Friday 3 October 2014

कल्माषपाद - राजा निष्कासनं (श्रीगुरुचरित्र अध्याय ७ – गोकर्णमहिमा)


                      या अध्यायात इक्ष्वाकुवंशातील मित्रसह राजाच्या जीवनकथेतून पुराणातील गोकर्णमहिमा व्यक्त करणाऱ्या कथा श्रीगुरुचरित्रकार विस्ताराने सांगतात.
मीमांसा:
                   राजा मित्रसहची जीवनकथा वाचताना, तत्कालीन समाजात राजसत्तेस नैतिकबंधनांचे अधिष्ठान होते, हे दिसून येते.
                  राजसत्तेच्या पाया असलेल्या सेवकाने, जेवणात (राजाच्या नकळत) नरमांस मिसळल्याने, श्री वशिष्ठमुनी मित्रसह राजास १२ वर्षे ब्रह्मराक्षस होशील,” ह्या शापाद्वारे, राजाला निष्कासन (मानव समाजातून हद्दपार) करतात.
                    ह्या प्रसंगातूनराजसत्तेतील कोणत्याही प्रकारची चूक ही राजाची नैतिक जबाबदारी असतेअसे पुराणकालीन नीतिशास्त्र दर्शविते.




विचारधन : ओवी क्रमांक ५ ते १५
मीमांसा :
                   ‘राजा मित्रसहहा युगान्तरीच्या इक्ष्वाकु वंशातील वंशजआहे.
(एका युगाचे दुसऱ्या युगात परिवर्तन म्हणजे युगान्तरहोय)
                   प्रभू रामचंद्रांच्या इक्ष्वाकु वंशास श्रीगुरुचरित्रकारांनी युगान्तरीचा  म्हणण्याचे मर्म खालील सुभाषितात मिळते.
निन्दन्तु नीतिनिपुणाः यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्।
अद्यैव वा मरणस्तु युगान्तरे वा न्यायः पथत् प्रविचलन्ति पदम् न धीरः॥

अर्थ
                          नीतिशास्त्रातील तज्ज्ञ पंडित, भले स्तुती करोत वा निंदा करोत; लक्ष्मी देवता प्रसन्न होवो अथवा अप्रसन्न होऊन निघून जावो; जन्मावस्था असो वा मरणावस्था असो वा एका युगाचे दुसऱ्या युगात परिवर्तन असो; खंबीर आणि धीरोदात्त पुरुषांचे एक पाऊल ही न्यायपथावरुन विचलित होत नाही.
                     अशा ह्या  न्यायी इक्ष्वाकुवंशातील मित्रसह राजा, जंगलात राक्षसाची शिकार करतो. ह्या राक्षसाच्या भाऊ आपल्या भावाच्या हत्त्येचा बदला घेण्यासाठी, वेषांतर करुन राजाचा विश्वासू सेवक बनतो.
विचारधन : ओवी क्रमांक १६
मीमांसा :
                           राजा मित्रसहकडे पितृश्राद्ध असल्याने, श्रीवशिष्ठमुनी व इतर ऋषींना राजा आमंत्रित करतो.
                          ऋषी =  विरक्त योगी जो अन्तःस्फूर्त कवी असतो. ज्याला परमात्म्याचे ज्ञान झाले, त्याला ऋषी म्हणतात. परमात्म्याचे ज्ञान म्हणजेच आत्मतत्त्व ज्याला चर्मचक्षूंनी नव्हे तर ज्ञानचक्षूंनी ज्ञात होते, त्याला द्रष्टा म्हणतात. म्हणूनच वेदकालीन ऋषींना द्रष्टे म्हटले जाते. वेदकालीन ऋषींना दिव्यदृष्टीने अंतःकरणातून जे स्फुरले, त्यातूनच वेदांची निर्मिती झाली.
श्रीमद् भगवद् गीतेतील संदर्भानुसार :
ऋषिभिः  बहुधा  गीतम्  छन्दोभिः  विविधैः  पृथक्  
ब्रह्मसूत्र  पदैः    एव  हेतुमद्भिः  विनिश्चितैः    १३ - ५ ॥
अर्थ
            हे  क्षेत्रज्ञाचे  ज्ञान , ऋषींनी , ऋग्वेदादि  वेदांनी  तसेच  हेतूपूर्वक  निश्चित  केलेल्या  ब्रह्मसूत्रांतील  पदांनी ; अनेक  प्रकारे  गाईलेले  आहे .
ऋषींमधील श्रेष्ठ व्यक्तींना, महान ऋषी अथवा महर्षी म्हणतात.
श्रीमद् भगवद् गीतेतील संदर्भानुसार :
महत्  ऋषीणाम्  भृगुः  अहम्  गिराम्  अस्मि  एकम्  अक्षरम् ।
यज्ञानाम्  जप  यज्ञः  अस्मि  स्थावराणाम्   हिमालयः ॥ १ - २५
अर्थ
महर्षींमध्ये  भृगुवाणीमध्ये   एकाक्षर   म्हणजेच    मी  आहेयज्ञांमध्ये  जपयज्ञ  आणि  स्थिर  राहणाऱ्यांमधे  हिमालय  पर्वत  मीच  आहे .

