Monday 28 July 2014

कै. गौरबाई करमरकर, दि. २९ जुलै २०१४ पुण्यतिथीनिमित्य श्रद्धांजली


          साहित्याचे बीजांकुर आम्हाला देणारी, आमची आई  कै. गौरबाई करमरकर 
                       दि. २९ जुलै २०१४   पुण्यतिथीनिमित्य श्रद्धांजली
          तव छायाचित्र मज खुणावते, मम बालपण
          भूतकाळात रमले मी विसरले, मम वृद्धपण॥
          सत्शील, तत्त्वनिष्ट तव लाभला, जीवनसाथी
          तत्त्वनिष्टेस्तव जीवनी अपार कष्ट तव माथी॥
          तरुणपणी मोठ्या प्रपंचाची जबाबदारी तुझ्या भाळी
          चुलमूल या क्षेत्रातून तुझी उंच भरारी आभाळी॥
          ल्याली आभूषण एकही न, साधी तुझी रहाणी
          गुणगुणत राहशी सदा, देशभक्तीपर गाणी ॥
          शिक्षणापासून वंचित तू ,इतिहासाचे ज्ञान अचाट
          सभेतील सूत्रबद्ध विचार ऐकून श्रोते होती चाट॥
          निव्वळ अक्षर ओळख लिखाण असे अशुद्ध (व्याकरणदृष्ट्या)
          अशुद्ध लिखाणातून दिसती तव विचार शुद्ध॥
          मदतकार्यास्तव पावती पुस्तक हाती जाशी तू दारोदारी
          लोकसंग्रहातून कार्यकर्ती अशी  तुझी ओळख घरोघरी॥
           हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व, हा तव कार्याचा केंद्रबिंदू
           कार्यनिष्टेतून तव मनी उसळे, सावरकर विचार - सिंधू॥
           राव - रंकाशी तुझी मैत्री, उत्कट इच्छा व्हावी समाजक्रांती
         बलशाली समाज व्हावा, नांदावी इथे सुख शांती ॥
           कार्य  तळमळीतून समाजाला कळली, तव महती
           त्या महतीतून तुला दिली, समाजाने पावती ॥
         बलाढ्य पक्षा पराभूत करून झालीस, तू नगरसेविका
           पदभार सांभाळता शोभलीस, तू खरी राष्ट्र्सेविका ॥
           सभाधीट तूनिर्भीड तू , नाही बाळगली कोणती क्षिती
           स्वमताचे समर्थन करण्या, नाही तुला कशाची भिती ॥
           वेळप्रसंगी तुझ्या माझ्यात उडाले असतील खटके
           माहित आहे  आईतुला  हे खटके झाले लटके ॥
           भिन्न विचारसरणी स्वभाव पडले आपले हट्टी
          त्या मतभेदातून कशी जमावी आई, आपुली गट्टी ॥
          नाते संबंधातून जडले, आपुले माय लेकीचे नाते
          समजले असेल आई, तुला रक्त रक्ताकडे ओढ घेते ॥
          भ्रष्टाचार, लाचलुचपत, हिंसा अशी सद्यः स्थिती
          तुझ्या मनाला नाही पटणार ही दयनीय परिस्थिती ॥
          तुला सांगते आई, पुनर्जन्म तू भूलोकी घेऊ नको
          आपुल्या प्रेमसंबधी अन्य वाटेकरी आम्हा नको ॥
          तव सहवासे काव्यबद्ध शब्दरचना प्रयत्न मी करते
           साश्रू नयनाने आज तुला मी श्रद्धांजली वाहते ॥
                                                             प्रभा आठवले

