Friday 24 January 2014

प्रजापती श्री अत्रीऋषी


‘भ्रष्टाचार निर्मूलक, खगोलशास्त्रज्ञ, प्रजापती श्री अत्रीऋषी’
                श्रीगुरुचरित्रात श्रीदत्तात्रेयांना आद्य गुरु पीठ संबोधलेले आहे. ह्या श्रीगुरुदेव दत्तात्रेयांना गुरुतत्वाचे बालकडू देणारे आई वडील कोण होते? अर्थात हा सर्व खरा इतिहास मिळणे कठीण आहे. श्रीदत्ताचे वडील हे सृष्टी निर्माण कर्त्या ब्रह्मदेवाचे द्वितीय मानस पुत्र होत.
                          सृष्टी निर्मिती कशी झाली? केव्हां झाली?  ह्या प्रश्नांची उत्तरे आधुनिक विज्ञान शोधत आहे.   
                   प्राचीन धर्मग्रंथांतून हा शोध घेण्याचा प्रयत्न, त्यात असणाऱ्या दंतकथांमुळे अंतिम सत्यापर्यंत पोहचू देत नाही. ह्या दंतकथा प्राचीन ग्रंथातच आहेत असे नाही तर, प्राचीन काळापासून आजच्या मानवापर्यंत चालत आलेला हा मनुष्य स्वभाव आहे.
                   यंदाच्या जू २०१३मध्ये उत्तराखंडातील ढग फुटीत केदारनाथाचे मंदीर बचावले, कारण ते उंचवट्यावर आपल्या पूर्वजांनी बांधलेले आहे.ह्या मंदीराच्या दोन्ही बाजूंना मंदाकिनी नदीचे पात्र आहे. डाव्या पात्रातून ही नदी बारा महिने वहाते. उजव्या पात्रातून पुराचे पाणी निसर्ग घेऊन जातो.८ महिने कोरडे असलेल्या ह्या पात्रात प्राचीन काळी लोक शेती करीत. परंतू आधुनि मानवाने तेथे उभी केलेली गावे, पाण्याच्या लोटात टिकली नाहीत,वाहून गेली. हे सत्य आपण स्वीकारत नाहीत. उलटपक्षी शासनाने केदारनाथ मंदीराची  पूजा - अर्चा यांची नीट व्यवस्था केली नाही, हेंडसाळ केली म्हणून शिवाचा कोप झाला. अशा दंतकथा मात्र आपण चवीने चघळतो. ह्या घटनेमागचे खरे कारण नदीच्या पात्रातील अनधिकृत बांधकाम, परंतू दंतकथांमुळे वस्तुस्थितीचा विपर्यास होतो.
                 श्रीअत्री ऋषींच्या काळातही अतिवृष्टी, दुष्काळ हे लहरी मान्सूनचे प्रश्न असावेत. ऋगवेदातील पाचव्या मंडलाचे नाव अत्री मंडल आहे. ह्या अत्री मंडलात पर्जन्यसुक्त दिलेले आहे.  ह्या मंडलात खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ग्रह नक्षत्रांच्या स्थिती-गती, सूर्यग्रहण तसेच पावसाची अतिवृष्टी, अनावृष्टी कशी टाळावी? ह्या निसर्गासंबंधी गोष्टींचा अभ्यास होत असे.
                   चित्रकुट पर्वतावरून पाहिलेल्या  खग्रास सूर्यग्रहणाच्या नोंदी श्री अत्री ऋषींनी करुन ठेवल्या आहेत . ह्या नोंदीनुसार लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ओरिअन ह्या पुस्तकात गणिताच्या सहाय्याने माहिती दिलेली आहे. ही माहिती कॉप्युटरच्या आधारे शोधली असता, हे खग्रास सूर्यग्रहण इसवी सन पूर्व ४६७७ साली झाले असावे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ह्याचा अर्थ श्री अत्री ऋषींचा काळ सुमारे ७०००वर्षांपूर्वीचा असावा.
              धर्मशास्त्र सांगते, सृष्टी निर्माण करण्यासाठी परमात्म्याने आपल्या संकल्पबलाने १) सनक, ) सनंदन ,) सनानन व ४ सनत्कुमार हे चार ऋषी प्रथम निर्माण केले परंतू  हे चारही जण अत्यंत विरक्त वृत्तीचे असल्याने सृष्टी निर्मितीसाठी त्यांचा उपयोग होऊ शकला नाही. थोडक्यात परमात्म्याचा पहिला प्रयोग फसला.
                  सृष्टी निर्मितीसाठी परमात्म्याने नंतर सात मानस पुत्र निर्माण केले. त्यांची नावे
) मरीचि, ) अत्री, ) अंगिरा, ) पुलस्य, ) पुलह, ) ऋतु, ) वसिष्ठ
हे सातही जण ऋषी होते म्हणून त्यांना सप्तर्षीम्हणतात.
निर्माण झालेली सृष्टी नियंत्रित करण्यासाठी परमात्म्याने २१ प्रजापती नेमले त्यांची नावे:
) ब्रह्मा
) स्थाणु
) मनु
) दक्ष
) भृगु
) धर्म
) यम
) मरीचि
) अंगिरा
१०) अत्रि
११) पुलस्य
१२) पुलह
१३) क्रतु
१४) वसिष्ठ
१५) परमेष्ठी
१६)विवस्वान्
१७) सोम
१८) कर्दम
१९) क्रोध
२०) अर्वाक्
२१) क्रित
                 परमात्म्याचे द्वितीय मानस पुत्र, खगोलशास्त्रज्ञ तसेच प्रजापती असलेल्या श्री अत्रीऋषींची पत्नी अनसूया ही प्रजापती कर्दम ऋषींची द्वितीय कन्या होय.
