Tuesday 25 February 2014

अखंड भारत - स्वप्न

             अखंड भारत - स्वप्न
गतवीरांची स्म्रृती जागृतीस्तव, शिव प्रतिष्ठानाने घातला घाट
नतमस्तके प्रणाम करण्या, पाऊले चालती अंदमानची वाट
पारतंत्र्य बेडी झुगारण्यास्तव स्फुरली विनायकाची छाती
स्वातंत्र्यास्तव प्राणार्पण करण्या नाही कशाची भिती
अस्पृशता निवारण, जातीभेद निवारण्यार्थ हाती घेतली लेखणी
अखंड भारत स्वप्न साकारण्यास्तव प्रज्वलित तव वाणी
कोलू पिसता पिसता, श्रमाची नाही केली तमा
तत्व रक्षण्या मनी कधी अपेक्षिली नाही क्षमा
खळ खळ बेड्या वाजत होत्या लोखंडी पायी
परसत्तेची अमानुषता प्रकटत होइ ढायी ढायी
राजद्रोहाची शिक्षा म्हणून अंदमान काळे पाणी
त्या शिक्षेतून स्फूरली देशभक्तीची सुरेल गाणी
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मनी रंगविले स्वप्न तू भव्य
स्वतंत्र अखंड भारताचे चित्र रेखाटले तू दिव्य
तरूणांनो लष्करात भरती व्हा ही तुझी साद
स्वातंत्र्य रक्षण्या क्षात्र तेजाची उमटवा प्रतिसाद
स्वातंत्र टिकवण्या देशाच्या सर्व सीमा असाव्या संरक्षित
लक्ष्यद्विप बेटे, स्वर्गाचे द्वार सन्मानित व्हावे आरक्षित
चिनी सत्तेने आजी प्रवेशास्तव केले सागरी लक्ष्य
भूतकाळी स्वातंत्र्यवीराची वाणी वदली करू नका भक्ष्य
अंदमानी प्रवेश करता जागृत झाल्या वीरांच्या स्मृती
अचाट संयम, अफाट धैर्य देखता गुंग झाली मम मती
                                    प्रभा आठवले, नासिक

jayostute.com वर २०१२ साली प्रकाशित

1 comment:

  1. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्तीचा वारसा चालविणारे कै. विक्रमराव सावरकर यांना श्रद्धांजली.
    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर यांचे विक्रम सावरकर हे सुपुत्र होत. हिंदू महासभेचे अखंड कार्यकर्ते, अखंड हिन्दुस्थान तसेच समान नागरी कायदा हिंदूंचे हितरक्षण करणारे एक आक्रमक आणि कृतीशील हिंदू नेता.
    सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक सदस्य असलेल्या, विक्रमराव सावकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून मुरबाड, जिल्हा- ठाणे येथे ‘महाराष्ट्र सैनिकी विद्यालय’ सुरू केले. श्री विक्रम सावरकर यांना त्यांच्या या कर्मभूमीत (शाळेच्या आवारात) रविवार दि. २३ फेब्रुवारी २०१४ रोजी देवाज्ञा झाली.

    ReplyDelete