Wednesday 23 July 2014

श्रीगुरुचरित्र आशय : अध्याय ५

विषय : अतिथीदेवो भवः।

                 या अध्यायात श्रीदत्तात्रेयांचा मनुष्यरुपातील अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभयांची जन्मकथा श्रीगुरुचरित्रकार आपल्याला सांगताना, गंगा नदी भूतलावर आणणाऱ्या राजा भगीरथाला श्रीदत्तात्रेयांचा अवतार मानतात.
            भक्तजनरक्षणार्थ। अवतरला श्रीगुरुनाथ।
सगरांकारणें भगीरथ। आणी गंगा भूमंडळीं॥ ५ - ८॥
मीमांसा:-
               प्राचीन भारतीय पुराणांनुसार राजा सगरासाठी राजा भगीरथाने घनघोर तपश्चर्या करुन पवित्र गंगा नदीस स्वर्गातून पृथ्वीवर आणली. ह्याच पुराणकथेत उल्लेख आहे की, गंगेच्या मार्गात कश्यप गोत्रातील जन्हु ऋषींचा आश्रम होता. गंगेच्या प्रवाहाच्या मार्गात आलेला श्रीजन्हु ऋषींचा आश्रम गंगेने उध्वस्त केला.  त्यामुळे रागाने गंगेस पिऊन टाकले व नंतर राजा भगीरथाच्या विनंतिवरुन कानातून सोडून दिले. ह्या घटनेमुळे गंगेस जाह्नवी हे नाव पडले. अध्याय १मध्ये ओवी क्रमांक ४४ श्रीगुरुचरित्रकार ह्या श्रीजन्हु ऋषींचा उल्लेख आपले मातुलघराचे  पूर्वज असा करतात.
                             राजा भगीरथाची ही तपश्चर्या ही प्रयत्नांची मालिकाच असावी. आजही आपण अशा प्रचंड प्रयत्नांना भगीरथ प्रयत्नह्या वाक् प्रचाराने संबोधतो. राजा भगीरथाची हे गंगा आणण्याचे व गंगेस हिमालयातील गंगोत्री ह्या उगमस्थानाकडून बंगालच्या उपसागराकडे नेण्याचे यशस्वी प्रयत्न, त्याच्यातील भूगर्भशास्त्रज्ञ दर्शवितात. ही सर्व कथा वाचताना लक्षात येते की, राजा भगीरथास जसे गंगेचा प्रवाह विशिष्ठ ठिकाणी नेण्याचे ज्ञान अवगत होते, तसेच ज्ञान श्रीजन्हू ऋषींनाही असावे. श्रीजन्हू ऋषींचा  आश्रम उध्वस्त झाल्याने त्यांनी रागाने गंगा
पिऊन टाकली म्हणजे गंगेचा प्रवाह रोखला’. नंतर राजा भगीरथाच्या विनंतीवरुन गंगेस आपल्या कानातून बाहेर काढले, ह्याचा अर्थ राजा भगीरथाच्या प्रत्यक्ष भेटीनंतर,  ‘गंगा मार्गक्रमण भगीरथ प्रयत्नांमधील सद्हेतू समजल्याने कानावर आलेल्या उलट सुलट बातम्या(प्रवाद) दुर्लक्षित केल्या व गंगेचा आडविलेला मार्ग खुला केला’.
                          हिमालय पर्वत ही आपल्या भारतास मिळालेली निसर्गाची देणगी आहे. हा पर्वत जसा आपल्या उत्तरेकडच्या सीमेचे रक्षण करतो, तसेच हिंदी महासागराकडून उत्तरेकडे  वाहणारा  मान्सून  अडवून परत पाठवितो. त्यामुळे जुन, जुलै - आषाढ महिना तसेच ऑगस्ट, सप्टेंबर - श्रावण महिना हा वर्षा ऋतूचा काळ आपल्याला मिळतो. निसर्गचक्रानुसार हा मान्सून कमी जास्त प्रमाणात बरसतो. अशा ह्या लहरी मान्सूनमुळे भरतखंडावर ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ अशी नैसर्गिक संकटे प्राचीन काळापासून येत असावीत. ह्या निसर्ग परिस्थितीवर मात करण्यासाठी राजा भगीरथह्या भूगर्भशास्त्रज्ञाने येणाऱ्या अपयशाने न खचून जाता, गंगेच्या प्रवाहाखाली संपूर्ण उत्तरभारत सुजलाम् सुफलाम् केलेला आहे.  
                                 सध्या  आपला शेजारी असलेल्या चीन देशाचे ब्रह्मपुत्रा ह्या प्रचंड मोठ्या नदीचा मार्ग चीनमध्ये प्रवाहित करण्याचे भगीरथ प्रयत्न चालू आहेत.
(ब्रह्मपुत्रेच्या प्रचंड मोठ्या विस्तारामुळे, जबरदस्त  वेगधारक प्रवाहामुळे ब्रह्मपुत्रेला आपण नद’  असे म्हणतो.)
                          चीनी भूगर्भशास्त्रज्ञांचे हे प्रयत्न जर यशस्वी झाले, तर   राजा सगराच्या काळात उद्भवली होती, तशी दुष्काळी परिस्थिती कायमस्वरुपी  आसाम व बंगाल ह्या प्रदेशांत निर्माण होईल.  ही भीषण भविष्यकालीन स्थिती  टाळण्यासाठी  नुसता चीनचा निषेध करुन उपयोगाचे नाही. ब्रह्मपुत्रेचा प्रवाह भारतात कसा कायमस्वरुपी राहील?   यासाठी आधुनिक भूगर्भशास्त्रज्ञांच्या भगीरथ प्रयत्नांची गरज आहे.
                          नुकत्याच निवडून आलेल्या मोदीसरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात नदीजोडप्रकल्पासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद आहे. यातील २५ कोटी रुपयांचा निधी  गंगा, ब्रह्मपुत्रा, महानंदा आणि गोदावरी ह्या नद्या जोडण्यासाठी ठरविलेला आहे.
                         नदी जोडणी प्रकल्पात एका नदीतील पाणी दुसऱ्या नदीत  पाटाद्वारे(कॅनॉलद्वारे) सोडण्याची मुख्य संकल्पना आहे. अशा प्रकारे उजनी धरणातील भीमा नदीचे पाणी सीना नदीत सोडून सीना नदीकाठावरील दुष्काळग्रस्त प्रदेश आता   हिरवागार झालेला दिसतो.
                     नदी जोडणी प्रकल्पात मुख्य अडचणी राजकीय महत्वकांक्षा, भ्रष्टाचारी लोकांच्या घोटाळ्यांचा विळखा ह्या होत. नदी जोडणी करताना प्रथम नदीमध्ये जाणारे गावाचे  तसेच औद्योगिक वसाहतींचे सांडपाणी शुद्ध करण्याच्या प्रक्लपांची प्रथम गरज आहे. अन्यथा रासायनिक प्रदुषणाने दुषित पाण्यामुळे भूचर तसेच जलचर जीवसृष्टीस धोका निर्माण होऊन   दुषित पाण्याने सृष्टीचा विनाश अटळ आहे. त्यामुळे पालनकर्त्या विष्णुदेवास परत दश अवतार घेण्यास आपण भाग पाडू.                      
                            सध्याची जगातील भीषण पाणी समस्या पाहिल्यावर, राजा भगीरथाने गंगा नदी भारतात प्रवाहित करुन जगाचे युगानुयुगांचे कल्याण केलेले आहे. त्यामुळे श्रीगुरुचरित्रकार राजा भगीरथाचे वर्णन करताना म्हणतात, “भक्तजनांच्या रक्षणासाठी श्रीगुरुनाथाने राजा भगीरथहा अवतार घेतला.”
 
