Wednesday 17 December 2014

आध्यात्मिक संदीपन

विषय : आध्यात्मिक संदीपन
                                    श्रीगुरुचरित्र अध्याय ५, ८, ९ मध्ये  श्रीपाद श्रिया वल्लभांच्या चरित्र कथा सांगितलेल्या आहेत. ह्या कथांमधून श्रीपाद वल्लभांनी अध्यात्म मार्गाने सर्व समाजात सम (सारखे) दीपन (जागृती निर्माण करण्याचे काम) केलेले दिसते.
दीपन ह्या शब्दाचा अर्थ चेतविणे असा आहे.
  चेतविणे ह्या शब्दातील चेत = जागृत , पेट 
 (त्यामुळे चेतविणे म्हणजे पेटवणे किंवा उत्तेजित करणे ह्या अर्थी व्यवहारात वापरला जातो.
तसेच चेतविणे म्हणजे जागृत करणे असल्याने
दीपन =  चेतविणे= जागृत करणे)
           सर्व सामान्य माणसास आध्यात्मिक मार्गे  प्रवृत्त करताना
निसर्ग निर्मित  लिंग भेद (अध्याय क्रमांक ५)
तिमंद बुद्धीने येणारे अपंगत्व (अध्याय क्रमांक ८)
तसेच
मनुष्य निर्मित जात, धर्म भेद (अध्याय क्रमांक ९)
 दूर करण्याचे  काम श्रीपाद वल्लभांनी केलेले दिसते.
 ----------------------------------------------------------------------
 (अध्याय क्रमांक ५)
निसर्ग निर्मित लिंग भेद : स्त्रीचा सन्मान करणारे श्रीपाद वल्लभ:-
                     श्रीपाद वल्लभांचा जन्म, आपळराज व सुमता या ब्राह्मण दांपत्याच्या घरी सध्याच्या आंध्रप्रदेशातील पीठापूर गावी झाला (ओवी क्रमांक १०, ११,  ४६).                                   
                    वयाच्या  ७ व्या वर्षी   मुंज  झाल्यावर श्रीपाद आचार, व्यवहार प्रायश्चित, वेदान्तावर भाष्य करुन वेदार्थ  इत्यादी ज्ञान तसेच चारही वेद सांगायला लागले. गुरुगृही शिक्षणास न जाता हे प्रचंड ज्ञान सांगणारा हा ७  वर्षीय मुलगा पाहून गावातले लोक आश्चर्य चकित झाले व हा मुलगा पुढे निश्चित अवतार (म्हणजे महात्मा) होईल, असे म्हणू लागले.
                         तत्कालिन समाजाने अंधश्रद्धेने ह्या ७ वर्षीय श्रीपादांची व्यक्ती पूजा केलेली दिसत नाही (ओवी क्रमांक ४९ )
              वर्षाच्या श्रीपादास मातापिता   म्हणू लागले, “तुझा विवाह करु”.
                   त्यावर श्रीपादांनी व्यक्त केलेले विचार ”वैराग्यस्त्री हिच आमची नेमस्त (वधू) आहे. तिच (विरक्ती) इच्छा आम्ही धरलेली आहे.  दुसऱ्या सर्व स्त्रिया आम्हाला मातेसमान आहेत. मी तापसी, ब्रह्मचारी आहे. योग - लक्ष्मी शिवाय मला दुसरी स्त्री चालत नाही, हे निश्चित समजा. ’श्रियावल्लभमाझे नाव आहे.” (ओवी क्रमांक ५३, ५४, ५५)
                  पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजात सर्वसामान्यपणे स्वतःचे नाव नंतर (मध्यम नाम) पित्याचे किंवा पतीचे नाव व शेवटी आडनाव किंवा गावाचे नाव लिहिण्याची प्रथा दिसून येते.
हंगेरी सारख्या मातृप्रधान राष्ट्रात मध्यम नाम आईचे लावतात.
हल्ली काही लोक आपल्या आईचे नाव आडनावाच्या आधी (मध्यम नाम)  लिहिताना दिसतात.
                         श्रीपाद वल्लभांनी इसवी सन सुमारे १३२८ च्या सुमारास “मी स्वतः विष्णु आहे” असे न सांगता आपल्या पत्नीची ओळख आपल्या नावात दिलेली दिसते. श्रियेचा वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा नवरा होय. आजच्या जमान्यातही पत्नीकडे पाहाण्याचा हा नवीन दृष्टिकोन आहे असेच म्हणावे लागेल.
                          श्रीपाद श्रिया वल्लभांनी लग्न केले नाही परंतु ‘आपल्या पत्नीचा सन्मान करा’ हा संदेश समाजास दिलेला दिसतो.
-------------------------------------------------------------------- 
(अध्याय क्रमांक ८)
तिमंद बुद्धीने येणारे अपंगत्व :तिमंदत्व दूर करण्यासाठी मातेचे कथारुपी केलेले प्रबोधन
                   श्रीपाद वल्लभांनी हिमालयातील बदरीनाथ पर्यंत विविध तीर्थ स्थानांना भेट देऊन नंतर श्रीगिरी  पर्वत तसेच गोकर्ण क्षेत्री काही काळ वास्तव्य केले, नंतर कृष्णा नदीकाठची कुरवपुर ही कर्मभूमी निश्चित केलेली दिसते.
