Saturday 15 October 2016

वाचन प्रेरणा दिन - को जागरती

                          आज दि. १५ ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती तसेच भारतीय क्षेपणास्त्रशास्त्राचे जनक डॉ. अब्दुल कलामसाहेब यांची जयंती. हा दिवस वाचक प्रेरणा दिनम्हणून साजरा करण्याचे शिक्षणखात्याने ठरविल्याची बातमी वाचनात आली. मोबाईल - गुगल युगातील हा उपक्रम स्तुत्य आहे, परंतु ऑक्टोबर महिना म्हणजे सहामाही परिक्षांचे दिवस. अभ्यासाच्या ताणाने थकलेले विद्यार्थी तसेच पेपरच्या गठ्यांनी बेजार झालेले शिक्षक, ह्यांना वाचनाची प्रेरणा ह्या एका दिवसात देता - घेता येईल का ? एखाद्या खाऊन अजीर्ण झालेल्या माणसासमोर पंचपक्वानाचे ताट ठेवल्यावर ती व्यक्ती अन्नग्रहण करु शकेल का ?
                             ‘गोष्टी युक्तीच्या सांगेन चारअशा सेवानिवृत वयातील आमची पिढी. स्वाभाविकच बालपणी अनुभवलेली वाचन प्रेरणा स्रोत आठवू लागते. आत्मप्रौढी म्हणून नाही परंतु आमच्या गुरुजनांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजविलेल्या वाचन प्रेरणेचा इतिहास साकारायचा हा एक छोटासा प्रयत्न.
                             इयत्ता दुसरी, मुरलीधर मंदिर (सांगली) ह्या वर्गात वाचन ह्या शब्दाची प्रथम ओळख करुन दिली ती आमच्या फडकेबाईंनी. शाळा सुटायच्या आधी त्या आम्हाला अवांतर पुस्तके वाचून दाखवायच्या. नुकतीच अक्षर ओळख झालेला आमचा वर्ग अवाक होऊन ते वाचन ऐकायचा. त्या पुस्तकातील गोष्टीत रमायचा. आपल्यालाही फडके बाईंसारखे वाचता आले पाहिजे, ह्या जिद्दीतून मिळेल ते चिटोरे, दुकानावरच्या पाट्या असा वाचन प्रवास सुरु झाला. एकदा आमच्या वाड्यातील कोणाचे तरी तोंड आले म्हणून तवकील’  पाहिजे होते. मोठ्या लोकांच्या गोष्टी ऐकून आम्ही तत्परतेने माहिती पुरविली, “आम्ही एक पाटी वकीलम्हणून वाचलेली आहे. बहुतेक पाटी लिहिताना, ते लोक लिहायचे विसरुन गेले असतील. मोठ्या लोकांनी आम्हाला हसून खेळायला पिटाळले.
                                  वडिलांच्या  सांगलीतील आत्याबाईंना देवाज्ञा झाली. आत्येसासूबाईंचे करण्यासाठी सांगलीला गुंजूमामा करमरकरवाड्यात राहिलेली आमची आई बुलढाण्याला आली. इतके दिवस आमचे वडिल एकटेच बुलढाण्याला नोकरी निमित्त्य रहात होते. आम्ही मुले बुलढाण्याच्या शाळेत
जाऊ लागलो.
                        एडेड स्कूल मधील इयत्ता ५वीतला  गणिताचा तास खूप आवडायचा. डोंगरेसर गणित विषय  संपवून  गोष्ट सांगायला सुरवात कधी करतात? इकडे लक्ष असायचे. आमचे डोंगरेसर १८५७चे स्वातंत्र्यसमरह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकातील  प्रसंग, गोष्टी आपल्या ओघवत्या भाषेत रंगवून सांगायचे. सर्व वर्ग शांतपणे ऐकत असे. शाळा सुटण्याची बेल झाली की गोष्ट बंद. मनात उद्याच्या गोष्टीचे वेध लागायचे.
