Showing posts with label निसर्ग. Show all posts
Showing posts with label निसर्ग. Show all posts

Saturday, 2 July 2016

निसर्गदत्त लोणार : वैज्ञानिक तीर्थक्षेत्र (भाग ३ रा)

 लोणार निसर्गशास्त्र न्यास:-
                       लोणार या ठिकाणी शास्त्रीय पर्यटन, ही संकल्पना कृतीत आणणारा जागतिक दर्जाचा  ‘लोणार न्यास’ उभारल्यास लोणारवासीय व तेथील निसर्ग सुस्थापित होऊ शकतील.
                      न्यास उभारणे म्हणजे मंत्रांनी देवाच्या मूर्तीच्या अवयवांवर देवत्वाची स्थापना करणे.
लोणार न्यासातील देवता असेल तिथला निसर्ग. निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळा, हेच निसर्गदेवतेचे अवयव. प्रयोगशाळांमध्ये होणारे विविधांगी संशोधन हेच ह्या न्यासातील मंत्र होत.
१)         रसायन शास्त्र :
                   लोणार सरोवराचे रसायनशास्त्र सांगते की, लवण म्हणजे मीठ. लवणयुक्त पाण्याचे सरोवर म्हणून ह्या सरोवरास पूर्वजांनी ‘लोणार सरोवर’ हे नाव दिले असावे.
                    ह्या सरोवराच्या पाण्यातील मीठ व सोडा यांचा उगम कोठे आहे ? अशा प्रकारे समुद्राव्यतिरिक्त इतर ठिकाणी कृत्रिम मीठ निर्मिती करता येईल का ?

                         हे पाणी अल्कालाइन(pH11)आहे. पावसाळ्यात ह्या पाण्याची pHकमी होते. ह्या पाण्याचा फेस चांगला होतो, त्यामुळे पूर्वी स्थानिक लोक शांपू बनवित असत.
                     नैसर्गिक साधनांद्वारे केमिकल न वापरता साबण,  शांपू बनविण्याचा मार्ग.
  
                             लोणार सरोवराच्या खाऱ्या पाण्यात खरच प्लास्टिक विरघळते का ?  अशा प्रकारे पॉलिमर ह्या पाण्यात विरघळण्याचे शास्त्रीय कारण काय व ह्या मिश्रणातून जैविक इंधन मिळविता येईल का ? अशाप्रकारचे प्रयोग पुण्यनगरीतील (पुण्याचे) शास्त्रप्रेमी मंडळींचे चालू आहेत. हे लोक दर महिन्याला लोणारला भेट देऊन तिथे पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करुन घेऊन, परत पुण्याला जाऊन त्यांचे प्रयोग करतात. त्यांच्या ह्या परिसर स्वछतेच्या मोहिमेमुळे लोणार प्रदुषित झालेले नाही.
                          लोणार न्यासानी ह्या प्रयोगांची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास, जैविक इंधन विषयक संशोधनाची प्रगती लवकर होईल तसेच न्यास निर्मितीतून उपलब्ध होणारे शास्त्रीय पर्यटन येथे प्लास्टिकचा  (कॅरीबॅगचा) कचरा निर्माण करणार नाही.
         अशा अनेक प्रश्नांची उत्तरे रसायन शास्त्र प्रयोगशाळेत मिळू शकतील.

२ )  भूगर्भशास्त्र :
                          सुमारे ५लाख ७०हजार वर्षांपूर्वी  अवकाशातून झालेल्या उल्कापातात एखाद्या ग्रहाचे तुकडे  झालेल्या दगडांच्या माऱ्यात प्रचंड उष्णता निर्माण झाली असावी. ह्या उष्णतेने येथील वाळूचे काचेत रुपांतर केल्याने, इथे काचमिश्रित माती आढळते.                          
                         अशा प्रकारची काचमिश्रित माती चंद्राच्या पृष्ठभागावर आढळते. कारण अति प्राचीन भारतीय धर्मशास्त्र चंद्राला पृथ्वीचा मुलगा मानते. श्रीगुरुचरित्र आशय अध्याय ४था तसेच आधुनिक शास्त्राच्या अनुमानानुसार, मंगळसदृश्य ग्रह पृथ्वीवर आदळून पृथ्वीनिर्मितीच्या वेळी पृथ्वीचा एक तुकडा अवकाशात जाऊन ‘चंद्र’ हा पृथ्वीचा उपग्रह तयार झाला असावा. चंद्रनिर्मितीच्या भौगोलिक घटनेच्या वेळी निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेने चंद्रावरची माती काचमिश्रीत आहे.
                               भविष्यात अंतराळ संशोधनासाठी मानवी वसाहत  चंद्रावर निर्माण करणे, ही काळाची गरज आहे. ह्या थांब्यामुळे अंतराळातील दूरच्या मोहिमा मानवास करता येतील. चंद्रावर जर शेती करता आली तरच ह्या मानवी वसाहती स्वयंपूर्ण होऊ शकतील. ह्या शेतीच्या प्रयोगासाठी लागणारी  चंद्रसदृश्य कृत्रिम वातावरण निर्मिती लोणार न्यासात करता येईल. ह्या शेतीच्या प्रयोगासाठी लोणारची काचमिश्रित माती (चंद्राच्या भूपृष्ठभागावर अशीच काचमिश्रित माती आहे) खूप मोठे योगदान ठरेल.

                     लोणार येथे झालेल्या उल्कापातातील दगडात चुंबकत्व आहे. ह्या दगडाचा उपयोग करुन झोपलेल्या स्थितीत ठेवलेली वीर मारुतीची मुर्ति, मोठा मारुती मंदिरात आढळते. लोणारवासीयांच्या मते, ह्या मारुती जवळ चुंबकसूची नेली असता, ती उलटी फिरते. अशा ह्या लोणारच्या चुंबकत्व असलेल्या दगडाचा शास्त्रीय अभ्यास लोणार न्यासात करता येईल.
                          ‘मोठा मारुती मंदिर’ हे बुलढाण्याच्या कानिटकर कुटुंबाच्या मालकीचे आहे. कानिटकर कुटुंबाने डोळस श्रद्धेने
श्री शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत ह्या मारुतीरायाच्या मुर्तिवरचा शेंदूर दूर केला. वीर मारुतीची विलोभनीय मुर्ति आपल्याला दर्शन देतेच तसेच अवकाशातून भेट मिळालेल्या चुंबकत्व असलेल्या दगडांचा शास्त्रीय अभ्यास करा, असा संदेशही देते.


                        कमी पावसाच्या ह्या प्रदेशात पर्यटकांना   आकर्षित करणारे धबधबे नाहीत. लोणार सरोवरास पाणी पुरवठा करणारी ‘सीता धारा’ ही छोटी नदी गोमुखातून एखाद्या मोठ्या नळासारखी अव्याहत पाणी देते. ह्या नदीचे पाणी गोड असून हा झरा उन्हाळ्यात आटत नाही. ह्या नदीच्या माध्यमातून निसर्ग लोणार सरोवर हा अमूल्य ठेवा जपताना दिसतो.
                          सीता धारा ह्या गोडपाण्याच्या नदीच्या दृष्टीने लोणार सरोवर हा समुद्रच आहे. जशी सागराला नदी मिळते, तेवढ्याच वेगाने सीता धारा ही नदी लोणार सरोवराला पाणी पुरविते. निसर्गातल्या गोड्या पाण्याच्या नद्या,खाऱ्या पाण्याच्या जलाशयाकडे (तो जलाशय समुद्र असो किंवा लोणार सरोवर) वाहतात. ह्या मागे   भौगोलिक कारण आहे का? व असल्यास त्याचा आपल्याला नदी जोडणी प्रकल्पात उपयोग करता येईल का?

