Saturday 12 December 2015

स्मार्ट सिटी : नाशिक पार्श्वभूमी


                            ‘स्मार्ट सिटींचे शतक’ ह्या प्रक्लपाने येणाऱ्या संगणकीय युगाची नांदी देत, इसवी सन २०१५ आपला निरोप घेत आहे. २०१६ साली प्रवेश करणाऱ्या ह्या नवयुगाच्या दिंडी दरवाजात उभे असताना, सर्वसामान्य माणसाचे मन स्मार्ट सिटीतील महागाईच्या भस्मासूराने साशंक होते. स्मार्ट सिटीचे हे आव्हान पेलताना आपल्याकडे निधीची कमतरता व स्वयंभू तंत्रज्ञानाचा असलेला अभाव यांची प्रकर्षाने जाणीव होते.
                   कालचक्र हे अविरत फिरत असते. प्रत्येक गावाचा चेहरामोहरा त्या काळानुरुप बदलत असतो. आपल्या नाशिकने जलभूमी, नाशिक भूमी, मंत्रभूमी (नासिक तीर्थक्षेत्र), यंत्रभूमी (औद्योगिक क्षेत्र) अशी स्थित्यंतरे अनुभवलेली आहेत.
 १) जलभूमी :-
               ब्रह्मपुराणातील वर्णनानुसार तसेच भूगर्भ शास्त्राच्या अनुमानानुसार, सुमारे ६.८कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीतून ब्रह्मगिरी पर्वताची निर्मिती झालेली असावी. ह्या ज्वालामुखीचे ब्रह्मपुराणांत खूप सुंदर वर्णन आहे. ब्रह्मदेव सांगतो,”मी दंडकारण्यात केलेल्या यज्ञात, वर्षा ऋतू ब्रह्मगिरी पर्वतावरील कुशात (कुश= दर्भ= एक प्रकारचे गवत) ठेवला.”
ब्रह्मपुराणातील नोंदीनुसार, नाशिक क्षेत्री अरुणा व वरुणा ह्या दोन नद्यांचे संगमस्थान होते. ह्या संगमातून गंगा नदी आजची ‘दक्षिणवाहिनी गंगा’ उगम पावत होती.
{ ६.८ कोटीवर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीस सृष्टी निर्माण कर्त्या ब्रह्मदेवाचा यज्ञ म्हणणे सुयोग्य आहे.
ब्रह्म पुराण अध्याय ८९ श्लोक क्रमांक ४५ नुसार
अरुणावरुणानद्योर्गड्गायां संगमः शुभः।
देवानां तत्र तीर्थानामागतानां पृथक्पृथक्॥८९-४५॥
              ह्या श्लोकाचा अर्थ आहे, अरुणा व वरुणा ह्या नद्यांच्या संगमस्थानी गंगा नदीचा होणारा संगम शुभ आहे. त्या ठिकाणी त्या संगमस्थानी देव परत-परत येत असत. }
                    ‘नाशिक हे तळ्यांचे क्षेत्र होते’ असे मेरी (M.E.R.I.,Nashik) नासिक येथून सेवानिवृत्त झालेले भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. रत्नाकर पटवर्धन यांचे संशोधन सांगते.
२) नाशिक भूमी :-
                      अरुणा-वरुणा संगम असलेल्या ह्या जलभूमीतून  अरुणा नदी लुप्त झाली.
{  अरुणा नदी कशी लुप्त झाली ? हा पुरावा मिळालेला नाही.
    आजही नाशिकमध्ये १५ ते २० फूट खोलीवर पाणी लागते.
   ‘वरुणा नदी कुशावर्ती।‘ असे श्रीगुरुचरित्रकार अध्याय १५व्यात  
    सांगतात. }
                      पाणलोटाने वाहून आलेल्या प्रचंड मातीने नाशिक क्षेत्री टेकड्यांची निर्मिती झालेली असावी. नव शिखांमध्ये वसलेले क्षेत्र नाशिक हे नामकरण भूतकालीन टेकड्यांचे अस्तित्व दर्शविते.
                   नाशिक येथील मातीत CaCO3असल्याने ही काचसदृश्य चिकण माती आहे. मातीचे गंगापूर धरण तसेच जुन्या नाशिकमधील मातीचे वाडे नाशिकमध्ये आढळाणाऱ्या चिकण मातीचे पुरावे होत.
              पुराणातील उल्लेखानुसार, गौतम ऋषींनी गोदावरी नदीचा उगम शोधला. गौतम ऋषींच्या रुपाने जगाला  भूगर्भ शास्त्रज्ञ मिळाला, असे दिसते.
                    त्रिंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर पसरलेल्या लाव्हारसांत पावसाचे पाणी धरुन ठेवण्याची क्षमता आहे. ब्रह्मगिरी पर्वत शिखरावर गोदावरी व वैतरणा ह्या नद्यांचा उगम होतो.
 ३) नासिक :  तीर्थक्षेत्र
                          रामायणकाळात शूर्पणखेचे नाक (नासिका) लक्ष्मणाने कापल्याने नाशिकचे नाव ‘नासिक’ असे झाले असावे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे  क्षेत्र, तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावले.  विधीवत धर्मकृत्ये, तांब्या-पितळेची भांडी, शुद्ध नाशिक चांदी, द्राक्ष, कांदा तसेच नाशिकचा चिवडा अशा व्यवसायातून नाशिकची देशात ओळख निर्माण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा  स्वातंत्र्य सेनानी नाशिकने भारतभूमीला दिला.
                         स्वतंत्र भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे क्षात्रतेज भावी पिढीत निर्माण करण्यासाठी धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे  ह्यांनी  भोसला मिलिटरी स्कूलची नासिक तीर्थक्षेत्री स्थापना केली.
 ४) यंत्रभूमी (औद्योगिक क्षेत्र) :-
                   पद्मश्री बाबूभाई राठी, मामा शुक्ल, मामा अनगळ, बाबा वढावकर, प्रेमजीभाई वरीया अशा अनेक ज्ञात अज्ञात द्रष्ट्या नाशिककरांच्या प्रयत्नातून N.I.C.E. सातपूर नाशिक येथे औद्यौगिक क्षेत्र निर्माण झाले. त्रिंबकरोडवरील भोसला मिलिटरी स्कूल जवळील ह्या जागेवर पूर्वी माळरान होते. दुसऱ्या महायुद्ध काळात ब्रिटिशांनी सातपूर येथील माळरान असलेल्या टेकड्यांवर आफ्रिकन सैनिकांचे कॅम्प येथे उभारले होते.
                    त्रिंबक रोडवरील सातपूर तसेच जुन्या मुंबई आग्रा रोडवरील अंबड ह्या औद्योगिक वसाहतींनी नाशिकला जगाच्या नकाशात स्थान मिळवून दिले, तसेच नाशिककरांची रोजी रोटी निर्माण केली.
                मानवाच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ही त्याच्या व्यक्तिमत्त्वात असते. तशीच गावाच्या विकासाची गुरुकिल्ली ही त्या गावाला मिळालेल्या भौगोलिक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वात दडलेली असते.
                  प्रत्येक गावाला नाशिकप्रमाणे भौगोलिक,सांस्कृतिक  तसेच ऐतिहासिक वारसा मिळालेला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात हा अमूल्य ठेवा जपला गेला तर, ती गावे नुसती तांत्रिक न होता, रुबाबदार नगरी (Smart City)म्हणून जगाच्या नकाशात स्वतःचे स्थान मिळवतील.

॥जय गुरुदेवदत्त॥

No comments:

Post a Comment