स्वातंत्र्य
मिळून इतकी वर्षे झाली, पण इंग्लिश भाषेचा आपल्या मनावरील पगडा
दूर झालेला दिसत नाही. पालक ‘गरीब असो अथवा
श्रीमंत’, आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या भारी(?)शाळेत घालण्यात, धन्यता मानताना
दिसतो.
२०व्या
शतकांत स्वातंत्र्योत्तर काळांत, मराठी माध्यमात शिकलेली पिढी आजच्या संगणक युगात कुठेही कमी पडताना दिसत
नाही.
स्वातंत्र्यपूर्व
काळात जन्माला आमची पिढी एकत्र कुटुंबपद्धतीत वाढली. घरात कमीत-कमी ४-५ भावंडे, आजी –आजोबा, घरातील मुलांमध्ये शिकणारा एखादा काका किंवा लग्नाळू
आत्या. मिळवता एकटा पुरुष. त्याला पगार
१५०-२०० रुपये महिना. त्यावेळी भ्रष्टाचार, लाचलूचपत, घोटाळे ह्याचे फारसे अस्तित्व नव्हते. वडिलांची हयात
पैसे मिळविण्यात व आईचा जन्म धुणे, भांडी, स्वयंपाक करण्यात संपायचा.
दुसरे
महायुद्ध संपले, तरी त्याचे परिणाम समाजावर होत होते.
साखर, रॉकेल रेशन दुकानातून मिळत असे, परंतु तेही अपुरे. मुलाचे तसेच मुलीचे नाव शाळेत घालताना
प्रवेश फी, डोनेशन हा प्रकार नव्हता. मोठ्या
मुलाला नवीन पुस्तके मिळत असत. वर्तमानपत्राच्या कागदाचे कव्हर.
पुस्तके व्यवस्थित वापरावी लागत. लागोपाठ भावंडे असल्याने, धाकटी भावंडे तीच पुस्तके वापरीत असत. अभ्यासक्रमात फार बदल
होत नसे. एखाद्याच विषयाचे पुस्तक बदलत
असे. सबंध पेन्सिल कधीच मिळत नसे, एका पेन्सिलचे दोन तुकडे. दोन भावंडांत कंपास पेटी एकच. ज्याचा तास असेल त्याने
वापरायची. दुसऱ्याने तासाला तीच कंपासपेटी घेऊन यायची.
एकाच छत्रीतून २ भावंडांनी जायचे. पायात चप्पल असली तर असली, नाहीतर तसेच शाळेत जायचे. त्यावाचून काही अडत नसे.
दप्तर म्हणजे घरातील त्यातल्या त्यात बरी पिशवी. जेवणाचा डबा घरातील एखादा असावयाचा. डब्यात पोळी /
भाकरी - भाजी किंवा लोणचे- पोळी. आजच्या सारखे सॉस किंवा
जॅम प्रकार नसावयाचे. शाळेतून कोणतीही तक्रार येता कामा नये,
ही आई - वडिलांची ताकीद. पास झालात तर शिक्षण चालू. नापास झाला तर शिक्षण बंद.
प्रत्येक कुटुंबात मुलगा असो अथवा मुलगी असो शिक्षणाच्या बाबतीत एकच
नियम. सर्वसामान्य माणसाचे जीवन शिस्तबद्ध असल्याने शिक्षणाचे
खरे मूल्य कळाले.
हल्लीच्या
काळातील शिक्षणावर खर्च होणारे मूल्य (द्रव्य) पाहिल्यावर; मनात विचार येतो, ‘बरे झाले, आपण स्वातंत्र्यपूर्व काळांत जन्माला आलो नाहीतर
आजच्या युगात आपण अंगठेबहाद्दर राहिलो असतो.’
जितकी
महागडी पॉश शाळा म्हणजे उत्तम शिक्षण हे आजचे २१व्या शतकांतील समीकरण(?) मोठ्या उत्साहात पहिली १-२ वर्षे आई-वडील पोटाला चिमटा देऊन; शाळेचा गणवेश, फी, स्कूल बस किंवा रिक्क्षा वगैरे खर्च करतात.
महागड्या शाळातील शिक्षण खरोखरच ‘लय भारी’
असत का? ‘ह्या महागड्या शाळांचा खर्च पालकांना झेपत नाही तसेच इंग्रजी भाषेतील शिक्षण
मुलांना पेलवत नाही’, अशा कचाट्यात सापडलेले पालक मुलांची अॅडमिशन परत घराजवळच्या स्वस्त मराठी शाळेत
घेतात. १-२ वर्षे पॉश शाळेत वावरलेली मुले
स्वाभाविकच जनता क्लासच्या शाळेत शिकायला नाराज असतात.
इंग्रजी
शाळेत वाढलेले हे छोटेसे रोपटे मराठी शाळेत कसे रुजणार ? मराठी
भाषेशी इतके दिवस संपर्क नसल्याने, मराठीतील शिक्षण ह्या मुलांना
समजत नाही. बाल-मानसशास्त्र जपणारी हल्लीची
शिक्षणपद्धती विद्यार्थ्याला १०वी पर्यंत आरामात घेऊन जाते. १०वीतील
ही मुले मराठी भाषेत १० वाक्य लिहू शकत नाहीत मग इंग्रजी येण्याची गोष्ट दूरच राहिली.
