Wednesday 6 July 2016

जरंड्याचा वायूसुत - १००वर्षांपूर्वीचे काव्यदर्शन


                                  (चाल: ‘चरण कमल ज्याचे’ ह्या गाण्याप्रमाणे)
ध्यायी मना हृदयात
जरंड्याचा वायूसुत॥धृ

कवणेकाळी प्रगटला
ठाव नाही लागला
राघवाची गात लीला
बैसलासे डोंगरात॥ १॥
ध्यायी मना ---॥धृ

हिरवीगार वनस्पती
भोवती शोभे अती
पहाताची होय शांती
चित्ताशी आल्हादीत॥२॥
ध्यायी मना ---॥धृ

पाठीमागे राम उभे
पुढे ब्रह्मचारी शोभे
भक्तांची वाट बघे
रात्रंदिन तिष्ठत॥ ३॥
ध्यायी मना ---॥धृ

सान थोर दर्शनासी
जन येती अहर्निशी
अभय वाटे त्यासी
वज्रदेही रक्षीत॥ ४॥
ध्यायी मना ---॥धृ

सप्ताहामध्ये उत्सवासी
बहूत जन मुक्कामासी
सकळांना भोजनासी
बलभीम पुरवित॥ ५॥
ध्यायी मना ---॥धृ

रुद्र पूजा करुनी
वस्त्रे भूषणे सजवूनी
पक्वान ताटे दर्शवूनी
आरती करुनी समर्पित॥ ६॥
ध्यायी मना ---॥धृ

चैत्रमासी पौर्णिमेला
अंजनीसुत जन्मला
काय वर्णू जन्मलीला
इच्छिलेले पुरवित ॥ ७॥
ध्यायी मना ---॥धृ

मारुतीराया तुझी किर्ती
जाणे एक सीतापती  
तिथे मानवाची मती  
मंद मंद चालत॥ ८॥
ध्यायी मना ---॥धृ

जन्मताक्षणी भास्कराला
फळ म्हणूनी रीला
थक्क करी स्वमातेला
न्य जगी हनुमंत॥ ९॥
ध्यायी मना ---॥धृ

तूच माझी जनक जननी
किती अंत पहासी अजूनी
राधेवरी कृपा करुनी
दावी खूण अंतरात॥ १०॥
ध्यायी मना ---॥धृ
                 ---- कै. राधा आठवले
कै. राधा आठवले (माझी आजी - वडिलांची आई) ही कवयित्री माहेरची सातारच्या मारुतीभक्त कै. नाना कुमठेकरांची कन्या ‘सोनु ताई’. असे सांगतात की, सुवर्ण कांती वर्णाची ‘सोनुताई’ अंधारात उभी असली तरी तिच्या पिवळसर गोऱ्या रंगामुळे स्पष्ट  दिसायची. ह्या सोनुताईला पोथ्यापुराणे वाचता- वाचता मिळालेली प्रचंड शब्दसंपत्ती तसेच यमक जुळविण्याची कनकशुद्ध काव्य प्रतिभेची  प्रचिती ‘जरंड्याचा वायूसुत’ या कवितेत  येते.
                     ------- अनुराधा आठवले (घाणेकर), नासिक

No comments:

Post a Comment