Saturday 16 July 2016

गुरुपौर्णिमा ----- १००वर्षांपूर्वीची काव्यबद्ध गुरुवंदना

          गुरुवंदना
                         {चाल - आनंदाने पुसे पार्वती}
धाधाव रे आता तवपदी दे ठाया।
निजकृपेची नौका करुनी तारी रे गुरुराया॥धृ॥
दिवसामागूनी दिवस चालले सकल आयुष्याचे
मदां होऊनी नाही गाईले हरी गुण वाचे
वसागरी संसारात बुडाले हे मन साचे॥१॥
धाधाव रे ----- धृ
चुकले मुकले बघुनी सर्व विषय वैवाचे
अवघे गुण सर्वही मानले विषय-शाश्वतेचे
नाही पुजिले गेले क्षण वाया आयुष्याचे॥२॥
धाधाव रे ---- धृ
काही आठवले मनी कळे जन करु हरीचे
कर रुनी शरण रिघुनी अनन्य भावे साचे
विषय त्यजूनी या देही गुण गाऊ प्रभूचे॥३॥
धाधाव रे ---- धृ
तल्लीन होऊन क्तीने गुण गाऊ संतराया
कृपाप्रसादे प्रसन्न चित्ते असू दे तव छाया
दे मज शक्ती बोल राधेचे तव गुण गाया ॥४॥
धाधाव रे ---- धृ
                            ------ कवयित्री कै. राधाबाई आठवले

Wednesday 6 July 2016

जरंड्याचा वायूसुत - १००वर्षांपूर्वीचे काव्यदर्शन


                                  (चाल: ‘चरण कमल ज्याचे’ ह्या गाण्याप्रमाणे)
ध्यायी मना हृदयात
जरंड्याचा वायूसुत॥धृ

कवणेकाळी प्रगटला
ठाव नाही लागला
राघवाची गात लीला
बैसलासे डोंगरात॥ १॥
ध्यायी मना ---॥धृ

हिरवीगार वनस्पती
भोवती शोभे अती
पहाताची होय शांती
चित्ताशी आल्हादीत॥२॥
ध्यायी मना ---॥धृ

पाठीमागे राम उभे
पुढे ब्रह्मचारी शोभे
भक्तांची वाट बघे
रात्रंदिन तिष्ठत॥ ३॥
ध्यायी मना ---॥धृ

सान थोर दर्शनासी
जन येती अहर्निशी
अभय वाटे त्यासी
वज्रदेही रक्षीत॥ ४॥
ध्यायी मना ---॥धृ

सप्ताहामध्ये उत्सवासी
बहूत जन मुक्कामासी
सकळांना भोजनासी
बलभीम पुरवित॥ ५॥
ध्यायी मना ---॥धृ

रुद्र पूजा करुनी
वस्त्रे भूषणे सजवूनी
पक्वान ताटे दर्शवूनी
आरती करुनी समर्पित॥ ६॥
ध्यायी मना ---॥धृ

चैत्रमासी पौर्णिमेला
अंजनीसुत जन्मला
काय वर्णू जन्मलीला
इच्छिलेले पुरवित ॥ ७॥
ध्यायी मना ---॥धृ

मारुतीराया तुझी किर्ती
जाणे एक सीतापती  
तिथे मानवाची मती  
मंद मंद चालत॥ ८॥
ध्यायी मना ---॥धृ

जन्मताक्षणी भास्कराला
फळ म्हणूनी रीला
थक्क करी स्वमातेला
न्य जगी हनुमंत॥ ९॥
ध्यायी मना ---॥धृ

तूच माझी जनक जननी
किती अंत पहासी अजूनी
राधेवरी कृपा करुनी
दावी खूण अंतरात॥ १०॥
ध्यायी मना ---॥धृ
                 ---- कै. राधा आठवले
कै. राधा आठवले (माझी आजी - वडिलांची आई) ही कवयित्री माहेरची सातारच्या मारुतीभक्त कै. नाना कुमठेकरांची कन्या ‘सोनु ताई’. असे सांगतात की, सुवर्ण कांती वर्णाची ‘सोनुताई’ अंधारात उभी असली तरी तिच्या पिवळसर गोऱ्या रंगामुळे स्पष्ट  दिसायची. ह्या सोनुताईला पोथ्यापुराणे वाचता- वाचता मिळालेली प्रचंड शब्दसंपत्ती तसेच यमक जुळविण्याची कनकशुद्ध काव्य प्रतिभेची  प्रचिती ‘जरंड्याचा वायूसुत’ या कवितेत  येते.
                     ------- अनुराधा आठवले (घाणेकर), नासिक