३) सूक्ष्मजीव शास्त्र :
                २००७ साली ह्या खाऱ्या पाण्याचे केलेल्या संशोधन निष्कर्षानुसार ह्या खाऱ्या पाण्यात हवेतला नायट्रोजन स्थिर करणारे सूक्ष्म जीव बॅक्टेरिया आढळून आलेले आहेत.
                  भातासारख्या वनस्पतींना हवेतला नायट्रोजन थेट वापरता येत नाही. आकाशात वीज चमकते किंवा जंगलात वणवे पेटतात, तेव्हा निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे हवेतला नायट्रोजन हा वायू अलग होतो. बॅक्टेरिया हे सूक्ष्म जीव तो शोषून त्याचे वनस्पतींना उपयोगी असणाऱ्या नायट्रेटसारख्या रेणूंत रूपांतर करतात. हा नायट्रेट मिळाल्याने भात पिकतो. अशाप्रकारे इतरही वनस्पती हा नायट्रेट वापरतात, परंतु ह्यासाठी आकाशात वीज चमकून पाऊस पडावा लागतो.
                          लोणार  सरोवरातील पाण्यात हवेतला नायट्रोजन स्थिर करणारे बॅक्टेरिया आहेत. ह्या सूक्ष्मजीवांची प्रयोगशाळेत पैदास करुन त्यांचा उपयोग पृथ्वीवरील वनस्पती, शेती संवर्धनासाठी होईल. तसेच भविष्यातील अंतराळातसुद्धा हे जीवसृष्टीचे अमृत नेता येईल. लोणारच्या खाऱ्या पाण्यात समुद्रासारखे मासे आढळत नाहीत. परंतु  हे नायट्रोजनयुक्त अमृत देणारे सूक्ष्म जीव लाखो वर्षांपासून नांदत आहेत. त्यांच्या अस्तित्वामुळे ह्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराभोवती बाभूळ, चिंच, साग, वनौषधी असलेले जंगल उभे राहिले असावे.
                    ‘वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड’ ही म्हण शब्दशः ह्या भागात आपल्याला अनुभवायला मिळते. हे सूक्ष्मजीव प्रयोगशाळेत पैदा करुन, देशात हरितक्रांती करण्याचा प्रयत्न होऊ शकेल.
                   सीता धाराच्या  कुंडात मनुष्यप्राणी, मजा करण्याच्या हेतूने तसेच पुण्य मिळविण्याच्या हेतूने, स्नान करताना आढळतो. ह्या स्नानातून क्षणिक आनंद  मिळविताना, माणसाच्या शरिरावरचे हजारो बॅक्टेरिया सीता धारा ह्या स्वच्छ पाण्याच्या नदीला अशुद्ध बनवितात. हेच अशुद्ध पाणी लोणार सरोवराला पाणीपुरवठा करते. आपल्या शरीरात हजारो बॅक्टेरिया अन्न पचविण्यापासून अनेक कामे करीत असतात. १००किलो वजनाच्या माणसातील १० किलो वजन ह्या बॅक्टेरियांचे असते. स्नानातून त्वचेवरचे बॅक्टेरिया धुतले जातात. आपण स्वच्छ होतो, परंतु लोणार सरोवरात आपण आपली घाण मिसळून, तेथील नायट्रोजन रुपी अमृत देणाऱ्या सूक्ष्म जीवांना आपण धोका पोहोचवितो.
                         मानवनिर्मित अशुद्ध पाण्यामुळे लोणार सरोवरातील सूक्ष्मजीव सृष्टीस निश्चित धोका पोहोचत असणार. सीता धारा कुंडात स्नान करणे तसेच ह्या कुंडाच्या काठावर श्राद्ध विधी करणे त्वरित थांबविणे अत्यंत गरजेचे आहे
                           अशा प्रकारे रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना भौतिकशास्त्र प्रयोगशाळेची जोड दिल्यास, अंतराळातील इतर ग्रहांवर मानवी वसाहत निर्माण करण्याचे संशोधन लोणार येथे होऊ शकेल, तसेच इथे येणाऱ्या संशोधकांना परिपूर्ण प्रयोगशाळा मिळू शकेल.
                             शेती हा मुख्य व्यवसाय असलेले लोणार हे छोटे गाव श्री बुकदाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली  ‘पर्यटन स्थळ’ ह्या नव - संहितेत स्वतःला वसवू पहात आहे. ह्या परिसराची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती सविस्तर देणारी पुस्तके लोणारचे शिक्षक श्री. बुकदाणेसर यांनी मराठी व इंग्रजी भाषेत लिहिलेली आहेत.श्री. बुकदाणेसरांचे विद्यार्थी असलेली चैतन्य कायंदे (मोबाईल नंबर 8856028467, 8888264934)सारखी गाईड म्हणून कार्यरत असलेली तरुण पिढी ह्या न्यासात नोकरी मिळाल्यास घरची शेती सांभाळून जीवनात सुस्थिर होऊ शकेल.  
                            अशी ही जागतिक प्रयोगशाळा निर्माण झाल्यास तिला कोणत्याही  महात्म्याचे नाव देऊ नये.  लोणार निसर्ग न्यास किंवा तत्सम नावातून प्राचीन लोणार सरोवर  जागतिक वैज्ञानिक तीर्थक्षेत्र बनविणे, लोणारवासीयांच्या तसेच विज्ञानप्रेमी मंडळीच्या प्रयत्नांतून साकार होऊ शकेल.
                                                                             समाप्त
॥ जय श्रीगुरुदेवदत्त॥




Thursday, 31 March 2016

१ एप्रिल (खबरदार) फूल

 सावळ्या (निसर्ग) :
खबरदार जर घाव घालूनी न्याल मम बावड्या
संपेल तव जीवन केवढ्या !
कुण्या शहरीचा वासी आपण कुठे चालला असे
ठेव ही लुटुनी तीरसे ?
गुलाम करुनी भूमातेला राव पांग हे फेडूनी
कसे रहाल खडे ह्या अंगणी !
जोर करुनी हसण्यावारी वेळा नका नेऊ ही
मला ओळखले का हो तुम्ही ?
हा दर्द निसर्गाचा आवाज असे
हे उन्हही माझे लेचेपेचे नसे
ह्या नदी नाल्यातूनी जीवन माझे वसे
खबरदार जर घाव घालूनी न्याल मम बावड्या
संपेल तव जीवन केवढ्या !

बावळ्या (स्वार) :
ढगात जाऊनी पाऊस-पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही बोअरची तो का डरे
वीर तू समजलास काय रे ?
घोर वाढवित अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव कातळ भूमी तरी ?
हे ड्रिल बघ पाते किती चमकते
अणकुचीदार गति यंत्राचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर घाव घालूनी न्याल मम बावड्या
संपेल तव जीवन केवढ्या !

सावळ्या (निसर्ग) :
आपण मोठे गाडीवाले अहा शूर वीर की -
किती ते आम्हाला ठाउकी !
झडप तुमची गिळे शेती आम्हा माहित न का
दावती कशाला फुशारकी फुका ?
तुम्हा सारिखे लोळविले छप्पन नरमणी -
आमुच्या रौद्ररुपाने क्षणी
मी असे इमानी चेला भूमातेकडे
हुकुमावरुनी तिच्या समजा ह्या पुढे
नेईन मी स्मशाना तव लाकडे
पुन्हा सांगतो, खबरदार जर घाव घालूनी न्याल मम बावड्या
संपेल तव जीवन केवढ्या !

