Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Sunday, 10 December 2017

अतिथी देवो भव।


{सत्य घटनेवर आधारित कथा}

                                     त्यादिवशी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळेतील विद्यार्थीवर्ग, अध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग सर्वजण कामात दंग होते. मधूनमधून मुख्याध्यापकांची फेरी होत होती व ते सूचना देत होते. कोणी शाळेची स्वच्छता करण्यात दंग होते, तर कोणी वर्ग सजावटीत दंग होते. अध्यापक वर्ग मुलांच्या कामावर लक्ष ठेवून बोर्डवर सुविचार, सुभाषिते विद्यार्थ्यांकडून लिहून घेत होते. कर्मचारीवर्ग घोडे व घोड्याची पागा, कवायतीचे ग्राऊंड, मेसची जागा, शुटींगचे ग्राऊंड स्वच्छ करण्यात गढला होता.

                  उद्या ब्रिटीश अधिकाऱ्याची शाळेला अचानक भेट होणार होती. ते १९४२ साल होते. देश गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीने भारावलेला होता. इंग्रजांची सत्ता उखडून टाकून देश स्वतंत्र करावयाच्या ईर्षेने भारतीय जनता पेटून उठली होती. असहकाराचे अस्त्र पुकारले गेले. सत्याग्रह, मोर्चे, प्रभात फेऱ्या, रेल्वे रूळ तोडणे, टेलीफोनच्या तारा तोडणे असे अनेक मार्ग हाताळण्यात आले. इंग्रज राज्यकर्ते  धरपकड, गोळीबार, लाठीमार वगैरे अनेक तंत्राचा वापर करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न  करीत होते.

                          अशा तंग वातावरणात ब्रिटीश अधिकाऱ्याची शाळेला भेट होती. ‘सत्तेपुढे शहाणपण काय कामाचे!’ ब्रिटीश अधिकाऱ्याचे स्वागत करणे, संस्थेला प्राप्त होते.

                  दुसरे दिवशी ब्रिटीश अधिकाऱ्याचे लवाजम्यासह आगमन झाले. मिलिटरी स्कूल असल्यामुळे लष्करी पद्धतीने शिस्तीत स्वागत झाले. बॅंड पथकाच्या साथीने कवायत, राईडिंग, स्वीमिंग, शुटींग वगैरे उपक्रम क्रमाक्रमाने दाखविण्यात आले. नियोजनबद्ध कार्यक्रम पाहून पाहुण्यांच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते.

                       कार्यक्रम संपल्यावर सर्व विद्यार्थी असेंब्लीत एकत्रित झाले. व्यवस्थित युनिफॉर्ममधले शिस्तीत बसलेले विद्यार्थी, कार्यक्रमाची शोभा वाढवित होते. सर्वत्र शांतता होती.

                               मुख्याध्यापकांचे पाहुण्यांसमवेत व्यासपीठावर आगमन झाले. कार्यक्रमाची सुरुवात झाली. इतक्यात विद्यार्थ्यांमधून एक मोठा आवाज आला, ‘गांधीजी की जय।‘ समारंभाचा बेरंग झाला. ब्रिटीश अधिकारी रागाने लाल झाले. मुख्याध्यापक व अध्यापकवर्ग गोंधळून गेला. ताबडतोब कार्यक्रम आटोपता घेतला गेला.

                        संपूर्ण शाळा गोंधळून गेली. ‘ब्रिटीश सरकार काय निर्णय

घेईल ?’ मोठा प्रश्न निर्माण झाला. म्हणतात ना, ‘ज्याच्या हाती सत्ता, तो मारी लत्ता’.

                       त्यादिवशी तब्येत बरी नसल्यामुळे, ‘डॉक्टर मुंजे’ ह्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.अखिल भारताचे एक छोटेसे जिवंत प्रातिनिधिक चित्र असलेल्या ह्या शाळेची विद्यार्थी संख्या जेमेतेम १०० होती. काही वर्षे ही विद्यार्थी संख्या ६० - ६५ पर्यंत कमी होती.

                         देशाला स्वातंत्र्य मिळविण्याकरता व देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याकरिता, ऐन परकीय अंमलात १९३७ साली डॉक्टर बा. शी. मुंजे ह्या द्रष्ट्या नेत्याने ही शाळा नाशिक येथे स्थापन केली. ब्रिटीश सरकारचा अतिशय जाच असताना, डॉ मुंजेंनी ही शाळा एका विशिष्ट्य हेतूने काढली व चालविली. डॉक्टर साहेबांचे लक्ष्य भारतीय सैन्याचे भारतीयकरण करण्याकडे व तसेच अन्य सरकारी कारभारांत लागणाऱ्या अधिकाऱ्यांत योग्य असे भारतीय तरुण निर्माण करण्याकडे होते. त्या काळच्या लोकसभेत त्यांनी महनीय कामगिरी केली. त्यामुळेच ब्रिटीश सरकारलाही मनांतून इच्छा नसतानाही ह्या शाळेला परवानगी द्यावी लागली.

