Saturday 12 July 2014

निसर्गदत्त लोणार सरोवर - जन्मकथा


                                  लोणार सरोवराला जगाच्या नकाशावरील पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने कॅनडातून १५ तज्ज्ञ लोकांचे पथक दीड महिना लोणार येथे रहाणार आहे.  मागच्या आठवड्यात वर्तमानपत्रात ही बातमी   वाचल्यावर मनात प्रश्न उभा रहातो. पर्यटनस्थळ निर्मितीमुळे ह्या ठिकाणाचा अनमोल नैसर्गिक ठेवा तर नष्ट होणार नाही ना ?
                                 बुलढाणा जिल्हात लोणार हे ठिकाण मेहकर ह्या गावाजवळ आहे. आपल्या सर्वांना संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराजांचे शेगावमाहीत आहे. शेगाव पासून खामगावमार्गे सुमारे १४० कि. मी. वर लोणार सरोवर आहे.
                                 बुलढाणा हा शब्द भिल्ल ढाणा (भिल्ल लोकांचे वस्ती स्थान) ह्याचा बोलीभाषेत अपभ्रंश होऊन तयार झालेला आहे. अतिशय कमी पावसाच्या विदर्भा (वऱ्हाडा) तील या भागात घनदाट जंगल ऋग्वेद कालापासून असावे. ऋग्वेदात ह्या भागाला दंडकारण्यसंबोधिलेले आहे.
                                लवण म्हणजे मीठ, मीठाच्या पाण्याचे सरोवर ते लोणार सरोवर होय. ह्या मीठाच्या सरोवराभोवती असलेली बाभूळ, चिंच, साग, विविध प्रकारच्या वनौषधींची जंगलसंपत्ती, आपल्याला वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड ह्या प्राचीन म्हणीची प्रचिती देते. ह्या पाण्यात असलेल्या मीठ व सोडा यांचे मुख्य स्त्रोत काय असावे ? समुद्राच्या पाण्यापेक्षाही खारट पाण्याभोवती तसेच कमी पावसाच्या ह्या प्रदेशात जंगल कसे काय ? असे प्रश्न मनात येतात.
                               स्मिथसोनिअन संस्था (Smithsonian Institution), जिऑलॉजिकल सर्वे अमेरिका, जिऑलॉजिकल सोसायटी - भारत, सागर युनिव्हर्सिटी, तसेच नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी यांनी लोणार सरोवरचा सर्वदृष्टीने अभ्यास केला. ह्या सर्व संशोधनाचे २०१० साली निष्कर्ष प्रसिद्ध केले. ह्या निष्कर्षांनुसार सुमारे ५ लाख ७० हजार वर्षांपूर्वी आकाशातून प्रचंड मोठा उल्कापात लोणार ह्या ठिकाणी, झालेला असावा. ह्या प्रचंड मोठ्या उल्कापाताने, लोणार येथे बेसॉल्टह्या ४००मीटर जाडीच्या खडकाच्या थरात सुमारे १३७ मीटर खोल अंडाकृती विवर (मोठा) खड्डा बनविले असावे. ह्या अंडाकृती विवराचा मोठा व्यास १८००मीटर व लहान व्यास १२००मीटर आहे. ४००मीटर जाडीच्या बेसॉल्ट खडकाला १३७ मीटर खोलीचा खड्डा पडला, ह्यावरुन  आकाशातून झालेला उल्का  (तुटलेला तारा- अवकाशस्थित ग्रहाचे, ताऱ्याचे तुकडे इत्यादि ) मारा खूप जबरदस्त वेगात झालेला असावा. एवढा प्रचंड मोठा आघात सहन करुनही पृथ्वीमाता तिथे जंगलसंपत्ती निर्माण करते. पृथ्वीच्या ह्या सहनशील गुणामुळे श्रीगुरुदेव दत्तात्रेय पृथ्वीला आपला प्रथम निसर्ग गुरु मानतात.
                         अशाचप्रकारे  उल्कापातातून पृथ्वीवर पुढील ठिकाणी सरोवर निर्माण झालेली आहेत:-
सिलजान सरोवर, स्वीडन
वेस्ट हॉक सरोवर, कॅनडा
काली सरोवर, सारेमा बेट, इस्टोनिआ
 मॅनिकॉन्गन सरोवर, क्युबेक इत्यादि
तसेच लोणार सरोवराजवळ गणेश सरोवर, अंबर तलाव ही दोन उल्कानिर्मित छोटी सरोवरे आहेत.
                              जगातील मान्यताप्राप्त पंच सरोवरातील लोणार सरोवर हे आपले जागतिक भूषण आहे.
                             भारतीय पुराणात लोणार सरोवर आणि परिसराला कपिलतीर्थ, विरजतीर्थ, धारातीर्थ, नाभीतीर्थ, तारातीर्थ , पवित्रतीर्थ, पद्मसरोवर, पंचाप्सर
आदी विविध नावे आहेत.
                        स्कंद पुराणात
ब्रह्मदेव, नारदमुनी, कपिलमुनी, अगस्तीऋषी, भृगुऋषी, याज्ञवल्क, शुक्राचार्य आदी ऋषीमुनींनी
लोणार सरोवर परिसरात तपश्चर्या केल्याचा उल्लेख आहे.
                      
                              सध्या लोणार सरोवर भोवती मुख्यत्वे शेती हा व्यवसाय करणारे लोणार गावआहे. ह्या गावाची ग्रामदेवता असलेले कमलजा देवी मंदिरलोणार सरोवराकाठी पुरातन स्थापत्त्य शास्त्राचे(Civil Engineering) दर्शन देते. लोणारवासीय लोक सांगतात की, खूप पाऊस पडला तर सरोवर पाण्याने भरते परंतू कमलजा देवीच्या मंदिरात पाणी येत नाही. पुरातन मंदिरे बांधताना पुरापासून सुरक्षित जागा निवडत असावेत. मागच्या वर्षी (पावसाळा इसवी सन २०१३ढगफुटीत मंदाकिनी नदीतील  पूराचे पाणी वाहून नेणाऱ्या पात्रातील २१ शतकातील अतिक्रमणे(बांधकामे) वाहून गेली, पण केदारनाथ मंदिर सुरक्षित होते. मंदाकिनीनदीचे दोन प्रवाह आहेत. एका प्रातातून बारमाही मंदाकिनी नदी वाहते, दुसऱ्या पात्रातून  पूराचे पाणी वाहून नैसर्गिकरित्या जाण्याची सोय आहे. ह्या दोन पात्रांच्या मध्ये केदारनाथमंदिर पूर्वजांनी बांधलेले आढळते. पूर वाहून नेणाऱ्या पात्रात पूर्वी लोक पावसाळा सोडून इतर ऋतुत शेती करीत. परंतु इंच - इंच जमीनीच्या हव्यासापोटी ह्या पात्रात माणसाने नगरे वसवली ही नगरे पूरात वाहून गेली ह्याला निसर्गाचा कोप म्हणायचा की माणसाचा मुर्ख हव्यास ?
                                  उत्तराखंडातील दुर्दैवी घटना थांबवता आली नाही. परंतु मागच्यास ठेच पुढचा शहाणा हे तत्त्व जर लोणार सरोवर विकासात वापरुन हा निसर्गनिर्मित अलौकिक ठेवा आपल्याला निश्चित जपता येईल. ह्यासाठी पर्यटन स्थळ हा वातावरणास हानी करणारा मार्ग  होईल.

(क्रमशः)

No comments:

Post a Comment