Showing posts with label प्रार्थना. Show all posts
Showing posts with label प्रार्थना. Show all posts

Saturday, 2 July 2016

काळाराम मंदीर दर्शन - काव्य चित्र ---- दिनांक : रामनवमी, १९२५


(चाल  :-  ‘गोपीनाथा आले’ या गाण्याप्रमाणे)  
मंदबुद्धी स्तवू आता वर्णवेना तुजला
राघवा रे, तुझे चरणी मनू माझा वेधला
घनःश्याम तुझा महिमा त्रिभूवनी गाजला
नको नको अंत पाहू प्रकाशावे मतीला॥धृ॥

जाऊन पाहू आता पंचवटीच्या रामाला
शामसुंदर मूर्ती उभी सीतेसह शोभला
महाद्वारी दास मारुती उभा ठाकला
दक्षिणेस गणपती सव्यभागी बैसला
उत्तरेसी दत्तात्रेय आशीष देत राहिला
पूर्व पुण्याई आजी दर्शन लाभ जाहला॥ १॥
मंदबुद्धी स्तवू आता -----                ॥धृ॥

रचना नक्षीदार कोरीव असे मंदीराला
सुवर्ण कळस लकलकीत झळके शिखराला
चहूबाजूनी ओवऱ्या बांधल्या यात्रेकरु मुक्कामाला
वैकुंठची भूलोकी अवतरले वाटते मनाला
प्रसन्न वदने शांत चित्ते वंदिते प्रभूरामाला
कृपादृष्टीविना अन्य नको वरदान मजला॥२॥
मंदबुद्धी स्तवू  आता -----------         ॥धृ॥
 
प्रातःकाळी नरनारी येती त्वरे काकड्याला
स्तुतिस्तोत्रे म्हणूनी आळविती राघवला
मुखमार्जन सारुनी प्रक्षाळीती चरणाला
नानापरीचे पोशाख घालीती शोभतसे रामाला
परोपरीची पक्वाने अर्पिती रामचंद्रा नैवेद्याला ॥३॥
मंदबुद्धी स्तवू  आता ----------                ॥धृ॥ 

चैत्रमासी शुक्लपक्षी उत्सवात सर्व दंग
मंडपात नित्यनेम होत असे किर्तन रंग
लहान थोर यात्रेकरु समवेत घडतसे सत्संग
नवमी दिवशी जन्मोत्सवी आनंदोत्सव पाहिला
स्त्री पुरुषांची दाटी सभा मंडप भरला॥४॥
मंदबुद्धी स्तवू आता   -----------         ॥धृ॥  

चौऱ्या छत्रचामरे दिसताती चहूबाजूला
विविध हंड्या झुंबराची शोभा दिसे मंदिराला
परब्रह्म पहाताची पुष्पे गुलाल वाहिला
हळदीकुंकवाची घाई सुंठवडा प्रसाद दिधला
वाजंत्री वाजताती नाद न मावे गगनाला॥५॥
मंदबुद्धी स्तवू आता ---------            ॥धृ॥  

पारण्याला दशमीस येती सर्व भोजनाला
चारी वर्ण तृप्त होऊनी आत्माराम तोषविला
पुण्यकाल एकादशीसी सभारंभ पाहिला
रामसीता गर्जनाने मिरविती रथाला
पालखीचा थाट मोठा नादध्वनी गाजला॥६॥
मंदबुद्धी स्तवू आता -----------          ॥धृ॥

चौऱ्याऐंशी फिरता बा जीव बहूत शिणला
रामनाम वदे वाणी, दोष जाती लयाला
रामनाम ऐकूनीया, हर्ष मनी जाहला
अज्ञान भ्रांती छेदूनिया, पावन करी देहाला
निरंतर तवपदी ठेवी, या भक्त राधेला॥७॥
 मंदबुद्धी स्तवू आता  ----------         ॥धृ॥

                                 ----   कै. राधाबाई  आठवले


                       माझे आजी-आजोबा (कै. राधाबाई व कै. दत्तात्रय आठवले) हे इसवी सन १९२५ साली रामनवमी उत्सवासाठी नासिकला कारवार, कर्नाटक येथून  आले होते.  फक्त ६ महिने शालेय जीवनाची ओळख झालेल्या, माझ्या आजीचे शिक्षण पोथ्या पुराणे वाचता येण्यापूरते मर्यादित होते. स्वतःच्या काव्यरचना तिला दुसऱ्याकडून लिहून घ्याव्या लागत.
             त्या देवभोळ्या मनाने रामदर्शन घेत असताना तत्कालिन (१९२५ साल) रामनवमी वातावरणाचे केलेले अचूक वर्णन !