                    डॉक्टर साहेबांच्या कार्यप्रणालीत ‘शाळा व राजकारण’ ही दोन भिन्न गाठोडी होती. ते आपल्या भाषणांत सांगत असत, “मी माझे राजकारणाचे गाठोडे नाशिकरोड स्टेशनवर ठेवून शाळेत येतो व परत राजकीय कामासाठी जाताना, स्टेशनवरुनच ते गाठोडे उचलून नाशिक बाहेर जातो.” राजकारणाचा वारा न लागलेली शस्त्र व शास्त्र पूजक संस्था धर्मसंकटात पडली होती. डॉक्टरसाहेबांची झालेल्या प्रकारावर प्रतिक्रिया काय असेल?

                          शस्त्र सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे ‘डॉक्टर मुंजे’ तर अहिंसेचे पुजारी ‘गांधीजी’ दोघांचे राजकीय मार्ग भिन्न, परंतु ‘भारतीय स्वातंत्र्य मिळविणे’ हे एकच ध्येय.

                    डॉक्टर साहेबांनी त्या विद्यार्थ्याला बोलावून घेतले. बिछान्यावर झोपलेले डॉक्टरसाहेब त्या मुलाला म्हणाले, “तू तुझ्या वयाप्रमाणे योग्यच केले. मी तुझ्या वयाचा असतो तर हेच केले असते. परंतु एक लक्षात घे, ते इंग्रज अधिकारी आपल्या शाळेत पाहुणे म्हणून आले होते. आपली भारतीय संस्कृती सांगते, ‘अथिती देवो भव।‘ घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान करणे चूक आहे. जीवनांत पुन्हा अशी चूक करु नकोस.”

                       डॉक्टर साहेबांच्या खोलीतून तो रामदंडी विद्यार्थी एक नवीन धडा घेऊन बाहेर पडला. शाळा पूर्ववत चालू झाली. डॉक्टरसाहेबांनी प्रकरणावर पडदा कसा टाकला? हे कोणालाच समजले नाही.

                                ब्रिटीश सरकारच्या जाचाबरोबर, पराकोटीचा आर्थिक ताण सहन करीत असलेल्या भोसला शाळेने, अनेक भूमीगत स्वातंत्र्यसैनिकांना लपण्यासाठी आश्रय देऊन स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले.

                        इंग्रजी ‘कॅडेट’ शब्दास भारतीय प्रतिशब्द ‘रामदंडी’ वापरुन डॉक्टर मुंजेंनी ‘पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा आदर्श’ विद्यार्थ्यांसमोर ठेवला. भोसला मिलिटरी स्कूलच्या माजी रामदंडींनी भारतीय लष्कर, सरकारी विभाग, शिक्षण क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, वैद्यकीय व्यवसाय, शेती अशा विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाद्वारे डॉक्टर मुंजेचे सक्षम भारताचे स्वप्न साकारलेले आहे.
श्रीमती प्रभा आठवले

माजी शिक्षिका, ग. ग. हायस्कूल, नाशिक

Saturday, 9 September 2017

लोक (तडजोड ?) न्यायालय

                          आज दि. ९ सप्टेंबर २०१७ रोजी आम्हा माय-लेकींना लोक न्यायालयात एका प्रथितयश सेल्युलर कंपनीने आमंत्रण दिले. हे आमंत्रण लेखी नोटिसद्वारे का आले नाही? हे गुढ आम्हाला उलगडले नाही, परंतु मोबाईल फोनवर आलेल्या smsमुळे आमची स्वारी सर्व कागदपत्र-पुराव्यांसहित लोक न्यायालयात  दाखल झाली.
                              डिसेंबर २०११ मध्ये सदर कंपनीचे प्रतिनिधींनी  आमच्या एम. आय. डी. सी. ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या नेट सेटरची माहिती दिली. त्याकाळी असलेल्या डायल अप नेट कनेक्शनने जेरीस आलेल्या आम्हाला हा ‘नेट सेटर’ एक वरदान वाटला. वार्षिक वर्गणी (नेट सेटर सहित) रुपये ३०१०/= रोख व कागदपत्रांची पुर्तता करुन (दिनांक २० डिसेंबर २०११ रोजी पावती क्रमांक १०७) आम्ही नेट सेटर बुक केला. जानेवारी २०१२ पासून नेट सेटर कार्यन्वित झाला.
                                    दि. १४ जानेवारी २०१३ रोजी, सदर कंपनीच्या जानेवारीत आमच्या ऑफीसमध्ये आलेल्या प्रतिनिधीला मागील वर्षी प्रमाणे रुपये ३०१०/= रोख अॅडव्हान्स देऊन (पावती क्रमांक २९७३- नेट सेटर २०१३साठी) आम्ही निश्चिंत झालो.

