Thursday 11 May 2017

मायबोलीचे भुक्कड १

                                       गेल्या आठवड्यात मी बसची वाट पहात बसस्टॉपवर उभी होते. इतक्यात माझ्या मैत्रिणीची नात तिथे आली. आमच्या गप्पा सुरु झाल्या. ती चांगल्या तऱ्हेने पास होऊन, अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी जाण्याच्या प्रयत्नांत होती. ते ऐकून मलाही बरे वाटले. ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणार, एवढीशी पाहिलेली चिमुकली ! मनाप्रमाणे शिक्षण घेऊन उच्चशिक्षित विदूषी म्हणून समाजात वावरणार, किती आनंद वाटला सांगू पण ----

                                         थोड्याच सेकंदात त्या आनंदावर विरजण पडले. काय झाले ? एक खेडूत एक पत्र घेऊन आमच्याजवळ आला व ती तरुण मुलगी पाहून तो तिला म्हणाला, “बाळ, ह्या पत्रात काय लिवलय ? ते वाचून दाखीव बरं.” त्या मुलीने ते पत्र हातात घेतले व लगेच म्हणाली, “मला मराठी वाचता येत नाही”. तिचे उद्गार ऐकून मी थक्क झाले. तो माणूस अडाणी म्हणून वाचू शकत नाही; ही मुलगी शिकलेली असून वाचू शकत नाही.

                                  मराठी मुलगी, आई-वडील सुशिक्षित, मराठी संस्कारात वाढलेली; पण इंग्रजी माध्यमात शिकल्याने इंग्रजी कामापुरते बोलू शकते. मराठी बोलता येते पण लिहिता - वाचता येत नाही. एकंदरीत ह्या पिढीला कोणत्याच भाषेची सखोल माहिती दिसत नाही. कोणत्याही भाषेला साहित्य असते. ह्या साहित्यात लेख, कादंबरी, नाटक, काव्य असे प्रकार असतात. ह्या प्रकारातील भाषाशैली, विचारमांडणी, शब्दसंपत्ती, शब्दांची योग्यायोग्यता, त्याने सालेली लयबद्धता याने ती भाषा समृद्ध होते.

आपल्या माय मराठी विषयी सांगताना बहिणाबाई चौधरी म्हणतात,
माझी माय सरसोती। माले शिकविते बोली।
लेक बहिणाबाईच्या ।मनी किती गुपीत पेरली॥
सरसोती म्हणजे सरस्वती असलेल्या आपल्या मायबोलीला विसरुन कसे
चालेल ?

                            इतक्यात बस आली, आम्ही बसमध्ये बसलो. बसची चाके फिरु लागली आणि माझे विचारचक्र सुरु झाले. मी मनात म्हटले, “जा बाई, तू अमेरिकालाच जा. तिथेच शोभून दिसशील.” मराठीच काय कोणतीच भाषा नीट न येणाऱ्या  व्यक्तीला  भारताचा इतिहास, भूगोल, संस्कृती ह्यांची तोंड ओळख कशी होणार ? ही पिढी आमच्या भारताची आधारस्तंभ कशी होणार? पुढचे भारताचे व ह्या उगवत्या पिढीचे भवितव्य काय? विचारांच्या पलीकडे हे जग आहे.
क्रमशः
अनुप्रभा, नाशिक
टीप :-
भुक्कड = निरुद्योगी, बुभुक्षित (भुकेला, हपापलेला, गरजू )

No comments:

Post a Comment