                          अनुराधा आठवले (घाणेकर),नासिक

Friday, 24 June 2016

गवळण

गोपीनाथा आले आले, सोडूनिया काम रे
वृंदावनी वाजविसी वेणू जरा थांब रे ॥धृ॥
यमुनाबाई वाहे स्थिर। नादे लुब्धला समीर।
हालवेना तरुवर पुष्पे फळे पान रे॥ १॥
एक गोपी म्हणे, “माझ्या घरी आले पाहुणे
बहिणीचे पति माझे होती, सखे मेहुणे
स्वयंपाक करुनिया येता झाले, श्रम रे”॥२॥
एक गोपी म्हणे, “माझी सासू बहु तापट
कुंजवनी येत होते, मारुनिया करी पीठ
आता कैसी येऊं देवा, भजते तुझे नाम रे”॥ ३॥
एक गोपी म्हणे, “देवा मुरली नादे रंगली
तिच्या नादे आज माझी पतिसेवा भंगली
विडा करितां करितां आले, सुटला भाळी घाम रे”॥ ४॥
एक नारी माळीयाची जात होती सासरी
अवचित मुरलीचा नाद भरे अंतरी
द्राक्ष, केळी, अननस, उंबर, जांब रे॥ ५॥
वेडावल्या वेदशृती, खुंटे अनंताची मती

तेथे कृष्णाबाई किती चरणी घनःश्याम रे ऽ॥ ६॥

Tuesday, 21 June 2016

प्रातः उपासना


म्हणे नंदप्रिया उठ हरि लवलाही। नभी भास्कर उदया येई॥
बघ गोठणची वत्से हंबरती गाई२ पयप्राशनाची त्या घाई।
घे पात्र करी धार काढी कृष्णा ही। मग धेनु चराया नेई।
दहीभाताची संगे शिदोरी घेई। हरि मुरली वाजवित जाई।
गोवर्धन अचल धरा रे, विमलार्जुन मुक्त करा रे।
हे तुजसाठी गोप पातले पाही। कशी निद्रा आली तुजला ही ----॥ १॥
घे श्रीरंगा काठी कांबळी काळा। घाली वैजयंती वनमाळा।
आज उशीर किती झाला तुजसी बाळा। नेस पितांबर हा पिवळा।
पदी वहाणा त्या घाली शीघ्र घननिळा। घे दांडूचेंडू गोपाळा।
हा समीर मंदगती वाहे। द्विज किलबील करीती  वाहे।
हरिपाठक उठले गा हे। रवीय  उपासी अर्ध्यदान तो देई।
झाली रक्त पूर्व दिशाही। म्हणे नंदप्रिया --॥ २॥
या गोपींनी घुसळण घुसळूनी बा रे।जाती यमुना जळ आणण्या रे।
बहु गडवडीने जाती विप्र स्नानारे। गुरुशिष्य पढ ती वेदा रे।
या मार्गाने कापडी जाती यात्रे। मनमोहना उघडी नेत्रे।
ही गवळण ही गवळण राधा द्वारी। आली शोभे बहु शृंगारी।
हे ऐकून उठे गिरीधारी। म्हणे कोठे ती कोठे राधा, आई।
मन रमले कृष्णापाई। म्हणे नंदप्रिया उठ हरि लवलाही। नभी -----

शब्दार्थ :-
धेनु= गाय  
पय= दूध
कापडी = खांद्यावर कावड घे ऊन तीर्थयात्रा करीत फिरणारा मनुष्य

Monday, 21 December 2015

‘गीता साद घाली मना’