लालभडक ते वदन जाहले सूर्य तापला असे
स्वार मनी ओशाळला कसे ?
त्या काळाच्या नयनी चमके पाणी पावसामुळे
स्वार परि सौम्य वृत्तीने डुले
मूल दिसे एक जणू, दुसरा जपे तयाचा पिता
ऐका ही निसर्गाची गीता -
रहाशील इमानी माझा चेला खरा
देईन इनाम माझा जल पेला तुला
पण ध्यान ठेव बावळ्या मम बोल पुन्हा एकदा
“खबरदार जर घाव घालूनी न्याल मम बावड्या
संपेल तव जीवन केवढ्या !”
                            --- अनुप्रभा, नाशिक
शब्दार्थ :-
बावडा= मोठी विहीर
कातळ =खडकाळ जमीन
------------------------------------------------------------------------
कविवर्य श्री. वा. भा. पाठक यांची ‘खबरदार जर टाच मारुनी  --- ‘ही पिटुकला शिलेदार सावळ्या व घोडेस्वार श्री. शिवाजी महाराज यांच्यातील संवादरुपी अप्रतिम कविता आम्हाला शाळेत होती. ही आठवणीतील कविता 
http://www.aathavanitli-gani.com/Song/Khabardar_Jar_Tach
 ह्या मराठी गाण्यांच्या ठेव्याने जपून ठेवलेली आहे.
सध्या मानवाची पाण्यासाठी निसर्गावर चाललेली स्वारी पाहिल्यावर मन
उद्विग्न होते. घरोघरी बोअर वेल तसेच यंत्राच्या सहाय्याने शेततळी म्हणजे परत निसर्गाचा विध्वंस ! निसर्गाला सतत असे ओरबाडत राहिल्यास, सिमेंटच्या जंगलात रहाणाऱ्या माणसाला, स्वतःच्या जीवनाची केवढी किंमत मोजावी लागेल ?
निसर्गात फूल फुलवायचे सोडून, निसर्गाला फूल (Fool)समजणाऱ्या मानवाला निसर्ग म्हणतो “ खबरदार --- “




Monday, 7 March 2016

प्राचीन व अर्वाचीन लायगो

अर्वाचीन लायगो  प्रकल्प

https://youtu.be/0KbzmO2g9-Y


प्राचीन लायगो  प्रकल्प :  5 - Dimensional Universe Theory
https://youtu.be/k7k_qS0Uq90

Tuesday, 17 November 2015

भारत-भूमी दर्शन (भाग १)


मना,त्वाचिरे नदी स्नान केले।
तयापासूनी प्रदुषण प्राप्त झाले ॥
विचारी मना तूच शोधूनी पाहे ।
तीर्थ संहिते जल शुद्ध वाहे ॥
नदी पाहिली की, नदीच्या वहात्या खळाखळत्या पाण्यात उतरावे, मनसोक्त आनंद घ्यावा, ह्या निर्भेळ आनंदाला पुण्यप्राप्तीची जोड असेल तर मनुष्य प्रदुषणाचा विचार न करता, निसर्ग स्नानाकडे धाव घेतो. ह्या स्नानातून त्या व्यक्तीला पुण्य मिळते की नदी प्रदुषणाचे पाप मिळते ?
         सुमारे ६००वर्षांपूर्वी श्रीनृसिंहसरस्वतींनी ‘गंगा स्वच्छता’ अभियानाची मुहुर्तमेढ केलेली दिसते. अध्याय १५ मध्ये श्रीगुरु आपल्या शिष्यांना तीर्थ यात्रेची सुरवात करताना, काशीला जाऊन गंगा नदीची चाकरी  करण्यास सांगतात.
श्रीगुरुंच्या नियमांनुसार, शिष्यांनी फक्त नदी संगमात स्नान करावे. दोन -तीन नद्यांच्या संगमातील भरपूर पाण्यात प्रदुषणाची मात्रा निश्चित कमी होते.
श्रीगुरुंनी ‘नदी उगम-स्नान तसेच समुद्र-स्नान करा’ असा संदेश शिष्यांना दिलेला नाही. निसर्गाच्या जलचक्राचे हे दोन्ही स्त्रोत प्रदुषणमुक्त ठेवणे, आजही गरजेचे आहे.
पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असलेल्या जलाशयांमध्ये श्रीगुरुंनी शिष्यांना स्नान करण्यास सांगितलेले आढळते.
‘खेकड्यांच्या प्रजनन काळात तसेच उन्हाळ्यात नदीचे बाष्पीभवन काळात नदीत स्नान करु नका’, ह्या श्रीगुरुंच्या संदेशातून निसर्ग संवर्धक श्रीगुरु आपल्याला भेटतात.
         २१व्या शतकात पर्यटनशास्त्र(  Tourism) पर्यावरण शास्त्र(  Environmental Science) भारत भूमीचा उपग्रहांद्वारे छायांकित झालेला भुगोल (Geography)अशी ज्ञानाची विविध दालने समृद्ध होत असताना,
केल्याने देशाटन, जाणिवे प्रदुषण
हा अनुभव येतो.
आसामच्या निसर्गरम्य प्रदेशात प्रवेश करताना, आपली आगगाडी ब्रह्मपुत्र नदीवरील मोठ्या पुलावरुन जात असते. ब्रह्मपुत्र नदीचे ते विशाल दर्शन डोळ्यात साठवित असताना, सहप्रवासी श्रद्धेने नदीमध्ये १-२ रुपयांची नाणी नदीला अर्पण करीत असतात. ब्रह्मपुत्रनदी दररोज किती नाण्यांचे प्रदुषण स्वतःबरोबर वाहून नेत असेल ?
ब्रह्मपुत्र नदीला प्राचीन काळापासून तिच्या भव्यतेमुळे नद (पुलिंगी) म्हणतात.
ब्रह्मपुत्र नदीच्या वेगवान प्रवाहात, सर्वसामान्य मनुष्य स्नानाचे पुण्य घ्यायला घाबरतो. परंतु ह्या नदीला नाणी-दान करुन प्रदुषणात भर टाकतो.
ब्रह्मपुत्र नदीपासून चार हात दूर रहाणारा माणूस, विदर्भातील लोणार सरोवर येथील सीता धारा ह्या छोट्या नदीच्या उगमात  यथेच्छ स्नान करतो. हे स्नान करताना   लोणार सरोवर ह्या नैसर्गिक ठेव्यास आपण धक्का पोहोचवित असतो ! हे त्या व्यक्तीच्या गावीही नसते.
संदर्भ:-
निसर्गदत्त लोणार सरोवर - जन्मकथा
निसर्गदत्त लोणार सरोवर -इतिहास (भाग २)
निसर्गदत्त लोणार सरोवर -वैज्ञानिक तीर्थक्षेत्र (भाग ३)
http://shrigurucharitrabodha.blogspot.in/2014/08/blog-post.html
१५ व्या शतकात परधर्मीय जुलमी राजवटीने सर्वसामान्य माणुस दबून गेला होता. अशा   प्रदेशांमध्ये   माणसातील स्फुलिंग जागृत करण्यासाठी, श्रीगुरुंनी आपल्या शिष्यांना पाठविलेले दिसते. त्यामुळे आसामची ब्रह्मपुत्र नदी, विदर्भातील लोणार सरोवर अशा अनेक ठिकाणांचा समावेश श्रीगुरुचरित्रांच्या ‘तीर्थ यात्रा निरुपण’ अध्यायात नसावा.

 तीर्थ संहितेतून घडणारे भारत दर्शन :-
श्रीगुरुचरित्र आशय अध्याय १५ -
http://media.wix.com/ugd/e49ced_8ed083387cf741edb333898c94db0f6c.pdf

                                ॥ श्रीगुरुदेवदत्त॥

Sunday, 20 July 2014

निसर्गदत्त लोणार सरोवर – इतिहास (भाग २)

लोणार ह्या वैज्ञानिक तीर्थक्षेत्राचे साक्षीदार हे तिथे असलेली मंदिरे व तेथील निसर्ग होय.
शेंदूरशिवाय मूळ मुर्ति

पूर्वीचा शेंदूरलिंपित 
मोठा मारुती, लोणार
        
      कल्पनाचित्र:-
डावीकडील आडवा मोठा मारुती 
उभा केल्यास वीरमारुती रुप
मोठा मारुती मंदिर:-
                                अलीकडच्या काळात लोणार येथील मोठा मारुती मंदिरातील मारुतीवरचा शेंदूर श्रीशंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत दूर करण्यात आला. शेंदूर दूर केल्यामुळे, मारुतीरायाची विलोभनीय दगडी मुर्ति आपल्याला दर्शन देते. ह्या मुर्तिचा दगड लोणार येथे ५ लाख ७० हजार वर्षांपूर्वी अवकाशातून आलेल्या उल्केचा आहे. ग्रामस्थ सांगतात, ‘ह्या दगडात चुंबकीय गुणधर्म असून चुंबक सूची मात्र उलटी फिरते.’
                              ही मारुतीची मुर्ति ८ ते १० फुट लांब असून, आडवी ठेवलेली असल्याने, ह्या मारुती मंदीरास मोठा मारुती मंदिर किंवा झोपलेला मारुती मंदिर असे म्हणतात. आडव्या स्थितीतील मारुतीचे वरील कल्पना चित्र दर्शविते की, ही वीरमारुतीची मुर्ति आहे. ही महाकाय मुर्ति बहुधा उभी करण्यात अडचणी आल्या असतील, त्यामुळे आडवी ठेवलेली असावी.
                                  हे मंदिर बुलढाण्याच्या कानिटकर कुटुंबाच्या मालकीचे असून सर्व भक्तांना दूरुन दर्शन घेण्यास खुले असते. ह्या मंदिराचे आवार स्वच्छ असून भोवताली असलेली परस बाग, निसर्ग सान्निध्य देते. कानिटकर कुटुंब व श्रीशंकराचार्य यांच्या डोळस श्रद्धेचे अभिनंदन.
दैत्यसुदन मंदिर:-
 