                                   चांगल्या लेखनाचे संस्कार व्हावेत म्हणून आमच्या वर्तकबाई अभ्यासक्रमा व्यतिरिक्त पुस्तकांत असलेली सकाळ, संध्याकाळ,
नदीकिनारा ह्यांचे वर्णन असलेले परिच्छेद पाठ करावयास सांगत. प्रसंगानुरुप त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी निबंधात करावा, असे शिकवित. आपोआप पाठांतर व अवांतर वाचनाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असे. आमचे मराठी विषयाचे पेपर नामजोशीसरांनी तपासले. माझा पेपर देताना सर म्हणाले, “ह्या पेपरचा प्राणी   खूप हुशार आहे. ‘प्रवासवर्णनह्या निबंधात संध्याकाळचे वर्णन घालण्यासाठी प्रवासाची गाडी लेट केली आहे.
                   बालवयात अशा लेखन करामती करत असताना, न कळत माझा कविता - कथा लेखन असा प्रवास सुरु झाला.
                          एकदा आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला पत्र लेखनिक म्हणून आम्ही भावडांनी भूमिका बजावली. पोस्ट कार्डावर तिने सांगितलेला मजकूर मी लिहिला. स्वतःच्या बाहेरगावी असलेल्या घरधन्यास (यजमानांना) पत्र लिहिताना, दर एक वाक्यानंतर तुम्ही खुशाल आम्ही खुशालअशी खुशाली लिहिण्यास ती बाई सांगत होती. पत्र लिहून पूर्ण झाले. पोस्टकार्डावर नाव लिहिण्याची वेळ आली. त्याकाळी नवऱ्याचे नाव बाई उच्चारायला तयार होईना. तिने मला सांगितले, “उडत ते, उडत ते !” आम्ही भावंड हे कोडे सोडवायला बसलो. कोणीतरी म्हणाले, “कबुतर”. बाई म्हणते, “हां बरोबरपण परत आपले साभिनय उडत ते, उडत ते!” सुरु झाले. आम्ही  भावंडे तिला पक्ष्यांची नावे सांगत होतो. कोड सुटत नव्हते. तेवढ्यात कोणीतरी म्हणाले, “कावळा”. बाई म्हणाली, “जवळ आले, जवळ आले”. तेवढ्यात दुसऱ्याने सांगितले, “पोपट”. बाईचे उत्तर दूर गेले, दूर गेले”. ‘चिऊताईकोणाला आठवेना. कावळा म्हणजे उत्तराच्या जवळ आलो, ह्या  clueवरुन अखेरीस चिमणीआठवली. चिमणरावांना खुशालीचे पत्र टाकायला, आमची कामवाली खुषीत रवाना झाली.
                                   आपल्यासारखे ह्या कष्टकरी वर्गाला लिहिता वाचता यायला पाहिजे, असे त्याकाळी वाटायला लागले. आमची मॅट्रिकची परीक्षा झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत साक्षरता प्रसाराचे वर्गआमच्या शाळेत जाहीर झाले. मी   ह्या वर्गात दाखल झाले.  आम्ही अभ्यासक्रम पूर्ण केला. उत्साहाने आजूबाजूच्या घरातून पाटी-पेन्सिली गोळा करुन, आम्ही  झोपडपट्टीत बायकांना शिकवायला गेलो. त्या संसारी बायका अ,, , --- गिरवायला वैतागल्या. “इथे पाटी गिरवत बसलो तर घरी भाकऱ्या कोण करणार ?” असेम्हणून पाट्या तेथेच टाकून निघून गेल्या, पण हा प्रसंग आम्हाला खूप काही शिकवून गेला असावा.