काहीतरी करायचे आहे, वाटे एक जाणीव ।
स्वकर्मी भासू नये, वाटतसे कोणतीच उणीव ॥
जन्म, काल, वेळ, कुळ नसे आपुल्या स्वाधीन ।
म्हणून म्हणती मानव जन्म असे केवळ पराधीन ॥
जन्म समयी लाभे मातेस मातृत्व, पित्यास पितृत्व  ।
तव अस्तित्वासाठी जपावे, सदैव तू सत्व॥
ईशदर्शन प्राप्तीचे साधन म्हणूनी करीशी भक्ती ।
ईश हा नसे दृश्य पण ती असे अचाट शक्ती ॥
पूजाअर्चाद्वारे न मागणे काही देवापाशी ।
म्हणून म्हणती ‘न मागे तयाची रमा होय दासी’ ॥
पूजा अर्चा उपासनेतून साधते मनाची एकाग्रता ।
स्वकर्मातून मिळते खचित मनाची नम्रता ॥
एकाग्री मन सांगे, सार चंचलता दूर दूर ।
मग जीवन मार्गी न राहील, कोणतीच हूरहूर ॥
दैनंदिन  आचार-विचार उच्चारातून प्रगटे स्वकर्म  ।
संस्काराचे शिंपण होता, स्वकर्म बने स्वधर्म ॥
धर्म दावितो सन्मार्गी समाजधारणा – प्रवृत्ती ।
समाजधारणेतून उत्कटते सामाजिक प्रवृत्ती ॥
धर्माचे थोतांड माजवून नको पोसू अहम् ।
सत्कर्म करुनी वर म्हणावे ‘इदं न मम’  ॥
नवससायातून ठेवू नये कधी अंधश्रद्धा ।
मनःशांतीस्तव सत्कर्मी ठेवावी अढळ श्रद्धा ॥
स्वधर्मातून पोसतो वाढतो स्व आवडीचा छंद ।
स्वकर्मातून लाभे सदैव अविरत नवनिर्मिती आनंद ॥
स्वकर्मे धरु नये, मनी फलाची आशा ।
असफल कर्मातून पदरी पडते, घोर निराशा  ॥
निराशेतून मनी भीषण उद्विग्नता प्राप्त होते ।
बदलता वातावरणी रुप होत्याचे नव्हते होते ॥
प्रयत्ने रगडिता वाळूचे तेलही गळे ।
सत्कर्मी लाभती सफलतेची फळे ॥
फलाशेतून स्वकर्माची निष्टा भंग पावते  ।
लाभासाठी चंचल मन अखंड धावते ॥
कुरुक्षेत्री महाभारत घडले कुटुंबकलहापायी ।
भाऊ बंदकीतून वैराची ठिणगी फुलते ठायी ठायी ॥
कलहसमयी समेट करण्या पुढे धावला भगवंत ।
सार्वभौम सत्तेची नशा, सत्तेस करी नाशिवंत ॥
भगवंत बोले, अर्जुनाशी “धरी रे शस्त्र हाती” ।
क्षात्रतेज जपण्या, विसर रक्ताची नाती ॥
आठव तुझा रणांगणी पराक्रमी गत इतिहास ।
आसक्तीपायी भ्याडमनी नको, स्वीकारु उपहास ॥
जगा त्रासूनी लोक स्वीकारती संन्यासधर्म ।
सर्वसंग परित्यागातून न सुटे कदापि स्वधर्म ॥
वनवासी अन्न –वस्त्र - निवारा गरजा न सुटती  ।
स्वरक्षणार्थ रानी भयभित चित्ती अनेक वाटा फुटती ॥
संन्यास नसून भासे हे निव्वळ संन्यास सोंग ।
आत्मवंचना का करतोस ? ही फसवी सोंग ढोंग ॥
प्रपंच करावा नेटका राहून प्रपंची ।
विरक्तीच्या गप्पा, करु नको पोपटपंची ॥
सावंतामाळी प्रपंची फुलवितो भाजीचा मळा ।
स्वकर्मातून नामस्मरणाचा गातो सुस्वर गळा ॥
नामयाची जनी अखंड करीते, कांडण- दळण ।
स्वकर्मातून नामस्मरणी लाविते, इंद्रिया- वळण ॥
स्वकर्म संपता ज्ञानदेव जाहले समाधीस्त ।
जन म्हणती जाहला ज्ञानसूर्याचा अस्त ॥
अस्त नसे हा स्वकर्मपूर्तीचा दिव्य संदेश ।
संदेश ह्या विश्वात व्यापून रहावा हाच आदेश ॥
मातृपितृ सेवेत गढला, पुंडलिक धुंद – दंग ।
प्रसन्न वदनी उभा ठाकला, वीटेवरी पांडूरंग ॥
गीतावचने सांगती, स्वकर्मयोगाची महती अगणित ।
स्वकर्मातून जीवनी सुटावे, जीवनाचे अवघड गणित ॥
धर्म कल्पना गाते, निव्वळ मानवतेची कवन ।
मानवधर्म एक, पण अनेक पंथ उद् घोषती संतवचन ॥
व्यक्ती व्यक्ती गणिक समाजी दिसे स्वधर्म अनेक  ।
सदाचार सोडून सत्तांध -मदांध वागती सोडून विवेक ॥
पैसा - पैसा करुनी जमविती अगणित मालमता  ।
मालमता हव्यासापोटी लाथाडती नीतिमत्ता ॥
लोकशाहीसाठी भल्या मारती लंब्या  बाता ।
सत्ता प्राप्त होता मारती मत्त गर्दभापरी लाथा ॥
मतासाठी केविलवाणे वदूनी होती सर्व लीन ।
स्वार्थासाठी सत्तांध बनूनी करीती जनता हीन – दीन ॥
ही नव्हे लोकशाही ही तर भासे हुकुमशाही ।
अनिर्बंध सत्तेसाठी बने ही पुरी घराणेशाही ॥
युद्धभूमी नव्हे ही तर कर्मभूमी बोले, श्रीकृष्ण परमात्मा ।
मनःशांतीस्तव रातंदिन तळमळे हरएक आत्मा  ॥
नको वाचन भगवद् गीता, नको करु नुसते पाठांतर  ।
संस्कारित कर्मापासून जीवात्म्याला दे ऊ नको अंतर ॥
गीता सांगे देह क्षणभंगूर असे आत्मा अमर ।
देहासक्तीपायी का उगीच माजवितो सदैव समर ॥
                       -----------प्रभा आठवले, नासिक