                      मुनी = उच्चैः  मनुते जानाति यः सः मुनिः
                             = जो उत्तम प्रकारे मनन जाणतो, त्याला मुनी म्हणतात. महान ऋषी अथवा महर्षी याच्या पुढची पायरी म्हणजे मुनी.
                         मननात् त्रायते इति मंत्रः = ज्याच्या अखंड स्मरणाने स्वतःचे रक्षण आणि उद्धार होतो, त्याला मंत्र म्हणतात. दुसऱ्यांना मंत्र देण्याचा अधिकार हा फक्त मुनींचा असतो; कारण मुनींनी उच्चारलेल्या प्रत्येक गोष्टी खऱ्या ठरतात. महर्षी व्यास हे मुनीपदाला योग्य होते; इतकेच नव्हे तरे मुनींमध्ये सर्वोत्तम मुनी असल्यामुळे, भगवान श्रीकृष्णाने ते माझाच अवतार आहेत असे खालील श्लोकात म्हटले आहे.
वृष्णीनाम्  वासुदेवः  अस्मि  पाण्डवानाम्  धनम् - जयः ।
मुनीनाम्  अपि  अहम्  व्यासः  कवीनाम्  उशना  कविः ॥ १ - ३७
अर्थ
            वृष्णी  कुलातील  वासुदेव ( अर्थात  मी  स्वतः  श्रीकृष्ण ) ,  पाण्डवांमध्ये  अर्जुन , मुनींमध्ये   व्यास  आणि  कवींमध्ये  उशना  नावाचा  कवी ( शुक्राचार्यमीच  आहे .


विचारधन : ओवी क्रमांक १८
मीमांसा :
                राजा स्वयंपाकगृहाचा  व्यवस्थापक म्हणून  विश्वासू(?) सेवकास (मनुष्यरुपी राक्षस) नेमतो. राजशकट चालविणाऱ्या नेत्याने, प्रत्येकास पारखून घेणे गरजेचे असते. राजा मित्रसहचा बेसावधपणा त्याचा स्वतःचाच घात करतो.
                        स्वयंपाकाची व्यवस्थाविषयक सुचनांच्या शब्दरचनेतून श्रीगुरुचरित्रकारांचा मिश्किल स्वभाव डोकावतो.
राजा त्याला म्हणाला ,”तू अन्न शिजविले जाईल त्या ठिकाणी (देखरेख करण्यासाठी रहाणार) आहेस.  भांडी ज्या ज्या  गोष्टी मागतील, त्या सर्व तू त्वरित आणून देण्याचे व्रत आचरावेस. (भावार्थ :- स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्यास कोणत्याही वस्तुची, पदार्थाची कमी पडू देऊ नकोस).”