                                      लग्नानंतर नासिकला घराजवळ रहाणाऱ्या माझ्यापेक्षा वयाने  ज्येष्ठ बाईंनी माझी मॅट्रिकची शिकवणी घ्याल का ?” म्हणून मला विचारले. साक्षरता प्रसार मोहिमेतील संसारी बायकांचा अनुभव गाठीशी असल्याने, मी त्यांना सांगितले, “सांसारिक जबाबदारी सांभाळून तुम्ही शिकणार तसेच मध्यंतरीच्या काळात तुमची खूप गॅपही गेली आहे. मी शिकवीन पण तुम्ही एक वर्षात मॅट्रिक न होता २-३ वर्षांत पास होऊ शकाल.” ह्या मध्यमवयीन विवाहित बाई जिद्दीने माझ्याकडे शिकवणीला यायला लागल्या. मला एक शांत, सोज्वळ, सुंदर विद्यार्थिनी मिळाली. ३ वर्षांनी ह्या बाईंना मी परीक्षेला बसण्यास सांगितले. बाई मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांनी मॉन्टेसरीचा कोर्स करुन सर्व्हिस केली. सेवानिवृत्त झाल्या. सध्या त्या हयात नाहीत परंतु जन्मभर त्या मला मान द्यायच्या. त्यांच्या नाती म्हणायच्या, “आजी, ह्या काकू तर तुझ्यापेक्षा कितीतरी लहान आहेत त्या कशा तुझ्या बाई?”
                               सारडा कन्या विद्यामंदिर, पुष्पावती विद्यालय, भोसला मिलिटरी स्कूल ह्या शाळांमध्ये B.A. झाल्यानंतर शिक्षिका म्हणून काम केले. B.Ed.झाल्यावर गव्हर्न्मेंट गर्ल्स हायस्कूल (नासिक) ह्या शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाले. ह्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी, सहकाऱ्यांनी, मुख्याध्यापिकांनी माझे शिक्षकी जीवन समृद्ध केले. कुसुमाग्रजांची मानसकन्या नासिकची प्रतिथयश कवयित्री रेखा भांडारेशाळेत १० मिनिटांच्या सुट्टीत, मधल्या सुट्टीत स्वतः केलेली कविता दाखवायला यायची. रेखा भांडारे तसेच विद्या टिळक, डॉक्टर वृंदा भार्गवे ह्या लेखिका घडताना आम्ही अनुभवल्या आहेत. शिक्षणतज्ज्ञ भावना ताई भार्गवे विविध पुस्तकांचे परीक्षण शिक्षकांना सेंट्रल हॉलमध्ये सादर करायला सांगत. ह्या उपक्रमातून अवांतर वाचन प्रेरणेची ज्योतशाळेत सतत तेवत असे.
                            रोजच्या वर्तमानपत्र वाचनातूनही मनुष्याला वाचन प्रेरणामिळू शकते. वयानुसार वाचनाच्या आवडी बदलतात. बालवयात परीकथा, राजा- राणीच्या गोष्टी, किशोरवयात वीरपुरुषांची चरित्रे, शौर्य कथा; तरुणाईत विज्ञान कथा, कादंबऱ्या, नाटके, रहस्यकथा; मध्यम वयात पुस्तकांची परिक्षणेनाटक सिनेमांची समीक्षा; सेवानिवृत्तीनंतर पुराणकथा, दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग वगैरे थोडासा अध्यात्माकडे कल झुकतो. काहींचा ओढा भक्तीह्या सदरात मोडतो तर काहींचा कल अंतिम सत्य काय?’ ह्या प्रश्नाचे उत्तर शोधतो.
                                  मी रोज वर्तमानपत्र वाचते व त्यातील बातम्या इतरांना सांगते, हा माझा स्वभाव. सेवानिवृत्तिनंतर रिक्षाने गावातील कामे करीत असताना, एक रिक्षावाला माझ्या सहवासात आला. माझे काम संपेपर्यंत माझ्या पिशवीतील लायब्ररीचे पुस्तक वाचता-वाचता, त्याला वाचनाची गोडी लागली. त्याने ही दैनंदिन पेपर विकत घ्यायला सुरवात केली. सध्या त्याने रिक्षा व्यवसाय बंद करुन, व्हॅनने शाळेची मुले ने-आणण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. संध्याकाळी वस्तीतील लोकांना तो पोथ्या, दासबोध वगैरे वाचून दाखवितो.
