Saturday 16 May 2015

श्रीशनि जयंती : प्रश्नांकित शुभेच्छा

शनि शिंगणापूरी मनी वसती अनंत भाव
जनी म्हणती “ह्याला जीवन ऐसे नाव”॥ १॥

जन म्हणती शनिवार ‘शनि’ चा वार
कर्म न करता टाकती मजवरी भार॥ २ ॥

जीवनी अघटीत घडता म्हणती शनिचा कोप
स्वचूकांवर पांघरुण घालूनी चढवती मज टोप॥ ३॥

गावामल्या भव्य दगडा नाव दिले ‘शनी’
देवत्व अर्पिले पण भयभीत झाले मनी॥ ४॥

एकामागून असंख्य येऊनी करती नतमस्तक
हीच क्रिया अखंड चालू राहील शतकानुशतक॥ ५॥

दगडामधून साकारले दिले मज भव्य देवत्व
वेड्या जीवा, का तू पहातोस मम सत्त्व॥ ६॥

नावडे मज बंदिस्त हे असे जीवनी पारतंत्र्य
चराचरांतून व्यापता मज मिळे अमर्याद स्वातंत्र्य॥ ७॥

देव समजूनी मजवरी वर्षाव असे तेल सुमनाचा
कर्मकांडापायी जीवनी विचार का न करी सु-मनांचा॥ ८॥

माते पोटी जन्म माझा गमे मम नारी श्रेष्ठ
जनमानसी मानती पूजाविधीत पुरुष तो ज्येष्ठ॥ ९॥

भारतीय घटने बहाल केली स्त्री-पुरुष समता
मग मम पूजाविधीत का दिसते विषमता॥ १०॥

मम माता भगिनी हस्ती असे कोमल स्पर्श
पूजाअर्चासमयी का मानिती तो अस्पर्श॥ ११॥

कुकर्म करुनी कर जोडोनी धाव घेती दर्शनी
मज म्हणती,”धाव पाव रे बाप्पा तू शनी”॥ १२॥

पूजा-पाठ स्नाने करुनी होशील का तू शुर्चिभूत
विचारी मना, खरोखरच आहेस का मनी तू शुर्चिभूत॥ १३॥

ऐक गड्या, सांगतो तूज मनीची एक गोष्ट
राग नको मानू मित्रा, बोलतो जरी मी स्पष्ट॥ १४॥

पूजा अर्चा आरतीतून मनी मिळे तूज शांती
नको देऊ थारा कुविचारा, मग मिळे मनःशांती॥ १५॥

नको पाहू वळूनी मागे, चाल तू पुढेपुढे
जीवनी अखंड गिरव, तू माणुसकीचे धडे॥ १६॥

मानवता आणि विश्वबंधुता तत्वे थोर महान
ह्यातून भागेल तव ईश दर्शनाची तहान॥ १७ ॥

वेळ संपला जाऊन बसतो त्या पाषाण सिंहासनी
मम अस्तित्वाचा दैनंदिनी विचार कर तू मनोमनी॥ १८॥

दि. २६ मार्च २००६

No comments:

Post a Comment