Thursday, 26 July 2018

व्रतस्थ (बालवाडी) गुरु : श्रीमती आक्का लेले


                                 वैनी, का रडवता लेकीला ? काय म्हणते?” हा आवाज कानी पडताच मी मागे वळून पाहिले. आक्का लेले मला विचारत होत्या. मी रोजच्या सारखी माझ्या मुलीची समजूत घालत होते. मी म्हणाले, “अहो काय करायच? तिला इतर मुलांसारखे शाळेत जायचे! ही मुलगी २॥ वर्षांची. हिला शाळेत कोण घेणार? माझा हा रोजचा परिपाठ आहे, तिची समजूत घालणे.” त्या लगेच म्हणाल्या, “मी घेऊन जाईन की तिला शाळेत. मी शाळेतच चालले आहे.” मी त्यांना म्हणाले, “अहो, तिला धड चालता येत नाही.” त्या म्हणाल्या, “त्यात काय ! मी तिला कडेवर घेईन.” लगेच आमचे कन्यारत्न खूष. पाटी- पेन्सिल, दप्तर, डबा वगैरे आयुधांसह सज्ज.

                                    रोज आक्का तिला घेऊन शाळेत जाऊ लागल्या आणि तिला शाळेची गोडी लागली. आपण ऐकतो की, मुले शाळेत जाताना रडतात, हटून बसतात, ऐन शाळेच्या वेळी त्यांच्या पोटांत दुखते, कधीतरी डोके दुखते म्हणतात. पण मला मात्र असा अनुव कधीच आला नाही, ह्याचे कारण शाळेची गोडी लावणाऱ्या आमच्या आक्का लेले’. इतकी वर्षे लोटली. माझ्या मुलीचे (अनुराधाचे) शिक्षण संपून ती आपल्या व्यवसायांत रमली.
                                           आक्कांची माझी बऱ्याच वर्षांत भेट-गाठ नाही. पण अधू-धून त्या माझ्या मनांत डोकवतात. त्यांचा विचार जरी माझ्या मनांत आला की, माझ्या मनःचक्षूसमोर त्यांची ठेंगणी- ठुसकी, सावळी, नीटनेटकी साधी व स्वच्छ सुती नऊ वारी पातळ नेसलेली, केसांचा अंबाडा घातलेली मुर्ति उभी रहाते. खर सांगायचे तर त्यांचे पूर्ण नाव ही त्याकाळात कुणाला माहित नव्हते. ‘त्यांचे शिक्षण किती झाले आहे ?’ हा प्रश्नही आमच्या मनात येत नसे. एवढेच माहित होते की त्या विवा आहेत व राणी वनमध्ये लहान मुलांना शिकवितात. त्या त्यांच्या दोन भावांमध्ये रहातात. त्यांचे भाऊही फार सज्जन व सरळमार्गी होते. हिण-भावांचे नाते अतुट कसे असावे ? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे लेले कुटुंब. आक्का तशा अबोल होत्या. कोणाशी मैत्रीचे संबंध त्यांनी जोडले नाहीत, पण कोणाशी वाद-विवाद केले नाहीत. स्वतःच्या दोन भावजयींशी त्या जुळवून घेत. त्या दोघी जावा आक्कांना मानाने वागवत असत. त्यांच्या घरांतून कोणाचे चढलेले आवाजही कधी ऐकू आले नाहीत. आक्का म्हणजे शांत सागर.

                             रोज सकाळी १०:४५  वाजता त्या शाळेत जावयास निघत त्यांच्या बरोबर आजूबाजूचा परिसरातली ४-५ छोटी मुले असत. त्यांत माझी मुलगी. एकवेळ घड्याळ चुकेल पण आक्कांची शाळेत जायची वेळ मात्र ठराविक. त्यांच्या जाण्या-येण्यावरुन लोक आपली घड्याळे लावत असत. ‘आपल काम बर की आपण रेहे आक्कांच्या जीवनाचे तत्त्व असावे.

                                 आक्का जन्मजात शिक्षक होत्या. मुलांचे मानसशास्त्रहा शब्द त्यांना माहितही नसेल, पण प्रत्यक्ष कृतीतून त्यांचे बालमानसशास्त्रावर आधारित अध्यापन दिसत असे. हसत-खेळत अध्यापन हा त्यांच्या अध्यापनाचा केंद्रबिंदू होता. मुलांना त्या अभिनयासह गाणी शिकवत, गोष्टी सांगत, श्लोक शिकवित, विवि खेळ शिकवित असत. अशा अनेक उपक्रमांतून मुलांवर चांगले संस्कार करण्याचे कार्य त्या करित असत. हल्लीच्या अभ्यासक्रमातून पाठांतर नाहीसे झालेले आहे. पाठांतरातून मुलांचे शब्दोच्चार सुधारतात, स्मरणशक्ती वाढते, शब्दसंपत्ती वाढते, ह्याची त्यांना जाणीव होती. हल्ली शिक्षकांचा समाजातर्फे, शासनाद्वारे आदर्श शिक्षकम्हणून सत्कार होतो. मला वाटते त्या काळी ही प्रथा नव्हती. आक्कांचा शासनातर्फे समाजाकडून सत्कार न होऊ देत, पण त्यांच्या सहवासांत आलेल्या विद्यार्थ्यांच्या इतकेच नव्हे तर पालकांच्या मनात त्यांनी मानाचे स्थान पटकाविले आहे.

                                विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण झाल्यावर; त्या अक्षर-ओळख,अंक-लेखन शिकवित असत. तसेच मुलांची पहिलीच्या अभ्यासक्रमाची तयारी आक्का करुन घेत असत. त्याकाळी जु. . रुंग्ठा हायस्कूलच्या आदर्श प्राथमिक शाळेत ह्या मुलांची पहिलीची परिक्षा घेतली जायची. स्वतः आक्का विद्यार्थ्यांना रांगेने नेऊन ह्या परिक्षेला बसवत असत. माझ्या मुलीचे शिक्षण ह्याच तऱ्हेने झाले. तिच्या वर्गातली सर्व मुले-मुली १लीची पास होऊन नव्या शाळेतील दुसरीत गेली. आम्हा पालकांना कोणताच त्रास झाला नाही.

                                  हल्ली आपण पहातो, शाळेत प्रवेशासाठी पालकांना किती खटपटी लटपटी कराव्या लागतात. काही ठिकाणी पालकांचे इंटरव्ह्यू, त्यानंतर डोनेशन त्यात वशिलेबाजी ---- ह्या सर्व चक्रातून फिरल्यावर बालकाचा नंबर लागून शाळा-प्रवेश. ‘मूल जन्माला येण्याआधी शाळेत प्रवेश घेऊन ठेवावा’, हा विनोदही सध्या प्रसिद्ध आहे.

                               माझ्यामते शिक्षक जन्माला यावा लागतो.कोणालाही शिक्षक होता येत नाही. शिकविणे ही कला आहे. ही कला ज्याला आत्मसात करता येते, तोच खरा शिक्षक. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या आक्का लेले.

पुष्कळवेळा वाटते, भारतात उत्तम शिक्षक निर्माण झाले तरच अभिमानाने म्हणू शकू भारत माझा महान.

श्रीमती प्रभा आठवले

माजी शिक्षिका, . . हायस्कूल, नाशिक

No comments:

Post a Comment