संदर्भ :- http://bhagawad-geeta.com/

Thursday, 28 May 2015

मनःशांती देणारी अनुभवसिद्ध 'श्रीगुरुचरित्र प्रार्थना'


 www.shrigurucharitra.com वरील प्रसारित श्रीगुरुचरित्र प्रार्थना लिंक
श्रवणिका (Audio MP 3 file)

श्रवणाक्षरी (Video MP4 file)

http://www.shrigurucharitra.com/amrutdhwani/prarthana.mp4



श्रीगुरुचरित्र प्रार्थनेतील प्रत्येक ओवीच्या आद्याक्षरातून निर्मित श्रीगुरु जयघोष :-
॥श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय॥
॥भीमा अमरजा संगमनिवासी राजाधिराज श्री गुरू महाराज की जय॥

॥अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त॥

                                                                       ॥श्रीगुरुदेवदत्त॥              

Saturday, 16 May 2015

श्रीशनि जयंती : प्रश्नांकित शुभेच्छा

शनि शिंगणापूरी मनी वसती अनंत भाव
जनी म्हणती “ह्याला जीवन ऐसे नाव”॥ १॥

जन म्हणती शनिवार ‘शनि’ चा वार
कर्म न करता टाकती मजवरी भार॥ २ ॥

जीवनी अघटीत घडता म्हणती शनिचा कोप
स्वचूकांवर पांघरुण घालूनी चढवती मज टोप॥ ३॥

गावामधल्या भव्य दगडा नाव दिले ‘शनी’
देवत्व अर्पिले पण भयभीत झाले मनी॥ ४॥

एकामागून असंख्य येऊनी करती नतमस्तक
हीच क्रिया अखंड चालू राहील शतकानुशतक॥ ५॥

दगडामधून साकारले दिले मज भव्य देवत्व
वेड्या जीवा, का तू पहातोस मम सत्त्व॥ ६॥

नावडे मज बंदिस्त हे असे जीवनी पारतंत्र्य
चराचरांतून व्यापता मज मिळे अमर्याद स्वातंत्र्य॥ ७॥

देव समजूनी मजवरी वर्षाव असे तेल सुमनाचा
कर्मकांडापायी जीवनी विचार का न करी सु-मनांचा॥ ८॥

माते पोटी जन्म माझा गमे मम नारी श्रेष्ठ
जनमानसी मानती पूजाविधीत पुरुष तो ज्येष्ठ॥ ९॥

