Sunday 14 August 2016

‘शास्त्रीय कुंभ : सिंहस्थ, नाशिक’

                            दि. ११ ऑगस्ट २०१६ रोजी, नाशिक येथील सिंहस्थाची समाप्ती पारंपारिक प्रथेने झाली. गोदावरीमातेच्या मंदिराची कवाडे नाशिककरांनी श्रद्धेने बंद केली. गोदावरी मातेचे दर्शन पुढील सिंहस्थात एक तपाने होणार ! ह्या परंपरेमागे काही भौगोलिक इतिहास आहे का ? परंपरा ही श्रद्धेने जपावयास हवी, परंतु त्यामागचे सत्य शोधून काढावयास हवे.
                      वास्तविक दर वर्षी आषाढात येणारा गोदावरीचा पूर ही आमच्या नाशिकमधील एक पर्वणी असते.  नाशिकला आषाढमहिन्यात (जुलै अखेरीस) १-२ वेळेला ‘देता किती घेशील, तू दो कराने’ असा प्रचंड पाऊस पडतो. ह्या पावसाने तुडुंब भरलेली गोदामाय आपल्या बहिणीसह(उपनदी-नासरडीनदी) नाशिककरांना भेटायला येते. तिच्या पूररेषेच्या आतील सर्व गोष्टी   वाहून नेते.
                  प्राचीन काळी पाण्याच्या गरजेपोटी, गोदावरी नदीकाठी वसलेले जुने नाशिक जलमय होते. नासरडी नदीच्या पुराचे पाणी कांबळेवाडी, द्वारका ह्या भागाला भेट देते.
                    गोदावरी नदीने स्वतःचा गाळ कापत कातळ गाठलेला असल्याने, नदीचे पात्र रुंदावण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे, असे भूगर्भशास्त्र सांगते. गोदावरी नदीच्या जन्मकथेनुसार, प्राचीन काळी गौतम ऋषींनी ह्या नदीचा उगम शोधला. त्या काळात नाशिक क्षेत्री प्रचंड दुष्काळ पडलेला होता. गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावरील जटामंदिर, गंगाद्वार, गोमुख, कुशावर्त त्र्यंबकेश्वर अशा विविध ठिकाणी असलेली गोदावरी नदीची उगम स्थाने शोधली.   
                      भूगर्भशास्त्र अनुमानानुसार, (सुमारे ६कोटी वर्षांपूर्वी) दख्खनचे पठार निर्मितीच्या वेळी झालेल्या ज्वालामुखीतून ब्रह्मगिरी, अंजनेरी, निलय ह्या पर्वतरांगांची निर्मिती झाली. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हारसाने, ब्रह्मगिरी पर्वत रांगा आच्छादित झाल्या. ह्या लाव्हारसात पावसाचे पाणी धरुन ठेवण्याची क्षमता आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर पसरलेला लाव्हा रस  नदीला पाण्याचे स्त्रोत पुरवितो. ब्रह्मगिरी पर्वतावरुन ही नदी तीन  प्रवाहात उतरते. ह्यापैकी एका प्रवाहातून वैतरणा नदी तयार होते. उरलेल्या दोन प्रवाहातून तयार होणारी गोदावरी नदी, चक्रतीर्थ स्थानापासून सलग प्रवाहित होते.
                    ब्रह्मपुराणात ह्या इतिहासाचे खूप सुंदर वर्णन आहे. सृष्टि निर्माण कर्ता यज्ञ करण्यास बसला. त्याने कुशामध्ये (गवतामध्ये) वर्षा ऋतु ठेवला. सृष्टी निर्माण कर्त्याच्या यज्ञातून ब्रह्मगिरी पर्वत निर्माण झाला. ह्या वर्णनातील सृष्टी निर्माण कर्त्याचा यज्ञ म्हणजे ज्वालामुखी  व कुशामधील (गवतामधील) वर्षाऋतु म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावरील लाव्हारस असावा, असे दिसते.
                     जटामंदिर ह्या स्थानी लाव्हारसात असलेल्या चिरांमुळे जटासदृश्य रचना दिसते, म्हणून ह्या स्थानास ‘जटामंदिर’ म्हणत असावेत.
                           त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थानी सतत गोदावरीचा प्रवाह उगम पावताना दिसतो.