विचारधन  : ओवी क्रमांक ३ ते ५
वामनरुप झाला भिक्षुकझाला ब्राह्मण क्षत्रियकर्मी॥३॥
दशरथकुळीं जन्म। प्रख्यात अवतार श्रीरघुराम।
राजा होऊनि मागुती जन्म। गौळियां घरीं गुरें राखी॥४॥
वस्त्रें फेडूनि झाला नग्न। बौद्धरुपी झाला आपण।
मीमांसा :
श्रीगुरुचरित्रकारांनी विचारलेल्या
होऊनि कलंकी अवतार जाण। तुरंगारूढ काय आवडी॥५॥
ह्या प्रश्नाचा तार्किकदृष्ट्या उकल करण्याचा अल्पसा प्रयत्न  : -
विष्णुनारायणाने अवतार घेऊन सन्मानित केलेले प्राणी व मानव  यांचे वरील ओव्यांमधील वर्णनानुसार : -
) मत्स्य :  मासा नेहमी पाणी स्वच्छ ठेवतो.   ह्या माश्यासारखेच
सृष्टीतील पाणी स्वच्छ ठेवा. प्रदुषित करु नका.
)कूर्म : कासवसुद्धा पाणी स्वच्छतेचे काम करते तसेच  ही स्वच्छता
करताना त्याला १८० अंशातून मान फिरवून पहाता येते. कासवाला ४ पाय असल्याने पाण्याच्या किनाऱ्यावर येऊ शकते. ह्याचाच अर्थ नदी, विहीर, समुद्र ह्या पाण्याच्या जलाशयांच्या आजुबाजूचा प्रदेश स्वच्छ ठेवा.
) वराह : डुक्कर हे भूप्रदेशावरील स्वच्छता सांभाळते.
) नराचें देह सिंहाचें मुख :नृसिंह अवतारात सिंहाचे मुख व माणसाचे
           शरीर दर्शविते की मानव हा प्राणीमात्रातील सिंह (सिंह म्हणजे
           श्रेष्ठ) आहे. त्यामुळे ह्या सृष्टीचे जतन व संवर्धन करण्याची
           जबाबदारी मानवाची आहे.
) वामनरुप झाला भिक्षुक :  वामन रुपातील छोट्या बटुने बुद्धीच्या
          सहाय्याने दानशूरपणाचा गर्व झालेल्या बळी राजावर विजय
          मिळविला आणि तीन पावलात तीनही जग व्यापले. मानवाची
          खरी शक्ती ही त्याची बुद्धी आहे.
) झाला ब्राह्मण क्षत्रियकर्मी - भगवान परशुराम :  तुमच्या विद्येला
                शस्त्रसामर्थ्याची जोड हवी अन्यथा
दुर्बलांच्या  शब्दांना पण मान कोण देणार ?
) दशरथकुळीं जन्म। प्रख्यात अवतार श्रीरघुराम।
                  एकमेव (मर्यादा) पुरुषोत्तमाचा राम अवतार
) राजा होऊनि मागुती जन्म। गौळियां घरीं गुरें राखी॥४॥
                 गवळ्याच्या घरी लहानाचा मोठा झाल्याने गोपालनाचा
                  संदेश स्वतःच्या कृतीतून दिलात.
) वस्त्रें फेडूनि झाला नग्न। बौद्धरुपी झाला आपण।
                 विरक्तीतून बुद्ध होण्याचा म्हणजे ज्ञान प्राप्त करुन घेण्याचा
                संदेश दिला.
१०) होऊनि कलंकी अवतार जाण। तुरंगारूढ काय आवडी॥५॥
                घोडीवर आरुढ झालेला कलंकी अवतार घेण्यात श्रीविष्णुला
                काय आवडले असेल ? असा   प्रश्न श्रीगुरुचरित्रकार
                विचारतात.
   तर्क : घोडी ह्या अत्यंत विश्वासू आणि वेगवान प्राण्याच्या योजनेद्वारे
            कलियुगात  विश्वासू सहकाऱ्यांच्या सहाय्याने जगातील पाप
              अत्यंत वेगाने नाहिसे होऊ शकेल असे सूचित  केले असावे
             असे वाटते.
 ह्या दहा अवतारांद्वारे विश्वातील पाप क्षालन करुन विश्वाचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश तर दिला नसेल ना !  
(श्रीविष्णुच्या प्रत्येक अवतार कार्याविषयी सविस्तर माहिती श्रीगुरुचरित्र आशय अध्याय ३रा मध्ये दिलेली आहे.)
 