                    कुरवपुर क्षेत्री जीवनास कंटाळेली एक विधवा आई (अंबिका नावाची सुशील वर्तनाची ब्राह्मण स्त्री) आपल्या मतिमंद मुलासह श्रीपाद वल्लभांकडे असा मंत्र मागते” की, ज्याच्यामुळे जन्मोजन्मीच्या क्रमांत असा मंद बुद्धीचा पुत्र होऊ नये.
                  श्रीपाद वल्लभ ह्या मायलेकरांना कोणताही मंत्र  देत नाहीत, तर ते स्कंदपुराणातील उज्जनी नगरीतील राजाची गोष्ट सांगतात.   ह्या गोष्टीतील ‘चिंतामणी’ ह्या माणकाचे वर्णन तसेच शंकर प्रसन्न झाल्यावर रत्न जडीत झालेले भातुकलीतील शिवमंदीर  ह्या काल्पनिक गोष्टींचे आकर्षण मानवी मनास असते.
                   गोष्टीतील चंद्रसेन राजास त्याचा शिवभक्त मित्र ‘मणिभद्र’ हा चिंतामणी हे माणिक भेट   देतो. हे माणिक मिळविण्यासाठी आजुबाजूचे राजे एकत्र येऊन चंद्रसेन राजाच्या उज्जनी नगरीस वेढा घालतात.    माणिक मिळविण्याच्या हेतूने प्रेरित झालेल्या राजांच्या साम, दाम, दंड, भेद ह्या  अस्त्रांमुळे चंद्रसेन राजा सर्व बाजूंनी   संकटात अडकतो.   चंद्रसेन राजा अशा कडेलोटाच्या संकटकाळी शनिप्रदोषाची शिवपूजा करण्यास बसतो.
                 ‘चंद्रसेन राजाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने संकटकाळी  निरुपायस्थितीत परमेश्वरावरची श्रद्धा ढळू देऊ नये’ असा संदेश श्रीपाद वल्लभ मायलेकरांना देतात.
       चंद्रसेन राजाची  पूजा पहाण्यासाठी आलेल्या  गवळणींची मुले शिवपूजा हा भातुकलीचा खेळ घरी परत आल्यावर खेळतात. चंद्रसेन राजाच्या शिवपूजेचे अनुकरण गवळणींच्या मुलांनी भातुकलीच्या खेळात केलेले दिसते.
                ‘मुलाच्या अनुकरणशीलतेचा फायदा घेऊन मतिमंद मुला  सुस्थापित करता येईल’ हा विचार ह्या गोष्टीत सांगितलेला असावा.
                         रात्र झाल्यावर सर्व मुले आपल्या मातांबरोबर घरी जातात. परंतु एक मनस्वी मुलगा खेळ सोडून घरी येण्यास तयार नसल्याने, त्याची आई तो खेळ रागाने मोडून घरी जाते. रडून दमलेल्या मुलावर रत्नजडीत शिवमंदिरासह शंकर भगवान प्रसन्न होतात.
                       बालक श्रीशंकरास विनवितो,”माझ्या आईला रागावू नका. तिने प्रदोषाची पूजा मोडली. तिला क्षमा करा.” शंभू महादेव “तुझी आई पुढील जन्मी परमेश्वरी अवताराची माता समजली जाईल” असा वर बालकाच्या मातेस देतात तसेच ‘सुख समृद्धीचा आशिर्वाद’ त्या  बालकास न मागता देतात.
                 ‘मुलाच्या भल्यासाठी वेळ प्रसंगी माता रागावल्यास मूल आईवर राग धरत नाहीत’,हा संदेश गोष्टीतील अंबिका ह्या स्त्रीला श्रीपाद वल्लभ देतात.
तिमंद मुलांना घडविताना मातेच्या जागरुक संगोपनाचा मंत्र श्रीपाद वल्लभ यांनी ह्या गोष्टीतून अधोरेखीत केलेला असावा.
 --------------------------------------------------------------------
 (अध्याय क्रमांक ९):
मनुष्य निर्मित जात, धर्म भेद  न मानता मोहाचा क्षय करा हा संदेश देणारे श्रीपाद वल्लभ  
                       कुरवपुरक्षेत्री श्रीपाद वल्लभ स्नानासाठी तर एक धोबी कपडे धुण्यासाठी रोज कृष्णानदीवर जात असत. रोजच्या होणाऱ्या गाठीभेटीतून श्रीपाद वल्लभांकडे जातीभेद नसावा, असे दिसते. धोब्याच्या मनातील दुःख ओळखून ‘तू राजवैभव उपभोगशील’ हा आशीर्वाद त्यांनी धोब्यास दिला. धोब्याच्या मनात ‘आपण राजा व्हावे’ अशी प्रामाणिक इच्छा होती.
                          तत्कालीन समाजाने श्रीपाद वल्लभांविषयी शंका घेतलेल्या असाव्यात, त्यामुळे धोब्याची मनःस्थिती द्विधा झालेली असावी. धोब्याने लोक घेत असलेल्या शंका सोडून दिल्या.  निश्चित भक्त झालेला धोबी, श्रीपादवल्लभांचा सेवक झाला.( ओवी क्रमांक  ११, १२,१३).
                            