                                      जुलै २०१३मध्ये कंपनीने वकिलाची नोटिस पाठवून थकबाकी रुपये ११६६/९६ ची मागणी केली. ह्या वकिलांना तसेच सदर कंपनीच्या पुणे ऑफिसला कुरीअरने पत्र पाठवून अॅडव्हान्स रुपये ३०१०/= च्या पावतीची झेरॉक्स पाठवली. ह्याचा परिणाम कंपनीने आमच्या नेट सेटरची सेवा बंद करुन, तुमची केस पुण्याच्या कोर्टात दाखल झाली आहे, वगैरे धमक्या देण्यास सुरवात केली. नासिकच्या नेट सेटरसाठी पुणे कोर्टाची गरज काय? त्याचे उत्तर कोर्टाचे समन्स आल्यावर कळेल, वगैरे दमदाटीवजा फोन.
                                   एका अर्थी कंपनीला अॅडव्हान्स पैसे देऊन आपण पाप केल्याची जाणीव मनाला त्रस्त करीत होती. ह्याच काळात दि. ५ ऑगस्ट २०१३ रोजी लोकसत्ता वर्तमानपत्रात ‘चुकीचे शुल्क आकारणाऱ्या मोबाईल नेटवर्क कंपनीला सहा हजारांचा दंड’ ही बातमी वाचनात आली.
                                    ‘कोर्ट कचेऱ्या करण्यापेक्षा उरलेल्या ६ महिन्यांच्या पैशावर पाणी सोडून द्यावे’  ह्या सुज्ञ विचाराने जग-रहाटी चालत असताना, अचानक १५ दिवसांपूर्वी मोबाईलवर ९ सप्टेंबर २०१७ च्या लोक-न्यायालयाचे आमंत्रण sms ने आले.
                                       नेट सेटरचे टोंगल तसेच दोन्ही वर्षांच्या ओरिजनल पावत्या पुरावा म्हणुन सादर केल्या,तरीही आम्हाला तडजोड करुन प्रकरण मिटवावे लागले. वास्तविक आमची ६ महिन्यांची अॅडव्हान्स रक्कम कंपनीकडे जमा असताना, झटपट तडजोड ह्या न्यायाने कंपनीशी बारगेनिंग करीत रुपये १६१४/१६च्या ऐवजी रुपये ७००/= त प्रकरण मिटले.
                         ‘लोक न्यायालयात न्याय मिळेल’ ह्या अपेक्षेने आलेल्या आम्हाला तडजोडीचा अन्याय सहन करावा लागला.
प्रभा आठवले, नाशिक
सेवानिवृत्त हायस्कूल शिक्षिका