अनसूया = अन् + असूया = जिच्या मनांत कोणतीही असूया नसलेली. आपण मराठीत श्रीगुरुचरित्रातील अनसूया ह्या सुंदर अर्थपूर्ण नावाचा प्रचलित अपभ्रंश अनुसूया असा अर्थहीन करतो.
श्री अत्री ऋषी व अनसूया ह्या दांपत्याचा द्वितीय पुत्र म्हणजे दत्तात्रेय= दत्त +अत्रेय परमेश्वराने स्वत:ला पुत्राच्या रुपांत दिलेले असल्याने नाव दत्ततसेच अत्री ऋषींचा मुलगा म्हणून अत्रेय.
                       प्रजापती श्री अत्री ऋषी ह्यांनी स्वराज रक्षणासाठी नीती नियम आचारधर्म व कायदा सांगणारे अत्री स्मृतीअत्री संहिता हे दोन ग्रंथ लिहिलेले आहेत .
श्री अत्री ऋषींच्या मते
स्वराज्य रक्षण हे एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन बहुविध उपायांनी स्वराज्याचे रक्षण केले पाहिजे. स्वराज्य मिळविणे अवघड व मिळविलेले स्वराज्य टिकविणे त्याहूनही कठीण.  स्वराज्य टिकविण्यासाठी लोकांनी सतत सावध असले पाहिजे. कदा स्वराज्य मिळाले की लोक हळूहळू संकुचित, स्वार्थी होत जातात. या स्वार्थापायी समाजात भ्रष्टाचार वाढत जातो.’
                   श्री अत्री ऋषींचे मत आज आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत.
अत्यंत अवघड असा लढा देऊन आपण १९४७ साली इंग्रजी सत्तेकडून स्वराज्य मिळविले, परंतू आज २०१३ साली आपला देश भ्रष्टाचाराने पोखरला जाताना दिसतो.
                    श्रीअत्रीऋषींना ऋगवेदांत पांचजन्य म्हणून गौरविलेले आहे. त्यांनी त्याकाळी वाद, तंटे मिटविण्यासाठी पंचमंडळे नेमली. त्या पंचमंडळांचे ते सरपंच होते.
अशा ह्या लोकतंत्रवादी,भ्रष्टाचार निर्मूलक श्री अत्रीऋषींना तत्कालीन समाजकंटकांकडून ऋबीसमध्ये सहपरिवार टाकले असावे. ऋबीसम्हणजे तत्प अग्नीकुंड. हे ऋबीस भाताच्या कांडून शिल्लक राहिलेल्या तुसाचे ढीग चोहोबाजूंनी करून बनवित असत. हे सर्व बाजूंनी असलेले ऋबीसांतील तुसाचे ढीग पेटविले असता, धुमसून धुमसून जळत. त्यातून  ज्वाळा निघत नसत,  परंतु धुमसणाऱ्या ढीगाची दाहकता आंत कोंडलेल्या व्यक्तीस प्राणांतिक शिक्षा देत असे.ऋगवेदातील पहिल्या मंडळातील ११६व्या सुक्तातील आठव्या ऋचेत श्रीअत्री ऋषींना ऋबीसांतून वाचविल्याबद्दल अश्विनीकुमारांना धन्यवाद दिलेले आहेत.
एवढा प्रचंड समाजकंटकांचा विरोध झाला तरी प्रजापती म्हणून आपले काम श्रीअत्री ऋषींनी भारतभर आश्रम स्थापून केलेले दिसते. ती ठिकाणे पुढीलप्रमाणे
जम्मू काश्मीर, गंगोत्रीच्या  मार्गावर, ऋक्ष पर्वत, चित्रकुटपर्वत,
माहूरगड, गिरनार पर्वत, महीसागर संगम, कन्याकुमारीजवळ शुचीन्द्र क्षेत्र
                      अशाप्रकारे अत्री ऋषींनी काश्मीर ते कन्याकुमारी असे पूर्ण भारतवर्षात प्रवास करुन ठिकठिकाणी आश्रम स्थापून  परमात्म्याने दिलेली प्रजापती म्हणून जबाबदारी पार पाडलेली दिसते.
                   संशोधकांच्या मते मराठवाड्यातील माहूरगडावरील आश्रमांत त्रिमूर्तिंचे- अत्री पुत्र :- दुर्वास - शंकर, दत्त - श्रीविष्णु तर चंद्र - ब्रह्मदेव असे आगमन झाले असावे. महाराष्ट्रशासनाने माहूरगडास दत्तजन्म स्थान म्हणून मान्यता दिलेली आहे. माहूरगडापुढे सह्याद्री पर्वताच्या शिखरांपैकी एक शिखराचे नाव अनसूया आहे. हेच शिखर ह्या दत्तजन्म घटनेतील मुख्य स्थान आहे, असे मानले जाते.
                     श्रीअत्रीऋषींचा उल्लेख निर्मळ मनाचा अत्री ऋषी असे श्रीगुरुचरित्रकार करतात. भ्रष्टाचारमुक्त, लोकतंत्रवादी, खगोलाचे शास्त्र जाणून घेणारा समाज, हेच श्री अत्रीऋषींच्या विचारांचे मूर्त स्वरुप होय.
भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची राबवूया संकल्पना।
हिच प्रजापती श्री अत्रीऋषींनामानवंदना॥
                                                                            प्रजासत्ताक दिन २०१४