दैत्यसूदन 
=दैत्य (राक्षस) + सूदन (वध)
दैत्यसूदन हे मंदिराचे नाव आपल्याला श्रीविष्णुने राक्षसाचा वध केला, ही गोष्ट सांगते.
                                   सध्या जगाचे लक्ष गेलेल्या ह्या छोट्याशा    ठिकाणाला पुराणकाळापासूनचा इतिहास आहे. सत्ययुगात ‘लवणासूर’ हा राक्षस आपल्या बहिणींसह ह्या ठिकाणी रहात होता. म्हणून ह्या ठिकाणाला ‘लोणार’ हे नाव पडले असे मानले जाते. लवणासूराचा    श्रीविष्णुने वध केला.
                                   ह्या गावी आपल्याला चालुक्य राजवटीकालीन दैत्यसुदन हे हेमांडमंडपी पद्धतीचे   मंदिर पहावयास मिळते.   ह्या मंदिराच्या बांधणीमध्ये धातूचे मिश्रण असून, हे सर्व बांधकाम दगडी दिसते. मुख्य गर्भ गृहात विष्णुची मुर्ति लवण ह्या दैत्याचा वध करत असलेली आहे.
                    पूर्वी हे मंदिर ‘सूर्य मंदिर’ मानले जायचे. असाही एक प्रवाद ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळतो. मंदिराचा आकार एखाद्या ताऱ्याप्रमाणे  असून कोरीव काम अप्रतिम आहे. मंदिरावरील शिल्प  खजुराहो मंदिराची आठवण करुन देते. परंतु प्राचीन मुर्ति चोरीला गेल्याने हे ‘सूर्य मंदिर आहे की श्रीविष्णु मंदिर आहे’, ह्याचा खुलासा होत नाही.
                  मंदिरातील सध्याची मुर्ति नागपूरच्या भोसला घराण्याने वसविलेली आहे.  नासिकमधील ‘भोसला मिलिटरी स्कूल’ हे नाव डॉ. मुंजे यांनी ह्याच नागपूरच्या  सरदार घराण्याच्या सन्मानास्तव  ठेवले आहे.
                  गर्भगृहाबाहेरच्या खोलीच्या छतावर  विजेरीच्या (टॉर्चच्या) उजेडात आपल्या पुराण कथा मुर्तिरुपात चित्रीत केलेल्या दिसतात. ह्या अप्रतिम मुर्तींमध्ये आपल्याला कंस -कृष्ण, नरसिंह- कश्यप, रासक्रीडा, लवणासूरवध अशा अनेक कथा पहायला मिळतात. ह्या मुख्य मंदिराच्या शेजारी ब्रह्मा, विष्णु, महेश ह्या  तीनही देवतांचे एक छोटे देऊळ आहे. ह्या देवळातील प्राचीन महेशाची मुर्ति चोरीला गेल्याने, तिथे सध्या गरुडाची मुर्ति ठेवलेली आढळते.
           संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ‘दैत्यसूदन मंदिर’ पहाण्यास खुले असते.
                        अशी अनेक देवदेवतांची मंदिरे ह्या ठिकाणी आहेत. भोगावती कुंडात भगवान रामाने स्नान केले होते. पांडवांच्या काळात युधिष्ठिराने येथे वडिलांचे श्राद्ध केले होते, असेही सांगितले जाते. तसेच वनवासाहून अयोध्येला परताना श्रीराम सीता यांनी सरोवरकाठावरील मंदिरात श्रीशंकराची   पूजा केली  होती,अशी आख्यायिका आहे.
                            भारतीय पुराणात लोणार सरोवर आणि परिसराला कपिलतीर्थ , विरजतीर्थ , धारातीर्थ , नाभीतीर्थ , तारातीर्थ , पवित्रतीर्थ , पद्मसरोवर , पंचाप्सर आदी विविध नावे आहेत. स्कंद पुराणात ब्रह्मदेव, नारदमुनी, कपिलमुनी, अगस्तीऋषी , भृगुऋषी, याज्ञवल्क, शुक्राचार्य आदी ऋषीमुनींनी लोणार सरोवर परिसरात तपश्चर्या केल्याचा उल्लेख आहे.
                                ह्या सरोवराचे पाणी खारट असल्याने, मुगल काळात ह्या ठिकाणी मीठ निर्मिती करीत असत. राजा अकबरच्या काळात लोणार नगरीचा 'जिझीया कर' रद्द केलेला होता. निजाम व पेशव्यांच्या काळातही लोणारचा विकास झाला. ब्रिटिश काळात कर्नल मॅकेन्झीने लोणारचा सविस्तर अभ्यास केला.
                        लोणार ह्या विवरातील समुद्रासारखे खारे असून अल्कलाइन pH 11 आहे. ह्या सरोवरात प्रचंड मीठ व सोडा यांचा साठा हे एक नैसर्गिक कोडे आहे. ह्या  खाऱ्या पाण्यात मासे आढळत नाहीत. लोणार गावातील ग्रामस्थांच्या मते ह्या खाऱ्या पाण्याचा शांपू चांगला होतो. खूप फेस देतो व भांडी, कपडे स्वच्छ काढतो.
                         हल्ली ह्या सरोवरातील पाण्यापासून शांपू बनविण्यास किंवा उन्हाळ्यात बाष्पीभवन  झाल्याने मिळणारे मीठाचे पातळ थर ‘पापडखार’ म्हणून विकण्यास बंदी आहे.
                         लोणार ह्या ठिकाणच्या मातीत काचेचे कण चमकतात. लोणार येथील काच मिश्रित माती व चंद्रावरच्या मातीच्या नमुन्यात साम्य आहे. पृथ्वीवर बहुधा मंगळ सदृश्य ग्रह आदळल्याने पृथ्वीचाच एक भाग अवकाशात तुटून गेला व त्याभागातून पृथ्वीचा चंद्र तयार झालेला असावा. ह्या मंगळसदृश्य ग्रहाच्या धडकेच्या वेळी प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने, चंद्राच्या भूपृष्ठावर असलेल्या वाळूचे काचेत रुपांतर झालेले असावे, असे आजचे विज्ञान सांगते. चंद्र निर्मितीच्या वेळी, निर्माण झालेल्या उष्णतेसारखी उष्णता, लोणार ह्या ठिकाणी झालेल्या अवकाशातून उल्का माऱ्याच्या वेळी निर्माण झालेली असावी. त्यामुळे येथील वाळूचे रुपांतर काचेत झालेले असावे.
                          अशा प्रकारे येथील मंदिरातून तसेच मातीतून मिळणारा इतिहासाचा  मागोवा जपण्याचे उत्तरदायित्व लोणार पर्यटनस्थळ झाल्यास जपले जाईल का?
॥श्रीगुरुदेवदत्त॥

