Sunday 20 July 2014

निसर्गदत्त लोणार सरोवर – इतिहास (भाग २)

लोणार ह्या वैज्ञानिक तीर्थक्षेत्राचे साक्षीदार हे तिथे असलेली मंदिरे व तेथील निसर्ग होय.
शेंदूरशिवाय मूळ मुर्ति

पूर्वीचा शेंदूरलिंपित 
मोठा मारुती, लोणार
        
      कल्पनाचित्र:-
डावीकडील आडवा मोठा मारुती 
उभा केल्यास वीरमारुती रुप
मोठा मारुती मंदिर:-
                                अलीकडच्या काळात लोणार येथील मोठा मारुती मंदिरातील मारुतीवरचा शेंदूर श्रीशंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत दूर करण्यात आला. शेंदूर दूर केल्यामुळे, मारुतीरायाची विलोभनीय दगडी मुर्ति आपल्याला दर्शन देते. ह्या मुर्तिचा दगड लोणार येथे ५ लाख ७० हजार वर्षांपूर्वी अवकाशातून आलेल्या उल्केचा आहे. ग्रामस्थ सांगतात, ‘ह्या दगडात चुंबकीय गुणधर्म असून चुंबक सूची मात्र उलटी फिरते.’
                              ही मारुतीची मुर्ति ८ ते १० फुट लांब असून, आडवी ठेवलेली असल्याने, ह्या मारुती मंदीरास मोठा मारुती मंदिर किंवा झोपलेला मारुती मंदिर असे म्हणतात. आडव्या स्थितीतील मारुतीचे वरील कल्पना चित्र दर्शविते की, ही वीरमारुतीची मुर्ति आहे. ही महाकाय मुर्ति बहुधा उभी करण्यात अडचणी आल्या असतील, त्यामुळे आडवी ठेवलेली असावी.
                                  हे मंदिर बुलढाण्याच्या कानिटकर कुटुंबाच्या मालकीचे असून सर्व भक्तांना दूरुन दर्शन घेण्यास खुले असते. ह्या मंदिराचे आवार स्वच्छ असून भोवताली असलेली परस बाग, निसर्ग सान्निध्य देते. कानिटकर कुटुंब व श्रीशंकराचार्य यांच्या डोळस श्रद्धेचे अभिनंदन.
दैत्यसुदन मंदिर:-
 
