आहे. परंतु आजपावेतो ही गोष्ट सिद्ध करणारा पुरावा मिळालेला नाही.
                     सूर्य सिद्धांतानुसार ‘मेरु पर्वत’ हा  ‘भूगोल मध्य’ म्हणजे पृथ्वीचा केंद्र बिन्दू आहे. परंतु ९व्या शतकातील  अप्रसिद्ध नोंदी नुसार,
‘सुमेरु पृथ्वीच्या मध्यभागी आहे, असे ऐकलेले आहे. परंतु तो पृथ्वीच्या  भूगर्भगोलात दिसत नाही’ :- यमाल तंत्र
              पंच सिद्धांतिकामध्ये ‘वराहमिहीर’ म्हणतात, ‘मेरु पर्वत हा पृथ्वीच्या उत्तरध्रुवावर आहे, परंतु उत्तरध्रुवावर पर्वत नाही.’
श्रीगुरुचरित्रकार म्हणतात
सव्य घालूनि मेरूसी। तीर्थें नवखंड क्षितीसी।
अर्थ:-  मेरुपर्वताच्या डाव्या बाजूने पृथ्वीवरील नऊ खंडातील तीर्थांना श्रीगुरु गेले. 

                 पृथ्वीवर सध्या अस्तित्वात असलेल्या सप्त खंडांची नावे :-
१)            अफ्रिका
२)            अमेरिका
३)            अंटार्टिका
४)            आशिया
५)            ऑस्ट्रेलिया
६)            युरोप
७)            ओशियाना
URL: http://hi.wikipedia.org/wiki/पृथ्वी का हिन्दू वर्णन
या विकीपिडियात हिन्दू धर्मशास्त्रात केलेले पृथ्वीवरील सात खंडांचे वर्णन दिलेले आहे.

                      श्रीनृसिंहसरस्वतींचा अवतार इसवी सन १३७८ ते १४५८ ह्या कालावधीतील आहे. त्यानंतर सुमारे १०० वर्षांनी श्रीगुरुचरित्राची रचना झालेली असल्याने, श्रीनृसिंहसरस्वतींच्या बदरीवन ते गंगासागर ह्या तीर्थयात्रेची माहिती श्रीगुरुचरित्रकारांना उपलब्ध झालेली नसावी, असे वाटते.
              श्रीनृसिंहसरस्वतींच्या काळात (१५व्या शतकात) तसेच श्रीगुरुचरित्र रचना काळात (१६ व्या शतकात) पृथ्वीवर आजच्या सारखे सात खंड असावेत,  तसेच मेरु पर्वताच्या डाव्या बाजूने  म्हणजे निश्चित कोठे ? हा बोध होत नाही !
               ह्या विषयी योग्य माहितीसहित तज्ज्ञ लोकांनी खुलासा करावा, ही विनंति.
                    प्राचीन हिन्दू धर्मग्रंथां पृथ्वीवरील ‘९ खंड’ तसेच ‘मेरु’ पर्वत असे उल्लेख आढळतात.
                  भौगोलिक दृष्ट्या पृथ्वीच्या भूगर्मात सतत बदल होत असतात.
           सुमारे साडे सात कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील दक्षिण गोलार्धात  ‘गोंडवन’ हा महाखंड होता, असे भौगोलिक अनुमान आहे. ‘गोंडवन’ ह्या महाखंडाचा एक भूपृष्ठ अलग होऊन हळूहळू नैऋत्य दिशेला सरकू लागले. हे भूपृष्ठ सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी आशिया खंडाला येऊन धडकले. ह्या जागी अतिप्राचीन काळी असलेल्या समुद्राच्या जागेवर हिमालय पर्वताची निर्मिती झालेली असावी. समुद्राचे रुपांतर दलदलीत होऊन नद्यांनी आणलेल्या गाळातून गंगेचे सुपीक खोरे निर्माण झाले असावे.
         २००९ मधील भूगर्भीय संशोधनानुसार भारत भूमी दरवर्षी ५ सेंटि मीटर वेगाने ईशान्य दिशेकडे सरकत असावी असे अनुमान आहे.
                    १९६३ साली कोयना धरणाची निर्मिती झाली. १९६७ साली झालेल्या कोयनावरील प्रचंड भूकंप काळात नासिकचे भौतिकशास्त्र प्राध्यापक कै. रा. द. आठवले कोयनाधरणक्षेत्रात भूकंप अभ्यासासाठी जाऊन राहिले होते.
            प्राध्यापक आठवलेसरांच्या संशोधनानुसार  पृथ्वीच्या  भूगर्भातील स्तरांच्या एकमेकांवर आदळण्यातून कोयनेचा भूकंप झालेला असावा असावा.
भारतीय भूखंड असलेला, पृथ्वीचा स्तर उत्तरेकडे कोट्यावधी वर्षांपासून सरकत आल्याने, हिमालय पर्वत निर्मीतीप्रमाणेच, पश्चिमेकडील सह्याद्रीपर्वतरांगा निर्मिती तसेच द्वारकानगरी समुद्राच्या तळाशी जाणे, ह्या भौगोलिक घटना घडलेल्या असाव्यात.
                   कै. रा. द. आठवलेसरांच्या  १९६७ सालच्या कोयना धरण भूकंप संशोधनातील निष्कर्ष :-
१)            २०शतकाच्या अखेरीस तसेच २१व्या शतकाच्या सुरवातीला, प्रचंड मोठ्या धरणीकंपांचा सामना करावा लागेल, असा अंदाज वर्तविलेला होता.
२)             त्यांच्या मते हे भूकंप भूगर्भस्तरांच्या एकमेकांवर चढण्याच्या प्रक्रीयेतून होतील.
३)            २०शतकाच्या अखेरीस ‘किल्लारीचा भूकंप’(दिनांक ३० सप्टेंबर१९९३), ‘जबलपूर येथील भूकंप’ (दिनांक २२ मे १९९७) तसेच २१व्या शतकाच्या सुरवातीला ‘भूज गुजरात’ येथील भूकंप (दिनांक२६ जानेवारी २००१) झालेल्या भीषण भूकंपात वरील अनुमानांची ग्राह्यता पटते. 
ह्या सर्व भौगोलिक संशोधनांचा अभ्यास केल्यावर, हिमालय निर्मितीपूर्वी पृथ्वीवर नऊ खंड असावेत, असे आम्हाला वाटते.
               परंतू हिमालय निर्मितीच्यावेळी झालेल्या नैसर्गिक आपत्तीने भरतखंडातील चराचरास नष्ट केल्याने, नव खंड व मेरु पर्वत यांविषयीचे  सबळ पुरावे उपलब्ध नसावेत, असे दिसते.

॥श्रीगुरुदेवदत्त॥