विचारधन :-
राजा भगीरथानंतर दत्तात्रेयांचा भूतलावर झालेला अवतार श्रीपाद वल्लभ होय. श्रीपाद वल्लभ यांच्या आई वडिलांचे वर्णन करताना श्रीगुरुचरित्रकार म्हणतात
पीठापूर पूर्वदेशीं। होता ब्राह्मण उत्तमवंशी।
आपस्तंब शाखेसी। नाम आपळराज जाण॥ ५ - १०॥
त्याची भार्या नाम सुमता। असे आचार पतिव्रता।
अतिथि आणि अभ्यागता। पूजा करी भक्तिभावें॥ ५ - ११॥
                पीठापुर हे गाव सध्याच्या आंध्रप्रदेश ह्या राज्यात आहे. पीठापूर गावातील आपदस्तंब  शाखेतील आपळराजव त्याची पत्नी सुमताहे ब्राह्मण दांपत्य अतिथी व अभ्यागतयांची मनोभावे पूजा करीत असत.
मीमांसा:-
आपल्या भारतीय संस्कृतीत
अतिथी देवो भवः।
 हे तत्त्व आहे.
अतिथि =+ तिथि = म्हणजे अकाली तसेच न पूर्वसूचना देता येणारा पाहुणा
मराठीत अतिथी म्हणजे भोजनसमयी आलेला आगंतुक पाहुणा
तसेच
अभ्यागत (अभि + + गम् + क्त  = अचानक जवळ आलेली व्यक्ति)
मराठीत अभ्यागत म्हणजे पाहुणा
अशा ह्या अचानक येणाऱ्या अतिथीला देवाच्या ठिकाणी मानल्यावर, स्वाभाविकच आपळराज - सुमता हे दांपत्य त्याची पूजा करीत असे.
 