Saturday 18 January 2014

निसर्ग संवर्धक 'श्रीगुरुदेवदत्त’

 ‘जगातील आद्य निसर्ग संवर्धक श्रीगुरुदेवदत्त

                      श्रीगुरुचरित्र अध्याय ४ मध्ये सर्व परिचित श्रीदत्त जन्म कथा विस्ताराने सांगितलेली आहे. पतिपरायण अनसूयेच्या  ‘अतिथी देवो भव वर्तनाने ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर यांना निष्पाप अशा बालक रुपांत अनसूयेच्या घरी प्रकटावे लागले.
            ह्या दत्तजन्माचे वर्णन अध्याय ४ मध्ये श्रीगुरुचरित्रकार पुढीलप्रमाणे करतात. अत्री- अनसूयेच्या घरी ही तिन्ही बालके त्यांची मुले म्हणून वाढतात. परमेश्वर निजालयासी म्हणजे आपापल्या स्थानी किंवा घरी गेले.
ह्यातील ब्रह्मदेवाचे नाव चंद्र, विष्णुमूर्तीचे नांव दत्त, तसेच शंकराचे नांव दुर्वास अशी
नावे अत्री - अनसूया ह्यांनी बालकांची ठेवलेली आहेत.
श्रीगुरुचरित्रकार ह्या बालकांविषयी पुढे लिहितात,
त्रयमूर्ति ऐक्य हो ऊन। दत्तात्रेय राहिला आपण।
दुर्वास चंद्र निरोप घेऊन। गेले स्थाना आपुलाले॥ ७०॥
अनसूयेच्या घरीं देखा। त्रयमूर्ति राहिली मूर्ति एका।
नाम दत्तात्रेय ऐका। मूळपीठ श्रीगुरुचें॥ ७१॥  
ह्या श्रीदत्तमूर्तिला श्रीगुरुंचे मूळपीठ म्हटलेले आहे.
                    श्रीदत्तगुरुंना आद्यगुरु मानले तर त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा स्त्रोत निश्चित कोठे असेल? ह्या प्रश्नाचे उत्तर श्रीदत्तगुरुंनी सांगितले आहे.श्रीदत्तात्रेयांनी सांगितलेले त्यांचे २४गुरु हे आपल्या आजुबाजूच्या निसर्गातील आहेत.
        हे २४ निसर्ग गुरु श्रीदत्तात्रेयांनी सांगितलेल्या क्रमाने समजून घेतले तर त्यात एक समान धागा  आहे .तो धागा आत्मा, शरीर, मन यांना एकमेकांत गुंफत मानवाला मोक्षाकडे घेऊन जातो.