विचारधन : ओवी क्रमांक १९ ते २९
 मीमांसा :
                    राजाच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन, कपटी सेवक नरमांस (मनुष्याचे मांस) वशिष्ठमुनींना वाढतो. नरमांस जेवणाच्या ताटात पाहिल्यावर, वशिष्ठमुनी संतापतात. ते राजास तू ब्रह्मराक्षस होशील असा शाप देतात.
                       वास्तविक हे सर्व कारस्थान राजाच्या नकळत घडविलेले असते. त्यामुळे राजाचा व्यक्तिशः अपराध नसतो. आपला अपराध नसताना शिक्षा केली, म्हणून मनुष्य स्वभावानुसार राजा वशिष्ठमुनींवर चिडतो. हातात पाणी घेऊन वशिष्ठ मुनींनाही शाप देण्याची धमकी देतो. ह्या अविचारापासून राजपत्नी मदयंतीराजास रोखते.  
                मदयंतीचे (राजपत्नीचे),सतीचे बोलणे राजा आपण मान्य  केले.   ओंजळीत असलेले पाणी (राजा आपण) जाणून बुजून आपल्या पायावर सोडलेस.
                    वरील ओवी क्रमांक २६ वरुन दिसून येते की, राजाचे स्वतःच्याच हातातील पाणी त्याच्या पायावर  पडते.  
शाप देतां कल्मषपाणी। पडलें राजयाचे चरणीं।
'कल्माषपाद' नाम म्हणोनि।ब्रह्मराक्षस झाला तो राव॥२७॥
                   वशिष्ठ मुनी व इतर ऋषींना जेवणात नरमांस वाढण्याचे पाप घडल्याने, श्रीगुरुचरित्रकार राजाच्या हातातील पाण्यास कल्मष म्हणजे पापी, मलिन  पाणी संबोधतात.
                     असे हे पापी पाणीपायावर पडून, वशिष्ठ मुनींच्या शापानुसार, राजा मित्रसह कल्माष (राक्षस) पाद (पाय) नावाचा ब्रह्मराक्षस बनतो. राजाची पत्नी वशिष्ठमुनींची क्षमा मागते, त्यामुळे शांत झालेले वशिष्ठ मुनी उःशाप देतात, “तू १२ वर्षे ब्रह्मराक्षस बनून राहाशील.”
ब्रह्मराक्षस म्हणजे मरणोत्तर पिशाच झालेला ब्राह्मण होय.
परस्य योषितं हुत्वा ब्रह्मस्वमपहृत्य च। अरण्ये निर्जले देशे भवति ब्रह्मराक्षसः॥
अर्थ
                       ब्रह्मराक्षस हे मृत ब्राह्मणाचे पिशाच, दुसऱ्यांच्या तरुण स्त्रिया तसेच ब्राह्मणांची संपत्ती पळवून अरण्यात, निर्जल प्रदेशात, अतिशय तिरस्कारणीय जीवन जगते.
(संदर्भ :-The Student’s SANSKRIT–ENGLISH DICTIONARY by Shri Vaman Shivram Apte – Page NO.395)
                     ओवी क्रमांक ३० नुसार राजा ब्रह्मराक्षस बनून वनात निघून गेला. ब्रह्मराक्षसाच्या वरील व्याख्येनुसार राजाचे पिशाच बनलेले दिसत नाही. तो जिवंतपणीच ब्रह्मराक्षसाचे तिरस्कारणीय जीवन जगण्यास निघून गेला, असे दिसते. थोडक्यात राजाला श्रीवशिष्ठमुनींचा आदेश मान्य करुन, मनुष्यवस्तीबाहेर हद्दपार व्हावे लागलेले दिसते.

विचारधन : ओवी क्रमांक ३२ ते ४२
 मीमांसा :
                    ब्रह्मराक्षस बनलेला राजा जीवो जीवस्य जीवनम्ह्या पद्धतीने स्वतःचे अन्न मिळवीत आपले आयुष्य कंठीत असताना,   एका ब्राह्मण वाटसरुला आपले भक्ष्य म्हणून पकडतो. त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या पतीला ब्रह्मराक्षसाने जीव दान द्यावे म्हणून परोपरीने याचना करते, परंतू ब्रह्मराक्षसरुपी राजा त्या ब्राह्मणाला ठार मारुन आपले भक्ष्य बनवितो.
                       तत्कालीन पद्धतीनुसार आपल्या मृत पतीबरोबर सती जाण्याच्या आधी ती ब्राह्मणस्त्री राजाला शाप देते,
परि रमतां तुंवा स्त्रियेसवें।प्राण जाईल स्वभावें।
आम्हां अनाथां भक्षिसी दुष्ट भावें। दुरात्मा तूं राक्षसा॥४२
१२ वर्षे पूर्ण झाल्यावर राजा परत आपल्या घरी येतो.