भारतीय घटने बहाल केली स्त्री-पुरुष समता
मग मम पूजाविधीत का दिसते विषमता॥ १०॥

मम माता भगिनी हस्ती असे कोमल स्पर्श
पूजाअर्चासमयी का मानिती तो अस्पर्श॥ ११॥

कुकर्म करुनी कर जोडोनी धाव घेती दर्शनी
मज म्हणती,”धाव पाव रे बाप्पा तू शनी”॥ १२॥

पूजा-पाठ स्नाने करुनी होशील का तू शुर्चिभूत
विचारी मना, खरोखरच आहेस का मनी तू शुर्चिभूत॥ १३॥

ऐक गड्या, सांगतो तूज मनीची एक गोष्ट
राग नको मानू मित्रा, बोलतो जरी मी स्पष्ट॥ १४॥

पूजा अर्चा आरतीतून मनी मिळे तूज शांती
नको देऊ थारा कुविचारा, मग मिळे मनःशांती॥ १५॥

नको पाहू वळूनी मागे, चाल तू पुढेपुढे
जीवनी अखंड गिरव, तू माणुसकीचे धडे॥ १६॥

मानवता आणि विश्वबंधुता तत्वे थोर महान
ह्यातून भागेल तव ईश दर्शनाची तहान॥ १७ ॥

वेळ संपला जाऊन बसतो त्या पाषाण सिंहासनी
मम अस्तित्वाचा दैनंदिनी विचार कर तू मनोमनी॥ १८॥

दि. २६ मार्च २००६

Saturday, 22 February 2014

पूर्वजांनी दिलेला सगुण विविध मूर्तिंचा अमूल्य ठेवा (भाग २ )


सगुण मूर्ति : संकल्पना (भाग २ )
 श्रीगणेश प्रार्थना :                                                           ॥श्रीगणेशाय नमः॥
चिंता नुरे हरतसे मनु देह ताप।
विद्येमुळे मिळतसे यश अमाप॥
भजा हो तुम्ही ‘विद्याधरदेव’ देवा।
याचीतसें तव पदीं दृढ ज्ञान ठेवा॥
या प्रार्थनेतील,
चिंता नुरे हरतसे मनु देह ताप।
चिंता नुरे म्हणजे चिंता न उरे, हरतसे म्हणजे नाश होणे, मनु म्हणजे माणसाचे देह- ताप problems.
ह्याचा अर्थ चिंता उरली नाही तर माणसाच्या शरीराचे त्रास संपतील.
आपल्याला माहित आहे की चिंता मनाबरोबर शरीराला पोखरते. मधुमेह, रक्तदाब अगदी साधे सर्दी, पडसे इत्यादी पाहुणे त्या शरीरात प्रवेश करतात. शरीराच्या घरात मन रहात असल्याने ते एकमेकांना बांधलेले असतात. मनाची चिंता शरीर बिघडविते तर शारीरिक व्याधी मन पोखरते. अशा वेळेला डॉक्टर बरोबर देवाकडेही धाव घेतो.
श्रीगणपतिला चिंतामणि म्हणजे चिंता दूर करणारा  म्हणतात.
 मुद् गल पुराणात ‘चिंतामणि’ ह्या श्रीगणेशाच्या नावाची व्याख्या दिलेली आहे.
चिंतामणि ह्या शब्दाची व्याख्या सांगताना, मनाच्या ५ बिघडलेल्या अवस्था सांगितलेल्या आहेत : -
१) बर्हिमुख व्यक्ती - बाहेरच्या जगाचा विचार करणारी व्यक्ती
२) जास्त बर्हिमुख व्यक्ती  - बाहेरच्या जगाचाच विचार करताना पापाच्या मार्गाकडे जाऊ
    शकते.
३) अंतर्मुख व्यक्ती  हिला   विक्षिप्त म्हटले आहे.
४) जास्त अंतर्मुख व्यक्ती हिला  एकाग्र म्हटलेले आहे.
५) निष्क्रीय मन ह्याला निरुद्ध म्हटलेले आहे.
मनाच्या ह्या पाचही स्थिती ज्ञानाच्या सहाय्याने नष्ट करतो व  मनाला शांती देतो तो चिंतामणि.
                     आपल्याला रोजच्या जीवनात माझा पहिला नंबर येऊ दे, बॉस चांगला वागू दे अशा तात्कालिक चिंता असतात व त्यांचे उत्तरही आपल्या रोजच्या वागणुकीत, कामात दडलेले असते. ते उत्तर मिळवायचा प्रयत्न न करता आपण नाहक चिंताग्रस्त होतो  व देवाकडे धाव घेतो.
               ह्या ठिकाणी आपल्याला मानसिक आधार निश्चित मिळत असेलही परंतु सर्वप्रथम संतुलित मन रहाण्यासाठी मनाला अंतर्मुख किंवा बहिर्मुख होण्यापासून थांबवायला पाहिजे.
              मनाला ज्ञानाच्या सहाय्याने संतुलित ठेवता येते.  ‘ज्ञान’ ह्या शब्दाचा अर्थ जाणीव, विषयाचे आकलन, माहिती, ब्रह्मज्ञान असा आहे.
 श्रीगणेशाला १४ विद्यांचा स्वामी म्हणतात.  
१४ विद्या = ४ वेद  +  ६ वेदांगे –(शिक्षा ,कल्प,  ज्योतिष , निरुक्त ,छंद आणि व्याकरण )
                 + ४ उपांगे – (पुराणे , मीमांसा ,न्यायशास्त्र व धर्मशास्त्र)    
चिंतामणि आपल्याला संदेश देतो : -
विद्याभ्यासातून मिळणाऱ्या ज्ञानाच्या सहाय्याने मन संतुलित राखता येते. मनःशांती  ही संतुलित मनाने प्राप्त होते.
दि. २२ फेब्रुवारी २०१४                                                                           क्रमशः
(संदर्भ ग्रंथ : What is the implied meaning of the many Names of Lord Ganapati?
                   By Hindu Janjagruti Samiti)