सर्वप्रथम रहाण्याचे ठिकाण : पृथ्वी
)पृथ्वी:
      मानव निर्मित  व निसर्ग निर्मित कितीही पृथ्वीवर आघात झाले,
              तरी पृथ्वी शेती, वृक्षवल्ली उत्पन्न करुन मानवाचे भले करते.
              हे सर्व काम निरपेक्षपणे पृथ्वी करते.
शिकवण : पृथ्वीकडून सहनशीलता, दुसऱ्याचे निरपेक्षपणे भले करणे.

) पाणी : जीवनावश्यक गोष्ट.आज मंगळावरही माणूस पाण्याचा शोध घेतो.
                   पाणी स्वत: शुद्ध असते ते स्वच्छ करण्याचे काम करते.
शिकवण :  पाण्याकडून शुद्धता.
                   सुज्ञ माणसाने आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांना  आपल्या ज्ञानाने
                    शुद्ध करावे.

) हवा : जगण्यास आवश्यक घटक हवा.
                हवा सर्वत्र वहाते परंतु ती ज्या गोष्टींवरुन वहात असते,
               त्यांना बांधलेली नसते.
शिकवणसुज्ञ माणूस सर्व लोकांमध्ये वावरतो परंतू त्यांच्यात
                   बांधलेला नसतो.

) अग्नी: अंधारात प्रकाशाची गरज
      अग्नी आपल्याला प्रकाश देतो.
शिकवण : प्रकाशणे.
        सुज्ञ माणसाने नेहमी त्याच्या ज्ञानाने व तपचर्येने प्रकाशावे.

) आकाश : जगण्याच्या मुलभूत गरजा पूर्ण झाल्यावर आपल्या डोक्यावरचे छपर आकाश.
                   आकाशात  ढग, ग्रह, तारे असतात परंतु आकाश त्यांच्या संपर्कात नसते.
शिकवण :   त्याचप्रमाणे आत्मा शरीरात असतो परंतु तो शरीराच्या संपर्कात नसतो.
                 आत्मा शरीरापासून अलिप्त असतो.

) चंद्र  : आकाशाच्या उदाहरणातून शरीरातील आत्मा.
               आत्म्याची शरीरातील स्थिती आकाशातील चंद्र.
               चंद्र हा परिपूर्ण आहे परंतु पृथ्वीच्या पडणाऱ्या छायेनुसार तो अमावस्येपर्यंत
               कमी होत जातो (क्षय म्हणजे कृष्णपक्ष म्हणतो) व  पौर्णिमेपर्यंत मोठा होताना
               दिसतो  (वृद्धी म्हणजे शुक्ल पक्ष म्हणतो).
शिकवण :  चंद्राप्रमाणे आत्मा हा परिपूर्ण व न बदलणारा आहे परंतु तो ज्या देहात धारण होतो.
               त्याप्रमाणे त्याला मिळणा-या उपाधीमुळे किंवा त्या व्यक्तीच्या गुण दोषांमुळे आत्मा
               झाकाळतो.

आत्म्याच्या ओळखीनंतर श्रीगुरुदेवदत्तांनी आपल्याला मनाकडे नेलेले दिसते.
) सूर्य :
             सूर्याचा प्रकाश पाण्याच्या पात्रावरुन निरनिराळ्या प्रकारे परावर्तित होतो.
              सूर्याचा प्रकाश पृथ्वी तसेच पृथ्वीवरील सजीव निर्जीव अशा प्रत्येक गोष्टींवरुन
              परावर्तीत होतो. एवढे कशाला चंद्रावरुनही प्रकाश परावर्तित होतो.
              परंतु श्रीगुरुदेवांनी इथे मन हे जलाशयाप्रमाणे असावे हे मुद्दाम सांगितलेले दिसते.
               सूर्याचा प्रकाश पांढरा असतो.
पांढरा रंग = लाल रंग + हिरवा रंग +  निळा रंग
                 स्वच्छ खोल जलाशयातील पाण्याचा तळ नेहमी हिरवे दिसतो.
                ह्याचे शास्त्रीय कारण सूर्याचा पांढरा प्रकाश ह्या स्वच्छ पाण्यातून खोल तळापर्यंत
               जाताना ह्या प्रकाशातील लाल रंग पाण्यात शोषला जातो व हिरवा रंग परावर्तित
               होतो.
शिकवण : सूर्याची  प्रकाशकिरणे आपल्यापर्यंत येत असतात, तशीच ब्रह्मतत्त्वाची त्या
                सर्वव्यापी परमात्म्याची किरणे आपल्या पर्यत येत असतात. म्हणून आपले मन
                 हे नेहमी स्वच्छ पाहिजे.  तसेच ते उथळ नसावे, त्याची दारे सदैव उघडी पाहिजेत
                म्हणजे ही परमात्म्याची वैश्विक किरणे मनात खोलवर पोहोचतील. मन हे स्वच्छ
                असेल तर पाण्याप्रमाणे त्यातील काही किरणे आत्मसात करु शकेल व बाकीची
                 परावर्तीत होतील.
                 परंतू आपले मन गढूळ असेल तर ही किरणे परावर्तीत होतील .त्याचा आपल्याला
                  काहीच फायदा होणार नाही.

