Showing posts with label हितगुज. Show all posts
Showing posts with label हितगुज. Show all posts

Thursday, 26 July 2018

व्रतस्थ (बालवाडी) गुरु : श्रीमती आक्का लेले


                                 “वैनी, का रडवता लेकीला ? काय म्हणते?” हा आवाज कानी पडताच मी मागे वळून पाहिले. आक्का लेले मला विचारत होत्या. मी रोजच्या सारखी माझ्या मुलीची समजूत घालत होते. मी म्हणाले, “अहो काय करायच? तिला इतर मुलांसारखे शाळेत जायचे! ही मुलगी २॥ वर्षांची. हिला शाळेत कोण घेणार? माझा हा रोजचा परिपाठ आहे, तिची समजूत घालणे.” त्या लगेच म्हणाल्या, “मी घेऊन जाईन की तिला शाळेत. मी शाळेतच चालले आहे.” मी त्यांना म्हणाले, “अहो, तिला धड चालता येत नाही.” त्या म्हणाल्या, “त्यात काय ! मी तिला कडेवर घेईन.” लगेच आमचे कन्यारत्न खूष. पाटी- पेन्सिल, दप्तर, डबा वगैरे आयुधांसह सज्ज.

                                    रोज आक्का तिला घेऊन शाळेत जाऊ लागल्या आणि तिला शाळेची गोडी लागली. आपण ऐकतो की, मुले शाळेत जाताना रडतात, हटून बसतात, ऐन शाळेच्या वेळी त्यांच्या पोटांत दुखते, कधीतरी डोके दुखते म्हणतात. पण मला मात्र असा अनुभव कधीच आला नाही, ह्याचे कारण शाळेची गोडी लावणाऱ्या आमच्या ‘आक्का लेले’. इतकी वर्षे लोटली. माझ्या मुलीचे (अनुराधाचे) शिक्षण संपून ती आपल्या व्यवसायांत रमली.
                                           आक्कांची माझी बऱ्याच वर्षांत भेट-गाठ नाही. पण अधून-मधून त्या माझ्या मनांत डोकवतात. त्यांचा विचार जरी माझ्या मनांत आला की, माझ्या मनःचक्षूसमोर त्यांची ठेंगणी- ठुसकी, सावळी, नीटनेटकी साधी व स्वच्छ सुती नऊ वारी पातळ नेसलेली, केसांचा अंबाडा घातलेली मुर्ति उभी रहाते. खर सांगायचे तर त्यांचे पूर्ण नाव ही त्याकाळात कुणाला माहित नव्हते. ‘त्यांचे शिक्षण किती झाले आहे ?’ हा प्रश्नही आमच्या मनात येत नसे. एवढेच माहित होते की त्या विधवा आहेत व राणी भवनमध्ये लहान मुलांना शिकवितात. त्या त्यांच्या दोन भावांमध्ये रहातात. त्यांचे भाऊही फार सज्जन व सरळमार्गी होते. बहिण-भावांचे नाते अतुट कसे असावे ? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे लेले कुटुंब. आक्का तशा अबोल होत्या. कोणाशी मैत्रीचे संबंध त्यांनी जोडले नाहीत, पण कोणाशी वाद-विवाद केले नाहीत. स्वतःच्या दोन भावजयींशी त्या जुळवून घेत. त्या दोघी जावा आक्कांना मानाने वागवत असत. त्यांच्या घरांतून कोणाचे चढलेले आवाजही कधी ऐकू आले नाहीत. आक्का म्हणजे शांत सागर.

                             रोज सकाळी १०:४५  वाजता त्या शाळेत जावयास निघत त्यांच्या बरोबर आजूबाजूचा परिसरातली ४-५ छोटी मुले असत. त्यांत माझी मुलगी. एकवेळ घड्याळ चुकेल पण आक्कांची शाळेत जायची वेळ मात्र ठराविक. त्यांच्या जाण्या-येण्यावरुन लोक आपली घड्याळे लावत असत. ‘आपल काम बर की आपण बरे’ हे आक्कांच्या जीवनाचे तत्त्व असावे.

