Friday 17 August 2018

समाज संघटकास आदरांजली


                                             १९५२ साल असावे बहुतेक. निवडणूका नुकत्याच पार पडल्या होत्या. नगरपरिषद निवडणूकांनंतर एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कै. अटलबिहारी वाजपेयी यांचा विदर्भ दौरा चालू होता. अकोला येथे अटलबिहारीजींची सभा आयोजित करण्यात आली. जनसंघाचे कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने शहरांत जमत होते. आपल्या मुत्सद्दी, धुरं, प्रतिभासपन्न नेत्यास पहाण्यासाठी-ऐकण्यासाठी स्वयंसेवक उत्सुक होते.   

                        टाळ्यांच्या गजरात मा. अटलबिहारी वाजपेयींचे आगमन झाले. भा सुरु झाली. मा. अटलबिहारी वाजपेयींनी बोलण्यास सुरवात केली. श्रोते एकाग्रचित्ताने भाषण ऐकू लागले. आपल्या भाषणांत अटलजींनी श्रोत्यांना म्हणाले, “ नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या लोकांनी हात वर करावेत.” निवडून आलेल्या नगरसेवकांनी वर केलेल्या हातांमध्ये, महिलावर्गामधून एका महिलेचा हात वर केलेला दिसत होता.

                         मा. वाजपेयींनी लगेच विचारले,”जनसंघाच्या दिवानिशाणीवर कोण-कोण विजयी झाले आहेत ?” सर्व सभा अवाक्  झाली. प्रश्न मोठा गहन होता ! भारतीय जनसंघ नुकताच १९५१ साली दिल्ली येथे अस्तित्वात आला होता. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नेतृत्व जनसंघास लाले होते. मा. अटलबिहारी वाजपेयी त्यांचे व्यक्तिगत कार्यवाह म्हणून काम पहात होते. नुकत्याच जन्माला आलेल्या जनसंघाच्या तिकिटावर निवडूक लढविण्याचे धाडस कोण करणार ? जनसंघाच्या कार्याविषयी आत्मीयता असलेले लोकही अपक्ष म्हणून विजयी झाले होते.एकंदरीत अटलजींचा प्रश्न, विदर्भात अनुत्तरीत रहाणार! महिला वर्गातून हात वर केलेल्या बाई उभ्या राहिल्या आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाल्या, “मी सौ. गौरबाई करमरकर बुलढाणा नगरपरिषदेवर दिवाही निशाणी घेऊन  जनसंघातर्फे निवडून आले आहे.” सर्व सभेचे लक्ष ह्या महिलेने वेधून घेतले. ती महिला वयाने ४०च्या घरातील, किंचित स्थूल बांधा, रंग गोरा, उंची बेताची, नाकीडोळी नीटस, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज, आवाज खणखणीत, नऊवारी साडी, अंबाडा, रहाणीवरुन मध्यम वर्गातील. शिक्षण म्हणाल तर, कानडी ३ इयत्ता शिकलेली. सरावाने मराठी लिहिता-वाचता येणारी, अशी ही महिला पाहून सर्व सभा स्तब्ध झाली.

                         बुलढाणा येथे घरांत पुरुष एकटा मिळवता असताना, आपला सहा मुलांचा संसार टुकीत सांभाळणाऱ्या सौ. गौरबाई करमरकर  ह्या मध्यम वर्गीय महिलेचा समाजकार्याकडे ओढा होता. ती स्वतः हिंदूत्वनिष्ट तसेच सावरकर भक्त होती. तिला वाचनाची आवड होती. आजूबाजूच्या महिला गोळा करुन, दुपारच्यावेळी चांगल्या पुस्तकांचे तिच्या घरी वाचन चालत असे. राष्ट्र-सेविका समितीची ती निष्टावान कार्यकर्ती होती. झोपडीतील तिच्या कार्यामुळे संपूर्ण गावात आक्का करमरकरम्हणून तिची ओळख होती. जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी तिला नगरसेविका म्हणून निवडणूकीस उभी करण्याचा घाट घातला. आक्का करमरकर निवडूक लढविण्यास तयार नव्हती. लोकाग्रहास्तव तिने निवडूक लढवली आणि कॉंग्रेस उमेदवाराचा दणदणीत पराव करुन ती निवडून आली. कॉंग्रेसची उमेदवार बुलढाण्यातील प्रसिद्ध वकीलांची पत्नी, हायस्कूल पर्यंत शिकलेली तसेच निरनिराळ्या संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या होत्या. सौ. गौरबाई करमरकरांच्या समाजकार्याची मतदारांनी पावती दिली. ह्या विजयी उमेदवाला पहिला हार कॉंग्रेसच्या पराभूत महिला उमेदवाराने घातला. स्वतः पराभूत होऊनही केवढा मनाचा मोठेपणा! ह्या बाईंनी दाखविला.

निवडणूकीच्या पत्रकांचा फक्त रु.१७/= एवढाच खर्च सौ.गौरबाईंनी केला होता. मिरवणूकीत मिरवत सौ.गौरबाई गेल्या नाहीत. मिरवणूकीनंतरच्या सभेत व्यासपीठावरुन भाषण करताना आक्का करमरकर म्हणाल्या, “निवडणूक होई पर्यंत पक्षीय राजकारण; निवडून आल्यावर आता मी तुम्हा सर्वांची प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे.“

                            पराभूत उमेदवाराने विजयी उमेदवाराचे सर्वप्रथम केलेले अभिनंदन तसेच पदभार स्वीकारल्यानंतर पक्षीय राजकारण दूर ठेवून समाजसेवा करण्याची वृत्ति हल्ली क्वचित आढळते. निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी, राजकीय पक्षांची चाललेली चढाओढ  आपण सध्या पहातो.

                               १९५२ सालच्या अकोला येथील सभेत जनसंघाची निशाणी घेऊन विजयी झालेल्या बुलढाण्याच्या सौ. गौरबाई करमरकरांचा श्री. अटलबिहारी वाजपेयींनी रसभेत आपल्या भाषणात कौतुकाने उल्लेख केला. ‘जनसंघाची निशाणी, जनसंघाचे विचारह्यांची निवडणूक विजयातून समाजात होणारी प्रतिष्ठापना ही लोकशाहीची गुरुकिल्ली ठरली. एक प्रवाही शैलीचा वक्ता, संवेदनशील कवी, विचारवंत लेखक, डाडीचा पत्रकार आणि दूरदृष्टी असलेला लोकनेता  अटलजींच्या भाषणातून वऱ्हाडी माणसाने अनुविला.   

                               निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या संख्याबलापेक्षा पक्षाची विचारधारा-तत्वप्रणाली समाजात रुजविणाऱ्या अजातशत्रु संघटक कै. अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली.

अनुप्रभा, नाशिक

www.shrigurucharitra.com