Saturday 2 July 2016

निसर्गदत्त लोणार : वैज्ञानिक तीर्थक्षेत्र (भाग ३ रा)

 लोणार निसर्गशास्त्र न्यास:-
                       लोणार या ठिकाणी शास्त्रीय पर्यटन, ही संकल्पना कृतीत आणणारा जागतिक दर्जाचा  ‘लोणार न्यासउभारल्यास लोणारवासीय व तेथील निसर्ग सुस्थापित होऊ शकतील.
                      न्यास उभारणे म्हणजे मंत्रांनी देवाच्या मूर्तीच्या अवयवांवर देवत्वाची स्थापना करणे.
लोणार न्यासातील देवता असेल तिथला निसर्ग. निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळा, हेच निसर्गदेवतेचे अवयव. प्रयोगशाळांमध्ये होणारे विविधांगी संशोधन हेच ह्या न्यासातील मंत्र होत.
१)         रसायन शास्त्र :
                   लोणार सरोवराचे रसायनशास्त्र सांगते की, लवण म्हणजे मीठ. लवणयुक्त पाण्याचे सरोवर म्हणून ह्या सरोवरास पूर्वजांनीलोणार सरोवरहे नाव दिले असावे.
                    ह्या सरोवराच्या पाण्यातील मीठ व सोडा यांचा उगम कोठे आहे ? अशा प्रकारे समुद्राव्यतिरिक्त इतर ठिकाणी कृत्रिम मीठ निर्मिती करता येईल का ?

                         हे पाणी अल्कालाइन(pH11)आहे. पावसाळ्यात ह्या पाण्याची pHकमी होते. ह्या पाण्याचा फेस चांगला होतो, त्यामुळे पूर्वी स्थानिक लोक शांपू बनवित असत.
                     नैसर्गिक साधनांद्वारे केमिकल न वापरता साबण,  शांपू बनविण्याचा मार्ग.
  
                             लोणार सरोवराच्या खाऱ्या पाण्यात खरच प्लास्टिक विरघळते काअशा प्रकारे पॉलिमर ह्या पाण्यात विरघळण्याचे शास्त्रीय कारण काय व ह्या मिश्रणातून जैविक इंधन मिळविता येईल का ? अशाप्रकारचे प्रयोग पुण्यनगरीतील (पुण्याचे) शास्त्रप्रेमी मंडळींचे चालू आहेत. हे लोक दर महिन्याला लोणारला भेट देऊन तिथे पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करुन घेऊन, परत पुण्याला जाऊन त्यांचे प्रयोग करतात. त्यांच्या ह्या परिसर स्वछतेच्या मोहिमेमुळे लोणार प्रदुषित झालेले नाही.
                          लोणार न्यासानी ह्या प्रयोगांची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास, जैविक इंधन विषयक संशोधनाची प्रगती लवकर होईल तसेच न्यास निर्मितीतून उपलब्ध होणारे शास्त्रीय पर्यटन येथे प्लास्टिकचा  (कॅरीबॅगचा) कचरा निर्माण करणार नाही.
         अशा अनेक प्रश्नांची उत्तरे रसायन शास्त्र प्रयोगशाळेत मिळू शकतील.

)  भूगर्भशास्त्र :
                          सुमारे ५लाख ७०हजार वर्षांपूर्वी  अवकाशातून झालेल्या उल्कापातात एखाद्या ग्रहाचे तुकडे  झालेल्या दगडांच्या माऱ्यात प्रचंड उष्णता निर्माण झाली असावी. ह्या उष्णतेने येथील वाळूचे काचेत रुपांतर केल्याने, इथे काचमिश्रित माती आढळते.                          
                         अशा प्रकारची काचमिश्रित माती चंद्राच्या पृष्ठभागावर आढळते. कारण अति प्राचीन भारतीय धर्मशास्त्र चंद्राला पृथ्वीचा मुलगा मानते. श्रीगुरुचरित्र आशय अध्याय ४था तसेच आधुनिक शास्त्राच्या अनुमानानुसार, मंगळसदृश्य ग्रह पृथ्वीवर आदळून पृथ्वीनिर्मितीच्या वेळी पृथ्वीचा एक तुकडा अवकाशात जाऊनचंद्रहा पृथ्वीचा उपग्रह तयार झाला असावा. चंद्रनिर्मितीच्या भौगोलिक घटनेच्या वेळी निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेने चंद्रावरची माती काचमिश्रीत आहे.
                               भविष्यात अंतराळ संशोधनासाठी मानवी वसाहत  चंद्रावर निर्माण करणे, ही काळाची गरज आहे. ह्या थांब्यामुळे अंतराळातील दूरच्या मोहिमा मानवास करता येतील. चंद्रावर जर शेती करता आली तरच ह्या मानवी वसाहती स्वयंपूर्ण होऊ शकतील. ह्या शेतीच्या प्रयोगासाठी लागणारी  चंद्रसदृश्य कृत्रिम वातावरण निर्मिती लोणार न्यासात करता येईल. ह्या शेतीच्या प्रयोगासाठी लोणारची काचमिश्रित माती (चंद्राच्या भूपृष्ठभागावर अशीच काचमिश्रित माती आहे) खूप मोठे योगदान ठरेल.