Friday, 14 February 2014

पूर्वजांनी दिलेला सगुण विविध मूर्तिंचा अमूल्य ठेवा

सगुण मूर्ति : रुप (भाग १)                                                              
॥श्रीगणेशाय नमः॥
चिंता नुरे हरतसे मनु देह ताप।
विद्येमुळे मिळतसे यश अमाप॥
भजा हो तुम्ही ‘विद्याधरदेव’ देवा।
याचीतसें तव पदीं दृढ ‘ज्ञान’ ठेवा॥
                                नुकतीच दि. ३ फेब्रुवारी २०१४ रोजी (माघ शुद्ध चतुर्थी) आपण ‘श्रीगणेश जयंती’ साजरी केली.आपल्या लाडक्या गणपतिबाप्पाकडे आपण ज्ञानाचा ठेवा मागितला. श्रीगणेशाला ‘विद्याधर’ विद्येची देवता म्हणतात.  श्रीगणेशाची मूर्ति खरोखरच ज्ञानदेवतेची  वैशिष्ट्ये दर्शविते का? ते पाहू या.
श्रीगणपतीच्या पायाशी असलेला उंदीर :-
गणपति मूर्तिच्या पायाशी त्याचे वाहन छोटासा उंदीर आहे.  उंदीर हा प्राणी छोटा असला तरी कुरतडून शेतीतील धान्याचा नाश करतो. थोडासा अहंकार कुरडून तुमच्यातील ज्ञानाचा नाश करत असतो. ही गणपतिची मूर्ति सांगते, ‘ज्ञान मिळविताना प्रथम अहंकाररुपी उंदीरावर आरुढ व्हा म्हणजे मनातील अहंकारावर मात करा’.
जानवे : साप
ह्या मूर्तिचे जानवे साप आहे. साप उंदीराचा शत्रू - उंदीर नष्ट करणारा असल्याने शेतकऱ्याचा मित्र.   तुमच्यातील अहंकार दूर करणारे मित्र, ज्ञान साधनेत तुमच्या बरोबर असावेत म्हणजे ज्ञानरुपी शेतीचे रक्षण होईल.