                              एके दिवशी कृष्णा नदीत जलक्रिडा करण्यास आलेला मुसलमान राजा पाहून, धोबी स्वतःच्या कष्टमय आयुष्यावर खिन्न झाला. ह्या धोब्याला श्रीपाद वल्लभ सांगतात, “तू आता पुढील जन्मात मुसलमान राजघराण्यात जन्माला येऊन राज वैभव उपभोगशीलसर्व इंद्रिये शांत करावीत, नाहीतर मन स्वच्छ होत नाही. पुढील जन्मांमध्ये केवळ (ह्या इंद्रियांच्या अतृप्त इच्छा) पीडा करतात (त्रास) देतात.” (ओवी क्रमांक  २९)
                             ह्याचा अर्थ माणसाला मोक्ष मिळवायचा असल्यास, प्रथम मोहाचा क्षय करावयास हवा. त्यामुळे मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय असे म्हणता येईल.
                          मोहाचा क्षय करणे म्हणजे मोक्ष मिळविणे हा संदेश ह्या गोष्टीतून श्रीपाद वल्लभांनी दिलेला दिसतो.
                        श्रीपाद वल्लभांनी धोब्याला कथन केलेला ‘श्री नृसिंह सरस्वती’ हा अवतार श्रीपाद वल्लभ अवतार समाप्ती नंतर सुमारे २८ वर्षांनी  झालेला इसवी सन १३७८ ते १४५८ ह्या काळात जगाने पाहिला.
                   नृसिंह सरस्वती वैदुर(बिदर)च्या मुसलमान राजास भेटलेले आहेत. हा मुसलमान राजा पूर्वजन्मातील श्रीपाद वल्लभांचा शिष्य धोबी होय. मनुष्यास जात, धर्म ही बिरुदे जन्मानंतर चिटकवली जातात. हेच ह्या कथेतून श्रीपाद वल्लभांनी सांगितलेले दिसते. ते त्या त्यांच्या शिष्यास पुढील जन्मी स्वधर्मात बांधीत नाहीत. (ओवी क्रमांक ३०)   
श्रद्धा, अंधश्रद्धा आणि कर्मकांड प्रत्येक धर्मात काळ आणि परिस्थितीनुसार भिन्नभिन्न आढळून येतात पण तत्त्वज्ञानामध्ये एकरुपताच आढळून येते.
वैदिक सनातन धर्मात ब्रह्मन् म्हणजे परमात्मा वा परमेश्वर आहे. इस्लाम मध्ये त्याला अल्लाह् म्हणतात तर ख्रिस्तीधर्मात त्याला आकाशातील पिता (बाप्पा) म्हणतात.

