Friday 8 April 2016

पंचांग : खगोलशास्त्रीय कालमापन


नववर्ष स्वागतास सज्ज असे गुढीपाडवा
पंचागित मापनेतून प्राचीन शास्त्र आठवा॥
भास्कराचार्याने दिले गुरुत्वीय कालमापन
पंचांग सांगे कालचक्राचे मूल्यांकन॥
कालचक्र गतीस न दिसे वैश्विक कायदा
शास्त्रार्थाचा न घ्यावास तू गैर फायदा॥
कायद्याने मिळे मंदिर  गाभाऱ्यात प्रवेश
अंधश्रद्धा निर्मूलनाचा दिसे निव्वळ आवेश॥
कायद्यातून  मिळाले तुज हक्कांचे आवर्तन
शिक्षण गाभ्यातून घडे सदाचे मतपरिवर्तन॥
                        ‘पंचांग’ नामक खगोलशास्त्रीय घड्याळाच्या साथीने श्रद्धा व अंधश्रद्धा ही दोन्ही क्षेत्रे दिवसे न् दिवस विस्तारताना दिसत आहेत. पंचांग ह्या घड्याळाला तिथी, वार, नक्षत्र, योग, करण ही पाच अंगे असल्याने,
पंचांग (पंच =पाच + अंग) असे समर्पक नाव सुमारे १५०० वर्षांहून अधिक काळ प्रचलित आहे. पंचांगाचे सध्याचे रुप ५००व्या शतकात तयार झालेले  दिसते.
                     प्राचीन काळी जगभर कालमापनाचे कोष्टक बनविण्याचे प्रयोग सुरु होते. त्याकाळी आत्तासारखे कॉपी राइट, पेटन्ट वगैरे मालकी हक्काच्या कल्पना अस्तित्वात नसाव्यात, त्यामुळे ज्ञानात पडणारी भर जगभर वापरता येत असावी.
                   पंचांगातील वार हा विषय आपल्या दैनंदिन व्यवहारातील एक महत्त्वपूर्ण गरज. ‘वार’ ही संकल्पना हिंदू पंचांगाने ग्रीक संस्कृतीकडून घेतली असावी, असे मानले जाते.
 अर्थात इंग्रजी वारांची नावे ही त्यांच्या देवतांवरुन आलेली आहेत उदा.
ट्युजडे = टिऊ (जरमॅनिक देवता)
थर्स डे = थॉर (नॉस देव)     इत्यादी
                 जगातील शून्य संकल्पनेचा जनक असलेल्या आर्यभट्टांनी मात्र पंचागातील वारांना हिंदू देव-देवतांची नावे दिलेली दिसत नाहीत. वारांची नावे सांगणारे आर्यभट्ट यांचे सूत्र
‘आ मंदात् शीघ्रपर्यतम् होरेशाः।‘
मंदगतीच्या ग्रहापासून शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत होरे सुरु असतात.
                         आर्यभट्ट यांनी वाराच्या संकल्पनेस पूर्णपणे खगोलशास्त्रात रुपांतरीत केलेले दिसते. त्याकाळात ग्रीकांप्रमाणे वारांना हिंदू देव- देवतांचीच नावे असावीत की नसावीत ? याचे राजकारण झालेले दिसत नाही.
                  ह्या वार संकल्पनेत आर्यभट्ट यांनी डोळ्याला दिसणाऱ्या ग्रहांची नावे वापरलेली दिसतात. कोपर्निकस ह्या खगोलशास्त्रज्ञांच्या आधी (सुमारे १०००वर्षे) आर्यभट्ट यांनी पृथ्वी गोल असून अंतराळात अधांतरी आहे. तसेच ही पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असून सूर्याभोवती प्रदक्षिणा करीत असते. हा खगोलशास्त्रीय सिद्धांत ५००व्या शतकात प्रतिपादन केला.
                         आर्यभट्ट यांनी ‘पाय’ ह्या गणितातील संज्ञेची किंमत ३.१४१६ आहे, असे गणिताने सिद्ध केले. अरबस्थानातील गणिततज्ञ ‘मोहमद मुसा’ यांनी ह्या ‘पाय’ च्या गणिती उत्तराबद्दल हिंदू गणितज्ञांचा गौरवपूर्ण उल्लेख केला, असे इतिहास सांगतो.
                          आर्यभट्ट यांच्या ‘शून्य’ संकल्पनेतून आजचे संगणकीय तंत्रज्ञान उभे राहिले.  त्या संगणक युगाने आपले आयुष्य वेगात बदलत असलेले आपण अनुभवितो.
                         १५०० वर्षांपूर्वी आर्यभट्ट यांच्या काळात आजच्या सारखे आधुनिक तंत्रज्ञान नसताना ग्रहांच्या परिभ्रमणाचा काळ कसा ठरविला असेल?  