) कबुतर : मनाची आसक्ती
                 एकदा श्रीदत्तात्रेयांनी कबुतराची जोडी त्यांच्या पिलांसकट पाहिली. पारध्यानी
                 टाकलेल्या जाळ्यांत पिल्ले अडकली तेंव्हा पिल्लांसाठी मातृत्वामुळे ह्या कबुतर
                 जोडीतील आईने - मादी कबुतराने त्या जाळ्यात उडी घेतली. हे पाहिल्यावर
                 नर कबुतराने कुटुंबासाठी त्या जाळ्यात उडी घेतली.  नर व मादी कबुतरांनी
                 जाळ्यात उडी घेतल्यावर आपण अडकणार हे माहित असतानासुद्धा उड्या
                 घेतलेल्या दिसतात.  आसक्ती त्यांना जाळ्यांत अडकवते म्हणजेच दास्यत्वाकडे
                 घेऊन जाते.
शिकवण :  आसक्ती हेच दास्यत्वाचे मुळ कारण असल्याने कोणत्याही प्रकारच्या आसक्तीत
                 अडकू नये.

मनाच्या विश्लेषणा नंतर जीवनास आवश्यक अन्न.
)अजगर : अजगर अन्न शोधण्यासाठी हिंडत नाही ते एकाच जागी रहाते.
                   त्या जागी त्याला जे भक्ष मिळते तेच त्याचे अन्न असते.
शिकवण :    ह्या अजगराकडून मी(श्रीगुरुदेवदत्त)  अजगर वृत्ती = अन्नाची अनिच्छा शिकलो.
                जे अन्न मला मिळाले त्यातच भागवायला शिकलो.
                               (‘ठेविले अनंते तैसेची रहावे    
चित्ती असू द्यावे समाधान’  ------- हेच खरे)

एका जागी  स्थिर  असून  विचलीत न होणे ह्याचे उदाहरण समुद्र.
१०) समुद्र :समुद्रात शेकडो नद्या पडत असतात म्हणजे शेकडो नद्या समुद्राला मिळत असतात.
                तरीही समुद्र आपली जागा सोडत नाही.
शिकवण : ह्या समुद्राप्रमाणे सुज्ञ माणसाने त्याच्या मार्गात कितीही मोह अडचणी संकटे आली,
                तरी आपल्या स्थानापासून विचलीत होऊ नये.

मनातील विकारांनी विचलीत : पतंग
११) पतंग :पतंग ज्याप्रकारे अग्नी कडे आकर्षित होऊन त्यात उडी घेतो व त्या आगीत मरतो
               त्याचप्रमाणे विकारवश्य माणूस सुंदर मुलीच्या प्रेमात पडून उद्धवस्त होतो. 
शिकवण :ह्या गोष्टीतून आपली नजर शुध्द पाहिजे व आपल्याला सत्वाची जाणीव पाहिजे,
               हे मी(श्रीगुरुदेवदत्त) शिकलो.
(माणसाने विकारवश्य होऊ नये. हल्ली आपण एकतर्फी प्रेम भंगातून होणा-या आत्महत्त्या तसेच त्यातून पुढची पायरी acid ने हल्ला, खून, बलात्कार अशी अधोगतीबातम्या वाचतो ऐकतो.)

१२) भ्रमर :भ्रमर एकाच फुलातून मध गोळा करीत नाही. निरनिराळ्या फुलांतून मध
                गोळा करतो.
शिकवण :     त्याप्रमाणे मी(श्रीगुरुदेवदत्त) माधुकरी वृत्तीने भिक्षा मागतो. एकाच घरावर
                  माझा भार टाकत नाही निरनिराळ्या घरांतून भिक्षा गोळा करतो
                   संन्यासी  लोकांनी अन्नासाठी माधुकरी  मागावी.

