Tuesday 24 November 2015

‘ वारसा श्रद्धेचा ‘




मी आहे गोदावरी।  जन्मुनी ब्रह्मेश्वरी।
डोकाविते गंगाद्वारी। मिळविते मोकळा श्वास चराचरी॥ १॥
{ त्रिंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावरील जटा मंदिर, गंगाद्वार ह्या ठिकाणी गोदावरी नदी उगम पावते. }
पृथ्वीमातेची मी लाडकी लेक। पुनरपि घेई गर्भसुख।
त्रिंबक जन्मातील हीच खरी मेख। अशी आहे मी द्विज एक॥ २॥
{ब्रह्मगिरी पर्वतशिखरावर उगम पावणारी गोदावरी नदी, भूमीगत होऊन त्रिंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडात प्रगट होते. }
नासिक क्षेत्री सायंशोभा। सिंह राशी दिसे पश्चिम नभा।
शुक्र गुरु युतीची विहंगम आभा। सिंहस्थ चाहुली दिसे खगोल सभा॥ ३॥
 { दि. १४ जुलै २०१५पूर्वी   (सिंहस्थापूर्वी)  संध्याकाळी पश्चिम दिशेला लालसर रंगाचा गुरु व तेजस्वी शुक्र यांची युती विलोभनीय आकाशात दिसत होती.}
ही खगोल भेट मिळे द्वादश संवत्सरी। समीप असे अमावस्येची शुभ रात्री।
धाव घेशी मानवा मम मंदिरी। मिळविण्या पुण्य कुंभ जन्मभरी॥ ४॥
{ दर बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थात, नाशिक येथील गोदावरी मातेचे मंदिर वर्षभर खूले असते. सिंहस्थ संपल्यावर हे मंदिर १२ वर्षे बंद ठेवण्याची प्रथा आहे.}
ब्रह्मांड पुराण मांडते मम जन्मकुंडली। कृतयुगी दोन  लक्ष वर्षे संपली।
अवतरले मी गंगा शंकरजटेतली।अनुबंधित मी अमृतमंथनवेळी ॥५॥
 {पुराणांमध्ये आढळणारे गोदावरी नदीविषयीचे  संदर्भ}
निघाला मला शोधण्या गौतम ऋषी। तया हातूनी गोहत्त्या घडली कशी।
नियती खेळी पडला फशी। जगीचा भूगर्भ शास्त्रज्ञ शशी॥ ६॥
{ संदर्भ :- श्रीगुरुचरित्र अध्याय १३ - www.shrigurucharitra.com}
श्रद्धा नयनी दिसले  गंगाद्वारीचे गंगावतरण।दाखवी कुशावर्तीचे पुनरागमन।
करीते मी राजमहेन्द्री समर्पण। प्रवाहिते मम जगीचे उद्धरण॥ ७॥
{ आंध्र प्रदेशातील राजा मुंड्री (मराठी नाव राजमहेंद्री) जवळील काकीनाडा येथे गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला  मिळते. }
गौतम ऋषीची होते मी वरदायिनी। श्रीगुरुचरित्रातील मी पाप क्षालनी।
सिंहस्थात समजतात मज पुण्य दायिनी। का करिता मम  जल प्रदुषणी॥ ८॥