                     लोणार येथे झालेल्या उल्कापातातील दगडात चुंबकत्व आहे. ह्या दगडाचा उपयोग करुन झोपलेल्या स्थितीत ठेवलेली वीर मारुतीची मुर्ति, मोठा मारुती मंदिरात आढळते. लोणारवासीयांच्या मते, ह्या मारुती जवळ चुंबकसूची नेली असता, ती उलटी फिरते. अशा ह्या लोणारच्या चुंबकत्व असलेल्या दगडाचा शास्त्रीय अभ्यास लोणार न्यासात करता येईल.
                          ‘मोठा मारुती मंदिरहे बुलढाण्याच्या कानिटकर कुटुंबाच्या मालकीचे आहे. कानिटकर कुटुंबाने डोळस श्रद्धेने
श्री शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत ह्या मारुतीरायाच्या मुर्तिवरचा शेंदूर दूर केला. वीर मारुतीची विलोभनीय मुर्ति आपल्याला दर्शन देतेच तसेच अवकाशातून भेट मिळालेल्या चुंबकत्व असलेल्या दगडांचा शास्त्रीय अभ्यास करा, असा संदेशही देते.


                        कमी पावसाच्या ह्या प्रदेशात पर्यटकांना   आकर्षित करणारे धबधबे नाहीत. लोणार सरोवरास पाणी पुरवठा करणारी सीता धाराही छोटी नदी गोमुखातून एखाद्या मोठ्या नळासारखी अव्याहत पाणी देते. ह्या नदीचे पाणी गोड असून हा झरा उन्हाळ्यात आटत नाही. ह्या नदीच्या माध्यमातून निसर्ग लोणार सरोवर हा अमूल्य ठेवा जपताना दिसतो.
                          सीता धारा ह्या गोडपाण्याच्या नदीच्या दृष्टीने लोणार सरोवर हा समुद्रच आहे. जशी सागराला नदी मिळते, तेवढ्याच वेगाने सीता धारा ही नदी लोणार सरोवराला पाणी पुरविते. निसर्गातल्या गोड्या पाण्याच्या नद्या,खाऱ्या पाण्याच्या जलाशयाकडे (तो जलाशय समुद्र असो किंवा लोणार सरोवर) वाहतात. ह्या मागे   भौगोलिक कारण आहे का? व असल्यास त्याचा आपल्याला नदी जोडणी प्रकल्पात उपयोग करता येईल का?