अन्न मिळवून आणल्यावर साठवण (? )
१३) मध माशी: मधमाशी मोठ्या कष्टाने मध पोळ्यात साठवते. मध गोळा करणारा
                      माणूस सहज त्यातला मध काढून घेऊन जातो. ह्याप्रमाणे माणूस सुद्धा
                     मोठ्या कष्टाने संपत्ति वगैरे गोष्टी साठवतो, परंतु एक दिवस मृत्यु देवता
                     ह्या वस्तूंपासून त्या व्यक्तीला दूर घेऊन जाते.
शिकवण : ह्या गोष्टीवरुन मी(श्रीगुरुदेवदत्त) शिकलो वस्तू साठवणे निरुपयोगी आहे.
१४) हत्ती :
               एकदा एका नर हत्तीला पकडण्यासाठी सापळा रचलेला होता. ह्या सापळ्यात
                    हत्तीला पकडण्यासाठी खड्डा करुन तो गवताने झाकलेला होता. ह्या गवतावर
                    कागदी लगद्याची मादी हत्तीची मूर्ति उभी केलेली होती. मादी हत्तीच्या
                    लालसेपोटी नर हत्ती तिला भेटायला त्या गवतावर  आला व सापळ्यात  
                    अडकला. सापळा लावणारा माणसाने अंकूशाच्या सहाय्याने नर हत्तीला जेरबंद
                    केले . मादी हत्तीच्या लालसेपोटी नर हत्ती स्वत:चे स्वातंत्र्य गमावून जन्मभराचा
                    दु:खी झाला.
शिकवण : लालसा हेच दु:खाचे मूळ कारण असल्याने माणसाच्या मनात लालसा असू नये, ही
                गोष्ट मी (श्रीगुरुदेवदत्त) हत्तीकडून शिकलो.

१५) हरिण : संगीताच्या ओढीने हरीण पारध्याच्या जाळ्यात अडकतो, त्याचप्रमाणे
                चारित्र्यहीन स्त्रीच्या संगीताकडे माणूस आकर्षित होऊन आयुष्यात उद्धवस्त
                होतो.
शिकवण :  विषयासक्त किंवा कामुक संगीत ऐकू नये हा धडा मी (श्रीगुरुदेवदत्त
             हरीणाकडून शिकलो.
             चारित्र्यहीन स्त्रीचे संगी आयुष्य उद्धवस्त करते.

(चारित्र्यहीन स्त्री विकारवश्य माणूस यांना श्रीगुरुदेवांनी गैर मानलेले दिसतात.
जीवनाच्या गरजेमुळे नर्तिका, गणिका, वेश्या बनलेल्या स्त्रीला गैर मानीत नाहीत.)

१६)गणिका :विदेह ह्या नगरीत पिंगला नावाची गणिका(नर्तिका ) होती. ती एका रात्री
                गिऱ्हाईकांची वाट पाहून थकली. शेवटी तिच्याकडे जे होते, त्यातच समाधान
                मानून शांत झोपली.
शिकवण :   ह्या चारित्र्यहनन झालेल्या स्त्रीकडून मी(श्रीगुरुदेवदत्त) आशेचा त्याग केला
                 असता आयुष्यात समाधान मिळते.

१७) डोंबकावळा :डोंबकावळ्याने मांसाचा तुकडा उचलला, परंतु बाकीच्या पक्षांनी त्याचा
                     पाठलाग केला, त्याच्यावर हल्ला चढवला तेंव्हा  डोंबकावळ्याने तो मांसाचा
                       तुकडा फेकून दिला व शांती मिळवली.
शिकवण :  ह्या डोंबकावळ्याप्रमाणे मी(श्रीगुरुदेवदत्त)  जीवावर बेतणाऱ्या स्तूंचा त्याग
              करायला शिकलो.
(विषाची परिक्षा घेऊ नाही.)

जीवनातील आनंद कसा घ्यावा?
१८) लहान बाळ : लहान बाळ  दू पिताना अतिशय आनंदी तसेच चिंतामुक्त असते.
शिकवण :   ह्या लहान बाळाकडून मी (श्रीगुरुदेवदत्त)  आनंदी रहायला शिकलो.