                      "तुझ्या अंतकाळी (मृत्युसमयी) आम्ही तुला भेट देऊ. आम्हाला भेटण्याच्या (तुझ्या) पूर्ववासनेमुळे (आत्ताच्या जन्मात तू व्यक्त केलेल्या इच्छेमुळे) आम्हाला यावे लागेल.” (ओवी क्रमांक ३३ ).  
             माणसाच्या मनातील प्रामाणिक इच्छा परमेश्वरास पूर्ण करावी लागते. तिथे जात, धर्म, लिंग भेद आड येत नाही.
                              अश्विन वद्य द्वादशी ह्या दिवशी सिंह राशीत मघा नक्षत्र असताना, श्रीपाद वल्लभांनी स्वानंदाने कुरवपुरक्षेत्री कृष्णा नदीत जलसमाधी घेऊन आपला अवतार संपविला.
                       श्रीपाद वल्लभ कुरवपुरास रहात असताना, त्यांची थोरवी तत्कालीन लोकांना (समाजास) समजली नाही. नंतरच्या काळात  श्रीपाद वल्लभ  प्रसिद्ध झाले. (ओवी क्रमांक ४२).
                     श्रीपादराव हे त्रयमूर्तिंचा (श्रीदत्तात्रेयांचा) अवतार ठरविलेला आहे (मानलेला आहे). (ओवी क्रमांक ४९)
 ----------------------------------------------------------------------
                            श्रीपाद वल्लभ हा अवतार इसवी सन १३२० ते १३५० अशा ३० वर्षांच्या कालखंडात झाला. काळाच्या पुढे असणारा हा द्रष्टा तत्कालीन समाजास समजला नाही. त्यांनी धोब्याला सांगितल्यानुसार इसवी सन १३७८ ते १४५८ ह्या कालखंडात नृसिंहसरस्वतींच्या रुपाने समाज मार्गदर्शक अवतार समाजाने अनुभवल्याने, श्रीपाद वल्लभ यांना तसेच त्यांचे वास्तव्य असलेल्या कुरवपुर ह्या त्यांच्या कर्मभूमीस अलौकिक प्रसिद्धी मिळाली.
अलौकिक ह्या शब्दातील
लोक म्हणजे मनुष्य लोक अथवा पृथ्वीवरील मानवी जीवन होय.
लौकिक म्हणजे पृथ्वीतलावरील सामान्य प्रसिद्धी अथवा कीर्ति अथवा प्रतिष्ठा.
अलौकिक म्हणजे असामान्य प्रसिद्धी अथवा कीर्ति अथवा प्रतिष्ठा.
                              ‘ किम् कर्तव्य मूढः ‘ही समाजाची सद्यस्थिती पाहिल्यावर,  ‘श्रीपाद श्रिया वल्लभ’ चरणी मम प्रार्थना,
                               लौकिकार्थ अलौकिक कार्य तू केले
भक्तिमार्गे भक्तजना सन्मार्गी तू नेले
विश्वशांतीस्तव पुनश्च प्रवेश तुझा हवा
कर जोडोनी नम्रपणे प्रार्थिते तुज देवा
                   

॥ श्रीगुरुदेवदत्त॥

No comments:

Post a Comment