{ ‘चराचरास उद्धारणारी गंगा’ असा  गौतम ऋषींनी गोदावरी नदीचा केलेला उल्लेख श्रीगुरुचरित्रांत आढळतो.
श्रीगुरुचरित्र काळात ‘गोदावरीत स्नान केल्याने पाप धुतले जाते’, अशी समाज मनाची धारणा दिसते.
नुकत्याच झालेल्या सिंहस्थ २०१५ मध्ये पुण्य प्राप्तीसाठी स्नान अशी श्रद्धा भाविकांमध्ये दिसली. }
गोहत्त्येतूनी लागला मम शोध। जलत्त्वातूनी घे जीवनी बोध।
सिंहस्थ आव्हाने होशील तू प्रबुद्ध। सिमेंट जंगल रोपणी होईन मी क्रुद्ध॥१०॥
{ गौतम ऋषींनी गोदावरी नदीचा उगम शोला अशी पुराण कथा आहे. नदीच्या उगम स्थानी तसेच दोन्ही तीरांवरील सिमेंटची जंगले, नदीला पाण्याचा स्त्रोत कसा पुरवणार ? हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यां व्यतिरिक्त इतर सर्व नद्यांना जमिनीत मुरणारे पावसाचे पाणी  पाण्याचा स्त्रोत पुरविते, असे भूगर्भ शास्त्र सांगते. }
जीवनी जीवन दान देई सरिता। पृथ्वीमातेच्या आम्ही दुहिता।
आमच्या जीवनी असे गुणभिन्नता। जलदान हिच आमुची ध्येय पूर्तता॥ ११॥
{ ‘गोदा स्नान, प्रवरा पान’ ही प्राचीन म्हण सांगते, गोदावरी नदीचे पाणी जड (Hard water) आहे तर प्रवरेचे पाणी पचनास सुलभ (Soft water)आहे. अशा प्रकारचे नैसर्गिक विविध गुणधर्म असलेल्या ह्या नद्या  कर्मयोगिनी आहेत. }
ऐकोनी गोदेचे हे संकिर्तन ।करावे जलसाक्षर सकल जन ।
    संवर्धताची पर्यावरण तंत्र ।मिळेल जगीचा स्मार्ट मंत्र ॥१२॥
{  सिंहस्थातील श्रद्धेचा महापूर संपून,  देशात सध्या स्मार्ट सिटीचे वारे वहात आहेत. गाव, शहर, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा स्थित्यंतरातून विकसीत होणाऱ्या स्थानांना स्मार्ट सिटीचे वे लागले दिसतात. गाव ते स्मार्ट सिटी अशी वाटचाल करणारा सर्वसामान्य भारतीय, वाडा संस्कृतीतून चाळीत, चाळीतून बंगलीत (चार खोल्यांच्या छोटेखानी बंगल्यात), नंतर फ्लॅट, फ्लॅट मधून रो हाऊस अशा बदलातून जात असताना, तुळशीचे रोप मात्र बरोबर घेऊन जाताना दिसतो. घरापुढे जागा असेल तर तुळशी वृंदावन, अन्यथा बाल्कनीच्या कठड्यावर डब्यात तुळस लावतो. }
पर्यावरणाकडे नेणारा हा  सांस्कृतिक वारसा जपल्यास, ‘स्मार्ट सिटीतील आर्ट’ उपभोगता येईल.
॥ ॐ श्रीगुरुदेवदत्त॥
                             ---------- अनुराधा आठवले (घाणेकर), नाशिक