Saturday, 24 June 2017

मायबोलीचे भुक्कड ४ :-

शिक्षणातील 3 G
                          ‘गणित विषय ऐच्छिक होऊ शकतो का?’ असा प्रश्न उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाला विचारल्याची चर्चा, सध्या वर्तमानपत्रातून वाचावयास मिळते. मनुष्य सुशिक्षित अथवा अडाणी असला तरी रोजच्या जीवनात गणिताची गरज पडत असते.
                              घरगुती प्लंबिंगच्या कामातील गणिताचे महत्त्व गृहिणीला समजले नाही तर होणारा गोंधळ मी पाहिलेला आहे. एक वकीलबाई प्लंबरकडून घरात काही सुधारणा करुन घेत होत्या. वकीलबाईंना ड्रेनेजसाठी लागणाऱ्या स्लोपचा खर्च प्लंबर सांगत होता. वकील असलेल्या गृहस्वामिनीला पाण्याच्या उताराचे गणित कळत नव्हते. त्यांना वाटत होते, ‘हा प्लंबर आपल्याला हिशोबात गुंडाळतोय. नाहक जास्त खर्च करायला लावतोय.’ हिशोबात झालेल्या कटकटीतून गृहस्वामिनी गरजल्या, “तुला माहित आहे का? मी वकील आहे!” प्लंबरसाहेबही इरेला पेटले ते म्हणाले, “तुम्ही वकील असाल तर मी प्लंबिंगमधला फौजदार आहे.” फौजदारसाहेब काम अर्धवट टाकून निघून गेले.
                              ह्या प्रसंगातील वकीलबाई हल्लीच्या शॉर्टकट अभ्यासक्रमानुसार १२वी नंतर डायरेक्ट वकील झालेल्या आहेत. पदवी शिक्षणात निरनिराळ्या विषयांची तोंड ओळख होत असल्याने, अमेरिकेत पदवी प्राप्त केल्यानंतर वकील, डॉक्टर, इंजीनिअर ह्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो.
                                आधुनिक जगाबरोबर आपला विद्यार्थी रहावा म्हणून १९७५साली १०+२ अभ्यासक्रमाद्वारे शिक्षणक्षेत्राने अमूलाग्र क्रांती केली. ह्या अभ्यासक्रमांत एक विषयात नापास होऊनही, पास करणारी ढकलगाडी बंद झाली. विविध विषयांच्या अभ्यासांत भर पडून, विद्यार्थ्याला भावी संगणकयुगासाठी सक्षम बनविण्याचे प्रयत्न झाले.
                                 १०+२ अभ्यासक्रमानुसार इयत्ता सातवीत ‘सेट थिअरी’ ह्या विषयाचा नव-गणितात समावेश झाला. ‘सेट थिअरीची जीवनांत गरज नाही. नाहक विद्यार्थ्यांवरचा बोज वाढविलेला आहे’, अशी घरा-घरांतील वडिलधाऱ्या  मंडळींची टीका-टिपण्णी आम्ही विद्यार्थ्यांनी ऐकली.
                              आमच्या ग. ग. शाळेतील पांगारकरबाई(छोट्या केळकरबाई), वैद्यबाई, डांगेबाई ह्या गणित- शास्त्र विभागाच्या  शिक्षकांनी  सेट थिअरी स्वतः शिकून आम्हाला अप्रतिम शिकवली. सेट थिअरीच्या बळावर संगणक क्षेत्रात क्रांती(Image Processing)होऊन आंतरिक्षक्षेत्र(चंद्र-मंगळमोहिम),तसेचआंतरजालक्षेत्र(Facebook,Whatsapp,Website)  विकसित झाले. आधुनिक तंत्रज्ञानाची फळे चाखणारी तसेच आधुनिक तंत्रज्ञानांत काम करणारी आमची पिढी, शालेय जीवनातील शिक्षकांची सदैव ऋणी आहे.
                    मध्यंतरी शाळेत जाण्याचा प्रसंग आला. मन विषण्ण झाले. आमच्या शाळेचे वैभव असलेली बाग, ‘संगीत- शिवण -होमसायन्स -ड्रांईंग हॉल; डबल बार, सिंगल बार इत्यादी खेळाची साधने; व्हॉलीबॉल तसेच खोखोचे मैदान ह्या गोष्टी अदृश्य कश्या झाल्या? मुख्य म्हणजे ब्रिटीशकालीन वारसा लाभलेला, आमच्या व्यक्तिमत्वाचा  अविभाज्य भाग असलेला, सेंट्रल हॉल कुठे गेला? काळाच्या ओघांत शाळेचे रुप बदलले. परंतु आमचे शिक्षक सेवानिवृत्तिनंतरही शाळेत येऊन ज्ञानदानाचे काम करीत आहेत, हे पाहून मन नतमस्तक झाले.
                                जिना चढून गेले तर शेलारबाईंनी प्रथम स्वागत केले. सेवा निवृत्तीनंतरही शेलारबाई विद्यार्थिनींचे नुकसान होऊ नये म्हणून शाळेत गणित-शास्त्र पूर्वीच्याच उत्साहाने शिकवीत होत्या. शाळेत झालेल्या गप्पांमधून समजले वैद्य बाई, गीतेबाईंची आई - अंजना वाघ बाई, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका म. न. पा. शाळा क्र. ११ (१९८२ साली आदर्श शिक्षिका - धर्माधिकारी पुरस्काराने सन्मानित) ह्यांच्या सारखे अनेक शिक्षक सेवानिवृत्तिनंतर शाळेत शिकविण्यास येत आहेत.