                                 आक्का जन्मजात शिक्षक होत्या. मुलांचे ‘मानसशास्त्र’ हा शब्द त्यांना माहितही नसेल, पण प्रत्यक्ष कृतीतून त्यांचे बालमानसशास्त्रावर आधारित अध्यापन दिसत असे. हसत-खेळत अध्यापन हा त्यांच्या अध्यापनाचा केंद्रबिंदू होता. मुलांना त्या अभिनयासह गाणी शिकवत, गोष्टी सांगत, श्लोक शिकवित, विविध खेळ शिकवित असत. अशा अनेक उपक्रमांतून मुलांवर चांगले संस्कार करण्याचे कार्य त्या करित असत. हल्लीच्या अभ्यासक्रमातून पाठांतर नाहीसे झालेले आहे. पाठांतरातून मुलांचे शब्दोच्चार सुधारतात, स्मरणशक्ती वाढते, शब्दसंपत्ती वाढते, ह्याची त्यांना जाणीव होती. हल्ली शिक्षकांचा समाजातर्फे, शासनाद्वारे ‘आदर्श शिक्षक’ म्हणून सत्कार होतो. मला वाटते त्या काळी ही प्रथा नव्हती. आक्कांचा शासनातर्फे समाजाकडून सत्कार न होऊ देत, पण त्यांच्या सहवासांत आलेल्या विद्यार्थ्यांच्या इतकेच नव्हे तर पालकांच्या मनात त्यांनी मानाचे स्थान पटकाविले आहे.

                                विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण झाल्यावर; त्या अक्षर-ओळख,अंक-लेखन शिकवित असत. तसेच मुलांची पहिलीच्या अभ्यासक्रमाची तयारी आक्का करुन घेत असत. त्याकाळी जु. स. रुंग्ठा हायस्कूलच्या आदर्श प्राथमिक शाळेत ह्या मुलांची पहिलीची परिक्षा घेतली जायची. स्वतः आक्का विद्यार्थ्यांना रांगेने नेऊन ह्या परिक्षेला बसवत असत. माझ्या मुलीचे शिक्षण ह्याच तऱ्हेने झाले. तिच्या वर्गातली सर्व मुले-मुली १लीची पास होऊन नव्या शाळेतील दुसरीत गेली. आम्हा पालकांना कोणताच त्रास झाला नाही.

                                  हल्ली आपण पहातो, शाळेत प्रवेशासाठी पालकांना किती खटपटी लटपटी कराव्या लागतात. काही ठिकाणी पालकांचे इंटरव्ह्यू, त्यानंतर डोनेशन त्यात वशिलेबाजी ---- ह्या सर्व चक्रातून फिरल्यावर बालकाचा नंबर लागून शाळा-प्रवेश. ‘मूल जन्माला येण्याआधी शाळेत प्रवेश घेऊन ठेवावा’, हा विनोदही सध्या प्रसिद्ध आहे.

                               माझ्यामते शिक्षक जन्माला यावा लागतो.कोणालाही शिक्षक होता येत नाही. शिकविणे ही कला आहे. ही कला ज्याला आत्मसात करता येते, तोच खरा शिक्षक. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या आक्का लेले.

पुष्कळवेळा वाटते, भारतात उत्तम शिक्षक निर्माण झाले तरच अभिमानाने म्हणू शकू भारत माझा महान.

श्रीमती प्रभा आठवले

माजी शिक्षिका, ग. ग. हायस्कूल, नाशिक

Saturday, 9 September 2017

लोक (तडजोड ?) न्यायालय

                          आज दि. ९ सप्टेंबर २०१७ रोजी आम्हा माय-लेकींना लोक न्यायालयात एका प्रथितयश सेल्युलर कंपनीने आमंत्रण दिले. हे आमंत्रण लेखी नोटिसद्वारे का आले नाही? हे गुढ आम्हाला उलगडले नाही, परंतु मोबाईल फोनवर आलेल्या smsमुळे आमची स्वारी सर्व कागदपत्र-पुराव्यांसहित लोक न्यायालयात  दाखल झाली.
                              डिसेंबर २०११ मध्ये सदर कंपनीचे प्रतिनिधींनी  आमच्या एम. आय. डी. सी. ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या नेट सेटरची माहिती दिली. त्याकाळी असलेल्या डायल अप नेट कनेक्शनने जेरीस आलेल्या आम्हाला हा ‘नेट सेटर’ एक वरदान वाटला. वार्षिक वर्गणी (नेट सेटर सहित) रुपये ३०१०/= रोख व कागदपत्रांची पुर्तता करुन (दिनांक २० डिसेंबर २०११ रोजी पावती क्रमांक १०७) आम्ही नेट सेटर बुक केला. जानेवारी २०१२ पासून नेट सेटर कार्यन्वित झाला.
                                    दि. १४ जानेवारी २०१३ रोजी, सदर कंपनीच्या जानेवारीत आमच्या ऑफीसमध्ये आलेल्या प्रतिनिधीला मागील वर्षी प्रमाणे रुपये ३०१०/= रोख अॅडव्हान्स देऊन (पावती क्रमांक २९७३- नेट सेटर २०१३साठी) आम्ही निश्चिंत झालो.

