Monday 21 December 2015

‘गीता साद घाली मना’


काहीतरी करायचे आहे, वाटे एक जाणीव ।
स्वकर्मी भासू नये, वाटतसे कोणतीच उणीव ॥
जन्म, काल, वेळ, कुळ नसे आपुल्या स्वाधीन ।
म्हणून म्हणती मानव जन्म असे केवळ पराधीन ॥
जन्म समयी लाभे मातेस मातृत्व, पित्यास पितृत्व  ।
तव अस्तित्वासाठी जपावे, सदैव तू सत्व॥
ईशदर्शन प्राप्तीचे साधन म्हणूनी करीशी भक्ती ।
ईश हा नसे दृश्य पण ती असे अचाट शक्ती ॥
पूजाअर्चाद्वारे न मागणे काही देवापाशी ।
म्हणून म्हणती ‘न मागे तयाची रमा होय दासी’ ॥
पूजा अर्चा उपासनेतून साधते मनाची एकाग्रता ।
स्वकर्मातून मिळते खचित मनाची नम्रता ॥
एकाग्री मन सांगे, सार चंचलता दूर दूर ।
मग जीवन मार्गी न राहील, कोणतीच हूरहूर ॥
दैनंदिन  आचार-विचार उच्चारातून प्रगटे स्वकर्म  ।
संस्काराचे शिंपण होता, स्वकर्म बने स्वधर्म ॥
धर्म दावितो सन्मार्गी समाजधारणा – प्रवृत्ती ।
समाजधारणेतून उत्कटते सामाजिक प्रवृत्ती ॥
धर्माचे थोतांड माजवून नको पोसू अहम् ।
सत्कर्म करुनी वर म्हणावे ‘इदं न मम’  ॥
नवससायातून ठेवू नये कधी अंधश्रद्धा ।
मनःशांतीस्तव सत्कर्मी ठेवावी अढळ श्रद्धा ॥
स्वधर्मातून पोसतो वाढतो स्व आवडीचा छंद ।
स्वकर्मातून लाभे सदैव अविरत नवनिर्मिती आनंद ॥
स्वकर्मे धरु नये, मनी फलाची आशा ।
असफल कर्मातून पदरी पडते, घोर निराशा  ॥
निराशेतून मनी भीषण उद्विग्नता प्राप्त होते ।
बदलता वातावरणी रुप होत्याचे नव्हते होते ॥
प्रयत्ने रगडिता वाळूचे तेलही गळे ।
सत्कर्मी लाभती सफलतेची फळे ॥
फलाशेतून स्वकर्माची निष्टा भंग पावते  ।
लाभासाठी चंचल मन अखंड धावते ॥
कुरुक्षेत्री महाभारत घडले कुटुंबकलहापायी ।
भाऊ बंदकीतून वैराची ठिणगी फुलते ठायी ठायी ॥
कलहसमयी समेट करण्या पुढे धावला भगवंत ।
सार्वभौम सत्तेची नशा, सत्तेस करी नाशिवंत ॥
भगवंत बोले, अर्जुनाशी “धरी रे शस्त्र हाती” ।
क्षात्रतेज जपण्या, विसर रक्ताची नाती ॥
आठव तुझा रणांगणी पराक्रमी गत इतिहास ।
आसक्तीपायी भ्याडमनी नको, स्वीकारु उपहास ॥
जगा त्रासूनी लोक स्वीकारती संन्यासधर्म ।
सर्वसंग परित्यागातून न सुटे कदापि स्वधर्म ॥
वनवासी अन्न –वस्त्र - निवारा गरजा न सुटती  ।
स्वरक्षणार्थ रानी भयभित चित्ती अनेक वाटा फुटती ॥
संन्यास नसून भासे हे निव्वळ संन्यास सोंग ।
आत्मवंचना का करतोस ? ही फसवी सोंग ढोंग ॥
प्रपंच करावा नेटका राहून प्रपंची ।
विरक्तीच्या गप्पा, करु नको पोपटपंची ॥
सावंतामाळी प्रपंची फुलवितो भाजीचा मळा ।
स्वकर्मातून नामस्मरणाचा गातो सुस्वर गळा ॥
नामयाची जनी अखंड करीते, कांडण- दळण ।
स्वकर्मातून नामस्मरणी लाविते, इंद्रिया- वळण ॥
स्वकर्म संपता ज्ञानदेव जाहले समाधीस्त ।
जन म्हणती जाहला ज्ञानसूर्याचा अस्त ॥
अस्त नसे हा स्वकर्मपूर्तीचा दिव्य संदेश ।
संदेश ह्या विश्वात व्यापून रहावा हाच आदेश ॥
मातृपितृ सेवेत गढला, पुंडलिक धुंद – दंग ।
प्रसन्न वदनी उभा ठाकला, वीटेवरी पांडूरंग ॥
गीतावचने सांगती, स्वकर्मयोगाची महती अगणित ।
स्वकर्मातून जीवनी सुटावे, जीवनाचे अवघड गणित ॥
धर्म कल्पना गाते, निव्वळ मानवतेची कवन ।
मानवधर्म एक, पण अनेक पंथ उद् घोषती संतवचन ॥
व्यक्ती व्यक्ती गणिक समाजी दिसे स्वधर्म अनेक  ।
सदाचार सोडून सत्तांध -मदांध वागती सोडून विवेक ॥
पैसा - पैसा करुनी जमविती अगणित मालमता  ।
मालमता हव्यासापोटी लाथाडती नीतिमत्ता ॥
लोकशाहीसाठी भल्या मारती लंब्या  बाता ।
सत्ता प्राप्त होता मारती मत्त गर्दभापरी लाथा ॥
मतासाठी केविलवाणे वदूनी होती सर्व लीन ।
स्वार्थासाठी सत्तांध बनूनी करीती जनता हीन – दीन ॥
ही नव्हे लोकशाही ही तर भासे हुकुमशाही ।
अनिर्बंध सत्तेसाठी बने ही पुरी घराणेशाही ॥
युद्धभूमी नव्हे ही तर कर्मभूमी बोले, श्रीकृष्ण परमात्मा ।
मनःशांतीस्तव रातंदिन तळमळे हरएक आत्मा  ॥
नको वाचन भगवद् गीता, नको करु नुसते पाठांतर  ।
संस्कारित कर्मापासून जीवात्म्याला दे ऊ नको अंतर ॥
गीता सांगे देह क्षणभंगूर असे आत्मा अमर ।
देहासक्तीपायी का उगीच माजवितो सदैव समर ॥
                       -----------प्रभा आठवले, नासिक


संदर्भ :- http://bhagawad-geeta.com/

No comments:

Post a Comment