                             आमची ग. ग. ही सरकारी शाळा असताना, शिक्षकांची वानवा का? सरकारी शाळा असल्यामुळे, आमच्या शाळेला निधीची कमतरता कधीच भासली नाही. २०व्या शतकांत प्रशिक्षित शिक्षकांसहित, शाळेचे रुप सदैव अत्याधुनिक होते. त्या काळात ‘शाळेसाठी देणगी किंवा पालक सभा’ ह्या गोष्टींचा जन्म झाला नव्हता. शाळेची फी इयत्ता ५वीला नाममात्र रुपये ५/= होती. दरवर्षी आठ आणे फी (५० पैसे) फी वाढायची. शिक्षकांच्या पाल्यांना फी माफ नव्हती. आमचे शिक्षक एक पैसा ही जास्त न घेता शनिवार-रविवार तसेच इतर वारी जास्त वेळ शिकवायचे. कोणतीही फी न आकरता, आमची स्कॉलरशिप,  टिळक-महाराष्ट्र विद्यापीठ(गणित, इंग्रजी), हिंदी विशारद तसेच ड्रॉईंगच्या परिक्षांची तयारी करुन घेत असत. ग. ग. हायस्कूलचा ह्या परिक्षांमधील निकाल अत्युत्तम लागायचा. शाळा बाह्य विश्वातील ह्या विविध परिक्षांमुळे आम्हा विद्यार्थिनींचे गणित तसेच इंग्रजी  व्याकरण खूप पक्के झाले.
                              आमच्या शाळेत अभ्यासाबरोबर खेळ, नाट्य, संगीत,  शिवण इत्यादी क्षेत्रातील गुणी विद्यार्थिनींना खूप प्रोत्साहन नेहमी मिळत असे.
१९७५साली महाराष्ट्र बोर्डाची शेवटची ११वी मॅट्रिकची परिक्षा झाली. ११वी मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना  ‘गणित’ विषय सोडून मॅट्रिक पास होण्याची सवलत होती. गणितात कच्च्या असणाऱ्या मुलींना गणित विषय मिळाला नाही की, दरवर्षी शाळेत थोडा गोंधळ व्हायचा. काही पालक आपल्या मुलींना दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या गावी पाठवून मॅट्रिक करवून घ्यायचे. काही विद्यार्थिनी धुसफुसत गणित विषय सोडून, मॅट्रिक परिक्षा पास व्हायच्या. कला शाखेत जाऊन B.A. करणाऱ्या ह्या मुलींना पुढील जीवनांत  नोकरीचे दरवाजे बंद व्हायचे. गणिताविना भविष्यातील अंधकाराच्या भितीने ह्या मुली बिथरायच्या. एकदा ह्या सर्व परिस्थितीचा उद्रेक झाला. चिडलेल्या काही विद्यार्थिनींनी वर्गातील शिक्षकांच्या टेबल खुर्चीला खाज-कुइली लावली होती. शिस्तप्रिय शाळेच्या इतिहासाने एक कटू प्रसंग अनुभविला.
                      १९८०पर्यंत नाशिकमधील शिक्षणक्षेत्रांत अग्रगण्य असलेल्या ग. ग. शाळेतील विद्यार्थिनींचे आई-वडील सुशिक्षित सुस्थापित मध्यमवर्गातील होते.   ह्या पालकांमध्ये आपल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्याची कुवत होती.
                                 २१व्या शतकात ग. ग. तसेच इतर मराठी माध्यमाच्या शाळांचे चित्र बदलेले आहे. ह्या शाळांमध्ये  येणाऱ्या विद्यार्थिनींचे पालक पोटाला चिमटा देवून आपल्या कन्येचे भविष्य घडत आहेत. शिक्षणाचा गंध नसणाऱ्या पालक पिढीला गणिताचे भविष्यातील महत्त्व कळणार नाही. शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थी जीवनाचे कधीही भरुन न निघणारे नुकसान होत आहे. गणिताचा बागुलबुवा  दूर झाल्यास, सध्याचा विद्यार्थी सहज पदवीधारक होईल. अशा प्रकारे प्राप्त झालेली पदवी स्वतःचे पोट भरु शकत नाही, हे समजल्यावर वेळ हातातून निघून गेलेली असेल. त्यावेळी बेकार असलेल्या तरुणाईचा उद्रेक झाल्यास,समाज धुरिणांचे हताश उद्गार (कविवर्य बा भ बोरकरांच्या शब्दसामर्थ्याचा आधार) ऐकावयास मिळतील   
उभ्या जगाचे अश्रू  पुसाया
जरी आपुले हात उणे
तरी समुद्रायणी प्रमाणे
पोसू तटिची म्लान तृणे
हे भीषण भविष्य टाळण्यासाठी आमच्या ग. ग .हायस्कूल, नाशिक  सारख्या सर्व मराठी माध्यमाच्या शाळांना समाजाने तसेच सरकारने गतवैभव प्राप्त करुन द्यावे.     प्रशिक्षित गुरुजनांद्वारे ह्या शाळांचा विद्यार्थी घडविल्यास, तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण-गंगा पोहोचेल.
सर्व शिक्षण अभियानाद्वारे भावी पिढ्यांच्या शिक्षणातील 3G  (गणिताची गणिती गरज) भागवावी, ही न्याय-देवतेला प्रार्थना.
अनुप्रभा नाशिक


