Monday 31 March 2014

श्रीगुरुदेवदत्त शिष्य भगवान परशुराम

                  भगवान परशुराम श्रीगुरुदेवदत्तांचे शिष्यत्व स्विकारण्याआधी  आपले वडील श्री. जमदग्नी ऋषी व आई रेणुका यांच्यासह घनदाट जंगलात रहात होतापरशुरामाचे तो रहात असलेल्या भागातील राजघराण्यातील लोकांबरोबर भांडण झाले. परशुरामाने राजघराण्यातील लोकांना त्या जंगलातून पळवून लावले. हा पराभव राजघराण्यातील लोकांच्या जिव्हारी लागलात्यांच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला. ह्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजघराण्यातील लोकांनी परशुराम बाहेरगावी गेल्याची संधी साधली. परशुरामाच्या घरावर हल्ला करुन त्यांनी जमदग्नी ऋषींचा खून केला. घरी परत आल्यावर परशुरामाला आपल्या आईकडून, रेणुका मातेकडून  घरावर झालेल्या हल्ल्याची व त्यात त्याच्या वडिलांचा क्षत्रिय राजघराण्यातील लोकानी केलेल्या खूनाची बातमी समजली. त्याच्या आईने गंगेकाठी श्रीजमदग्नी ऋषींना अग्नि देऊन, त्याच चितेत सती जाण्याचा केलेला  आपला निश्चय सांगितला. या सर्व गोष्टींनी स्वाभाविकच तरुण परशुरामाचे मन उद्विग्न झाले. त्याने भूतलावरील सर्व समाजकंटक क्षत्रिय राजांना संपविण्याची प्रतिज्ञा केली. तो वडीलांचे पार्थिव व आईला बरोबर घेऊन गंगा नदीकडे निघाला .वाटेत श्रीदत्तगुरुंनी या मायलेकरांना पाहिले.
 त्यांनी   रेणुका मातेला   नमस्कार केला. परशुरामाच्या आईने सती जाऊन आपले आयुष्य संपविण्याचा केलेला निश्चय श्रीदत्त गुरुंना सांगितला व परशुरामाला तिने सल्ला दिला की आयुष्यात कधीही गरज पडली तर तू श्रीदत्तगुरुंकडे जा. श्रीदत्तगुरुंच्या सल्ल्याने श्रीपरशुराम गंगा नदीपर्यंत गेला नाही. त्याने वडिलांवर तिथेच अंत्यसंस्कार केले व  त्याची आई रेणुका माता सती गेली.
                    प्राचीन इतिहासात आपण पहातो, नवरा गेल्यावर त्याची पत्नी त्याच चितेवर त्या पुरुषाबरोबर स्वतः जळून आपले आयुष्य संपवित असे काळाप्रमाणे समाजाचे व विशेषतः समाजातील  स्त्रियांचे विचार बदलेले दिसतात. शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे यांना देवाज्ञा झाल्यावर, शिवाजी राजांच्या आईने बाल शिवाजीसाठी सती न जाण्याचा निर्णय घेतला. जिजाऊमातेने बाल शिवबावर लहानपणापासून संस्कार करुन शहाजीराजांचे स्वातंत्र्याचे स्वप्न साकार केले. शिवाजीराजांनी मोठेपणी जिजाऊमातेच्या आज्ञेनुसार हिंदवी स्वराजाची स्थापना केली. जिजाऊमातेप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांनी पतीनिधनानंतर सती न जाता लोककल्याणाची कामे करुन होळकरांची गादी सांभाळली. ह्या नंतरच्या काळात राजा राम मोहन रॉय यांनी सती जाण्याची अघोरी प्रथा बंद व्हावी, म्हणून अत्यंत परिश्रम घेतले. ह्या त्यांच्या प्रयत्नांतून इंग्रजी राज्यसत्तेने कायदा करुन सतीची चाल बंद केली.
                   जिजाऊ माता अहिल्याबा ई होळकर तसेच राजा राम मोहन रॉय ह्या घटना अलिकडच्या ३०० ते ३५० वर्षांपूर्वीच्या परंतु श्रीदत्तात्रेयांचे वडील श्री. अत्रीऋषी यांनी चित्रकुट पर्वतावरुन पाहिलेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या नोंदी करुन ठेवलेल्या आहेत. श्री अत्रीऋषी हे स्वतः खगोलशास्त्रज्ञ होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या अचूक नोंदी हे खग्रासग्रहण सुमारे ७००० वर्षांपूर्वी घडले असावे, असे  सांगतात.