विचारधन : ओवी क्रमांक १२१ ते १७९
मीमांसा :
                          ब्राह्मणस्त्रीने दिलेल्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी तीर्थाटन करुन हताश मनाने मिथिला नगरीबाहेर झाडाखाली बसला असताना श्रीगौतमऋषी राजाला भेटतात. श्रीगौतमऋषी राजाला महापातके नाहिसे करणाऱ्यागोकर्णह्या स्थानाविषयीचा शिव- महिमा गोष्ट रुपात सांगतात.
                 
                    ह्या गोष्टीतील व्यभिचारी स्त्री प्रथम जन्मात सुंदर सुस्वरुप असते. परंतु तिचे स्वयंकेंद्रित मन पतीच्या आत्महत्त्येची दखल न घेता व्यभिचाराच्या गर्ततेत भरकटत जाते.
                    मित्रसह राजा शिकारीला गेलेला असताना, भयंकर राक्षसाला रागाने मारुन टाकतो. वास्तविक त्या राक्षसाने राजाला कोणताच त्रास दिलेला नसतो. स्वयंकेंद्रित राजाला राक्षस हत्त्येचे सोयरसुतक नसते.
                    व्यभिचारी स्त्री व राजा ह्या दोन्हीही व्यक्ती स्वतःच्या हातून घडलेल्या चुकीची दखल घेत नाहीत. वास्तविक ह्या चुकाच त्यांना पापाच्या मार्गावर नेताना दिसतात.

                          राजाने नाहक मारलेल्या आपल्या भावाचा बदला विश्वासू सेवक रुपी राक्षस श्री वशिष्ठऋषींना राजाने दिलेल्या जेवणात नरमांस मिसळवून घेतो. या प्रसंगात वशिष्ठमुनी तसेच आमंत्रित ऋषींची माफी मागण्याचे सोडून राजा वशिष्ठमुनींना शाप देण्याचा कांगावा करतो. राजा मित्रसहच्या सूर्यवंशाचा पहिला राजा इश्वाकुने वशिष्ठमुनींकडून अध्यात्मविद्या संपादन केली. अशा ह्या वंशपरंपरेने अध्यात्मिक गुरुंना प्रत्युत्तर देण्याची राजाची चूक राजपत्नी थांबविते.
राजपत्नी वशिष्ठमुनींची क्षमा मागून शिक्षेचा कालावधी १२ वर्षे मर्यादित करते.

                       गौतमऋषींच्या गोष्टीतील व्यभिचारी स्त्री मद्याच्या नशेत गायीचे वासरु कापते. नशा उतरल्यानंतर तिला तिची चूक लक्षात येते. आपल्या पतीपासून ती चूक लपविण्यासाठी मृत वासराची जमिनीत पुरुन विल्हेवाट लावते व वासरु वाघाने पळविले म्हणून कांगावा करते. व्यभिचारी स्त्रीला पश्चाताप होत नाही. ती जन्म मृत्यूच्या फेऱ्यांत केलेल्या पापांच्या शिक्षा भोगते.

                          कल्माषपाद ब्रह्मराक्षसरुपी राजा आपल्या हातून न कळत झालेल्या पापाचे मर्म नाहक केलेली राक्षसाची शिकार जाणत नाही. वास्तविक शरण आलेल्या अभय देणे हेच खरे क्षत्रियत्व, परंतु राजा निरपराध ब्राह्मणाची शिकार करतो. ब्राह्मणपत्नीच्या शापवाणीने राजाच्या मनाला आपल्या हातून घडलेल्या ब्रह्महत्त्येची टोचणी लागते
                      अशा ह्या पश्चातापदग्ध राजाला गौतमऋषींनी सांगितलेल्या गोष्टीतून दिसते की, अंध कुष्ठ रोगी भिकारी स्त्री कडून न कळत बेलाची पाने शिव लिंगावर पडतात. ह्या न कळत घडलेल्या पुण्य कर्मामुळे तिची जन्म मृत्युच्या फेऱ्यातून सुटका होते.
         


