Saturday, 24 June 2017

मायबोलीचे भुक्कड ४ :-

शिक्षणातील 3 G
                          ‘गणित विषय ऐच्छिक होऊ शकतो का?’ असा प्रश्न उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाला विचारल्याची चर्चा, सध्या वर्तमानपत्रातून वाचावयास मिळते. मनुष्य सुशिक्षित अथवा अडाणी असला तरी रोजच्या जीवनात गणिताची गरज पडत असते.
                              घरगुती प्लंबिंगच्या कामातील गणिताचे महत्त्व गृहिणीला समजले नाही तर होणारा गोंधळ मी पाहिलेला आहे. एक वकीलबाई प्लंबरकडून घरात काही सुधारणा करुन घेत होत्या. वकीलबाईंना ड्रेनेजसाठी लागणाऱ्या स्लोपचा खर्च प्लंबर सांगत होता. वकील असलेल्या गृहस्वामिनीला पाण्याच्या उताराचे गणित कळत नव्हते. त्यांना वाटत होते, ‘हा प्लंबर आपल्याला हिशोबात गुंडाळतोय. नाहक जास्त खर्च करायला लावतोय.’ हिशोबात झालेल्या कटकटीतून गृहस्वामिनी गरजल्या, “तुला माहित आहे का? मी वकील आहे!” प्लंबरसाहेबही इरेला पेटले ते म्हणाले, “तुम्ही वकील असाल तर मी प्लंबिंगमधला फौजदार आहे.” फौजदारसाहेब काम अर्धवट टाकून निघून गेले.
                              ह्या प्रसंगातील वकीलबाई हल्लीच्या शॉर्टकट अभ्यासक्रमानुसार १२वी नंतर डायरेक्ट वकील झालेल्या आहेत. पदवी शिक्षणात निरनिराळ्या विषयांची तोंड ओळख होत असल्याने, अमेरिकेत पदवी प्राप्त केल्यानंतर वकील, डॉक्टर, इंजीनिअर ह्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो.
                                आधुनिक जगाबरोबर आपला विद्यार्थी रहावा म्हणून १९७५साली १०+२ अभ्यासक्रमाद्वारे शिक्षणक्षेत्राने अमूलाग्र क्रांती केली. ह्या अभ्यासक्रमांत एक विषयात नापास होऊनही, पास करणारी ढकलगाडी बंद झाली. विविध विषयांच्या अभ्यासांत भर पडून, विद्यार्थ्याला भावी संगणकयुगासाठी सक्षम बनविण्याचे प्रयत्न झाले.
                                 १०+२ अभ्यासक्रमानुसार इयत्ता सातवीत सेट थिअरीह्या विषयाचा नव-गणितात समावेश झाला. ‘सेट थिअरीची जीवनांत गरज नाही. नाहक विद्यार्थ्यांवरचा बोज वाढविलेला आहे’, अशी घरा-घरांतील वडिलधाऱ्या  मंडळींची टीका-टिपण्णी आम्ही विद्यार्थ्यांनी ऐकली.
                              आमच्या ग. . शाळेतील पांगारकरबाई(छोट्या केळकरबाई), वैद्यबाई, डांगेबाई ह्या गणित- शास्त्र विभागाच्या  शिक्षकांनी  सेट थिअरी स्वतः शिकून आम्हाला अप्रतिम शिकवली. सेट थिअरीच्या बळावर संगणक क्षेत्रात क्रांती(Image Processing)होऊन आंतरिक्षक्षेत्र(चंद्र-मंगळमोहिम),तसेचआंतरजालक्षेत्र(Facebook,Whatsapp,Website)  विकसित झाले. आधुनिक तंत्रज्ञानाची फळे चाखणारी तसेच आधुनिक तंत्रज्ञानांत काम करणारी आमची पिढी, शालेय जीवनातील शिक्षकांची सदैव ऋणी आहे.
                    मध्यंतरी शाळेत जाण्याचा प्रसंग आला. मन विषण्ण झाले. आमच्या शाळेचे वैभव असलेली बाग, ‘संगीत- शिवण -होमसायन्स -ड्रांईंग हॉल; डबल बार, सिंगल बार इत्यादी खेळाची साधने; व्हॉलीबॉल तसेच खोखोचे मैदान ह्या गोष्टी अदृश्य कश्या झाल्या? मुख्य म्हणजे ब्रिटीशकालीन वारसा लाभलेला, आमच्या व्यक्तिमत्वाचा  अविभाज्य भाग असलेला, सेंट्रल हॉल कुठे गेला? काळाच्या ओघांत शाळेचे रुप बदलले. परंतु आमचे शिक्षक सेवानिवृत्तिनंतरही शाळेत येऊन ज्ञानदानाचे काम करीत आहेत, हे पाहून मन नतमस्तक झाले.
                                जिना चढून गेले तर शेलारबाईंनी प्रथम स्वागत केले. सेवा निवृत्तीनंतरही शेलारबाई विद्यार्थिनींचे नुकसान होऊ नये म्हणून शाळेत गणित-शास्त्र पूर्वीच्याच उत्साहाने शिकवीत होत्या. शाळेत झालेल्या गप्पांमधून समजले वैद्य बाई, गीतेबाईंची आई - अंजना वाघ बाई, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका म. . पा. शाळा क्र. ११ (१९८२ साली आदर्श शिक्षिका - धर्माधिकारी पुरस्काराने सन्मानित) ह्यांच्या सारखे अनेक शिक्षक सेवानिवृत्तिनंतर शाळेत शिकविण्यास येत आहेत.