Saturday, 12 July 2014

निसर्गदत्त लोणार सरोवर - जन्मकथा


                                  लोणार सरोवराला जगाच्या नकाशावरील पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने कॅनडातून १५ तज्ज्ञ लोकांचे पथक दीड महिना लोणार येथे रहाणार आहे.  मागच्या आठवड्यात वर्तमानपत्रात ही बातमी   वाचल्यावर मनात प्रश्न उभा रहातो. पर्यटनस्थळ निर्मितीमुळे ह्या ठिकाणाचा अनमोल नैसर्गिक ठेवा तर नष्ट होणार नाही ना ?
                                 बुलढाणा जिल्हात लोणार हे ठिकाण मेहकर ह्या गावाजवळ आहे. आपल्या सर्वांना संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराजांचे ‘शेगाव’ माहीत आहे. शेगाव पासून खामगावमार्गे सुमारे १४० कि. मी. वर लोणार सरोवर आहे.
                                 बुलढाणा हा शब्द भिल्ल ढाणा (भिल्ल लोकांचे वस्ती स्थान) ह्याचा बोलीभाषेत अपभ्रंश होऊन तयार झालेला आहे. अतिशय कमी पावसाच्या विदर्भा (वऱ्हाडा) तील या भागात घनदाट जंगल ऋग्वेद कालापासून असावे. ऋग्वेदात ह्या भागाला ‘दंडकारण्य’ संबोधिलेले आहे.
                                लवण म्हणजे मीठ, मीठाच्या पाण्याचे सरोवर ते लोणार सरोवर होय. ह्या मीठाच्या सरोवराभोवती असलेली बाभूळ, चिंच, साग, विविध प्रकारच्या वनौषधींची जंगलसंपत्ती, आपल्याला वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड ह्या प्राचीन म्हणीची प्रचिती देते. ह्या पाण्यात असलेल्या मीठ व सोडा यांचे मुख्य स्त्रोत काय असावे ? समुद्राच्या पाण्यापेक्षाही खारट पाण्याभोवती तसेच कमी पावसाच्या ह्या प्रदेशात जंगल कसे काय ? असे प्रश्न मनात येतात.
                               स्मिथसोनिअन संस्था (Smithsonian Institution), जिऑलॉजिकल सर्वे अमेरिका, जिऑलॉजिकल सोसायटी - भारत, सागर युनिव्हर्सिटी, तसेच नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी यांनी लोणार सरोवरचा सर्वदृष्टीने अभ्यास केला. ह्या सर्व संशोधनाचे २०१० साली निष्कर्ष प्रसिद्ध केले. ह्या निष्कर्षांनुसार सुमारे ५ लाख ७० हजार वर्षांपूर्वी आकाशातून प्रचंड मोठा उल्कापात लोणार ह्या ठिकाणी, झालेला असावा. ह्या प्रचंड मोठ्या उल्कापाताने, लोणार येथे ‘बेसॉल्ट’ ह्या ४००मीटर जाडीच्या खडकाच्या थरात सुमारे १३७ मीटर खोल अंडाकृती विवर (मोठा) खड्डा बनविले असावे. ह्या अंडाकृती विवराचा मोठा व्यास १८००मीटर व लहान व्यास १२००मीटर आहे. ४००मीटर जाडीच्या ‘बेसॉल्ट’ खडकाला १३७ मीटर खोलीचा खड्डा पडला, ह्यावरुन  आकाशातून झालेला उल्का  (तुटलेला तारा- अवकाशस्थित ग्रहाचे, ताऱ्याचे तुकडे इत्यादि ) मारा खूप जबरदस्त वेगात झालेला असावा. एवढा प्रचंड मोठा आघात सहन करुनही पृथ्वीमाता तिथे जंगलसंपत्ती निर्माण करते. पृथ्वीच्या ह्या सहनशील गुणामुळे श्रीगुरुदेव दत्तात्रेय पृथ्वीला आपला प्रथम निसर्ग गुरु मानतात.
                         अशाचप्रकारे  उल्कापातातून पृथ्वीवर पुढील ठिकाणी सरोवर निर्माण झालेली आहेत:-
सिलजान सरोवर, स्वीडन
वेस्ट हॉक सरोवर, कॅनडा
काली सरोवर, सारेमा बेट, इस्टोनिआ
 मॅनिकॉन्गन सरोवर, क्युबेक इत्यादि
तसेच लोणार सरोवराजवळ गणेश सरोवर, अंबर तलाव ही दोन उल्कानिर्मित छोटी सरोवरे आहेत.
                              जगातील मान्यताप्राप्त पंच सरोवरातील लोणार सरोवर हे आपले जागतिक भूषण आहे.
                             भारतीय पुराणात लोणार सरोवर आणि परिसराला कपिलतीर्थ, विरजतीर्थ, धारातीर्थ, नाभीतीर्थ, तारातीर्थ , पवित्रतीर्थ, पद्मसरोवर, पंचाप्सर
आदी विविध नावे आहेत.
                        स्कंद पुराणात
ब्रह्मदेव, नारदमुनी, कपिलमुनी, अगस्तीऋषी, भृगुऋषी, याज्ञवल्क, शुक्राचार्य आदी ऋषीमुनींनी
लोणार सरोवर परिसरात तपश्चर्या केल्याचा उल्लेख आहे.
                      
                              सध्या लोणार सरोवर भोवती मुख्यत्वे शेती हा व्यवसाय करणारे ‘लोणार गाव’ आहे. ह्या गावाची ग्रामदेवता असलेले ‘कमलजा देवी मंदिर’ लोणार सरोवराकाठी पुरातन स्थापत्त्य शास्त्राचे(Civil Engineering) दर्शन देते. लोणारवासीय लोक सांगतात की, खूप पाऊस पडला तर सरोवर पाण्याने भरते परंतू कमलजा देवीच्या मंदिरात पाणी येत नाही. पुरातन मंदिरे बांधताना पुरापासून सुरक्षित जागा निवडत असावेत. मागच्या वर्षी (पावसाळा इसवी सन २०१३)  ढगफुटीत मंदाकिनी नदीतील  पूराचे पाणी वाहून नेणाऱ्या पात्रातील २१ शतकातील अतिक्रमणे(बांधकामे) वाहून गेली, पण केदारनाथ मंदिर सुरक्षित होते. मंदाकिनीनदीचे दोन प्रवाह आहेत. एका प्रातातून बारमाही मंदाकिनी नदी वाहते, दुसऱ्या पात्रातून  पूराचे पाणी वाहून नैसर्गिकरित्या जाण्याची सोय आहे. ह्या दोन पात्रांच्या मध्ये केदारनाथमंदिर पूर्वजांनी बांधलेले आढळते. पूर वाहून नेणाऱ्या पात्रात पूर्वी लोक पावसाळा सोडून इतर ऋतुत शेती करीत. परंतु इंच - इंच जमीनीच्या हव्यासापोटी ह्या पात्रात माणसाने नगरे वसवली ही नगरे पूरात वाहून गेली ह्याला निसर्गाचा कोप म्हणायचा की माणसाचा मुर्ख हव्यास ?
                                  उत्तराखंडातील दुर्दैवी घटना थांबवता आली नाही. परंतु मागच्यास ठेच पुढचा शहाणा हे तत्त्व जर लोणार सरोवर विकासात वापरुन हा निसर्गनिर्मित अलौकिक ठेवा आपल्याला निश्चित जपता येईल. ह्यासाठी पर्यटन स्थळ हा वातावरणास हानी करणारा मार्ग  होईल.