विचारधन : ओवी क्रमांक ७५
मीमांसा :
ह्या ओवीत सांगितलेला
विश्वदेव म्हणजे सर्व विश्वाला व्यापून उरलेला देव
ईशावास्य उपनिषदातील संदर्भानुसार
ॐ पूर्णम् अदः पूर्णम् इदम् पूर्णात पूर्णम् उदच्यते।
पूर्णस्य पूर्णम् आदाय पूर्णम् एव अवशिष्यते॥
अर्थ -
ॐ या नावाने संबोधिलेले परमब्रह्म हे परिपूर्ण आहे, तसेच कार्यब्रह्म पण परिपूर्ण आहे. कारण पूर्णापासूनच पूर्णाची उत्पत्ती होते, तसेच महाप्रलय काळी कार्यब्रह्म परमब्रह्मात विलीन होते आणि पूर्ण रुपात परमब्रह्म उरते.
गणितीभाषेत आपण अनंत(infinity) ची व्याख्या करतो :-
infinity - infinity = infinity
infinity + infinity = infinity





विचारधन :  ओवी क्रमांक ६६, ६७

मीमांसा :
अशाप्रकारे वरील पुराणकथेतून श्रीगुरुचरित्रकार सांगत असावेत,
                        ‘कळत-नकळत घडलेल्या पापाची शिक्षा जशी राजा व व्यभिचारी स्त्रीला भोगावी लागते, तसेच न कळत घडलेल्या पुण्याचे फळ व्यभिचारी स्त्रीला मिळते.’
                           मनुष्याने स्वतःच्या पाप -पुण्याचे समर्थन करण्यापेक्षा आध्यात्मिक भक्तिमार्ग आचरणात आणावा. भक्तीमार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शक ठिकाण गोकर्ण क्षेत्र आहे, असे  श्रीगुरुचरित्रकार सांगतात.
 गोकर्ण क्षेत्राचे वर्णन करताना  श्रीगुरुचरित्रकार म्हणतात,
 ‘जसे कैलास पर्वताचे  शिखरावर  किंवा मंदर  पर्वताचे  शिखर  येथे कर्पूरगौराचा (शंकराचा) वास  आहे हे ठाम मत आहे. तसाच गोकर्णक्षेत्री   (शंकराचा) वास  आहे, हे ऐका.’
                           कोणतेही शास्त्र जाणून घेण्यासाठी प्रथम त्यातील ठाम मते (assumptions)समजून घ्यावी  लागतातसृष्टीत उत्पत्ति झाल्यापासून झाडावरुन फळ खाली पडत असणार. सफरचंद खाली पडताना पाहून सर आयझॅक न्युटन ह्यांना गुरुत्वाकर्षण जाणविले. ‘पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहेह्या श्री न्युटन यांच्या ठाम मतावर आजची भौतिक प्रगति अस्तित्वात आली.
न पाहिलेले पृथ्वीवरचे गुरुत्वाकर्षण आपण अनुभवतो. न पाहिलेल्या,                          अनुभवलेल्या मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत दि २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारतीय मंगळयान प्रथम प्रयत्नात स्थिरावले. हे मंगळयान  तिथून  मंगळ ग्रहाचे  विविध फोटो पाठवून शास्त्रीय  माहिती देत राहिल
                         अंतराळक्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणारे इस्त्रोचे समस्त शास्त्रज्ञ तसेच भारतीय अंतराळ विज्ञानाचे जनक माजी राष्ट्रपति डॉ. अब्दुल कलामसाहेब यांचे अभिनंदन.
                               भौतिक विज्ञान हे शस्त्र म्हणून वापरल्यास सृष्टीचा विनाश करु शकते परंतू तेच विज्ञान शास्त्र मानवाच्या अंतराळातील कक्षा विस्तृत करते.
                     अध्यात्मिक भक्तीमार्गातून मानवाची होणारी मानसिक प्रगती त्याला सर्वनाशाकडे न नेता उत्कर्षाकडे नेते. असा हा अध्यात्मिक भक्तिमार्ग सांगताना, सर्वप्रथम गोकर्ण क्षेत्र ह्या ठिकाणी श्री शंकराचा वास आहेहे ठाम मत (assumption)सांगतात.
ह्या दृढ भावातून उपदेशतात ते शुद्ध आत्म्याचे महत्त्व॥
॥श्रीगुरुदेवदत्त॥


No comments:

Post a Comment