सूर्यमालेतील नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या ग्रहांचा सूर्य प्रदक्षिणेचा कालावधी पुढीलप्रमाणे :-
ग्रह
सूर्याभोवती प्रदक्षिणा कालावधी
(पृथ्वी वर्षे)
बुध
०.२४
शुक्र
०.६२
पृथ्वी
मंगळ
१.८८
गुरु
११.८६
शनी
२९.४६
{ सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती गोलाकार न फिरता, लंबवर्तुळाकार फिरतात तसेच गुरुत्वाकर्षण इत्यादी नैसर्गिक बलांमुळे ग्रहांची अचूक स्थिती गणितात मांडणे अशक्य होते.}
ह्या ग्रहांमध्ये शनी ग्रह सूर्यापासून सर्वात जास्त अंतरावर असल्याने, सूर्याभोवती २९.४६वर्षांत फिरतो. सूर्याभोवती फिरण्यास शनी ग्रहाला सर्वात जास्त वेळ लागत असल्याने, ह्या ग्रहास मंदग्रह म्हणतात.
                    सूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाचा होरा असतो. त्या ग्रहाचे नाव* त्या वारास दिलेले असते. हिंदू पंचांगानुसार दिवस   सूर्योदयापासून सुरु होतो.
पंचांगाचे दुसरे अंग नक्षत्र :-
                  पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते.  सूर्य सकाळी पूर्व दिशेला उगवितो, भर दुपारी हाच सूर्य डोक्यावर असतो व संध्याकाळी सूर्य पश्चिमेला मावळतो. पृथ्वीच्या स्व-अक्षाभोवती फिरण्यामुळे आपल्याला सूर्य पृथ्वी भोवती फिरतोय, असा भास होतो.
                      सूर्याच्या ह्या भासमान मार्गास क्रांतिवृत्त म्हणतात. क्रांतिवृत्त गोल ३६० (अंशाचे) मानलेले असून  क्रांतिवृत्ताचे समान २७ भाग केलेले आहेत. हे भाग म्हणजे २७ नक्षत्रे होत.
 ३६०/  २७  = १३ २० कला
                    =(१३ x६० कला) + २० कला
                    = ८०० कला
८०० कला हे एका नक्षत्राचे क्रांतिवृत्तावरील अंतर होय.
                            रेवती ह्या नक्षत्रातील निःशर ताऱ्यापासून (झीटा पीशियम पासून) अंतर मोजलेले आहे. निःशर ताऱ्यापासून ८०० कलांचे पहिले अश्विनी नक्षत्र मानले गेलेले आहे.
पंचागाचे तिसरे अंग ‘तिथी’ :-
                            गुरुत्वाकर्षण बलाचा सिद्धांत भास्कराचार्यांनी सर आयझॅक न्युटन यांच्या सुमारे ५०० वर्षे आधी सूर्य सिद्धांताद्वारे जगात मांडला. भास्कराचार्यांच्या मते गुरुत्वाकर्षणामुळे कोणतीही वस्तू भूमीवर पडते, ह्याच गुरुत्वाकर्षण सिद्धांत कल्पनेतून सर न्युटन यांनी भौतिकशास्त्राची निर्मिती केलेली दिसते.
                          गुरुत्वाकर्षण बलामुळे सूर्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह गोलाकार फिरतात,  असे भास्कराचार्यांनी प्रथम प्रतिपादन  केले.
                        स्वाभाविकच सूर्य व चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाचे पृथ्वीवर होणारे परिणाम मोजणासाठी कालमापनात तिथी, योग, करण ही अंगे विकसित झालेली दिसतात.
                        सूर्याभोवती पृथ्वी फिरते तसेच पृथ्वी भोवती चंद्र फिरतो. त्यामुळे सूर्य व चंद्र ह्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीवरील समुद्र पातळीवर परिणाम होतो.
सूर्य पृथ्वी व चंद्र ह्यांच्या गोलाकार भ्रणम कक्षा
ह्या लिंक मध्ये खूप सुंदर अॅनिमेट केलेल्या दिसतात.
                          पृथ्वीसापेक्ष गुरुत्वाकर्षण मोजायचे तर पृथ्वी ही केंद्र स्थानी मानल्यावर सूर्याचे पृथ्वीभोवती होणारे काल्पनिक भ्रमण एक वर्षांत पूर्ण होते.   काल्पनिक क्रांतीवृताचे ३६० अंश पूर्ण करायला सूर्याला एक वर्ष लागते.