Tuesday 17 November 2015

भारत-भूमी दर्शन (भाग १)


मना,त्वाचिरे नदी स्नान केले।
तयापासूनी प्रदुषण प्राप्त झाले ॥
विचारी मना तूच शोधूनी पाहे ।
तीर्थ संहिते जल शुद्ध वाहे ॥
नदी पाहिली की, नदीच्या वहात्या खळाखळत्या पाण्यात उतरावे, मनसोक्त आनंद घ्यावा, ह्या निर्भेळ आनंदाला पुण्यप्राप्तीची जोड असेल तर मनुष्य प्रदुषणाचा विचार न करता, निसर्ग स्नानाकडे धाव घेतो. ह्या स्नानातून त्या व्यक्तीला पुण्य मिळते की नदी प्रदुषणाचे पाप मिळते ?
         सुमारे ६००वर्षांपूर्वी श्रीनृसिंहसरस्वतींनी ‘गंगा स्वच्छता’ अभियानाची मुहुर्तमेढ केलेली दिसते. अध्याय १५ मध्ये श्रीगुरु आपल्या शिष्यांना तीर्थ यात्रेची सुरवात करताना, काशीला जाऊन गंगा नदीची चाकरी  करण्यास सांगतात.
श्रीगुरुंच्या नियमांनुसार, शिष्यांनी फक्त नदी संगमात स्नान करावे. दोन -तीन नद्यांच्या संगमातील भरपूर पाण्यात प्रदुषणाची मात्रा निश्चित कमी होते.
श्रीगुरुंनी ‘नदी उगम-स्नान तसेच समुद्र-स्नान करा’ असा संदेश शिष्यांना दिलेला नाही. निसर्गाच्या जलचक्राचे हे दोन्ही स्त्रोत प्रदुषणमुक्त ठेवणे, आजही गरजेचे आहे.
पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असलेल्या जलाशयांमध्ये श्रीगुरुंनी शिष्यांना स्नान करण्यास सांगितलेले आढळते.
‘खेकड्यांच्या प्रजनन काळात तसेच उन्हाळ्यात नदीचे बाष्पीभवन काळात नदीत स्नान करु नका’, ह्या श्रीगुरुंच्या संदेशातून निसर्ग संवर्ध श्रीगुरु आपल्याला भेटतात.
         २१व्या शतकात पर्यटनशास्त्र(  Tourism) पर्यावरण शास्त्र(  Environmental Science) भारत भूमीचा उपग्रहांद्वारे छायांकित झालेला भुगोल (Geography)अशी ज्ञानाची विविध दालने समृद्ध होत असताना,
केल्याने देशाटन, जाणिवे प्रदुषण
हा अनुभव येतो.
आसामच्या निसर्गरम्य प्रदेशात प्रवेश करताना, आपली आगगाडी ब्रह्मपुत्र नदीवरील मोठ्या पुलावरुन जात असते. ब्रह्मपुत्र नदीचे ते विशाल दर्शन डोळ्यात साठवित असताना, सहप्रवासी श्रद्धेने नदीमध्ये १-२ रुपयांची नाणी नदीला अर्पण करीत असतात. ब्रह्मपुत्रनदी दररोज किती नाण्यांचे प्रदुषण स्वतःबरोबर वाहून नेत असेल ?
ब्रह्मपुत्र नदीला प्राचीन काळापासून तिच्या भव्यतेमुळे नद (पुलिंगी) म्हणतात.
ब्रह्मपुत्र नदीच्या वेगवान प्रवाहात, सर्वसामान्य मनुष्य स्नानाचे पुण्य घ्यायला घाबरतो. परंतु ह्या नदीला नाणी-दान करुन प्रदुषणात भर टाकतो.
ब्रह्मपुत्र नदीपासून चार हात दूर रहाणारा माणूस, विदर्भातील लोणार सरोवर येथील सीता धारा ह्या छोट्या नदीच्या उगमात  यथेच्छ स्नान करतो. हे स्नान करताना   लोणार सरोवर ह्या नैसर्गिक ठेव्यास आपण धक्का पोहोचवित असतो ! हे त्या व्यक्तीच्या गावीही नसते.
संदर्भ:-
निसर्गदत्त लोणार सरोवर - जन्मकथा
निसर्गदत्त लोणार सरोवर -इतिहास (भाग २)
निसर्गदत्त लोणार सरोवर -वैज्ञानिक तीर्थक्षेत्र (भाग ३)
http://shrigurucharitrabodha.blogspot.in/2014/08/blog-post.html
१५ व्या शतकात परधर्मीय जुलमी राजवटीने सर्वसामान्य माणुस दबून गेला होता. अशा   प्रदेशांमध्ये   माणसातील स्फुलिंग जागृत करण्यासाठी, श्रीगुरुंनी आपल्या शिष्यांना पाठविलेले दिसते. त्यामुळे आसामची ब्रह्मपुत्र नदी, विदर्भातील लोणार सरोवर अशा अनेक ठिकाणांचा समावेश श्रीगुरुचरित्रांच्या ‘तीर्थ यात्रा निरुपण’ अध्यायात नसावा.

 तीर्थ संहितेतून घडणारे भारत दर्शन :-
श्रीगुरुचरित्र आशय अध्याय १५ -
http://media.wix.com/ugd/e49ced_8ed083387cf741edb333898c94db0f6c.pdf

                                ॥ श्रीगुरुदेवदत्त॥