                                      जुलै २०१३मध्ये कंपनीने वकिलाची नोटिस पाठवून थकबाकी रुपये ११६६/९६ ची मागणी केली. ह्या वकिलांना तसेच सदर कंपनीच्या पुणे ऑफिसला कुरीअरने पत्र पाठवून अॅडव्हान्स रुपये ३०१०/= च्या पावतीची झेरॉक्स पाठवली. ह्याचा परिणाम कंपनीने आमच्या नेट सेटरची सेवा बंद करुन, तुमची केस पुण्याच्या कोर्टात दाखल झाली आहे, वगैरे धमक्या देण्यास सुरवात केली. नासिकच्या नेट सेटरसाठी पुणे कोर्टाची गरज काय? त्याचे उत्तर कोर्टाचे समन्स आल्यावर कळेल, वगैरे दमदाटीवजा फोन.
                                   एका अर्थी कंपनीला अॅडव्हान्स पैसे देऊन आपण पाप केल्याची जाणीव मनाला त्रस्त करीत होती. ह्याच काळात दि. ५ ऑगस्ट २०१३ रोजी लोकसत्ता वर्तमानपत्रात ‘चुकीचे शुल्क आकारणाऱ्या मोबाईल नेटवर्क कंपनीला सहा हजारांचा दंड’ ही बातमी वाचनात आली.
                                    ‘कोर्ट कचेऱ्या करण्यापेक्षा उरलेल्या ६ महिन्यांच्या पैशावर पाणी सोडून द्यावे’  ह्या सुज्ञ विचाराने जग-रहाटी चालत असताना, अचानक १५ दिवसांपूर्वी मोबाईलवर ९ सप्टेंबर २०१७ च्या लोक-न्यायालयाचे आमंत्रण sms ने आले.
                                       नेट सेटरचे टोंगल तसेच दोन्ही वर्षांच्या ओरिजनल पावत्या पुरावा म्हणुन सादर केल्या,तरीही आम्हाला तडजोड करुन प्रकरण मिटवावे लागले. वास्तविक आमची ६ महिन्यांची अॅडव्हान्स रक्कम कंपनीकडे जमा असताना, झटपट तडजोड ह्या न्यायाने कंपनीशी बारगेनिंग करीत रुपये १६१४/१६च्या ऐवजी रुपये ७००/= त प्रकरण मिटले.
                         ‘लोक न्यायालयात न्याय मिळेल’ ह्या अपेक्षेने आलेल्या आम्हाला तडजोडीचा अन्याय सहन करावा लागला.
प्रभा आठवले, नाशिक
सेवानिवृत्त हायस्कूल शिक्षिका

Tuesday, 15 August 2017

देशाचे गाणे : आज / ७५ वर्षांपूर्वी*

( आज -स्वतंत्र भारत  )
धाव धाव गा, भारतीय जनता   (गा = अहो)
करील बा साह्य, भारत-माता॥ धृ॥

आग लागली ह्या देशाला
स्वस्थ कसे हो तुम्ही बसला
चला जलदी विझवायला
अवधी नसे ह्या कार्याला॥ १॥
                                धाव धाव गा,----- ॥ धृ॥
देशसेवेला बहुत लागले
राजकारणी जाऊन पडले
कठीण समयी ते नच अडले
भ्रष्ट नीतीने तयांना सोडविले॥ २॥
                               धाव धाव गा,----- ॥ धृ॥
आज पेरिले बीज अर्थक्रातींचे
नमो दावती ब्रीद प्रगतीचे
पाश तोडूनी कृष्ण पैश्याचे
व्यवहार व्हावे  धवल धनाचे॥ ३॥
                                     धाव धाव गा,----- ॥ धृ॥
भुलू नका त्या गारुडाला
परदेशीच्या भूलभूल्लयाला
जुलुमी अशा चिनी सत्तेला
सत्य जाणूनी घेरा तयाला॥४॥
                                  धाव धाव गा,----- ॥ धृ॥
करावी मुक्त ही क्षिती
संपवूनि दहशतवादी नीती
एकनिष्ठ पुत्र भारताचे
भोगिती फल महासत्तेचे ॥ ५॥
                                  धाव धाव गा,----- ॥ धृ॥
अनुप्रभा, नाशिक
www.shrigurucharitra.com
------------------------------------------------------------------ 
*        संदर्भ :-
सुमारे ७५ वर्षांपूर्वी (पारतंत्र्यातील भारत)
देशाचे गाणे
(चाल  - तारी प्रभो महाराष्ट्राला)
धाव धाव त्वरे धाव ईशा ।
करी बा साह्य ह्या क्षणी देशा॥धृ॥