१९)विवाहयोग्य उपवर मुलगी :एकदा एका घरी विवाहयोग्य मुलगी एकटी असताना मुलाकडचे
                    लोक तिला पहायला आले. ह्या मुलीने त्यांचे आगतस्वागत केले .त्यांना बसायला
                    आसन दिले व बाहेर गेलेले आपले आईवडील परत येईपर्यंत स्वयंपाकाची तयारी
                    म्हणून भात कांडायला घेतला.
(त्याकाळी पॉलिश केलेला तादूळ ,कणीक बनविण्यासाठी चक्की नव्हती.)
भात कांडताना तिच्या लक्षात आले  --- आपल्या हातातील बांगड्यांच्या होणाऱ्या आवाजावरुन मुलाकडच्यांना आपल्याकडे भात कांडायला कोणी नोकर नाही. आपण स्वत: हे काम करीत आहोत हे समजेल. तिला आपल्या गरीब सांपतिक स्थितीचे प्रदर्शन करायचे नव्हते, म्हणून तिने प्रत्येक हातांत फक्त दोन बांगड्या ठेवल्या व बाकीच्या बांगड्या काढून टाकल्या व भात कांडायला सुरवात केली. ह्या उरलेल्या दोन बांगड्या एकमेकांवर आपटल्याचा आवाज येत होता. तिने परत प्रत्येक हातातली एकएक बांगडी काढली. आता दोन्ही हातात एक-एक बांगडी राहिल्यामुळे बांगड्यांचा आवाज येणे बंद झाले व भात कांडण्याचे काम पाहुण्यांच्या अपरोक्ष ह्या मुलीने बिनबोभाट पूर्ण केले.
शिकवण :जास्त लोक एकत्र आले की वाद-विवाद भांडणे सुरु होतात. दोन लोक एकत्र आले तरी  शाब्दिक चमक होते म्हणून संन्यासी माणसाने एकान्तवासांतच रहावे .

(“संन्यासी माणसाने एकान्तवासांतच रहावे पण कुठे रहावे?”)

२०) मासा:
                  माशाला पकडण्यासाठी माणूस अन्नाचे अमिष असलेली जाळी पाण्यात टाकतो.
                  ह्या जाळ्यातील अन्नाच्या लोभापायी मासा अन्न खायला जाळ्यात येतो व
                  अडकतो.
शिकवण :   लोभापाशी माणूस   स्वत:चे स्वातंत्र्य गमावतो व देशोधडीला लागतो
                  हे मी (श्रीगुरुदेवदत्त) माशाकडून शिकलो.

२१)साप :साप स्वत:साठी बिळ कधीच तयार करीत नाही. दुस-याने बनविलेल्या बिळात रहातो.
(आयत्या बिळात नागोबा)
शिकवण :त्याप्रमाणे संन्यासी माणसाने स्वत:साठी घर कधीच बांधू नये. त्याने डोंगरातील गुहा
              किंवा लोकांनी बांधलेल्या मंदिरात रहावे.

(अन्न, निवारा ह्या गरजा भागल्यानंतर जीवन जगण्यासाठी जरुरीचे असलेले काम धनुष्य बनविणाऱ्या कारागीराप्रमाणे एकाग्र चित्ताने करावे.)
२२) धनुष्य बनविणारा कारागिर :एकदा एक कारागीर धनुष्य एकाग्र चित्ताने धनुष्य बनवित
                      असताना त्याच्या दुकानासमोरील रस्त्यावरुन राजा गेला. दुसऱ्या एका
                      माणसाने ह्या कारागीराला आत्ता ह्या रस्त्यावरुन राजा गेला का? म्हणू
                      विचारले असता, धनुष्य बनविणाऱ्या कारगीराला काहीच माहित नव्हते.
                     तो कारागीर आपल्या कामात मग्न होता त्याला आजुबाजूचे काहीच भान
                      नव्हते. प्रत्यक्ष राजा समोरुन गेल्यावर रस्त्यावर झालेली धावपळ कारागीराला
                      समजली नाही.
शिकवण :      ह्या कारागीराप्रमाणे कोणतेही काम मन पुर्णपणे एकाग्र करुन करावे.

(मन एकाग्र करताना मनाच्या विचाराच्या भोवऱ्यात गुंतू नका. शेखमहंमदी करु नका.)
२३)कोळी :कोळी आपल्या स्वत:च्या लाळेने सतत जाळे विणत असतो. ह्या स्वत:च विणलेल्या
               जाळ्यात तो कोळी अडकतो. सर्वसामान्य माणूस स्वत:च्याच कल्पनांच्या जाळ्यात
               गुरफटून जातो.
शिकवण :   सुज्ञ माणसाने जगाचे ऐहिक विचार त्याग करुन परमेश्वराचे विचार करावेत.