देह माणसाचा व मुख सर्वात बुद्धिमान प्राणी हत्तीचे :-
ह्या मूर्तिचा देह माणसाचा व मुख सर्वात बुद्धिमान प्राणी हत्तीचे ह्याचाच अर्थ ज्ञान मिळविण्यासाठी हत्तीप्रमाणे कुशाग्र बुद्धी जरुरीची आहे.
लंबोदर :-
ह्या मूर्तितील मनुष्यदेहाचे पोट मोठे आहे, म्हणून गणपतिचे एक नाव लंबोदर = लंब+ उदर= मोठे पोट असलेला. संत एकनाथमहाराजांनी ह्या मोठ्या पोटात सर्व चराचर सामाविलेले आहे, असे म्हटले आहे. ह्याचा अर्थ हत्तीच्या बुद्धीमत्तेने तुम्हाला मिळालेले ज्ञानरुप अन्न ह्या चराचरापर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व समाजास उपयुक्त झाले पाहिजे.
त्रिशुल: -
ह्या मुर्तीच्या एका हातात त्रिशुल आहे म्हणजे ज्ञानाबरोबर तुम्ही सदैव शस्त्रसज्ज असायला हवे. आपण नेहमी म्हणतो,
' भारतीयता आणि विश्वबंधुता तत्वे थोर उदार
पण दुर्बलांच्या शब्दांना मान कोण देणार ? '
पाश:-
दुसऱ्या हातात पाश आहे. हा पाश आपल्याला सांगतो आपल्या मनातील, समाजातील पाप ह्या पाशाने दूर करा.
मोदक:-
ह्या मूर्तिच्या पुढच्या  हातात मोदक आहे. मोद म्हणजे कल्याण, ज्ञानाने धनधान्य पिकवून सर्व समाजाचे कल्याण करा.

दुसऱ्या हातावर ॐ हे अक्षर आहे:-
दुसऱ्या हातावर ॐ हे अक्षर आहे ह्याचाच अर्थ ही मूर्ति सांगते मी स्वतः ॐ आहे.
ॐ ह्या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरांनी सांगितला आहे, ॐ म्हणजे अ+ उ +म.
‘अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णु, मकार तो महेश जाणियेला.’
अध्याय ३-यांत श्रीगुरुचरित्रकार ह्याच त्रिमुर्तिचे वर्णन करतात
ब्रह्मयाचा रजोगुण। विष्णु असे सत्त्वगुण।
तमोगुण उमारमण। मूर्ति एकचि अवधारा॥ ५२॥
ह्या सर्व वर्णनातून श्रीगुरुचरित्रकार सांगताना दिसतात, ‘श्रीदत्तात्रेय ही एकच मूर्ति म्हणजे व्यक्ती आहे. जिच्यात तीन मूर्ति एकत्रित नसून तीन गुण एकत्रित आहेत. अशा ह्या त्रिगुणात्मक दत्तगुरुंमध्ये ब्रह्मदेवाचा रजोगुण, श्रीविष्णुचा सत्त्वगुण व श्रीशंकराचा तमोगुण एकत्रित झालेला आहे.’  
श्रीदत्ताची पिढ्यांपिढ्या चालत आलेली मुर्ति ब्रह्मा, विष्णु व महेश ह्यांची तीन मुखे व  सहा हात असलेला मनुष्यदेह. ह्यातील ब्रह्मदेव रजो गुण हा सृष्टी निर्माण करणारा, विष्णु सत्त्वगुण हा त्या सृष्टीचे पालन करणारा तर महेश तमो गुण  म्हणजे तामसी तापट हे तीनही गुण एकत्रित असलेली मूर्ति.
                    शंकर ह्या शब्दाची व्याख्या आहे,
यः शमम् करोति इति शंकरः
शम् म्हणजे कल्याण जो पाप नाहिसे करुन सर्वांचे कल्याण करतो तो शंकर.
 ‘श्रीगुरुचरित्रा’त श्रीगुरुचरित्रकारांची समाजाला भक्तीमार्गाकडे वळविण्याची तळमळ दिसून येते.
श्रीगुरुचरित्रांत सांगितलेली परमेश्वराची भक्ति  निश्चित कशी करायची?
                            
                      संत वाड़मयात आपण ईश्वरभक्तीची अनेक रुपे पहातो.
सावंता माळी कांदा, मुळा पिकवण्यात विठ्ठलाची भक्ति केली असे समजतो. कर्मयोगात तो देवाचे रुप जाणतो .
गोरा कुंभार चिखल तुडवताना विठ्ठलाचे नामस्मरण करतो.
जनाबाई दळण - कांडण करताना विठ्ठलाचे नाव घेऊन भक्ति करते.
आमचा भक्तपुंडलिक म्हणतो,
"आई बाप हे दैवत, माझे| असता माझ्या  घरी, कशाला जाऊ मी पंढरपूरी"
मातापित्यांच्या सेवेत तो विठ्ठलाचे रुप पहातो यापुढे जाऊन तो प्रत्यक्ष देव भेटीस आले, असे समजून तो विठ्ठलाला म्हणतो ,
“विठ्ठला उभे रहा विट्टेवरी”
अलिकडच्या काळातील उदाहरण
माई मंगेशकरांच्या देवाविषयीच्या भावना शांताबाई शेळके यांनी सुरेख काव्यबद्ध केलेल्या आहेत.
‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्यासाठी देव माझा पाहत आहे’