त्र्यंबकेश्वर= त्रि +अंबक (अंब=पाणी) + ईश्वर
                 ज्योर्तिलिंग स्थानी शंभू महादेवाची पिंड नसून ब्रह्मा (उत्पत्ति),  विष्णु (स्थिती= पालनकर्ता)  व  महेश (तम= संहारक) अशी तीन स्थाने आहेत.
               त्र्यंबकेश्वर स्थानास प्राचीन काळी ‘त्रिकालसंध्या क्षेत्र’ असे नाव होते. ह्या ठिकाणी अंजनेरीच्या पायथ्याशी रहाणारे लोक जप, ध्यान-धारणा करण्यासाठी दिवसा जात असत. शिवाजी महाराजांनी जव्हार मार्गे सुरत- स्वारीवर जाताना, त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वराची व्यवस्था ठेवण्यासाठी, अंजनेरी डोंगराच्या पायथ्याशी रहात असलेल्या गावकऱ्यांना त्र्यंबकेश्वरी वसविले. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या ज्योर्तिलिंग व्यवस्थेतून ह्या क्षेत्राचे ‘त्र्यंबकेश्वर’ नाव प्रचलित झाले. पुढील काळांत पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर बांधले.
                   उत्पत्ति, स्थिती, लय ह्या सृष्टीच्या तीन स्थिती नाशिक क्षेत्रानी अनुभवल्या असाव्यात, असे पुराणातील संदर्भानुसार व नाशिक येथे आढळणाऱ्या चिकण मातीच्या प्रचंड ढिगांवरुन दिसते.
             ब्रह्म पुराण अध्याय ८९ श्लोक क्रमांक ४५ नुसार
अरुणावरुणानद्योर्गड्गायां संगमः शुभः।
देवानां तत्र तीर्थानामागतानां पृथक्पृथक्॥८९-४५॥
              ह्या श्लोकाचा अर्थ  = अरुणा व वरुणा ह्या नद्यांच्या संगमस्थानी गंगा नदीचा होणारा संगम शुभ आहे. त्या ठिकाणी त्या संगमस्थानी देव परत-परत येत असत.
                     अरुणा व वरुणा यांच्या नाशिकक्षेत्री असलेल्या संगमात गंगा नदी उगम होत असावी. रामकुंड येथे गोदावरी नदीचा प्रवाह दक्षिणेकडे वळत असल्याने ह्या नदीस ‘दक्षिण वाहिनी गंगा’ म्हणतात. पुराणकाळात नाशिकक्षेत्री मोठे जलाशय असावे.  हे सरोवर निर्माण करणारी अरुणा नदी काळाच्या ओघात लुप्त झालेली दिसते.
                  ‘वरुणा नदी कुशावर्ती’असे श्रीगुरुचरित्रकार म्हणतात. (अध्याय १५-ओवी क्रमांक  ३१,४५) 
                        पुराणकालीन तसेच श्रीगुरुचरित्रकालीन असलेली वरुणा नदी म्हणजे आजची गोदावरी नदी असावी असे दिसते.
                      नैसर्गिक किंवा मनुष्य निर्मित आपत्तीतून,अरुणा नदी लुप्त होणे, नाशिक येथील सरोवर नष्ट होऊन गौतम ऋषींच्या काळात लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागणे,  ह्या घटना घडल्या असतील तर सध्याची गोदाकाठची तसेच ब्रह्मगिरीवरील जंगलतोड व मनुष्य निर्मित सिमेंट जंगल (सध्या नदीतीरावर होणारी बोअरवेलसहित सुसज्ज घरे तसेच सुशोभिकरण करताना होत असलेले कॉंक्रिटीकरण) नाशिकच्या सर्वनाशास कारणीभूत ठरतील.
                      नाशिकचे सेवाव्रती होमिओपाथिक डॉ. रत्नाकर पटवर्धन यांचे अप्रकाशित संशोधन ‘तळ्यातील शहर –नाशिक’  गोदावरीनदीची भौगोलिक माहिती देते.  

                  डॉ रत्नाकर पटवर्धन साहेब (सेवानिवृत्त भूगर्भ शास्त्रज्ञ, मेरी नाशिक) तसेच जलतज्ज्ञ डॉ. राजेन्द्रसिंहजी अशा तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्यातून नाशिक शहर विकसित करणे, हीच गोदावरीप्रती कृतज्ञता.
                                                        www.shrigurucharitra.com