२४) मोगरा :मोगरा नावाचा किडा दुस-या किड्याला पकडून आपल्या घरट्यांत आणतो
                  व पकडलेल्या किड्याला टोचा मारतो. हा पकडून ठेवलेला किडा सतत त्या
                   घरट्यात घाबरलेला असतो. त्याला वाटते तो पकडणारा किडा परत येईल व
                  आपल्याला टोचा मारेल. ह्या सततच्या भितीयुक्त विचारातून पकडलेला किडा
                   टोचा मारायला शिकतो. ह्या मोगरा ह्या किड्याप्रमाणे मनुष्यही सतत जसे
                   विचार करतो, तसाच बनतो.
(इथे प्रश्न मनांत येतो की घाबरलेला किडा एक दिवस टोचा मारायला कसा काय शिकला ?
सततच्या दडपणांत राहिलेला जीव एक दिवस ते दडपण झुगारुन देतो.
 एका गावातील राजकारणात घडलेली सत्य घटना :
 राजकारणात शेवटी मतपेटी निर्णायक असते .एकदा एका महिला समितीच्या सभापदी पदाची निवडणुक सत्ताधारी जास्त मतैक्य असलेल्या पक्षाने प्रतिष्ठेची ठरवली.
आपल्याच पक्षाची  महिला ह्या समितीची सभापती झाली पाहिजे ,म्हणून त्याच पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींना एका केबीन मध्ये डांबून ठेवले. त्यांचे आदरातिथ्य व्यवस्थित चालू होते.
परंतू सकाळपासून मतदान संपायच्या अर्धा तास आधीपर्यंत सतत नजरकैदेत ठेवले.
ह्या सततच्या दडपणाला स्वाभाविकच ह्या मतदार महिला लोकप्रतिनिधी वैतागल्या .
त्यांनीही आपापसांत ठरविले ही दडपशाही मतपेटीद्वारे झुगारुन द्यायची  .
वास्तविक खुल्या वातावरणांत निवडणुक झाली असती तर ह्या बंदिस्त महिला प्रतिनिधी
स्वत:च्याच पक्षाला मत देणार होत्या .
बंदिस्त किडा जसा टोचा मारयला शिकला तशीच प्रतिक्रिया ह्या महिला लोकप्रतिनिधींची झाली.
बंदिवासातून बाहेर पडल्यावर मताचे दान अल्पमतात असलेल्या विरोधी पक्षाच्या महिला उमेदवाराच्या पदरांत टाकले.
ही  विरोधी पक्षाची महिला उमेदवार विनासायास सभापती झाली सत्ताधारी पक्ष त्यांच्याच कर्माने प्रतिष्ठेची निवडणूक  हरला.)

शिकवण :ह्या मोगरा व त्याने पकडून आणलेल्या किड्याप्रमाणे जर सतत आत्म्याचे विचार
             आत्मसात केले, स्वत:च्या देहासंबंधीची आसक्ती सोडून दिली तर मोक्ष किंवा मुक्ति
              मिळेल.
  (तुमच्या सततच्या विचांराप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्व बनते ,ह्या मानशास्त्रातील सिद्धान्ताच्या आधारे  मनाला मोक्षाच्या मार्गाकडे श्रीगुरुदेवदत्त घेऊन जाताना दिसतात.)

                       अशाप्रकारे तुम्ही रहात असलेल्या पृथ्वी पासून सृष्टीतील गुरुंच्या माध्यमांतून    मोक्षाकडे नेताना आप, तेज, वायू ,पृथ्वी, आकाश, पशू ,पक्षी, प्राणी, किटक तसेच माणसातील कारागीर ह्या गुरुंच्या स्थानांत निष्पाप बाळ अगदी वेश्येला सुद्धा स्था आहे पण चारित्र्यहीन स्त्रीचे संगीत व विकारवश माणूस त्याज्य आहे.

                ओक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक श्री. मार्टीन हाय ह्या भूगर्भ शास्त्रज्ञाने २००७ साली कॅनेडिअन पर्यावरण विषयक जर्नलमध्ये श्रीत्तात्रेय व त्यांचे २४ गुरु ह्यावर लिहिलेल्या शोधनिबंधात निसर्ग विषयक जाणीवांचे जगातील आद्य जनक म्हणून श्रीगुरुदत्तात्रेयांना गौरविले आहे.
                 आजच्या युगांत आपण  प्रदुषण’, पर्यावरण मित्र वगैरे संकल्पनांचा सतत उहापोह निसर्ग जपण्यापेक्षा जास्त करीत असतो परंतु श्रीदत्तात्रेयाने ह्या निसर्गालाच  पूज्यनीय अशा गुरुस्थानी ठेवले. निसर्ग गुरुस्थानी  मानल्यावर त्याचा  ऱ्हास  माणसाकडून आपोआपच थांबेल.
॥ जय श्रीगुरुदेवदत्त॥
                                                    --------------- श्रीगुरुचरित्र आशय निधी

                                ताजा कलम                               दि. १७/ जानेवारी /२०१४
ह्या वेब साईटवर
                                    अर्पणपत्रिका, प्रस्तावना, प्रयोजन प्रकाशित