विचारधन :-   ओवी क्रमांक १३ ते ४६
                  घरात श्राद्धाचा दिवस असल्याने घरातील लोकांचे जेवण झाले नसतानाही, सुमता अतिथीवेषात आलेल्या श्रीदत्तात्रेयांना भिक्षा घालतेत्यामुळे प्रसन्न होऊन श्रीदत्तात्रेयांनी दिलेल्या वरामुळे सुमताला मुलगा होतो, म्हणून ह्या मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवतात.
मीमांसा:-
श्रीपादह्या शब्दातील श्रीम्हणजे श्रीगुरुदेव दत्तात्रेय व पादम्हणजे चरण  होय. श्रीपाद ह्या शब्दाचा भावार्थ : ह्या बालकाच्या रुपाने श्रीगुरुदेव दत्तात्रेयआपल्या घरी चालत आलेले आहेत.
 
विचारधन :- ओवी क्रमांक ४७ ते ५६
                             श्रीपाद  ७ वर्षांचा झाल्यावर तत्कालिन प्रथेप्रमाणे त्याचे आईवडील श्रीपादची मुंज करतात. पूर्वी मुंजहा संस्कार झाल्यावर मुलास गुरुगृही शिक्षणासाठी पाठवित असत. मुंज झाल्यावर लगेच श्रीपाद चारही वेद तर्क, व्याकरण वगैरे ज्ञान सांगू लागल्याने, गावातील लोक अचंबित झाले. हा निश्चित पुढे कोणीतरी अवतार होणार असा तर्क करु करायला लागले. परंतू  बालवयातील प्रचंड ज्ञानी व्यक्ती हा देवाचा अवतार असा चुकीचा समज करुन तत्कालीन समाजाने श्रीपादची व्यक्तीपूजा केलेली दिसत नाही.
                  श्रीपाद १६ वर्षांचा झाल्यावर त्याच्या आईवडिलांनी त्याचा विवाह करायचे ठरविल्यावर, श्रीपाद सांगतो,
आपण तापसी ब्रह्मचारी  । योगश्रियावांचोनि नारी ।
नलगती हा बोल धरा निर्धारीं ।श्रियावल्लभनाम माझें ॥ ५५॥
माझे नाव श्रिया वल्लभ’= श्रियेचा (लक्ष्मीचा) वल्लभ (नवरा) आहे.  लक्ष्मीचा नवरा म्हणजे श्रीविष्णु होय.
श्रीगुरुचरित्रकार त्यांच्या मनातील प्रश्न विचारतात,
श्रीपादवल्लभऐसें  । नाम झालें त्रिमूर्ति कैसें 
बोलीभाषेत श्रीपाद - श्रिया वल्लभह्या नावाचे श्रीपाद वल्लभहे संक्षिप्त नाव प्रचलित झाले असावे.
श्रीमद् भगवद् गीतेतील संदर्भानुसार तापसीशब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे
तापसी = तपस्वी = ascetic = one who practices self discipline
देव - द्विज - गुरु - प्राज्ञः  पूजनम्  शौचम्  आर्जवम् ।
ब्रह्मचर्यम्  अहिंसा    शारीरम्  तपः  उच्यते  ॥ १७ - १४॥

देव - ब्राम्हण - गुरुजन  आणि  ज्ञानी  यांची  पूजा , स्नानादि  शुद्धता , शरीर  आणि  मनाचा  समतोल    समन्वय , ब्रह्मचर्य  आणि  अहिंसा  याला शारीरिक  म्हणजेच  कायिक  तप  असे  म्हणतात .

अनुद्वेगकरम्  वाक्यम्  सत्यम्  प्रियहितम्    यत् ।
स्वाध्याय  अभ्यसनम्    एव  वाङ्मयम्  तपः  उच्यते  ॥ १७ - १५॥

कोणाच्याही  मनाला    दुखविणारे , सत्य , प्रिय    हितकारक  असे  भाषण  आणि  वेदांचे  अध्ययन  करणे ; याला  वाणीचे  किंवा  वाचिक  तप  असे  म्हणतात .

मनःप्रसादः  सौम्यत्वम्  मौनम्  आत्मविनिग्रहः 
भावसंशुद्धिः  इति  एतत्  तपः  मानसम्  उच्यते  ॥ १७ - १६॥

मनाची  प्रसन्नता , मन  शांत  ठेवणे , मौन  धारण  करणे , मनाचा  निग्रह  आणि  अन्तःकरणाचे  पावित्र्य  राखणे ; या  सर्वांना  मानसिक  तप  असे  म्हणतात .