संदर्भ :-
दिव्यमराठी बातमी दिनांक २० ज़ून २०१७ (पान क्रमांक ७, नासिक सिटी)

लोकसत्ता :- दिनांक २१ जून २०१७
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ‘कांचनसंध्या’ कवितेतील चौथे  कडवे
उभ्या जगाचे अश्रू  पुसाया
जरी आपुले हात उणे
तरी समुद्रायणी प्रमाणे
पोसू तटिची म्लान तृणे
* भुक्कड = निरुद्योगी बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )

Saturday, 17 December 2016

राजद्वारे स्मशाने च यः तिष्ठति स बान्धवः।


उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रुसंकटे ।
राजद्वारे स्मशाने च यः तिष्ठति स बान्धवः ॥१-१२॥ --- चाणक्यनीतिः

 [अर्थ :- उत्सवप्रसंगी, संकटात, दुष्काळात, शत्रूपासून धोका उत्पन्न झाला असता, राजाच्या दरबारात; एवढेच नव्हे, तर स्मशानातसुद्धा जो आपल्यामागे उभा राहतो, तोच खरा आप्त.]  


                          आर्य चाणक्याचे वर्णन सार्थ ठरविणारी ‘आठवले – करंदीकर’ ही मैत्र-जोडी दि. ११ डिसेंबर २०१६ रोजी, बापूसाहेब  करंदीकरांना देवाज्ञा होऊन, काळाच्या पडद्याआड गेली.
                 नियतीने दोघाही मित्रांच्या गमनाची तारीख ११ नेमून ह्या ‘एकरुप मैत्रीची’ आठवण करुन दिली. ह्या दोन मित्रांच्या जोडीतील प्राध्यापक रा. द. आठवले दि. ११ जुलै १९९५ रोजी इहलोक सोडून गेले. भावी आयुष्यात, प्राध्यापक मनोहर रघुनाथ (बापूसाहेब) करंदीकरांनी मैत्रीचा घेतलेला वसा सोडला नाही. आठवले नसल्यामुळे ‘आठवलेच्या घरी सर्व व्यवस्थित चालले आहे ना !’ हे पहाण्यासाठी ते मुद्दाम नाशिकला येऊन ३-४ दिवस रहात असत. अन्यथा हल्लीच्या तांत्रिकयुगात फोनवर खुशाली कळाली की काम भागते !

                      नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये  ‘आठवले – करंदीकर’ मैत्रीचा अंकूर रुजला. इयत्ता ५ वी ते ११ वी हे दोघे मित्र ‘डॉक्टर बा. शि. मुंजे’ ह्या उतुंग व्यक्तिमत्वाच्या छायेखाली लहानाचे मोठे झाले. वसतीगृहांत रहाणारी ही मुले आपोआप शाळा  - कुटुंबाचे सदस्य झाली.
                       ही मुले भोसलात शिकत असताना पारतंत्र्यातील भारत देश महात्मा गांधींच्या ‘चले जाव’ घोषणेने पेटून उठलेला होता. शाळेत मधून मधून भूमीगत स्वातंत्र्यसैनिकांचा शोध घेण्यासाठी पोलीस पार्टी येत असे. शाळेत मुलांच्या कानावर थोडी कुजबूज पडत असे. परंतु शाळेत लपलेला भूमीगत ह्या कानाचे त्या कानाला कळू न देता सुखरुप ठिकाणी रवाना झालेला असे. ‘हे भूमीगत लोक कोण आहेत ?, शाळेत कुठे रहातात ?’, ह्याविषयी मुलांना काहीच कळत नसे. डॉ. मुंजे स्वतः हिंदू महासभेचे मोठे नेते असूनही, त्यांनी मुलांचे भावविश्व सुरक्षित जपले. डॉक्टर मुंजे ह्या द्रष्ट्याच्या मते विद्यार्थ्यांची ही पिढी स्वतंत्र भारताची पायाभरणी करणार आहे. त्यामुळे ही पिढी सैनिकी शिक्षणासहित सक्षम झाली पाहिजे. ते स्वतः भाषणात सांगत, “मी नाशिक-रोड स्टेशनवर माझे राजकारणाचे गाठोडे ठेवून देतो व शाळेचे गाठोडे घेऊन शाळेत येतो. परत जाताना गाठोड्यांची अदलाबदल करुन राजकारणाचे गाठोडे घेऊन, नाशिक-रोड स्टेशनवरुन नाशिक बाहेर जातो.” मुले जशी राजकीय विश्वापासून दूर होती, तसेच शाळेत रहाणारे भूमीगत स्वातंत्र्यसैनिक  सर्व पक्षांचे होते.