                            शाळा कॉलेज शिकून सुस्थापित आयुष्य जगणाऱ्या प्रजेच्या ह्या गोष्टी.  अंगठेबहाद्दर प्रजेला साक्षर करण्यासाठी अ, , ---- , का कि, की  ------ बाराखडी पद्धत कंटाळवाणी ठरते. आमच्या घरी काम करणाऱ्या दोन बायकांना २-३ महिन्यात वाचायला शिकविताना मी वेगळी पद्धत वापरली. मी प्रश्न विचारत असे, “आज स्वयंपाक काय केला?” भाजी, भाकरी, भात, भरीत ह्या उत्तरातून हे अक्षर शिकविल्यावर, ‘रवाह्या शब्दासारखे रवा, खवा, हवा, तवा ही उत्तरे देण्यात त्यांना गंमत वाटायची. ‘वाअक्षर घटले जायचे. अशा पद्धतीने भाज्यांची, फळांची, फुलांची नावे करता - करता त्या स्वतःहून घरच्या लोकांची नावे लिहू लागल्या.
दोघींच्यापैकी एका बाईने पेपरमध्ये येणाऱ्या लहान मुलांच्या गोष्टी, पाककृती वगैरे वाचून स्वतःचे लेखन वाचन वाढविले. आजही ती नवीन वाचलेल्या गोष्टी लोकांना सांगते.
दुसरी बा ई २-२॥ महिन्यात वर्तमानपत्रातील ठळक बातम्या वाचत असे. तिच्या एका पत्रकार नातेवाईक बाईने तिला विचारले, “तुला कोणी शिकविले, इतक्या थोड्या दिवसांत?” पण तिने आपले वाचन वाढविले नाही. मी तिला सांगितले, “मुले अभ्यासाला बसली की, तूही काहीतरी वाचत जा. अडले तर मुलांना विचार.” पण तिने मनावर घेतले नाही. बसवरच्या पाट्या वाचता येणारी व्यक्ती अक्षर ओळख विसरायला लागली.
                           जीवनात आलेले हे साक्षरता प्रसारातील अपयश आमच्या काळातील पाठांतराचे महत्त्व अधोरेखीत करते. शाळा सुटण्याच्या आधी १० मिनिटे वर्गातून पाढे म्हणण्याची प्रथा होती. ‘२९ साते किती?’ ह्याचे उत्तर मागची पिढी अजूनसुद्धा पटकन देते. मेंदूरुपी संगणकाला पाढे, कविता ह्या ड्र्रिलची बालपणी गरज आहे.
                       आमचे शिक्षक अ व ब  कडी अशा मुळाक्षरांच्या भेंड्या (सध्याची अंताक्षरी) घेत असत. , , --- ह्या शब्दांनी सुरु होणाऱ्या कविता अजूनही आठवतात. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीतजात, भाषा प्रांतभेद विसरुन सहभागी झालेला समाज यशोधनपुस्तकातील कवितेत साकारलेला आहे.
                               औरंगजेबाच्या पंज्यातून सहिसलामत बाहेर पडलेल्या बाल संभाजीराजांना सांभाळणाऱ्या  उत्तरप्रदेशातील ब्राह्मणाचे काव्यरुपी  मनोगत:-
कोणाचे तरी पोर, म्हणूनही माझेच हे पाडस
संभाजी नच हा करु, कसे हे घातकी धाडस
ह्याचा घेशील का मुका, न इतके ताटात एका बसू
झाला रे भ्रष्ट तया द्विज, कुणी आम्ही द्विजा त्या हसू
                                       कळत न कळत वाचन - पाठांतरातून भाषेची शुद्धता, स्पष्ट उच्चार, शुद्ध आचार प्राप्त होतात. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे भारतीय महासत्तेचे स्वप्न साकार करण्यासाठी आमच्या पिढीला मिळाला तसा दैनंदिन वाचन प्रेरणा दिन२१शतकातील विद्यार्थ्यास  मिळावा ह्या सदिच्छा.
               
   ॥ जय श्रीगुरुदेव दत्त॥
                                                                            प्रभा आठवले
                                                                   सेवानिवृत्त शिक्षिका, नाशिक
www.shrigurucharitra.com