पृथ्वी स्वतःभोवती २४ तासांत फिरते ह्याचा अर्थ क्रांतिवृतावरील सूर्याचा १ अंश म्हणजे पृथ्वीचा एक दिवस होय.
                  चंद्र पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा २७.५ दिवसांत पूर्ण करतो.  सूर्याच्या १अंश पुढे गेलेल्या जागेवर, यायला चंद्राला अजून २ दिवसाला कालावधी लागतो. ह्याचा अर्थ चंद्र महिना २९.५  म्हणजे साधारण ३० दिवसांत पूर्ण होतो.
                चंद्राचा पृथ्वीप्रदक्षिणेचा कालावधी २९ दिवस १२ तास ४४ मिनिटे २.९ सेकंद असून पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास ३६५ दिवस ५तास ४८ मिनिटे ४६ सेकंद इतका वेळ लागतो. हे सर्व आकडे पूर्णांक नसल्याने, महिन्याचे ३० दिवस असे एकक ठरविणे शास्त्रीयदृष्ट्या अशक्य आहे.
                     त्यामुळे चंद्राच्या भ्रमण कक्षेवरुन तिथी निश्चित केलेली दिसते.
तिथी म्हणजे सूर्याचे रेखांश - चंद्राचे रेखांश होय.
                    सूर्यप्रकाश चंद्रावरुन परावर्तित होत असल्याने शुद्ध पक्षातील प्रदिपदा ते पौर्णिमा व पौर्णिमेनंतर येणाऱ्या प्रतिपदा ते अमावस्या अशा चंद्राच्या ३० कला म्हणजे पंचांगामधील ३० तिथी होत.
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्र स्वतःभोवती फिरत असूनही आपल्या चंद्राची एकच बाजू दिसते.
चंद्रभ्रमणाचे शास्त्रीय ज्ञान
ह्या लिंक मध्ये सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे.
योग म्हणजे सूर्याचे रेखांश  + चंद्राचे रेखांश
चंद्र सूर्य यांच्या रेखांशाची बेरीज १३ अंश २० कला होण्यास लागणारा कालावधी म्हणजे एक योग होय. क्रांतिवृत वर्तुळाकार म्हणजे ३६०अंशाचे गृहित धरल्याने
३६०/ १३ अंश ३३कला  =(सुमारे) २७ =२७ योग होतात.
कै. शं. बा. दीक्षित यांच्यामते   शके ५५० च्या आधी योग ही संकल्पना नव्हती.
पंचांगाचे पाचवे  करण  
 करण म्हणजे तिथींचे अर्ध याचा अर्थ सूर्य व चंद्र यांच्यातील ६अंश अंतराचा एक करण होतो.
प्रत्येक तिथीचे ११ करण  होतात.
            ‘पंचांग’ ह्या खगोलशास्त्रीय सॉफ्टवेअरचा मुख्य उद्देश्य कालमापन तसेच सूर्य व चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणांचा पृथ्वीवरील समुद्रावर होणारा परिणाम जाणून घेणे, असा असावा. आजही कारवार, कोकण  समुद्रकिनाऱ्यावरील रहिवासी  तिथी व करण यांच्या सहाय्याने समुद्राची भरती-ओहोटी ठरवितात. कारवार, बैलोंगल भागात बालपणी राहिलेले माझे वडील (कै. प्रा. रा. द. आठवले, नासिक) तिथी व करण ह्यांच्या गणितातून  समुद्राच्या भरती - ओहोटीच्या वेळा सांगायचे.
           आधुनिक खगोलशास्त्रातून  मिळणारी अचूकता व संगणकिय तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने बनविलेले ‘पंचांग’  मोबाईल अॅप कोळी बांधवांच्या सहाय्यास येऊ शकेल.
               अशा अॅपद्वारे आर्यभट्ट, भास्कराचार्य इत्यादी प्राचीन खगोलशास्त्रज्ञांचा पंचाग निर्मिती मागचा उद्देश साध्य करुन आपण म्हणू शकू,  
कालचक्र हे अविरत चाले। काळ चालला पुढे।
‘पंचाग’ अॅप उलगडे। भरती ओहोटीचे कोडे॥
*ता. क. आठवड्यातील वार पद्धत - आर्यभट्ट यांच्या वार सूत्रानंतर वराहमिहीर यांनी होरा पद्धतीचे कोष्टक बनवून सोमवार ते रविवार अशी आठवड्यातील वारांची प्रचलित क्रमवारी निश्चित केली. 

॥जयगुरुदेव दत्त॥

No comments:

Post a Comment