आग लागली देशाला।
स्वस्थ कसे हो तुम्ही बसला।
चला जलदी विझवायाला।
अवधी नसे ह्या कार्याला॥ १॥
                            धाव धाव त्वरे --- ॥धृ॥
देशसेवेला बहूत लागले।
कारागृही जाऊन पडले।
कठीण समयी ते नच खचले।
लाठ्यांचे ते हल्ले सोशीयले॥२॥
                                धाव धाव त्वरे --- ॥धृ॥   
आधी लोकमान्य टिळकांचे।
ब्रीद दावा स्वातंत्र्याचे।
पाश तोडा भूमातेचे।
नाम जपा गांधीजींचे॥ ३॥
                                    धाव धाव त्वरे --- ॥धृ॥
भुलू नका गारुड्याला।
परदेशाच्या मोहाला।
जुलमी अशा इंग्रजाला।
सत्य लढूनी घेरा त्याला॥४॥
                               धाव धाव त्वरे --- ॥धृ॥
करी मुक्त गांधीजींना।
प्रभू यश देई त्यांना।
एकनिष्ठ सत्यतेचे।
फल देई स्वातंत्र्याचे॥ ५॥
                               धाव धाव त्वरे --- ॥धृ॥
कै. राधाबाई आठवले, नाशिक

Sunday, 23 July 2017

मायबोलीचे भुक्कड ६

३ कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
 म्हाइंभट (तेरावे शतक) :  मराठीतील पहिले चरित्रकार महानुभाव पंथाचे प्रवर्तक. महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी. चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्याने अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लिहिला. नंतर ‘गोविंदप्रभूचरित्र’ही लिहिले. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाजजीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने ‘लीळाचरित्र’ हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे.
               कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही, हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ सांगितलेला आहे. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे हे, प्रस्तुत लीळेतून पटवून दिले आहे.
---------------------------------------------------------------------------------
              डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उद्याचे मातीकाम होत होतेः ते सी बाजत होतेः तेणे भक्तीजनासी व्यापार होववे नाः आन भट व्यापार करु लागले नाथोबाय म्हणीतलें:  नागदेयाः तू कैसा काही हिंवसी ना तवं भटी म्हणीतलें:  आम्ही वैरागीः काइसीया हिवुः यावर सर्वज्ञे म्हणीतलें: वानरेयाः पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडेः हाही एकू विकारुचि कीं गाः यावरि भटी म्हणीतलें: जी जीः निर्विकार तो कवणः सर्वज्ञें म्हणीतलें वानरेयाः पोर जीव वीकारावेगळा केव्हळाही जालाचि नाहीः मा तु काई वेगळा अससिः हो कां जीः यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त निरोपिलाः कव्हणी एकू कठीया असे भोगस्थानाची सुश्रुषा करीः झाडीः सडा संमार्जन करीः ते देखौनि गावीचे म्हणतिः कठीये नीके करीत असा बरवे करीत असाः ते आईकौनि दीसवडीचा दीसवडी हात हात चढवीः तयासि देवता आपुले फळ नेदीः तयासि कीर्तीचेचि फळ झालेः
लीळाचरित्र उत्तरार्ध : एकांक लीळा क्र. १२०
संपादक – प्रा. पुरुषोत्तम नागपुरे
शब्दार्थ :-
ग्राम =गाव
ठायी = समोर
उद्या = सकाळी
ते= तेव्हा
सी = थंडी
तेणे =त्यामुळे
व्यापार = काम
आन = आणि / परंतु
वैरागी = तपश्चर्या करणारे
काइसीया = कशाला
वानरेया = माकडा
सर्वज्ञ = स्वामी
गा = अहो
कव्हणी= कोणी
सुश्रुषा =  सेवा
कठीया = मंदिराचा पुजारी
निका= चांगला
बरवा = सुंदर
भोगस्थान =दैवतस्थान
दीसवडीचा दीसवडी= रोजच्या रोज
हात हात चढवीः = काम वाढवू लागला
नेदणे = न देणे

