Friday 24 January 2014

प्रजापती श्री अत्रीऋषी


‘भ्रष्टाचार निर्मूलक, खगोलशास्त्रज्ञ, प्रजापती श्री अत्रीऋषी’
                श्रीगुरुचरित्रात श्रीदत्तात्रेयांना आद्य गुरु पीठ संबोधलेले आहे. ह्या श्रीगुरुदेव दत्तात्रेयांना गुरुतत्वाचे बालकडू देणारे आई वडील कोण होते? अर्थात हा सर्व खरा इतिहास मिळणे कठीण आहे. श्रीदत्ताचे वडील हे सृष्टी निर्माण कर्त्या ब्रह्मदेवाचे द्वितीय मानस पुत्र होत.
                          सृष्टी निर्मिती कशी झाली? केव्हां झाली?  ह्या प्रश्नांची उत्तरे आधुनिक विज्ञान शोधत आहे.   
                   प्राचीन धर्मग्रंथांतून हा शोध घेण्याचा प्रयत्न, त्यात असणाऱ्या दंतकथांमुळे अंतिम सत्यापर्यंत पोहचू देत नाही. ह्या दंतकथा प्राचीन ग्रंथातच आहेत असे नाही तर, प्राचीन काळापासून आजच्या मानवापर्यंत चालत आलेला हा मनुष्य स्वभाव आहे.
                   यंदाच्या जू २०१३मध्ये उत्तराखंडातील ढग फुटीत केदारनाथाचे मंदीर बचावले, कारण ते उंचवट्यावर आपल्या पूर्वजांनी बांधलेले आहे.ह्या मंदीराच्या दोन्ही बाजूंना मंदाकिनी नदीचे पात्र आहे. डाव्या पात्रातून ही नदी बारा महिने वहाते. उजव्या पात्रातून पुराचे पाणी निसर्ग घेऊन जातो.८ महिने कोरडे असलेल्या ह्या पात्रात प्राचीन काळी लोक शेती करीत. परंतू आधुनि मानवाने तेथे उभी केलेली गावे, पाण्याच्या लोटात टिकली नाहीत,वाहून गेली. हे सत्य आपण स्वीकारत नाहीत. उलटपक्षी शासनाने केदारनाथ मंदीराची  पूजा - अर्चा यांची नीट व्यवस्था केली नाही, हेंडसाळ केली म्हणून शिवाचा कोप झाला. अशा दंतकथा मात्र आपण चवीने चघळतो. ह्या घटनेमागचे खरे कारण नदीच्या पात्रातील अनधिकृत बांधकाम, परंतू दंतकथांमुळे वस्तुस्थितीचा विपर्यास होतो.
                 श्रीअत्री ऋषींच्या काळातही अतिवृष्टी, दुष्काळ हे लहरी मान्सूनचे प्रश्न असावेत. ऋगवेदातील पाचव्या मंडलाचे नाव अत्री मंडल आहे. ह्या अत्री मंडलात पर्जन्यसुक्त दिलेले आहे.  ह्या मंडलात खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ग्रह नक्षत्रांच्या स्थिती-गती, सूर्यग्रहण तसेच पावसाची अतिवृष्टी, अनावृष्टी कशी टाळावी? ह्या निसर्गासंबंधी गोष्टींचा अभ्यास होत असे.
                   चित्रकुट पर्वतावरून पाहिलेल्या  खग्रास सूर्यग्रहणाच्या नोंदी श्री अत्री ऋषींनी करुन ठेवल्या आहेत . ह्या नोंदीनुसार लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ओरिअन ह्या पुस्तकात गणिताच्या सहाय्याने माहिती दिलेली आहे. ही माहिती कॉप्युटरच्या आधारे शोधली असता, हे खग्रास सूर्यग्रहण इसवी सन पूर्व ४६७७ साली झाले असावे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ह्याचा अर्थ श्री अत्री ऋषींचा काळ सुमारे ७०००वर्षांपूर्वीचा असावा.
              धर्मशास्त्र सांगते, सृष्टी निर्माण करण्यासाठी परमात्म्याने आपल्या संकल्पबलाने १) सनक, ) सनंदन ,) सनानन व ४ सनत्कुमार हे चार ऋषी प्रथम निर्माण केले परंतू  हे चारही जण अत्यंत विरक्त वृत्तीचे असल्याने सृष्टी निर्मितीसाठी त्यांचा उपयोग होऊ शकला नाही. थोडक्यात परमात्म्याचा पहिला प्रयोग फसला.
                  सृष्टी निर्मितीसाठी परमात्म्याने नंतर सात मानस पुत्र निर्माण केले. त्यांची नावे
) मरीचि, ) अत्री, ) अंगिरा, ) पुलस्य, ) पुलह, ) ऋतु, ) वसिष्ठ
हे सातही जण ऋषी होते म्हणून त्यांना सप्तर्षीम्हणतात.
निर्माण झालेली सृष्टी नियंत्रित करण्यासाठी परमात्म्याने २१ प्रजापती नेमले त्यांची नावे:
) ब्रह्मा
) स्थाणु
) मनु
) दक्ष
) भृगु
) धर्म
) यम
) मरीचि
) अंगिरा
१०) अत्रि
११) पुलस्य
१२) पुलह
१३) क्रतु
१४) वसिष्ठ
१५) परमेष्ठी
१६)विवस्वान्
१७) सोम
१८) कर्दम
१९) क्रोध
२०) अर्वाक्
२१) क्रित
                 परमात्म्याचे द्वितीय मानस पुत्र, खगोलशास्त्रज्ञ तसेच प्रजापती असलेल्या श्री अत्रीऋषींची पत्नी अनसूया ही प्रजापती कर्दम ऋषींची द्वितीय कन्या होय.