                    सावंता माळी, भक्त पुंडलिक, जना बाई, माई मंगेशकर  हे सर्व दैनंदिन जीवनात ईश्वरभक्ती करणारे कर्मयोगी.
                  काही कर्मयोगी  लोक त्यांच्या कामालाच देव मानतात.
श्रीगुरुचरित्र सांगते तुमच्या दैनंदिन जीवनातील कामे ईश्वरापर्यंत पोहोचतात.
                      सर्वसामान्य माणसाला असा कर्मयोग आचरावा किंवा अशी मानसपूजा करावी म्हणून सांगितले तर आपल्याला नक्की काय करायचे? हेच कळणार नाही. तसेच परमेश्वर तर आपण पाहिलेला नाही, आपल्याला दिसत नाही.
ह्यासाठी आपल्या पूर्वजांनी परमेश्वराच्या मुर्ती निर्माण करुन  समाजाला भक्तिमार्गाकडे  
जाण्याचा राजमार्ग दाखवून दिलेला आहे.
                   आपण घरी, देवळात देवाची पूजा- अर्चा करतो. मन, घर, देऊळ मंगलमय, प्रसन्न अनुभवतो. कोणत्याही देवतेची पूजा -अर्चा करताना, त्या मूर्तीतून प्रतित होणारे गुण समजून घेऊन आत्मसात करता आले तर खरोखरच त्या देवाची पूजा सफल झाली असे म्हणता येईल.
  उदाहरणार्थ :  श्रीदत्तात्रेयांची मूर्ति आपल्याला सांगते, प्रत्येक माणसात हे तीनही गुण (रज, सत्त्व, तम) असणे आवश्यक आहेत.
उदाहरणार्थ : आपण शेतकरी घेतला तर
तो आपल्या शेतात शेती करुन त्याची सृष्टी निर्माण करतो - ब्रह्मदेवाचे काम 
त्या शेतीला पाणी, खते घालून ह्या सृष्टीचे संगोपन करतो - श्रीविष्णुचे काम
वेळच्या वेळी निंदणी, खुरपणी करुन आलेले तण काढून टाकतो. पिकांवर पडलेली कीड वेळीच औषधांच्या सहाय्याने नष्ट करतो (अर्थात येथे केमिकल्स कमीतकमी वापरावीत).  शेतीत आलेले पाप : कीड, तण दूर करतो तमो गुणी - शंकराचे काम 
                 अशाप्रकारे आपल्या शेतीचे जर अद्ययावत ज्ञान ठेवले तर आपल्या कृषीप्रधान देशात सर्वत्र शिव म्हणजे पावित्र्य  नांदायला वेळ लागणार नाही.
गृहिणी सुद्धा आपल्या घराच्या विश्वात
आपली छोटीशी सृष्टी निर्माण करत असते, हे झाले - ब्रह्मदेवाचे काम.
ह्या सृष्टीची अन्नपुर्णा त्या घरातील गृहिणी असते, तसेच सर्वांना काय हवे नको ते पाहून त्या सृष्टीचे पालन करत असते  हे झाले -श्रीविष्णुचे काम.
काही वेळेला रुद्रावतार घेऊन घरातील मुले किंवा कोणी सदस्य चुकीच्या किंवा पापाच्या मार्गाने जात असेल तर त्यांना थांबवते- शंकराचे काम
                          ही दत्तमूर्ति सांगत असलेली   वैशिष्ट्ये जरी आपण प्रामाणिकपणे आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन आपल्या संसारात वापरली तर घरात खरोखरच शिव म्हणजे पावित्र्य नांदू लागेल.
पूर्वजांनी दिलेला सगुण विविध मूर्तिंचा अमुल्य  ठेवा आपल्याला संदेश देत असतो
भाव तैसा मूर्तित देव दिसे ।
डोळस श्रद्धेत ज्ञान असे॥
॥ श्रीगुरुदेवदत्त॥
क्रमशः
(संदर्भ ग्रंथ :
॥श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश॥ लेखक डॉ. प्र. न. जोशी

 प्रकाशक : श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश प्रकाशन, पुणे)