Thursday 31 March 2016

१ एप्रिल (खबरदार) फूल

 सावळ्या (निसर्ग) :
खबरदार जर घाव घालूनी न्याल मम बावड्या
संपेल तव जीवन केवढ्या !
कुण्या शहरीचा वासी आपण कुठे चालला असे
ठेव ही लुटुनी तीरसे ?
गुलाम करुनी भूमातेला राव पांग हे फेडूनी
कसे रहाल खडे ह्या अंगणी !
जोर करुनी हसण्यावारी वेळा नका नेऊ ही
मला ओळखले का हो तुम्ही ?
हा दर्द निसर्गाचा आवाज असे
हे उन्हही माझे लेचेपेचे नसे
ह्या नदी नाल्यातूनी जीवन माझे वसे
खबरदार जर घाव घालूनी न्याल मम बावड्या
संपेल तव जीवन केवढ्या !

बावळ्या (स्वार) :
ढगात जाऊनी पाऊस-पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही बोअरची तो का डरे
वीर तू समजलास काय रे ?
घोर वाढवित अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव कातळ भूमी तरी ?
हे ड्रिल बघ पाते किती चमकते
अणकुचीदार गति यंत्राचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर घाव घालूनी न्याल मम बावड्या
संपेल तव जीवन केवढ्या !

सावळ्या (निसर्ग) :
आपण मोठे गाडीवाले अहा शूर वीर की -
किती ते आम्हाला ठाउकी !
झडप तुमची गिळे शेती आम्हा माहित न का
दावती कशाला फुशारकी फुका ?
तुम्हा सारिखे लोळविले छप्पन नरमणी -
आमुच्या रौद्ररुपाने क्षणी
मी असे इमानी चेला भूमातेकडे
हुकुमावरुनी तिच्या समजा ह्या पुढे
नेईन मी स्मशाना तव लाकडे
पुन्हा सांगतो, खबरदार जर घाव घालूनी न्याल मम बावड्या
संपेल तव जीवन केवढ्या !

लालभडक ते वदन जाहले सूर्य तापला असे
स्वार मनी ओशाळला कसे ?
त्या काळाच्या नयनी चमके पाणी पावसामुळे
स्वार परि सौम्य वृत्तीने डुले
मूल दिसे एक जणू, दुसरा जपे तयाचा पिता
ऐका ही निसर्गाची गीता -
रहाशील इमानी माझा चेला खरा
देईन इनाम माझा जल पेला तुला
पण ध्यान ठेव बावळ्या मम बोल पुन्हा एकदा
“खबरदार जर घाव घालूनी न्याल मम बावड्या
संपेल तव जीवन केवढ्या !”
                            --- अनुप्रभा, नाशिक
शब्दार्थ :-
बावडा= मोठी विहीर
कातळ =खडकाळ जमीन
------------------------------------------------------------------------
कविवर्य श्री. वा. भा. पाठक यांची ‘खबरदार जर टाच मारुनी  --- ‘ही पिटुकला शिलेदार सावळ्या व घोडेस्वार श्री. शिवाजी महाराज यांच्यातील संवादरुपी अप्रतिम कविता आम्हाला शाळेत होती. ही आठवणीतील कविता 
http://www.aathavanitli-gani.com/Song/Khabardar_Jar_Tach
 ह्या मराठी गाण्यांच्या ठेव्याने जपून ठेवलेली आहे.
सध्या मानवाची पाण्यासाठी निसर्गावर चाललेली स्वारी पाहिल्यावर मन
उद्विग्न होते. घरोघरी बोअर वेल तसेच यंत्राच्या सहाय्याने शेततळी म्हणजे परत निसर्गाचा विध्वंस ! निसर्गाला सतत असे ओरबाडत राहिल्यास, सिमेंटच्या जंगलात रहाणाऱ्या माणसाला, स्वतःच्या जीवनाची केवढी किंमत मोजावी लागेल ?
निसर्गात फूल फुलवायचे सोडून, निसर्गाला फूल (Fool)समजणाऱ्या मानवाला निसर्ग म्हणतो “ खबरदार --- “




Monday 7 March 2016