श्री गुरुचरित्र

श्रीगुरुचरित्र

“मागणे बा लई नायी, बा लई नायी ‘श्रीगरुदत्त ’
कार्यपूर्तिस्तव ठॆवा, मम शिरी आपुला वरदहस्त॥“

भक्तांचा तारक, कृपेचा सागर, वेदांचा ज्ञानी अशा तीन मुर्ती ‘श्रीगुरुनाथानं’ वंदन करुन मी माझे मनोगत व्यक्त करते. मी स्वत: आस्तिक आहे पण अधं:श्रध्द नाही. देवळात देवाची मूर्ती पाहून आपोआप नतमस्तक होऊन माझे नमस्कारासाठी हात जोडले जातात, इतपतच माझी देशभक्ती असते. सृष्टीचा कारभार चालविणारी एक अदृश्य महान शक्ति असावी, असे माझे मत आहे. श्रीगुरुचरित्राचे अर्वाचीन मराठी भाषेत अनुवाद करण्याचे काम ह्याच शक्तीने माझ्याकडून करुन घेतले असावे, असे मला वाटते.

२ वर्षापूर्वी (जानेवारी २०११) नागीण, कावीळ अश्या बड्या आजारांचे आदरातिथ्य (?) केल्यानंतर लवासा, महाबळेश्वर, पांचगणी व गॊंदवले ह्या ठिकाणी वातावरण बदल म्हणून गेले होते. सर्व ठिकाणी निसर्ग सौदर्य व शांतता यांनी मानसिक व शारिरीक स्वास्थ मिळावे गोंदवले आश्रमातील ग्रंथ भांडार पहाताना ’श्रीगुरुचरित्र’ हा ग्रंथ माझ्या नजरेस पडला. लहानपणी बुलढाण्याला माझी आई कॆ. गौरबाई करमरकर आजुबाजूच्या महिलांना दुपारी आमच्या घरी बोलावून, चांगल्या पुस्तकाचे सामुदायिक वाचन करायची. त्या काळात ’श्रीगुरुचरित्र’ महिलांनी वाचू नये, अशी चर्चा मी ऎकली होती.

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ पाहिल्यावर माझ्या मनांतील ‘WHY‘ जागा झाला. माझे एक मन नेहमी दुस-या मनाला प्रश्न करते –
‘WHY‘ ? = Who Harasses You ?

श्रीगुरुचरित्रात स्रियांनी वाचू नये, असा उल्लेख आहे का ? व असल्यास त्याचे कारण काय असेल? ह्या ‘WHY‘ चे उत्तर शोधण्यासाठी मी ते पुस्तक तिथेच विकत घेउन वाचनास आरंभ केला.

‘श्रीगुरुचरित्र‘ हा ग्रंथ श्री सरस्वती गंगाधर यांनी १६व्या शतकातं ओवीबध्द रचलेला आहे. हा ग्रंथ वाचत असताना मला त्यात प्रचडं शब्दसंपत्ती तसेच पुराणकथांतून केलेले समाज प्रबोधन, त्याकाळातील समाज जीवन, भौगोलिक, ऐतिहासिक घटनांचे संदर्भ तसेच रावण कालीन संगीत वाद्य, वेदांची माहिती, ईश्र्वराविषयी कल्पना, पूजा - अर्चा विधी, नियम इत्यादी गोष्टींचा खजिना उलगडत जातो. त्या काळातील नीति – नियम, समाज धारणा सांगत असताना ग्रंथकार वाचकास कोठेही कर्मकांडांत गुंतवत नाहीत. हे सर्व ग्रंथभांडार वाचत असताना मी ‘श्री सरस्वती गंगाधर‘यांच्या काव्य प्रतिभेने स्तिमित झाले.

मळू कानडी असलेल्या ह्या महान कवीने मराठी भाषा शिकून ५२ अध्यायांत ७४९१ ओव्यांमध्ये सर्व विषयांची क्रमवार, सुसंगत रचना केलेली आहे. ग्रंथात सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्र हे खरोखरच अमतृाप्रमाणे गोड आहे. पूर्ण ग्रंथ वाचल्यावर, माझ्या लक्षात आले की महिलांनी हा ग्रंथ वाचू नये, असा कोणत्याही ओवीत उल्लेख नाही. माझ्या ‘WHY‘ ला उत्तर मिळाले. परंतू हे उत्तर शोधत असतांना मला जाणवले की, भाषा प्राचीन मराठी असल्याने व ओवीबध्द असल्याने प्रत्येक ओवी अर्थासकट समजनू घेणे, यातच सर्व शक्ती व वेळ संपतॊ. म्हणनू ह्या सर्व ओव्या मला नीट समजाव्यात, ह्या हेतूने मी गद्यात भाषांतर करून लिहून काढले. शब्दश: भाषांतर करतांना, मला काही ओव्या तर मोठी लढाई जिंकल्याचा आनंद देऊन गेल्या.

कधीही गुरुचरित्र पारायण न केलेल्या माझ्या सारख्या व्यक्तिकडून हे प्रचडं काम त्या नियतीनेच केले असावे. हे काम गुरुभक्तांपर्यंत पोहोचवावे व येणा-या भावी पिढ्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून श्रीगुरुचरित्र समजावे. ‘माझ्यामते वाचकांचा प्रतिसाद हाच श्रीगुरुंचा आशीर्वाद’ ह्या सद हेतूने मी ww.shrigurucharitra.com ह्या वेब साइटद्वारा ‘श्रीगुरुचरित्र आशय-निधी‘ स्वरुपात श्रीगुरुदेवदत्तांच्या चरणी अर्पण करते.

प्रभा आठवले, नासिक
सेवानिवृत्त हायस्कूल शिक्षिका
नासिक - ४२२००५
॥श्रीगुरुदेवदत्त ॥

No comments:

Post a Comment