                             आमची ग. . ही सरकारी शाळा असताना, शिक्षकांची वानवा का? सरकारी शाळा असल्यामुळे, आमच्या शाळेला निधीची कमतरता कधीच भासली नाही. २०व्या शतकांत प्रशिक्षित शिक्षकांसहित, शाळेचे रुप सदैव अत्याधुनिक होते. त्या काळात शाळेसाठी देणगी किंवा पालक सभाह्या गोष्टींचा जन्म झाला नव्हता. शाळेची फी इयत्ता ५वीला नाममात्र रुपये ५/= होती. दरवर्षी आठ आणे फी (५० पैसे) फी वाढायची. शिक्षकांच्या पाल्यांना फी माफ नव्हती. आमचे शिक्षक एक पैसा ही जास्त न घेता शनिवार-रविवार तसेच इतर वारी जास्त वेळ शिकवायचे. कोणतीही फी न आकरता, आमची स्कॉलरशिपटिळक-महाराष्ट्र विद्यापीठ(गणित, इंग्रजी), हिंदी विशारद तसेच ड्रॉईंगच्या परिक्षांची तयारी करुन घेत असत. . . हायस्कूलचा ह्या परिक्षांमधील निकाल अत्युत्तम लागायचा. शाळा बाह्य विश्वातील ह्या विविध परिक्षांमुळे आम्हा विद्यार्थिनींचे गणित तसेच इंग्रजी  व्याकरण खूप पक्के झाले.
                              आमच्या शाळेत अभ्यासाबरोबर खेळ, नाट्य, संगीत,  शिवण इत्यादी क्षेत्रातील गुणी विद्यार्थिनींना खूप प्रोत्साहन नेहमी मिळत असे.
१९७५साली महाराष्ट्र बोर्डाची शेवटची ११वी मॅट्रिकची परिक्षा झाली. ११वी मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना  ‘गणितविषय सोडून मॅट्रिक पास होण्याची सवलत होती. गणितात कच्च्या असणाऱ्या मुलींना गणित विषय मिळाला नाही की, दरवर्षी शाळेत थोडा गोंधळ व्हायचा. काही पालक आपल्या मुलींना दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या गावी पाठवून मॅट्रिक करवून घ्यायचे. काही विद्यार्थिनी धुसफुसत गणित विषय सोडून, मॅट्रिक परिक्षा पास व्हायच्या. कला शाखेत जाऊन B.A. करणाऱ्या ह्या मुलींना पुढील जीवनांत  नोकरीचे दरवाजे बंद व्हायचे. गणिताविना भविष्यातील अंधकाराच्या भितीने ह्या मुली बिथरायच्या. एकदा ह्या सर्व परिस्थितीचा उद्रेक झाला. चिडलेल्या काही विद्यार्थिनींनी वर्गातील शिक्षकांच्या टेबल खुर्चीला खाज-कुइली लावली होती. शिस्तप्रिय शाळेच्या इतिहासाने एक कटू प्रसंग अनुभविला.
                      १९८०पर्यंत नाशिकमधील शिक्षणक्षेत्रांत अग्रगण्य असलेल्या ग. . शाळेतील विद्यार्थिनींचे आई-वडील सुशिक्षित सुस्थापित मध्यमवर्गातील होते.   ह्या पालकांमध्ये आपल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्याची कुवत होती.
                                 २१व्या शतकात ग. . तसेच इतर मराठी माध्यमाच्या शाळांचे चित्र बदलेले आहे. ह्या शाळांमध्ये  येणाऱ्या विद्यार्थिनींचे पालक पोटाला चिमटा देवून आपल्या कन्येचे भविष्य घडत आहेत. शिक्षणाचा गंध नसणाऱ्या पालक पिढीला गणिताचे भविष्यातील महत्त्व कळणार नाही. शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थी जीवनाचे कधीही भरुन न निघणारे नुकसान होत आहे. गणिताचा बागुलबुवा  दूर झाल्यास, सध्याचा विद्यार्थी सहज पदवीधारक होईल. अशा प्रकारे प्राप्त झालेली पदवी स्वतःचे पोट भरु शकत नाही, हे समजल्यावर वेळ हातातून निघून गेलेली असेल. त्यावेळी बेकार असलेल्या तरुणाईचा उद्रेक झाल्यास,समाज धुरिणांचे हताश उद्गार (कविवर्य बा भ बोरकरांच्या शब्दसामर्थ्याचा आधार) ऐकावयास मिळतील   
उभ्या जगाचे अश्रू  पुसाया
जरी आपुले हात उणे
तरी समुद्रायणी प्रमाणे
पोसू तटिची म्लान तृणे
हे भीषण भविष्य टाळण्यासाठी आमच्या ग. .हायस्कूल, नाशिक  सारख्या सर्व मराठी माध्यमाच्या शाळांना समाजाने तसेच सरकारने गतवैभव प्राप्त करुन द्यावे.     प्रशिक्षित गुरुजनांद्वारे ह्या शाळांचा विद्यार्थी घडविल्यास, तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण-गंगा पोहोचेल.
सर्व शिक्षण अभियानाद्वारे भावी पिढ्यांच्या शिक्षणातील 3G  (गणिताची गणिती गरज) भागवावी, ही न्याय-देवतेला प्रार्थना.
अनुप्रभा नाशिक


संदर्भ :-
दिव्यमराठी बातमी दिनांक २० ज़ून २०१७ (पान क्रमांक ७, नासिक सिटी)

लोकसत्ता :- दिनांक २१ जून २०१७
कविवर्य बा. . बोरकर यांच्याकांचनसंध्याकवितेतील चौथे  कडवे
उभ्या जगाचे अश्रू  पुसाया
जरी आपुले हात उणे
तरी समुद्रायणी प्रमाणे
पोसू तटिची म्लान तृणे
* भुक्कड = निरुद्योगी बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )

No comments:

Post a Comment