) सूक्ष्मजीव शास्त्र :
                २००७ साली ह्या खाऱ्या पाण्याचे केलेल्या संशोधन निष्कर्षानुसार ह्या खाऱ्या पाण्यात हवेतला नायट्रोजन स्थिर करणारे सूक्ष्म जीव बॅक्टेरिया आढळून आलेले आहेत.
                  भातासारख्या वनस्पतींना हवेतला नायट्रोजन थेट वापरता येत नाही. आकाशात वीज चमकते किंवा जंगलात वणवे पेटतात, तेव्हा निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे हवेतला नायट्रोजन हा वायू अलग होतो. बॅक्टेरिया हे सूक्ष्म जीव तो शोषून त्याचे वनस्पतींना उपयोगी असणाऱ्या नायट्रेटसारख्या रेणूंत रूपांतर करतात. हा नायट्रेट मिळाल्याने भात पिकतो. अशाप्रकारे इतरही वनस्पती हा नायट्रेट वापरतात, परंतु ह्यासाठी आकाशात वीज चमकून पाऊस पडावा लागतो.
                          लोणार  सरोवरातील पाण्यात हवेतला नायट्रोजन स्थिर करणारे बॅक्टेरिया आहेत. ह्या सूक्ष्मजीवांची प्रयोगशाळेत पैदास करुन त्यांचा उपयोग पृथ्वीवरील वनस्पती, शेती संवर्धनासाठी होईल. तसेच भविष्यातील अंतराळातसुद्धा हे जीवसृष्टीचे अमृत नेता येईल. लोणारच्या खाऱ्या पाण्यात समुद्रासारखे मासे आढळत नाहीत. परंतु  हे नायट्रोजनयुक्त अमृत देणारे सूक्ष्म जीव लाखो वर्षांपासून नांदत आहेत. त्यांच्या अस्तित्वामुळे ह्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराभोवती बाभूळ, चिंच, साग, वनौषधी असलेले जंगल उभे राहिले असावे.
                    ‘वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाडही म्हण शब्दशः ह्या भागात आपल्याला अनुभवायला मिळते. हे सूक्ष्मजीव प्रयोगशाळेत पैदा करुन, देशात हरितक्रांती करण्याचा प्रयत्न होऊ शकेल.
                   सीता धाराच्या  कुंडात मनुष्यप्राणी, मजा करण्याच्या हेतूने तसेच पुण्य मिळविण्याच्या हेतूने, स्नान करताना आढळतो. ह्या स्नानातून क्षणिक आनंद  मिळविताना, माणसाच्या शरिरावरचे हजारो बॅक्टेरिया सीता धारा ह्या स्वच्छ पाण्याच्या नदीला अशुद्ध बनवितात. हेच अशुद्ध पाणी लोणार सरोवराला पाणीपुरवठा करते. आपल्या शरीरात हजारो बॅक्टेरिया अन्न पचविण्यापासून अनेक कामे करीत असतात. १००किलो वजनाच्या माणसातील १० किलो वजन ह्या बॅक्टेरियांचे असते. स्नानातून त्वचेवरचे बॅक्टेरिया धुतले जातात. आपण स्वच्छ होतो, परंतु लोणार सरोवरात आपण आपली घाण मिसळून, तेथील नायट्रोजन रुपी अमृत देणाऱ्या सूक्ष्म जीवांना आपण धोका पोहोचवितो.
                         मानवनिर्मित अशुद्ध पाण्यामुळे लोणार सरोवरातील सूक्ष्मजीव सृष्टीस निश्चित धोका पोहोचत असणार. सीता धारा कुंडात स्नान करणे तसेच ह्या कुंडाच्या काठावर श्राद्ध विधी करणे त्वरित थांबविणे अत्यंत गरजेचे आहे
                           अशा प्रकारे रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना भौतिकशास्त्र प्रयोगशाळेची जोड दिल्यास, अंतराळातील इतर ग्रहांवर मानवी वसाहत निर्माण करण्याचे संशोधन लोणार येथे होऊ शकेल, तसेच इथे येणाऱ्या संशोधकांना परिपूर्ण प्रयोगशाळा मिळू शकेल.
                             शेती हा मुख्य व्यवसाय असलेले लोणार हे छोटे गाव श्री बुकदाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली  ‘पर्यटन स्थळह्या नव - संहितेत स्वतःला वसवू पहात आहे. ह्या परिसराची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती सविस्तर देणारी पुस्तके लोणारचे शिक्षक श्री. बुकदाणेसर यांनी मराठी व इंग्रजी भाषेत लिहिलेली आहेत.श्री. बुकदाणेसरांचे विद्यार्थी असलेली चैतन्य कायंदे (मोबाईल नंबर 8856028467, 8888264934)सारखी गाईड म्हणून कार्यरत असलेली तरुण पिढी ह्या न्यासात नोकरी मिळाल्यास घरची शेती सांभाळून जीवनात सुस्थिर होऊ शकेल.  
                            अशी ही जागतिक प्रयोगशाळा निर्माण झाल्यास तिला कोणत्याही  महात्म्याचे नाव देऊ नयेलोणार निसर्ग न्यास किंवा तत्सम नावातून प्राचीन लोणार सरोवर  जागतिक वैज्ञानिक तीर्थक्षेत्र बनविणे, लोणारवासीयांच्या तसेच विज्ञानप्रेमी मंडळीच्या प्रयत्नांतून साकार होऊ शकेल.
                                                                             समाप्त
॥ जय श्रीगुरुदेवदत्त॥