                     तात्पर्य, रेणुकामाता सुमारे ७००० वर्षांपुर्वी त्याकाळाच्या प्रथेप्रमाणे सती गेलेली असावी. संशोधकांच्या  दत्तगुरुंची ह्या मायलेकरांशी झालेली भेट, माहुरगड परिसरात घडली  असावी. आजही आपण माहुरगडावर रेणुकामातेच्या मंदिरात दर्शनासाठी जातो.
                    श्रीपरशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्व क्षत्रिय राजांचा युद्धांत पराभव करुन त्यांना मारुन टाकले. अर्थात श्रीपरशुरामावर तरुणपणी झालेल्या आघातातून त्याचे मन जास्तच बहिर्मुख झाले. मनाचा विवेक संपला व सुडाने पेटलेल्या मनाने स्वतः केलेल्या प्रतिज्ञेतील समाजकंटक शब्दाला तिलांजली दिली व निरपराध क्षत्रिय राजांनाही युद्धात मारुन टाकले.
                     अशाप्रकारे जास्तच बहिर्मुख झालेल्या परशुरामाने पापाच्या मार्गावरुन चालताना प्रभू रामचंद्रांना क्षत्रिय राजा म्हणुन युद्धाचे आवाहन दिले. प्रभू रामाने हे आवाहन स्वीकारले व युद्धात परशुरामाला पराभूत केले.  परशुरामास ठार न मारता जिवंत सोडून दिले. वास्तविक पशुरामास देहदंड देऊन एक क्षत्रिय राजा या नात्याने इतर क्षत्रिय राजांच्या वधाचा बदला घ्यायला पाहिजे होता. परंतू अशा सूडाने विचार मरत नसतात ती व्यक्ती तेवढी मरते. परशुराम शूर होता परंतू प्रभू रामचंद्रांमध्ये असलेल्या क्षमाशील शौर्यामुळे ते देवत्वाला पोहोचले.
                  परशुरामाला कोकणचा आद्य पुरुष मानतात. आपल्याला माहित आहे की  भुकंप पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालींमुळे होतात. अशाच पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालींमुळे मोहेंजोदरो, हडपा संस्कृती  लुप्त झाल्या. श्रीकृष्णाची  द्वारका समुद्राच्या पोटात गेली. आजही ह्या भागात समुद्राच्या तळाशी  द्वारका नगरीचे अवशेष सापडतात. व्दारका नगरी जशी समुद्रात गडप झाली.तसाच कोकणचा किनारा हा भूभाग समुद्रातून वर आला. माणूस ह्या समुद्रातून वर आलेल्या जमिनीवर रहाण्यास घाबरत होता. माणसाच्या मनात निश्चितच भिती असणार परत हा भाग समुद्रात गेला तर आपणासही जलसमाधी ! भगवान पशुरामाने ह्या जमिनीवर मनुष्य वस्ती निर्माण करण्याचे मोठे काम आयुष्यात केलेले आहे. इतिहासाने त्याची फक्त शूर  व कोकणचा आद्य पुरुष म्हणून नोंद घेतलेली आहे.
                  परशुरामास खून का बदला खून हा न्याय न लावल्याने परशुराम शरमिंधा झाला. त्याच्या आईने, रेणुका मातेने सांगितल्याप्रमाणे परशुराम श्रीदत्तगुरुंना शरण आला.
श्रीदत्तगुरुंनी आपल्या ह्या पश्चातापदग्ध शिष्याचे  शिक्षण केले.
॥ श्रीगुरुदेवदत्त


                        ------------ ‘श्रीगुरुचरित्र आशय - निधी
गुढीपाडवा, दि. ३१ मार्च २०१३   
  (संदर्भ ग्रंथ :
                    The Mystery Beyond the Trinity
                    Tiprura Rahasya
                    Translated by
                   SWAMI SRI RAMANANANDA SARASWATHI

                 ॥श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश॥ लेखक डॉ. प्र. . जोशी
                  प्रकाशक : श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश प्रकाशन, पुणे )
              


No comments:

Post a Comment