               बाळ आठवले व बापू करंदीकर दोघेही एका वर्गातील सरळ मार्गी, हुशार विद्यार्थी परंतु दोघांमध्ये  स्पर्धेची भावना कधीच न डोक्यावल्याने, त्यांची  मैत्री निर्भेळ राहिली. दोघांचे स्वभाव मुलतः विरुद्ध. करंदीकर अतिशय वक्तशीर;   गरज पडली तर १८ तास काम करणारे आठवले स्वभावतः आळशी. करंदीकर अतिशय मितभाषी तर आठवलेचा ‘गप्पा मारणे म्हणजे जीवनातील प्राणवायू’. दोघा मित्रांमध्ये एका बाबतीत किंचित साम्य होते. एखादी गोष्ट पटली नाही किंवा काही कोणाशी काही मतभेद झाले तर दोघेही वाद घालणार नाहीत, भांडण करणार नाहीत. निषेधाची अभिव्यक्ती मात्र भिन्न होत असे. करंदीकर मिश्किल हांसून व्यक्त होत तर आठवले आपले मत एकदा मांडून बाजूला होई.
                       मित्र मंडळींमधील गप्पामधून एका वरच्या वर्गातील मित्राकडून बालचमुला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती मिळाली. ‘शाखेवर चांगले संस्कार होतात’, वगैरे गोष्टींमुळे मुलांची उत्सुकता ताणली गेली. सिनिअर मित्रांबरोबर बालचमुही शाळेबाहेर भरणाऱ्या एका शाखेवर जाऊ लागला. एके दिवशी संघ शाखेवर वाजविलेली बॅण्डची धून ‘प्राचीन भारतीय’ असल्याचे बौद्धिक कोणीतरी घेतले. आठवले स्वतः उत्कृष्ट वादक असल्याने, त्याने उभे राहून सांगितले, “ही प्रसिद्ध जॉर्जिया धून आहे. तुम्ही आत्ता त्या धूनचा थोडा भाग वाजवून दाखविला आहे. मला संपूर्ण धून वाजविता येते. मी ती तुम्हाला वाजवून दाखवितो.” आठवलेचे सांगणे  शाखा चालकांना पटले नसावे. आठवलेने संघ शाखेत जाणे बंद केले. करंदीकरांनी मात्र ‘सच्चा संघ स्वयंसेवक कसा असतो?’ हे स्वतः भावी जीवनांत दाखवून दिले. बालविश्वात  संघाची कल्पना रुजविणारा, वरच्या वर्गातील मित्र, भावी जीवनांत इंदिरा गांधींचा विश्वासू सहकारी झाला. स्वकर्तुत्वाने ही व्यक्ती केंद्रिय राजकारणात आदरणीय झाली.
                           शालेय जीवनाची सांगता करणाऱ्या ११वी मॅट्रिकच्या परिक्षेच्या १५ दिवस आधी आठवलेचे वडील हार्ट अॅटॅकने वारले. ‘वर्ष वाया जाऊ नये’ म्हणून आठवलेने परीक्षा दिली. दोघेही मित्र उत्तम मार्कांनी पास झाले.
                        पुढील शिक्षणासाठी दोघाही मित्रांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात  B.Sc. साठी प्रवेश घेतला. डेक्कन जिमखान्यावरील बंगल्यातील एक खोली करंदीकर कुटुंबाने मुलाच्या मित्राला दिली.  ह्या खोलीने दोघांच्या मैत्रीतील वीण घट्ट केली. बापूसाहेबांची आई (कै. बाई करंदीकर) प्राध्यापक आठवलेंना नेहमी म्हणायच्या, “आठवले, तुमची खोली शुभ ठरली. तुमच्यानंतर, ह्या खोलीत राहिलेला प्रत्येक विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊन आम्हाला खूप समाधान देणारा ठरला.”
                              १९४८ साली संघावर आलेल्या बंदीत बापूसाहेब करंदीकर डिसेंबर ते जुलै असा ९ महिन्यांचा कारावास भोगून परत आले. घरी परतल्यावर त्यांनी अर्धवट राहिलेले  B.Sc. पूर्ण केले. रसायन शास्त्रात  M.Sc. ही पदवी संपादन करुन, ते संघ प्रचारक झाले. प्रांत संघ चालक स्व. बाबाराव भिडे यांनी त्यांना मराठवाड्यात संघ कार्यासाठी पाठविले.