(क्रमशः)

Saturday, 18 January 2014

निसर्ग संवर्धक 'श्रीगुरुदेवदत्त’

 ‘जगातील आद्य निसर्ग संवर्धक श्रीगुरुदेवदत्त’

                      श्रीगुरुचरित्र अध्याय ४ मध्ये सर्व परिचित श्रीदत्त जन्म कथा विस्ताराने सांगितलेली आहे. पतिपरायण अनसूयेच्या  ‘अतिथी देवो भव’ वर्तनाने ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर यांना निष्पाप अशा बालक रुपांत अनसूयेच्या घरी प्रकटावे लागले.
            ह्या दत्तजन्माचे वर्णन अध्याय ४ मध्ये श्रीगुरुचरित्रकार पुढीलप्रमाणे करतात. अत्री- अनसूयेच्या घरी ही तिन्ही बालके त्यांची मुले म्हणून वाढतात. परमेश्वर निजालयासी म्हणजे आपापल्या स्थानी किंवा घरी गेले.
ह्यातील ब्रह्मदेवाचे नाव चंद्र, विष्णुमूर्तीचे नांव दत्त, तसेच शंकराचे नांव दुर्वास अशी
नावे अत्री - अनसूया ह्यांनी बालकांची ठेवलेली आहेत.
श्रीगुरुचरित्रकार ह्या बालकांविषयी पुढे लिहितात,
त्रयमूर्ति ऐक्य हो ऊन। दत्तात्रेय राहिला आपण।
दुर्वास चंद्र निरोप घेऊन। गेले स्थाना आपुलाले॥ ७०॥
अनसूयेच्या घरीं देखा। त्रयमूर्ति राहिली मूर्ति एका।
नाम दत्तात्रेय ऐका। मूळपीठ श्रीगुरुचें॥ ७१॥  
ह्या श्रीदत्तमूर्तिला श्रीगुरुंचे ‘मूळपीठ’ म्हटलेले आहे.
                    श्रीदत्तगुरुंना आद्यगुरु मानले तर त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा स्त्रोत निश्चित कोठे असेल? ह्या प्रश्नाचे उत्तर श्रीदत्तगुरुंनी सांगितले आहे.श्रीदत्तात्रेयांनी सांगितलेले त्यांचे २४गुरु हे आपल्या आजुबाजूच्या निसर्गातील आहेत.
        हे २४ निसर्ग गुरु श्रीदत्तात्रेयांनी सांगितलेल्या क्रमाने समजून घेतले तर त्यात एक समान धागा  आहे .तो धागा आत्मा, शरीर, मन यांना एकमेकांत गुंफत मानवाला मोक्षाकडे घेऊन जातो.

सर्वप्रथम रहाण्याचे ठिकाण : पृथ्वी
१)पृथ्वी:
      मानव निर्मित  व निसर्ग निर्मित कितीही पृथ्वीवर आघात झाले,
              तरी पृथ्वी शेती, वृक्षवल्ली उत्पन्न करुन मानवाचे भले करते.
              हे सर्व काम निरपेक्षपणे पृथ्वी करते.
शिकवण : पृथ्वीकडून सहनशीलता, दुसऱ्याचे निरपेक्षपणे भले करणे.

२) पाणी : जीवनावश्यक गोष्ट.आज मंगळावरही माणूस पाण्याचा शोध घेतो.
                   पाणी स्वत: शुद्ध असते व ते स्वच्छ करण्याचे काम करते.
शिकवण :  पाण्याकडून शुद्धता.
                   सुज्ञ माणसाने आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांना  आपल्या ज्ञानाने
                    शुद्ध करावे.

३) हवा : जगण्यास आवश्यक घटक हवा.
                हवा सर्वत्र वहाते परंतु ती ज्या गोष्टींवरुन वहात असते,
               त्यांना बांधलेली नसते.
शिकवण :  सुज्ञ माणूस सर्व लोकांमध्ये वावरतो परंतू त्यांच्यात
                   बांधलेला नसतो.

४) अग्नी: अंधारात प्रकाशाची गरज
      अग्नी आपल्याला प्रकाश देतो.
शिकवण : प्रकाशणे.
        सुज्ञ माणसाने नेहमी त्याच्या ज्ञानाने व तपचर्येने प्रकाशावे.

५) आकाश : जगण्याच्या मुलभूत गरजा पूर्ण झाल्यावर आपल्या डोक्यावरचे छपर आकाश.
                   आकाशात  ढग, ग्रह, तारे असतात परंतु आकाश त्यांच्या संपर्कात नसते.
शिकवण :   त्याचप्रमाणे आत्मा शरीरात असतो परंतु तो शरीराच्या संपर्कात नसतो.
                 आत्मा शरीरापासून अलिप्त असतो.

६) चंद्र  : आकाशाच्या उदाहरणातून शरीरातील आत्मा.
               आत्म्याची शरीरातील स्थिती आकाशातील चंद्र.
               चंद्र हा परिपूर्ण आहे परंतु पृथ्वीच्या पडणाऱ्या छायेनुसार तो अमावस्येपर्यंत
               कमी होत जातो (क्षय म्हणजे कृष्णपक्ष म्हणतो) व  पौर्णिमेपर्यंत मोठा होताना
               दिसतो  (वृद्धी म्हणजे शुक्ल पक्ष म्हणतो).
शिकवण :  चंद्राप्रमाणे आत्मा हा परिपूर्ण व न बदलणारा आहे परंतु तो ज्या देहात धारण होतो.
               त्याप्रमाणे त्याला मिळणा-या उपाधीमुळे किंवा त्या व्यक्तीच्या गुण दोषांमुळे आत्मा
               झाकाळतो.

आत्म्याच्या ओळखीनंतर श्रीगुरुदेवदत्तांनी आपल्याला मनाकडे नेलेले दिसते.
७) सूर्य :
             सूर्याचा प्रकाश पाण्याच्या पात्रावरुन निरनिराळ्या प्रकारे परावर्तित होतो.
              सूर्याचा प्रकाश पृथ्वी तसेच पृथ्वीवरील सजीव निर्जीव अशा प्रत्येक गोष्टींवरुन
              परावर्तीत होतो. एवढेच कशाला चंद्रावरुनही प्रकाश परावर्तित होतो.
              परंतु श्रीगुरुदेवांनी इथे मन हे जलाशयाप्रमाणे असावे हे मुद्दाम सांगितलेले दिसते.
               सूर्याचा प्रकाश पांढरा असतो.
पांढरा रंग = लाल रंग + हिरवा रंग +  निळा रंग
                 स्वच्छ खोल जलाशयातील पाण्याचा तळ नेहमी हिरवे दिसतो.
                ह्याचे शास्त्रीय कारण सूर्याचा पांढरा प्रकाश ह्या स्वच्छ पाण्यातून खोल तळापर्यंत
               जाताना ह्या प्रकाशातील लाल रंग पाण्यात शोषला जातो व हिरवा रंग परावर्तित
               होतो.
शिकवण : सूर्याची  प्रकाशकिरणे आपल्यापर्यंत येत असतात, तशीच ब्रह्मतत्त्वाची – त्या
                सर्वव्यापी परमात्म्याची किरणे आपल्या पर्यत येत असतात. म्हणून आपले मन
                 हे नेहमी स्वच्छ पाहिजे.  तसेच ते उथळ नसावे, त्याची दारे सदैव उघडी पाहिजेत
                म्हणजे ही परमात्म्याची वैश्विक किरणे मनात खोलवर पोहोचतील. मन हे स्वच्छ
                असेल तर पाण्याप्रमाणे त्यातील काही किरणे आत्मसात करु शकेल व बाकीची
                 परावर्तीत होतील.
                 परंतू आपले मन गढूळ असेल तर ही किरणे परावर्तीत होतील .त्याचा आपल्याला
                  काहीच फायदा होणार नाही.

८ ) कबुतर : मनाची आसक्ती
                 एकदा श्रीदत्तात्रेयांनी कबुतराची जोडी त्यांच्या पिलांसकट पाहिली. पारध्यानी
                 टाकलेल्या जाळ्यांत पिल्ले अडकली तेंव्हा पिल्लांसाठी मातृत्वामुळे ह्या कबुतर
                 जोडीतील आईने - मादी कबुतराने त्या जाळ्यात उडी घेतली. हे पाहिल्यावर
                 नर कबुतराने कुटुंबासाठी त्या जाळ्यात उडी घेतली.  नर व मादी कबुतरांनी
                 जाळ्यात उडी घेतल्यावर आपण अडकणार हे माहित असतानासुद्धा उड्या
                 घेतलेल्या दिसतात.  आसक्ती त्यांना जाळ्यांत अडकवते म्हणजेच दास्यत्वाकडे
                 घेऊन जाते.
शिकवण :  आसक्ती हेच दास्यत्वाचे मुळ कारण असल्याने कोणत्याही प्रकारच्या आसक्तीत
                 अडकू नये.