काळाराम मंदीर दर्शन - काव्य चित्र ---- दिनांक : रामनवमी, १९२५


(चाल  :-  ‘गोपीनाथा आले’ या गाण्याप्रमाणे)  
मंदबुद्धी स्तवू आता वर्णवेना तुजला
राघवा रे, तुझे चरणी मनू माझा वेला
घनःश्याम तुझा महिमा त्रिभूवनी गाजला
नको नको अंत पाहू प्रकाशावे मतीला॥धृ॥

जाऊन पाहू आता पंचवटीच्या रामाला
शामसुंदर मूर्ती उभी सीतेसह शोभला
महाद्वारी दास मारुती उभा ठाकला
दक्षिणेस गणपती सव्यभागी बैसला
उत्तरेसी दत्तात्रेय आशीष देत राहिला
पूर्व पुण्याई आजी दर्शन लाभ जाहला॥ १॥
मंदबुद्धी स्तवू आता -----                ॥धृ॥

रचना नक्षीदार कोरीव असे मंदीराला
सुवर्ण कळस लकलकीत झळके शिखराला
चहूबाजूनी ओवऱ्या बांल्या यात्रेकरु मुक्कामाला
वैकुंठची भूलोकी अवतरले वाटते मनाला
प्रसन्न वदने शांत चित्ते वंदिते प्रभूरामाला
कृपादृष्टीविना अन्य नको वरदान मजला॥२॥
मंदबुद्धी स्तवू  आता -----------         ॥धृ॥
 
प्रातःकाळी नरनारी येती त्वरे काकड्याला
स्तुतिस्तोत्रे म्हणूनी आळविती राघवला
मुखमार्जन सारुनी प्रक्षाळीती चरणाला
नानापरीचे पोशाख घालीती शोभतसे रामाला
परोपरीची पक्वाने अर्पिती रामचंद्रा नैवेद्याला ॥३॥
मंदबुद्धी स्तवू  आता ----------                ॥धृ॥ 

चैत्रमासी शुक्लपक्षी उत्सवात सर्व दंग
मंडपात नित्यनेम होत असे किर्तन रंग
लहान थोर यात्रेकरु समवेत घडतसे सत्संग
नवमी दिवशी जन्मोत्सवी आनंदोत्सव पाहिला
स्त्री पुरुषांची दाटी सभा मंडप भरला॥४॥
मंदबुद्धी स्तवू आता   -----------         ॥धृ॥  

चौऱ्या छत्रचामरे दिसताती चहूबाजूला
विविध हंड्या झुंबराची शोभा दिसे मंदिराला
परब्रह्म पहाताची पुष्पे गुलाल वाहिला
हळदीकुंकवाची घाई सुंठवडा प्रसाद दिधला
वाजंत्री वाजताती नाद न मावे गगनाला॥५॥
मंदबुद्धी स्तवू आता ---------            ॥धृ॥  

पारण्याला दशमीस येती सर्व भोजनाला
चारी वर्ण तृप्त होऊनी आत्माराम तोषविला
पुण्यकाल एकादशीसी सभारंभ पाहिला
रामसीता गर्जनाने मिरविती रथाला
पालखीचा थाट मोठा नादध्वनी गाजला॥६॥
मंदबुद्धी स्तवू आता -----------          ॥धृ॥

चौऱ्याऐंशी फिरता बा जीव बहूत शिणला
रामनाम वदे वाणी, दोष जाती लयाला
रामनाम ऐकूनीया, हर्ष मनी जाहला
अज्ञान भ्रांती छेदूनिया, पावन करी देहाला
निरंतर तवपदी ठेवी, या भक्त राधेला॥७॥
 मंदबुद्धी स्तवू आता  ----------         ॥धृ॥

                                 ----   कै. राधाबाई  आठवले


                       माझे आजी-आजोबा (कै. राधाबाई व कै. दत्तात्रय आठवले) हे इसवी सन १९२५ साली रामनवमी उत्सवासाठी नासिकला कारवार, कर्नाटक येथून  आले होते.  फक्त ६ महिने शालेय जीवनाची ओळख झालेल्या, माझ्या आजीचे शिक्षण पोथ्या पुराणे वाचता येण्यापूरते मर्यादित होते. स्वतःच्या काव्यरचना तिला दुसऱ्याकडून लिहून घ्याव्या लागत.
             त्या देवभोळ्या मनाने रामदर्शन घेत असताना तत्कालिन (१९२५ साल) रामनवमी वातावरणाचे केलेले अचूक वर्णन !

                          अनुराधा आठवले (घाणेकर),नासिक