अनसूया = अन् + असूया = जिच्या मनांत कोणतीही असूया नसलेली. आपण मराठीत श्रीगुरुचरित्रातील अनसूया ह्या सुंदर अर्थपूर्ण नावाचा प्रचलित अपभ्रंश अनुसूया असा अर्थहीन करतो.
श्री अत्री ऋषी व अनसूया ह्या दांपत्याचा द्वितीय पुत्र म्हणजे दत्तात्रेय= दत्त +अत्रेय परमेश्वराने स्वत:ला पुत्राच्या रुपांत दिलेले असल्याने नाव दत्ततसेच अत्री ऋषींचा मुलगा म्हणून अत्रेय.
                       प्रजापती श्री अत्री ऋषी ह्यांनी स्वराज रक्षणासाठी नीती नियम आचारधर्म व कायदा सांगणारे अत्री स्मृतीअत्री संहिता हे दोन ग्रंथ लिहिलेले आहेत .
श्री अत्री ऋषींच्या मते
स्वराज्य रक्षण हे एकट्या दुकट्याचे काम नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन बहुविध उपायांनी स्वराज्याचे रक्षण केले पाहिजे. स्वराज्य मिळविणे अवघड व मिळविलेले स्वराज्य टिकविणे त्याहूनही कठीण.  स्वराज्य टिकविण्यासाठी लोकांनी सतत सावध असले पाहिजे. कदा स्वराज्य मिळाले की लोक हळूहळू संकुचित, स्वार्थी होत जातात. या स्वार्थापायी समाजात भ्रष्टाचार वाढत जातो.’
                   श्री अत्री ऋषींचे मत आज आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत.
अत्यंत अवघड असा लढा देऊन आपण १९४७ साली इंग्रजी सत्तेकडून स्वराज्य मिळविले, परंतू आज २०१३ साली आपला देश भ्रष्टाचाराने पोखरला जाताना दिसतो.
                    श्रीअत्रीऋषींना ऋगवेदांत पांचजन्य म्हणून गौरविलेले आहे. त्यांनी त्याकाळी वाद, तंटे मिटविण्यासाठी पंचमंडळे नेमली. त्या पंचमंडळांचे ते सरपंच होते.
अशा ह्या लोकतंत्रवादी,भ्रष्टाचार निर्मूलक श्री अत्रीऋषींना तत्कालीन समाजकंटकांकडून ऋबीसमध्ये सहपरिवार टाकले असावे. ऋबीसम्हणजे तत्प अग्नीकुंड. हे ऋबीस भाताच्या कांडून शिल्लक राहिलेल्या तुसाचे ढीग चोहोबाजूंनी करून बनवित असत. हे सर्व बाजूंनी असलेले ऋबीसांतील तुसाचे ढीग पेटविले असता, धुमसून धुमसून जळत. त्यातून  ज्वाळा निघत नसत,  परंतु धुमसणाऱ्या ढीगाची दाहकता आंत कोंडलेल्या व्यक्तीस प्राणांतिक शिक्षा देत असे.ऋगवेदातील पहिल्या मंडळातील ११६व्या सुक्तातील आठव्या ऋचेत श्रीअत्री ऋषींना ऋबीसांतून वाचविल्याबद्दल अश्विनीकुमारांना धन्यवाद दिलेले आहेत.
एवढा प्रचंड समाजकंटकांचा विरोध झाला तरी प्रजापती म्हणून आपले काम श्रीअत्री ऋषींनी भारतभर आश्रम स्थापून केलेले दिसते. ती ठिकाणे पुढीलप्रमाणे
जम्मू काश्मीर, गंगोत्रीच्या  मार्गावर, ऋक्ष पर्वत, चित्रकुटपर्वत,
माहूरगड, गिरनार पर्वत, महीसागर संगम, कन्याकुमारीजवळ शुचीन्द्र क्षेत्र
                      अशाप्रकारे अत्री ऋषींनी काश्मीर ते कन्याकुमारी असे पूर्ण भारतवर्षात प्रवास करुन ठिकठिकाणी आश्रम स्थापून  परमात्म्याने दिलेली प्रजापती म्हणून जबाबदारी पार पाडलेली दिसते.
                   संशोधकांच्या मते मराठवाड्यातील माहूरगडावरील आश्रमांत त्रिमूर्तिंचे- अत्री पुत्र :- दुर्वास - शंकर, दत्त - श्रीविष्णु तर चंद्र - ब्रह्मदेव असे आगमन झाले असावे. महाराष्ट्रशासनाने माहूरगडास दत्तजन्म स्थान म्हणून मान्यता दिलेली आहे. माहूरगडापुढे सह्याद्री पर्वताच्या शिखरांपैकी एक शिखराचे नाव अनसूया आहे. हेच शिखर ह्या दत्तजन्म घटनेतील मुख्य स्थान आहे, असे मानले जाते.
                     श्रीअत्रीऋषींचा उल्लेख निर्मळ मनाचा अत्री ऋषी असे श्रीगुरुचरित्रकार करतात. भ्रष्टाचारमुक्त, लोकतंत्रवादी, खगोलाचे शास्त्र जाणून घेणारा समाज, हेच श्री अत्रीऋषींच्या विचारांचे मूर्त स्वरुप होय.
भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची राबवूया संकल्पना।
हिच प्रजापती श्री अत्रीऋषींनामानवंदना॥
                                                                            प्रजासत्ताक दिन २०१४










No comments:

Post a Comment