मनाच्या विश्लेषणा नंतर जीवनास आवश्यक अन्न.
९ )अजगर : अजगर अन्न शोधण्यासाठी हिंडत नाही ते एकाच जागी रहाते.
                   त्या जागी त्याला जे भक्ष मिळते तेच त्याचे अन्न असते.
शिकवण :    ह्या अजगराकडून मी(श्रीगुरुदेवदत्त)  अजगर वृत्ती = अन्नाची अनिच्छा शिकलो.
                जे अन्न मला मिळाले त्यातच भागवायला शिकलो.
                               (‘ठेविले अनंते तैसेची रहावे    
चित्ती असू द्यावे समाधान’  ------- हेच खरे)

एका जागी  स्थिर  असून  विचलीत न होणे ह्याचे उदाहरण समुद्र.
१०) समुद्र :समुद्रात शेकडो नद्या पडत असतात म्हणजे शेकडो नद्या समुद्राला मिळत असतात.
                तरीही समुद्र आपली जागा सोडत नाही.
शिकवण : ह्या समुद्राप्रमाणे सुज्ञ माणसाने त्याच्या मार्गात कितीही मोह अडचणी संकटे आली,
                तरी आपल्या स्थानापासून विचलीत होऊ नये.

मनातील विकारांनी विचलीत : पतंग
११) पतंग :पतंग ज्याप्रकारे अग्नी कडे आकर्षित होऊन त्यात उडी घेतो व त्या आगीत मरतो
               त्याचप्रमाणे विकारवश्य माणूस सुंदर मुलीच्या प्रेमात पडून उद्धवस्त होतो. 
शिकवण :ह्या गोष्टीतून आपली नजर शुध्द पाहिजे व आपल्याला सत्वाची जाणीव पाहिजे,
               हे मी(श्रीगुरुदेवदत्त) शिकलो.
(माणसाने विकारवश्य होऊ नये. हल्ली आपण एकतर्फी प्रेम भंगातून होणा-या आत्महत्त्या तसेच त्यातून पुढची पायरी acid ने हल्ला, खून, बलात्कार अशी अधोगती -  बातम्या वाचतो ऐकतो.)

१२) भ्रमर :भ्रमर एकाच फुलातून मध गोळा करीत नाही. निरनिराळ्या फुलांतून मध
                गोळा करतो.
शिकवण :     त्याप्रमाणे मी(श्रीगुरुदेवदत्त) माधुकरी वृत्तीने भिक्षा मागतो. एकाच घरावर
                  माझा भार टाकत नाही निरनिराळ्या घरांतून भिक्षा गोळा करतो
                   संन्यासी  लोकांनी अन्नासाठी माधुकरी  मागावी.

अन्न मिळवून आणल्यावर साठवण (? )
१३) मध माशी: मधमाशी मोठ्या कष्टाने मध पोळ्यात साठवते. मध गोळा करणारा
                      माणूस सहज त्यातला मध काढून घेऊन जातो. ह्याप्रमाणे माणूस सुद्धा
                     मोठ्या कष्टाने संपत्ति वगैरे गोष्टी साठवतो, परंतु एक दिवस मृत्यु देवता
                     ह्या वस्तूंपासून त्या व्यक्तीला दूर घेऊन जाते.
शिकवण : ह्या गोष्टीवरुन मी(श्रीगुरुदेवदत्त) शिकलो वस्तू साठवणे निरुपयोगी आहे.
१४) हत्ती :
               एकदा एका नर हत्तीला पकडण्यासाठी सापळा रचलेला होता. ह्या सापळ्यात
                    हत्तीला पकडण्यासाठी खड्डा करुन तो गवताने झाकलेला होता. ह्या गवतावर
                    कागदी लगद्याची मादी हत्तीची मूर्ति उभी केलेली होती. मादी हत्तीच्या
                    लालसेपोटी नर हत्ती तिला भेटायला त्या गवतावर  आला व सापळ्यात  
                    अडकला. सापळा लावणारा माणसाने अंकूशाच्या सहाय्याने नर हत्तीला जेरबंद
                    केले . मादी हत्तीच्या लालसेपोटी नर हत्ती स्वत:चे स्वातंत्र्य गमावून जन्मभराचा
                    दु:खी झाला.
शिकवण : लालसा हेच दु:खाचे मूळ कारण असल्याने माणसाच्या मनात लालसा असू नये, ही
                गोष्ट मी (श्रीगुरुदेवदत्त) हत्तीकडून शिकलो.

१५) हरिण : संगीताच्या ओढीने हरीण पारध्याच्या जाळ्यात अडकतो, त्याचप्रमाणे
                चारित्र्यहीन स्त्रीच्या संगीताकडे माणूस आकर्षित होऊन आयुष्यात उद्धवस्त
                होतो.
शिकवण :  विषयासक्त किंवा कामुक संगीत ऐकू नये हा धडा मी (श्रीगुरुदेवदत्त) 
             हरीणाकडून शिकलो.
             चारित्र्यहीन स्त्रीचे संगीत आयुष्य उद्धवस्त करते.

(चारित्र्यहीन स्त्री व विकारवश्य माणूस यांना श्रीगुरुदेवांनी गैर मानलेले दिसतात.
जीवनाच्या गरजेमुळे नर्तिका, गणिका, वेश्या बनलेल्या स्त्रीला गैर मानीत नाहीत.)

१६)गणिका :विदेह ह्या नगरीत पिंगला नावाची गणिका(नर्तिका ) होती. ती एका रात्री
                गिऱ्हाईकांची वाट पाहून थकली. शेवटी तिच्याकडे जे होते, त्यातच समाधान
                मानून शांत झोपली.
शिकवण :   ह्या चारित्र्यहनन झालेल्या स्त्रीकडून मी(श्रीगुरुदेवदत्त) आशेचा त्याग केला
                 असता आयुष्यात समाधान मिळते.

१७) डोंबकावळा :डोंबकावळ्याने मांसाचा तुकडा उचलला, परंतु बाकीच्या पक्षांनी त्याचा
                     पाठलाग केला, त्याच्यावर हल्ला चढवला तेंव्हा  डोंबकावळ्याने तो मांसाचा
                       तुकडा फेकून दिला व शांती मिळवली.
शिकवण :  ह्या डोंबकावळ्याप्रमाणे मी(श्रीगुरुदेवदत्त)  जीवावर बेतणाऱ्या वस्तूंचा त्याग
              करायला शिकलो.
(विषाची परिक्षा घेऊ नाही.)

जीवनातील आनंद कसा घ्यावा?
१८) लहान बाळ : लहान बाळ  दूध पिताना अतिशय आनंदी तसेच चिंतामुक्त असते.
शिकवण :   ह्या लहान बाळाकडून मी (श्रीगुरुदेवदत्त)  आनंदी रहायला शिकलो.

१९)विवाहयोग्य उपवर मुलगी :एकदा एका घरी विवाहयोग्य मुलगी एकटी असताना मुलाकडचे
                    लोक तिला पहायला आले. ह्या मुलीने त्यांचे आगतस्वागत केले .त्यांना बसायला
                    आसन दिले व बाहेर गेलेले आपले आईवडील परत येईपर्यंत स्वयंपाकाची तयारी
                    म्हणून भात कांडायला घेतला.
(त्याकाळी पॉलिश केलेला तादूळ ,कणीक बनविण्यासाठी चक्की नव्हती.)
भात कांडताना तिच्या लक्षात आले  --- आपल्या हातातील बांगड्यांच्या होणाऱ्या आवाजावरुन मुलाकडच्यांना आपल्याकडे भात कांडायला कोणी नोकर नाही. आपण स्वत: हे काम करीत आहोत हे समजेल. तिला आपल्या गरीब सांपतिक स्थितीचे प्रदर्शन करायचे नव्हते, म्हणून तिने प्रत्येक हातांत फक्त दोन बांगड्या ठेवल्या व बाकीच्या बांगड्या काढून टाकल्या व भात कांडायला सुरवात केली. ह्या उरलेल्या दोन बांगड्या एकमेकांवर आपटल्याचा आवाज येत होता. तिने परत प्रत्येक हातातली एकएक बांगडी काढली. आता दोन्ही हातात एक-एक बांगडी राहिल्यामुळे बांगड्यांचा आवाज येणे बंद झाले व भात कांडण्याचे काम पाहुण्यांच्या अपरोक्ष ह्या मुलीने बिनबोभाट पूर्ण केले.
शिकवण :जास्त लोक एकत्र आले की वाद-विवाद भांडणे सुरु होतात. दोन लोक एकत्र आले तरी  शाब्दिक चमक होते म्हणून संन्यासी माणसाने एकान्तवासांतच रहावे .