ह्या मुलांच्या व त्यांच्या आई वडिलांना पिढीला ‘वर्तमानपत्र’ म्हटले तर कळत नाही पण ‘पेपर’ म्हटले
की बरोबर समजते. बारसे, नामकरणविधी वगैरे
कार्यक्रम त्यांना माहित नसतात. Birth-Day माहिती असतो. बर्थ-डे न म्हणता बड्-डे म्हणतात. केक
कापतात. निरांजनानी ओवाळणे, माहिती नसते.
एकंदरीत आपल्या संस्कृतीचा विसर पडलेला दिसतो.
नवीन पिढीला श्राद्ध हा प्रकार माहित नसावा. एका ठिकाणी
आजी आणि नातीचा संवाद चालला होता. माझी भूमिका श्रोत्याची होती.
आजीने नातीला विचारले, “काय ग, आज तुझी ती संगीता मैत्रिण
आली नाही?” नातीने उत्तर दिले, “आजी,
आज संगीताचे ग्रॅण्डफादर (आजोबा) मरण पावले म्हणून त्यांचा बर्थ-डे होता. त्यामुळे ती आली नाही.” आजी व मी खूप हंसलो. आजीने तिला समजावून सांगितले (कारण तिची आजी शिक्षिका
होती), “अग ‘बर्थ-डे’ म्हणायचे नाही. ‘श्राद्ध’
म्हणावयाचे.” श्राद्ध म्हणजे काय? हे आजीने नातीला थोडक्यात सांगितले.
भाषा
बोलण्यावरुन ती व्यक्ति कोणत्या संस्कारात वाढलेली आहे, ह्याची
जाणीव होते. शब्द उच्चारण्याची पद्धत, शब्दसंपत्ती,
कोणत्या शब्दांवर केव्हा जोर द्यावा- केव्हा नाही,
आवाजातील सोज्वळता, शब्दांची लयबद्धता ह्या सर्व
गोष्टींचा समावेश भाषा संस्कारात होतो.
कोणतीही
भाषा ही व्यक्ति- स्थल- काल तसेच सामाजिक
परिस्थिती ह्यांवर अवलंबून असते. ‘भाषा ५ कोसांवर बदलते’,
असे म्हणतात. आपली मराठी भाषा कोकणात ‘कोकणी’ असते तर सांगली सातारचा ‘ठसका’ पुणे-मुंबई मराठीपेक्षा वेगळा
असतो. कानडी हेल काढत ‘बेळगावी मराठी’
मायबोलीची अस्मिता जपताना दिसते. हीच मराठी भाषा
जळगाव खानदेशात ‘अहिराणी’ रुप धारण करते
तर नागपूर विदर्भात ती अस्सल ‘वऱ्हाडी’ होते. नाशिक जवळील सापुतारा-वघईच्या
जंगलात गुजराथीचा पदर धारण केलेली मराठी
भाषा ‘डांगी’
भाषेत प्रकट होते. तंजावरची मराठी ‘शिवकालीन मराठीच्या अस्तित्व खुणा’ जपताना आढळते.
मराठी शब्दांना
जपानी भाषेतील प्रतिशब्द लिहा, हीच मायबोली जपानी भाषेत लिलया
बोलू शकते. ह्याचे कारण आपले बुद्ध भिक्क्षु बौद्ध ‘अहिंसा परमो धर्मः।‘ ह्या तत्वाचा प्रसार करण्यासाठी चीन-जपान ब्रह्मदेश ह्या
देशात गेले. ह्या बैद्ध भिक्क्षुंच्या तत्वज्ञानाबरोबर,
भारतीय व्याकरण जपानला पोहोचले. जपानी व मराठी भाषेचे व्याकरण समान असल्याने,
मराठी माणसाला जपानी भाषा शिकणे सुलभ होते.
संस्कृत
व प्राकृत भाषेच्या मिलाफातून तयार झालेली मराठी भाषा स्वतःचा प्रादेशिक गोडवा जपताना
दिसते. जाण्याची अनुमती देताना मराठी भाषा ‘जावा की’ ची सोलापूरी चादर पांघरवीते. ‘उद्या सकाळी पहाट जाऊ या’ म्हणणारी मराठी मराठवाड्यात
‘सकाळी १०वाजता निघते’. (आरामात जगायला शिकविणारी मराठवाड्याची मराठी भाषा 'बोले तैसा चाले' ह्या उक्तीचा अनुभव देते. मध्यंतरी काही महिने मराठवाड्यात रहाण्याचा योग आला. सकाळी घरी दुधाचा रतीब घालणाऱ्या आजीबाईंनी पहिल्याच दिवशी मला सांगितले, "ज्या दिवशी तुमची दुधाविषयी तक्रार येईल, त्या दिवसापासून माझे दुध बंद होईल." मराठ्वाड्यातील मुक्कामांत दररोज भाकरी एवढी जाड साय आम्हाला आजीबाईंच्या दुधावर रोज मिळत होती.) ह्या निघालेल्या
व्यक्तीचे वर्णन करताना ‘येऊन राहिलाय’ म्हणत नासिकला क्षणभर हीच मराठी थबकविते. परक्या व्यक्तीला
वाटते सकाळी निघालेली व्यक्ती येता-येता निघण्याच्या ठिकाणी राहून
गेली, परंतु नाशिककर मराठीला ‘व्यक्ती प्रवासात
असून, येत आहे;’ हा अर्थ अभिप्रेत असतो.
