Saturday 2 July 2016

काळाराम मंदीर दर्शन - काव्य चित्र ---- दिनांक : रामनवमी, १९२५


(चाल  :-  ‘गोपीनाथा आले’ या गाण्याप्रमाणे)  
मंदबुद्धी स्तवू आता वर्णवेना तुजला
राघवा रे, तुझे चरणी मनू माझा वेला
घनःश्याम तुझा महिमा त्रिभूवनी गाजला
नको नको अंत पाहू प्रकाशावे मतीला॥धृ॥

जाऊन पाहू आता पंचवटीच्या रामाला
शामसुंदर मूर्ती उभी सीतेसह शोभला
महाद्वारी दास मारुती उभा ठाकला
दक्षिणेस गणपती सव्यभागी बैसला
उत्तरेसी दत्तात्रेय आशीष देत राहिला
पूर्व पुण्याई आजी दर्शन लाभ जाहला॥ १॥
मंदबुद्धी स्तवू आता -----                ॥धृ॥

रचना नक्षीदार कोरीव असे मंदीराला
सुवर्ण कळस लकलकीत झळके शिखराला
चहूबाजूनी ओवऱ्या बांल्या यात्रेकरु मुक्कामाला
वैकुंठची भूलोकी अवतरले वाटते मनाला
प्रसन्न वदने शांत चित्ते वंदिते प्रभूरामाला
कृपादृष्टीविना अन्य नको वरदान मजला॥२॥
मंदबुद्धी स्तवू  आता -----------         ॥धृ॥
 
प्रातःकाळी नरनारी येती त्वरे काकड्याला
स्तुतिस्तोत्रे म्हणूनी आळविती राघवला
मुखमार्जन सारुनी प्रक्षाळीती चरणाला
नानापरीचे पोशाख घालीती शोभतसे रामाला
परोपरीची पक्वाने अर्पिती रामचंद्रा नैवेद्याला ॥३॥
मंदबुद्धी स्तवू  आता ----------                ॥धृ॥ 

चैत्रमासी शुक्लपक्षी उत्सवात सर्व दंग
मंडपात नित्यनेम होत असे किर्तन रंग
लहान थोर यात्रेकरु समवेत घडतसे सत्संग
नवमी दिवशी जन्मोत्सवी आनंदोत्सव पाहिला
स्त्री पुरुषांची दाटी सभा मंडप भरला॥४॥
मंदबुद्धी स्तवू आता   -----------         ॥धृ॥  

चौऱ्या छत्रचामरे दिसताती चहूबाजूला
विविध हंड्या झुंबराची शोभा दिसे मंदिराला
परब्रह्म पहाताची पुष्पे गुलाल वाहिला
हळदीकुंकवाची घाई सुंठवडा प्रसाद दिधला
वाजंत्री वाजताती नाद न मावे गगनाला॥५॥
मंदबुद्धी स्तवू आता ---------            ॥धृ॥  

पारण्याला दशमीस येती सर्व भोजनाला
चारी वर्ण तृप्त होऊनी आत्माराम तोषविला
पुण्यकाल एकादशीसी सभारंभ पाहिला
रामसीता गर्जनाने मिरविती रथाला
पालखीचा थाट मोठा नादध्वनी गाजला॥६॥
मंदबुद्धी स्तवू आता -----------          ॥धृ॥

चौऱ्याऐंशी फिरता बा जीव बहूत शिणला
रामनाम वदे वाणी, दोष जाती लयाला
रामनाम ऐकूनीया, हर्ष मनी जाहला
अज्ञान भ्रांती छेदूनिया, पावन करी देहाला
निरंतर तवपदी ठेवी, या भक्त राधेला॥७॥
 मंदबुद्धी स्तवू आता  ----------         ॥धृ॥

                                 ----   कै. राधाबाई  आठवले


                       माझे आजी-आजोबा (कै. राधाबाई व कै. दत्तात्रय आठवले) हे इसवी सन १९२५ साली रामनवमी उत्सवासाठी नासिकला कारवार, कर्नाटक येथून  आले होते.  फक्त ६ महिने शालेय जीवनाची ओळख झालेल्या, माझ्या आजीचे शिक्षण पोथ्या पुराणे वाचता येण्यापूरते मर्यादित होते. स्वतःच्या काव्यरचना तिला दुसऱ्याकडून लिहून घ्याव्या लागत.
             त्या देवभोळ्या मनाने रामदर्शन घेत असताना तत्कालिन (१९२५ साल) रामनवमी वातावरणाचे केलेले अचूक वर्णन !

                          अनुराधा आठवले (घाणेकर),नासिक

No comments:

Post a Comment