(“संन्यासी माणसाने एकान्तवासांतच रहावे पण कुठे रहावे?”)

२०) मासा:
                  माशाला पकडण्यासाठी माणूस अन्नाचे अमिष असलेली जाळी पाण्यात टाकतो.
                  ह्या जाळ्यातील अन्नाच्या लोभापायी मासा अन्न खायला जाळ्यात येतो व
                  अडकतो.
शिकवण :   लोभापाशी माणूस   स्वत:चे स्वातंत्र्य गमावतो व देशोधडीला लागतो
                  हे मी (श्रीगुरुदेवदत्त) माशाकडून शिकलो.

२१)साप :साप स्वत:साठी बिळ कधीच तयार करीत नाही. दुस-याने बनविलेल्या बिळात रहातो.
(आयत्या बिळात नागोबा)
शिकवण :त्याप्रमाणे संन्यासी माणसाने स्वत:साठी घर कधीच बांधू नये. त्याने डोंगरातील गुहा
              किंवा लोकांनी बांधलेल्या मंदिरात रहावे.

(अन्न, निवारा ह्या गरजा भागल्यानंतर जीवन जगण्यासाठी जरुरीचे असलेले काम धनुष्य बनविणाऱ्या कारागीराप्रमाणे एकाग्र चित्ताने करावे.)
२२) धनुष्य बनविणारा कारागिर :एकदा एक कारागीर धनुष्य एकाग्र चित्ताने धनुष्य बनवित
                      असताना त्याच्या दुकानासमोरील रस्त्यावरुन राजा गेला. दुसऱ्या एका
                      माणसाने ह्या कारागीराला आत्ता ह्या रस्त्यावरुन राजा गेला का? म्हणून
                      विचारले असता, धनुष्य बनविणाऱ्या कारगीराला काहीच माहित नव्हते.
                     तो कारागीर आपल्या कामात मग्न होता त्याला आजुबाजूचे काहीच भान
                      नव्हते. प्रत्यक्ष राजा समोरुन गेल्यावर रस्त्यावर झालेली धावपळ कारागीराला
                      समजली नाही.
शिकवण :      ह्या कारागीराप्रमाणे कोणतेही काम मन पुर्णपणे एकाग्र करुन करावे.

(मन एकाग्र करताना मनाच्या विचाराच्या भोवऱ्यात गुंतू नका. शेखमहंमदी करु नका.)
२३)कोळी :कोळी आपल्या स्वत:च्या लाळेने सतत जाळे विणत असतो. ह्या स्वत:च विणलेल्या
               जाळ्यात तो कोळी अडकतो. सर्वसामान्य माणूस स्वत:च्याच कल्पनांच्या जाळ्यात
               गुरफटून जातो.
शिकवण :   सुज्ञ माणसाने जगाचे ऐहिक विचार त्याग करुन परमेश्वराचे विचार करावेत.

२४) मोगरा :मोगरा नावाचा किडा दुस-या किड्याला पकडून आपल्या घरट्यांत आणतो
                  व पकडलेल्या किड्याला टोचा मारतो. हा पकडून ठेवलेला किडा सतत त्या
                   घरट्यात घाबरलेला असतो. त्याला वाटते तो पकडणारा किडा परत येईल व
                  आपल्याला टोचा मारेल. ह्या सततच्या भितीयुक्त विचारातून पकडलेला किडा
                   टोचा मारायला शिकतो. ह्या मोगरा ह्या किड्याप्रमाणे मनुष्यही सतत जसे
                   विचार करतो, तसाच बनतो.
(इथे प्रश्न मनांत येतो की घाबरलेला किडा एक दिवस टोचा मारायला कसा काय शिकला ?
सततच्या दडपणांत राहिलेला जीव एक दिवस ते दडपण झुगारुन देतो.
 एका गावातील राजकारणात घडलेली सत्य घटना :
 राजकारणात शेवटी मतपेटी निर्णायक असते .एकदा एका महिला समितीच्या सभापदी पदाची निवडणुक सत्ताधारी जास्त मतैक्य असलेल्या पक्षाने प्रतिष्ठेची ठरवली.
आपल्याच पक्षाची  महिला ह्या समितीची सभापती झाली पाहिजे ,म्हणून त्याच पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींना एका केबीन मध्ये डांबून ठेवले. त्यांचे आदरातिथ्य व्यवस्थित चालू होते.
परंतू सकाळपासून मतदान संपायच्या अर्धा तास आधीपर्यंत सतत नजरकैदेत ठेवले.
ह्या सततच्या दडपणाला स्वाभाविकच ह्या मतदार महिला लोकप्रतिनिधी वैतागल्या .
त्यांनीही आपापसांत ठरविले ही दडपशाही मतपेटीद्वारे झुगारुन द्यायची  .
वास्तविक खुल्या वातावरणांत निवडणुक झाली असती तर ह्या बंदिस्त महिला प्रतिनिधी
स्वत:च्याच पक्षाला मत देणार होत्या .
बंदिस्त किडा जसा टोचा मारयला शिकला तशीच प्रतिक्रिया ह्या महिला लोकप्रतिनिधींची झाली.
बंदिवासातून बाहेर पडल्यावर मताचे दान अल्पमतात असलेल्या विरोधी पक्षाच्या महिला उमेदवाराच्या पदरांत टाकले.
ही  विरोधी पक्षाची महिला उमेदवार विनासायास सभापती झाली व सत्ताधारी पक्ष त्यांच्याच कर्माने प्रतिष्ठेची निवडणूक  हरला.)

शिकवण :ह्या मोगरा व त्याने पकडून आणलेल्या किड्याप्रमाणे जर सतत आत्म्याचे विचार
             आत्मसात केले, स्वत:च्या देहासंबंधीची आसक्ती सोडून दिली तर मोक्ष किंवा मुक्ति
              मिळेल.
  (तुमच्या सततच्या विचांराप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्व बनते ,ह्या मानसशास्त्रातील सिद्धान्ताच्या आधारे  मनाला मोक्षाच्या मार्गाकडे श्रीगुरुदेवदत्त घेऊन जाताना दिसतात.)

                       अशाप्रकारे तुम्ही रहात असलेल्या पृथ्वी पासून सृष्टीतील गुरुंच्या माध्यमांतून    मोक्षाकडे नेताना आप, तेज, वायू ,पृथ्वी, आकाश, पशू ,पक्षी, प्राणी, किटक तसेच माणसातील कारागीर ह्या गुरुंच्या स्थानांत निष्पाप बाळ अगदी वेश्येला सुद्धा स्थान आहे पण चारित्र्यहीन स्त्रीचे संगीत व विकारवश माणूस त्याज्य आहे.

                ओक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक श्री. मार्टीन हाय ह्या भूगर्भ शास्त्रज्ञाने २००७ साली कॅनेडिअन पर्यावरण विषयक जर्नलमध्ये श्रीदत्तात्रेय व त्यांचे २४ गुरु ह्यावर लिहिलेल्या शोधनिबंधात निसर्ग विषयक जाणीवांचे जगातील आद्य जनक म्हणून श्रीगुरुदत्तात्रेयांना गौरविले आहे.
                 आजच्या युगांत आपण  ‘प्रदुषण’, ‘पर्यावरण मित्र’ वगैरे संकल्पनांचा सतत उहापोह निसर्ग जपण्यापेक्षा जास्त करीत असतो परंतु श्रीदत्तात्रेयाने ह्या निसर्गालाच  पूज्यनीय अशा गुरुस्थानी ठेवले. निसर्ग गुरुस्थानी  मानल्यावर त्याचा  ऱ्हास  माणसाकडून आपोआपच थांबेल.
॥ जय श्रीगुरुदेवदत्त॥
                                                    --------------- श्रीगुरुचरित्र आशय – निधी

                                ताजा कलम                               दि. १७/ जानेवारी /२०१४
ह्या वेब साईटवर
                                    अर्पणपत्रिका, प्रस्तावना, प्रयोजन प्रकाशित