दैत्यसूदन 
=दैत्य (राक्षस) + सूदन (वध)
दैत्यसूदन हे मंदिराचे नाव आपल्याला श्रीविष्णुने राक्षसाचा वध केला, ही गोष्ट सांगते.
                                   सध्या जगाचे लक्ष गेलेल्या ह्या छोट्याशा    ठिकाणाला पुराणकाळापासूनचा इतिहास आहे. सत्ययुगात लवणासूरहा राक्षस आपल्या बहिणींसह ह्या ठिकाणी रहात होता. म्हणून ह्या ठिकाणाला लोणारहे नाव पडले असे मानले जाते. लवणासूराचा    श्रीविष्णुने वध केला.
                                   ह्या गावी आपल्याला चालुक्य राजवटीकालीन दैत्यसुदन हे हेमांडमंडपी पद्धतीचे   मंदिर पहावयास मिळते.   ह्या मंदिराच्या बांधणीमध्ये धातूचे मिश्रण असून, हे सर्व बांधकाम दगडी दिसते. मुख्य गर्भ गृहात विष्णुची मुर्ति लवण ह्या दैत्याचा वध करत असलेली आहे.
                    पूर्वी हे मंदिर सूर्य मंदिरमानले जायचे. असाही एक प्रवाद ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळतो. मंदिराचा आकार एखाद्या ताऱ्याप्रमाणे  असून कोरीव काम अप्रतिम आहे. मंदिरावरील शिल्प  खजुराहो मंदिराची आठवण करुन देते. परंतु प्राचीन मुर्ति चोरीला गेल्याने हे सूर्य मंदिर आहे की श्रीविष्णु मंदिर आहे’, ह्याचा खुलासा होत नाही.
                  मंदिरातील सध्याची मुर्ति नागपूरच्या भोसला घराण्याने वसविलेली आहे.  नासिकमधील भोसला मिलिटरी स्कूलहे नाव डॉ. मुंजे यांनी ह्याच नागपूरच्या  सरदार घराण्याच्या सन्मानास्तव  ठेवले आहे.
                  गर्भगृहाबाहेरच्या खोलीच्या छतावर  विजेरीच्या (टॉर्चच्या) उजेडात आपल्या पुराण कथा मुर्तिरुपात चित्रीत केलेल्या दिसतात. ह्या अप्रतिम मुर्तींमध्ये आपल्याला कंस -कृष्ण, नरसिंह- कश्यप, रासक्रीडा, लवणासूरवध अशा अनेक कथा पहायला मिळतात. ह्या मुख्य मंदिराच्या शेजारी ब्रह्मा, विष्णु, महेश ह्या  तीनही देवतांचे एक छोटे देऊळ आहे. ह्या देवळातील प्राचीन महेशाची मुर्ति चोरीला गेल्याने, तिथे सध्या गरुडाची मुर्ति ठेवलेली आढळते.
           संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दैत्यसूदन मंदिरपहाण्यास खुले असते.
                        अशी अनेक देवदेवतांची मंदिरे ह्या ठिकाणी आहेत. भोगावती कुंडात भगवान रामाने स्नान केले होते. पांडवांच्या काळात युधिष्ठिराने येथे वडिलांचे श्राद्ध केले होते, असेही सांगितले जाते. तसेच वनवासाहून अयोध्येला परताना श्रीराम सीता यांनी सरोवरकाठावरील मंदिरात श्रीशंकराची   पूजा केली  होती,अशी आख्यायिका आहे.
                            भारतीय पुराणात लोणार सरोवर आणि परिसराला कपिलतीर्थ , विरजतीर्थ , धारातीर्थ , नाभीतीर्थ , तारातीर्थ , पवित्रतीर्थ , पद्मसरोवर , पंचाप्सर आदी विविध नावे आहेत. स्कंद पुराणात ब्रह्मदेव, नारदमुनी, कपिलमुनी, अगस्तीऋषी , भृगुऋषी, याज्ञवल्क, शुक्राचार्य आदी ऋषीमुनींनी लोणार सरोवर परिसरात तपश्चर्या केल्याचा उल्लेख आहे.
                                ह्या सरोवराचे पाणी खारट असल्याने, मुगल काळात ह्या ठिकाणी मीठ निर्मिती करीत असत. राजा अकबरच्या काळात लोणार नगरीचा 'जिझीया कर' रद्द केलेला होता. निजाम व पेशव्यांच्या काळातही लोणारचा विकास झाला. ब्रिटिश काळात कर्नल मॅकेन्झीने लोणारचा सविस्तर अभ्यास केला.
                        लोणार ह्या विवरातील समुद्रासारखे खारे असून अल्कलाइन pH 11 आहे. ह्या सरोवरात प्रचंड मीठ व सोडा यांचा साठा हे एक नैसर्गिक कोडे आहे. ह्या  खाऱ्या पाण्यात मासे आढळत नाहीत. लोणार गावातील ग्रामस्थांच्या मते ह्या खाऱ्या पाण्याचा शांपू चांगला होतो. खूप फेस देतो व भांडी, कपडे स्वच्छ काढतो.
                         हल्ली ह्या सरोवरातील पाण्यापासून शांपू बनविण्यास किंवा उन्हाळ्यात बाष्पीभवन  झाल्याने मिळणारे मीठाचे पातळ थर पापडखारम्हणून विकण्यास बंदी आहे.
                         लोणार ह्या ठिकाणच्या मातीत काचेचे कण चमकतात. लोणार येथील काच मिश्रित माती व चंद्रावरच्या मातीच्या नमुन्यात साम्य आहे. पृथ्वीवर बहुधा मंगळ सदृश्य ग्रह आदळल्याने पृथ्वीचाच एक भाग अवकाशात तुटून गेला व त्याभागातून पृथ्वीचा चंद्र तयार झालेला असावा. ह्या मंगळसदृश्य ग्रहाच्या धडकेच्या वेळी प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने, चंद्राच्या भूपृष्ठावर असलेल्या वाळूचे काचेत रुपांतर झालेले असावे, असे आजचे विज्ञान सांगते. चंद्र निर्मितीच्या वेळी, निर्माण झालेल्या उष्णतेसारखी उष्णता, लोणार ह्या ठिकाणी झालेल्या अवकाशातून उल्का माऱ्याच्या वेळी निर्माण झालेली असावी. त्यामुळे येथील वाळूचे रुपांतर काचेत झालेले असावे.
                          अशा प्रकारे येथील मंदिरातून तसेच मातीतून मिळणारा इतिहासाचा  मागोवा जपण्याचे उत्तरदायित्व लोणार पर्यटनस्थळ झाल्यास जपले जाईल का?
॥श्रीगुरुदेवदत्त॥

No comments:

Post a Comment