भाषांतर :-
         डोमगावी स्वामींच्या समोर सकाळच्या वेळी मातीकाम (बागकाम वगैरे) होत होते. तेव्हा थंडी वाजत होती, त्यामुळे भक्तजनांना काम करता येत नव्हते. परंतु भट (नागदेवाचार्य) काम करत होते. नागोबाए (भक्ताचे नाव),” नागदेवा, तुला थंडी कशी वाजत नाही ? (तुला थंडी वाजत नाही का?) तेव्हा नागदेवाचार्य म्हणाले, “आम्ही तपश्चर्या करणारे, आम्हाला थंडी कशी वाजेल?”  यावर स्वामी म्हणाले, “भटो, वानरेया (कौतुकाने माकडा) स्वतंत्र जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. अहो, हा सुद्धा एक विकारच आहे.” यावर भट नागदेवाचार्य म्हणाले, “जी जी (स्वामी स्वामी) असा कोण आहे ? ज्याला विकारच नाही.” स्वामी म्हणाले, “भटा, वानरेया (कौतुकाने माकडा) स्वतंत्र जीव हा विकारापासून वेगळा नाही मग तू काय वेगळा आहेस ? “ “हो का?” असे भट म्हणाले. यावर स्वामींनी प्रसिद्धी हवी असणाऱ्या मंदिराच्या पुजाऱ्याचा दृष्टान्त सांगितला. कोणी (कोणी  एके काळी) एक पुजारी होता. तो दैवतस्थानाची (देवतेची) सेवा करी, झाडी (मंदिर झाडायचा), सडा रांगोळी करायचा. ते बघून गावातले म्हणायचे, “पुजारी चांगले काम करीत आहे. सुंदर करीत आहे.” हे ऐकून रोजच्या रोज तो पुजारी काम वाढवू लागला. त्याला (पुजाऱ्याला) देवता आपुले फळ देत नाही. कीर्ती हेच त्याचे फळ झाले.
{ तात्पर्य :- लोकांनी वाहवा केल्यामुळे, मंदिराच्या पुजाऱ्याने आपले काम वाढविले. पूजा करण्यामागचा मुख्य हेतू (मोक्ष मिळविण्याचा)बाजूला राहिला. लोकांनी केलेली वाहवा वाढत गेली म्हणजे पुजाऱ्याला फक्त कीर्ती - प्रसिद्धी मिळत गेली.}
स्वाध्याय : -
प्रश्न १ कोणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा
१ वानरेया - नागदेवाचार्य
२ सर्वज्ञ - स्वामी
३ गोसावी - स्वामी
प्रश्न २ आकृती पूर्ण करा
स्तुतीप्रिय
कठीयाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये
मोक्ष मार्गाचे (ज्ञानमार्गाचे)   
प्रश्न ३  : प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोणतेही काम करु नये.
प्रश्न ४ : पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा
कठीया = पुजारी
सी = थंडी
काइसीया = कशाला
कव्हणी = कोणी
                  इयत्ता ९वीच्या पाठ्य पुस्तकातील धड्याचे भाषांतर, महानुभावपंथीय गुरु आदरणीय डोळसकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. अमोल गेटे (मराठी साहित्याचे गाढे अभ्यासाक) ह्यांनी करुन दिले. श्री. डोळसकर बाबांना दंडवत तसेच श्री. अमोल गुटेसाहेबांना  मनःपूर्वक  धन्यवाद.
                   तेराव्या शतकातील चक्रधर स्वामींचे लीळा चरित्र हा मराठी भाषेतील आद्य चरित्र ग्रंथ.  लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, श्रीगुरुचरित्र, तुकाराम गाथा, दासबोध अशा अनेक प्राचीन ग्रंथातील ग्रंथभांडार शालेय शिक्षणात समाविष्ट करताना, कठीण शब्दांचे शब्दार्थ धड्याखाली दिल्यास, शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना समजणे सोपे होईल.
                      मराठी साहित्याच्या ग्रंथ भांडार तसेच इतिहासातील शिवशाही त्याच्या मूळ अर्थासकट- उद्देशांसकट नवीन पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शिवशाहीचे स्वप्न साकारण्याकरिता, सांगावेसे (भुक्कड*६)वाटते,
शिकण्या येतील लेक बालके
तीच लेकरे जाण सखे
जरीपटक्याचे दिवस आणण्या जगी
तयाची आण मायबोलीच्या मुखे

समाप्त
अनुप्रभा, नाशिक

संदर्भ:-
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ‘कांचनसंध्या’ कवितेतील  शेवटचे (६वे) कडवे
शिणुनी येती गुरें-पाखरें 
तीच लेकरें जाण सखे,

दिवस जरेचे आले जरी 
त्या काठ जरीचा लावू सुखें...!

* भुक्कड = निरुद्योगी बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )

॥ जय श्री गुरुदेवदत्त॥