जग झपाट्याने
बदलत चालले आहे. समाजातील स्थल - काल परिस्थितीनुसार
अंतर्गत व बाह्य वातावरणाच्या परिणाम होऊन, भाषाही बदलत चाललेली
आहे. हे सर्व बदल आत्मसात करण्यास आपली मायबोली समर्थ आहे.
माय मराठीत ‘अॅपल’, ‘मॅंगो’
हे उच्चार लिहिण्याची क्षमता असताना; लेफ्ट साईड,
राइट साईड, थॅन्क्यु, प्लिज
ह्या शब्दांची पेरणी कशासाठी? अर्थवाही सुटसुटीत परकीय शब्द माय-मराठीने नेहमीच सामावून घेतले आहेत. मराठी भाषांतराचा
अतिरेकही मजेशीर विनोद निर्माण करु शकतो. ह्या विनोदाचे वर्णन
करताना दिलेलेले उदाहरण :-
‘रेल्वे सिग्नल’ ह्या इंग्रजी शब्दाचे आचार्य अत्रेंनी मायबोलीत केलेले भाषांतर ‘अग्निरथ
गमनागमनी दर्शक पट्टिका’
मराठी
भाषाही स्पष्ट बोलणारी असली तरी दुराग्रही कधीच नव्हती. भाषा बोलताना प्रत्येक
व्यक्तीने काळजी घ्यावयास हवी. शब्दाचा उच्चार स्पष्ट असावा. योग्य शब्दांचा वापर करावा.
शब्दांवर योग्य ठिकाणी जोर देऊन बोलण्यात लयबद्धता साधता येते. लोकांना भाषा ऐकाविशी वाटते. भाषेतून जसे विचार व्यक्त करता येतात तसेच दुसऱ्याच्या भावनाही जपता येतात.
इतर भाषांचा आदर करणारी
भाषा, व्यक्ति-व्यक्तिंमध्ये सुसंवाद साधू शकते.
ऑफिसमध्ये बोलण्याची भाषा, सहकाऱ्यांशी बोलण्याची भाषा, वरिष्ठांशी बोलण्याची
भाषा,
कनिष्ठांशी बोलण्याची भाषा, तारतम्य राखून
वापरावी लागते.
कुटुंबात
बोलण्याची भाषा, नातेसंबंधात बोलण्याची भाषा,
लहानमंडळींशी बोलण्याची भाषा, शेजाऱ्याशी बोलण्याची
भाषा,
समाजात बोलण्याची भाषा स्थल - काल प्रसंगानुसार बदलावी लागते.
भाषेचे हे संस्कार आमच्या लहानपणी आई-आजीच्या पिढीकडून न-कळत
होत होते. शाळेचे तोंडही न पाहिलेली ही पिढी, २-३ वाक्यांनंतर म्हणींचा वापर अर्थ समजून करायची.
त्यांच्या म्हणींच्या खजिन्यातून आमच्या पिढीला बालपणी व्यावहारिक ज्ञान
न कळत मिळत गेले.
इंग्लिश माध्यम शिक्षित माय-लेकरांचा सुसंवाद ऐकल्यावर मी कपाळाला हात लावला.
इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या
चिरंजीवांनी आईला विचारले, “आई, अंथरुण पाहून पाय
पसरावे म्हणजे काय ग?” मातोश्री म्हणाल्या, “हे अंथरुण आहे, तेवढेच आपले हात-पाय लांब करुन झोपायचे.” ‘आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा’
हा गभितार्थ मातेलाच माहिती नाही तर मुलाला कोठून समजणार?
कविवर्य
बा. भ. बोरकरांच्या शब्दसामर्थ्याच्या आधारातून उद्याचा आशावाद (भुक्कड*
३)व्यक्त करताना म्हणावेसे वाटते,
सले मनाची विसरुन सगळी
भले मराठीस जिव्ही शिकवू
शिशुहृदयात पुन्हा एकदा
या मायबोलीचे प्रेम
रुजवू
क्रमशः
अनुप्रभा, नाशिक
संदर्भ:-
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ‘कांचनसंध्या’ कवितेतील तिसरे कडवे
सले कालची विसरुन सगळी
भले जमेचे जिवी स्मरु
शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम
करु
* भुक्कड = निरुद्योगी बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )
|
No comments:
Post a Comment