                             इयत्ता पाचवी पासून सुरु झालेला दोघा मित्रांचा जीवन- प्रवाह अलग झाला. आठवले नाशिकच्या H.P.T. कॉलेजमध्ये पदार्थविज्ञानाचे   Demonstrator म्हणून रुजू झाले. जालन्याच्या J.E.S. कॉलेजमध्ये करंदीकरांनी रसायनशास्त्राचे अध्यापन सुरु केले.  बापूसाहेबांच्या माता-पित्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे आठवलेच्या गृहस्थाश्रमाच्या प्रवेशास शुभार्शिवाद दिले.  
                      मराठवाड्यात रसायनशास्त्र अध्यापन करीत असताना, स्वतःचे कुटुंब सांभाळून बापूसाहेबांनी संघ कार्याची पायाभरणी केली. करंदीकरांचे रात्रंदिवस संघ कार्याचे असितधारा व्रत  सुरु झाले. राजसत्ता विरोधात असल्याने अनेक संकटांचा न डगमगता सामना करावा लागत असे.
                          मराठवाड्यातील गावागावांमध्ये विज्ञान प्रसाराचे कार्य करीत असताना, प्राध्यापक करंदीकरांनी संघाच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या. अनेक वर्षे ते जालना जिल्हा संघचालक होते. जालन्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडीत बापूसाहेबांचे मोठे योगदान आहे. जालना जिल्ह्यातील पाणी प्रश्न तसेच सार्वजनिक स्वच्छता अभियान प्राध्यापक करंदीकरांनी यशस्वीपणे राबविले.
                           इसवी सन १९७५ साली आणीबाणीत मिसा कायद्यांतर्गत  बापूसाहेब करंदीकर नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये १९ महिने स्थानबद्ध होते. प्राध्यापक आठवले नित्यनियमाने करंदीकर व त्यांच्या सहकाऱ्यांना भेटायला जात असत. आठवलेसरांना ओळखणाऱ्या एका जेलच्या अधिकाऱ्याने   सांगितले, “सर, इथे भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद होत असते व ही नोंद रोज वरती पाठवली जाते.” आठवले सर म्हणाले, “मला ह्या  नोंदीची पर्वा नाही.” आणीबाणीचे काळे पर्व संपले. बापूसाहेब परत आपल्या समाज साधनेत व्यग्र झाले.
                             मार्च २०१२ साली अचानक आठवलेंच्या घरी बापूसाहेबांचा फोन आला. “माझ्या नागरी सत्काराला तुम्ही दोघी मायलेकींनी उपस्थित रहावे,अशी माझी इच्छा आहे.” बापूसाहेबांच्या समाजसेवेचा, जालना रहिवाशांनी केलेला नागरी सत्कार ‘न भूतो न भविष्यति’ असा होता. अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रमांत, सर्व प्रथम बापूसाहेबांचा जीवनपट (Video)दाखविला. सर्व पक्षीय तसेच सर्व धर्मीय लोक अहमहिकेने स्टेजवर बापूसाहेबांचा सत्कार करताना दिसत होते.
                        जालना नागरी समितीच्या वतीने बापूसाहेबांना रु. १ लाख ११ हजार १११ रुपयांची थैली अर्पण केली. ह्या निगर्वी संघ साधकाने (बापूसाहेब करंदीकर) तेवढेच स्वतःचे पैसे त्या थैलीत घालून समितीला देणगी दिली.   ‘देणगीचा विनियोग जालना गावासाठी आवश्यक असलेल्या योजनेत  करावा. ”, असे सांगून बापूसाहेबांनी स्वतःच्या निस्पृहतेचे दर्शन जगाला दिले.
                       संघ कार्य करताना सर्व नागरिकांचा एक संघ बनविणाऱ्या बापूसाहेब करंदीकर ह्या जगन्मित्राला शतशः प्रणाम।
अनुप्रभा, नाशिक
www.shrigurucharitra.com