असा प्रकारे शारीरिक, वाचिक आणि मानसिक  तपे यशस्वीरीत्या करु शकणाऱ्या व्यक्तीलाच तापसी अथवा तपस्वी म्हणतात.
 
विचारधन :- ओवी क्रमांक ६७ ते ७४
                     जसे चिंतामणीच्या स्पर्शाने लोखंड सोन्यासारखे होते, तसे महात्म्याच्या दृष्टी वर्षावाने तत्काळ ते लायक झाले. आपल्या दोन्ही अपंग भावांना धडधाकट व वेदशास्त्र संपन्न करुन श्रीपाद वल्लभ प्रथम घराची जबाबदारी पार पाडतात व जीवनातील पुढील कार्यासाठी घर सोडून जाण्याची परवानगी मागतात.
मीमांसा:-
                            चिंतामणीच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, असे न म्हणता, ‘चिंतामणीच्या स्पर्शाने लोखंड सोन्यासारखे होतेअसे श्रीगुरुचरित्रकार म्हणतात.
                आपली म्हातारपणाची जबाबदारी न  घेणाऱ्या मुलाचा आई वडिलांना तिरस्कार किंवा तिटकारा वाटणे स्वाभाविक  आहे, म्हणून श्रीपाद वल्लभ सांगतात, “मी साधुजनांना दीक्षा देण्याच्या समाजकार्यास जात आहे तरी माझा तिटकारा किंवा तिरस्कार करु नये.”
  
विचारधन :-
ओवी क्रमांक    ७०                                                
तुम्ही माता पित्याची सेवा कराल, तर महाज्ञानी होऊन तुम्हाला सुख मिळेल. इहलोकीचे सुख मिळून तुम्ही निश्चित मुक्त व्हाल.”
ओवी क्रमांक    ७१                                                
त्यांना असे बोलून त्यांनी मातेची समजूत घातली ,”दोन्ही पुत्रांबरोबर रहाल तर तुम्हाला सुख लाभेल.”

मीमांसा:-
              ह्या दोन्ही ओव्यांमधून एकत्र कुटुंब पद्धतीतील फायदे श्रीपाद वल्लभआपल्या दोन्ही भावांना व आई वडिलांना सांगतात.
 
ओवी क्रमांक    ७५   ते ७७
                 आई - वडिलांना असे सांगून आपण (श्रीपाद वल्लभ) अदृश्य झालात, त्वरीत काशी नगरात पोचलात, तेथे गुप्तरुपात होतात, असे ऐकले.काशीहून निघालेले श्रीपाद वल्लभनारायणाची भेट घेऊन बदरीच्या जंगलात गेले, तेथून ते मनोवेगाने गोकर्णास आले.
मीमांसा:-
                    इसवी सन १३२० ते १३५० असा अवघा ३० वर्षांचा श्रीपाद वल्लभांचा कालखंड.
                         श्रीपाद वल्लभांना अवघे ३० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यातील पहिली १६ वर्षे आई वडिलांच्या छत्राखाली व्यतित केल्यावर,  ह्या १६ वर्षे वयाचा बालयोग्याने उर्वरीत फक्त १४ वर्षांच्या कालखंडात दक्षिणेकडील पीठापुर गावातून निघून उत्तरेकडील काशी क्षेत्री वास्तव्य करुन नंतर हिमालयातील बदरीच्या अरण्यात नारायणाची भेट घेऊन परत दक्षिणेकडे कर्नाटकातील गोकर्ण क्षेत्री जगत् गुरु म्हणून कार्य  केलेले दिसते.
                          श्रीपाद वल्लभांच्या काळानंतर सुमारे ३०० वर्षांनी म्हणजे १६व्या शतकात गुरुचरित्र रचलेले आहे.  
                          श्रीपाद वल्लभांचा   प्रवास (दक्षिण दिशेच्या पीठापूरहून, उत्तरेकडे काशी, तेथून हिमालयातील बदरी अरण्य, व परत दक्षिणेकडे कर्नाटकातील गोकर्ण) ही ऐकलेली माहिती असे श्रीगुरुचरित्रकार म्हणतात, ते योग्य वाटते.
 ॥ श्रीगुरुदेवदत्त॥