Friday, 17 August 2018

समाज संघटकास आदरांजली


                                             १९५२ साल असावे बहुतेक. निवडणूका नुकत्याच पार पडल्या होत्या. नगरपरिषद निवडणूकांनंतर एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कै. अटलबिहारी वाजपेयी यांचा विदर्भ दौरा चालू होता. अकोला येथे अटलबिहारीजींची सभा आयोजित करण्यात आली. जनसंघाचे कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने शहरांत जमत होते. आपल्या मुत्सद्दी, धुरंधर, प्रतिभासपन्न नेत्यास पहाण्यासाठी-ऐकण्यासाठी स्वयंसेवक उत्सुक होते.   

                        टाळ्यांच्या गजरात मा. अटलबिहारी वाजपेयींचे आगमन झाले. सभा सुरु झाली. मा. अटलबिहारी वाजपेयींनी बोलण्यास सुरवात केली. श्रोते एकाग्रचित्ताने भाषण ऐकू लागले. आपल्या भाषणांत अटलजींनी श्रोत्यांना म्हणाले, “ नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या लोकांनी हात वर करावेत.” निवडून आलेल्या नगरसेवकांनी वर केलेल्या हातांमध्ये, महिलावर्गामधून एका महिलेचा हात वर केलेला दिसत होता.

                         मा. वाजपेयींनी लगेच विचारले,”जनसंघाच्या ‘दिवा’ निशाणीवर कोण-कोण विजयी झाले आहेत ?” सर्व सभा अवाक्  झाली. प्रश्न मोठा गहन होता ! भारतीय जनसंघ नुकताच १९५१ साली दिल्ली येथे अस्तित्वात आला होता. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नेतृत्व जनसंघास लाभले होते. मा. अटलबिहारी वाजपेयी त्यांचे व्यक्तिगत कार्यवाह म्हणून काम पहात होते. नुकत्याच जन्माला आलेल्या जनसंघाच्या तिकिटावर निवडूक लढविण्याचे धाडस कोण करणार ? जनसंघाच्या कार्याविषयी आत्मीयता असलेले लोकही अपक्ष म्हणून विजयी झाले होते.एकंदरीत अटलजींचा प्रश्न, विदर्भात अनुत्तरीत रहाणार! महिला वर्गातून हात वर केलेल्या बाई उभ्या राहिल्या आणि मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाल्या, “मी सौ. गौरबाई करमरकर बुलढाणा नगरपरिषदेवर ‘दिवा’ ही निशाणी घेऊन  जनसंघातर्फे निवडून आले आहे.” सर्व सभेचे लक्ष ह्या महिलेने वेधून घेतले. ती महिला वयाने ४०च्या घरातील, किंचित स्थूल बांधा, रंग गोरा, उंची बेताची, नाकीडोळी नीटस, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज, आवाज खणखणीत, नऊवारी साडी, अंबाडा, रहाणीवरुन मध्यम वर्गातील. शिक्षण म्हणाल तर, कानडी ३ इयत्ता शिकलेली. सरावाने मराठी लिहिता-वाचता येणारी, अशी ही महिला पाहून सर्व सभा स्तब्ध झाली.

                         बुलढाणा येथे घरांत पुरुष एकटा मिळवता असताना, आपला सहा मुलांचा संसार टुकीत सांभाळणाऱ्या सौ. गौरबाई करमरकर  ह्या मध्यम वर्गीय महिलेचा समाजकार्याकडे ओढा होता. ती स्वतः हिंदूत्वनिष्ट तसेच सावरकर भक्त होती. तिला वाचनाची आवड होती. आजूबाजूच्या महिला गोळा करुन, दुपारच्यावेळी चांगल्या पुस्तकांचे तिच्या घरी वाचन चालत असे. राष्ट्र-सेविका समितीची ती निष्टावान कार्यकर्ती होती. झोपडीतील तिच्या कार्यामुळे संपूर्ण गावात ‘आक्का करमरकर’ म्हणून तिची ओळख होती. जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी तिला नगरसेविका म्हणून निवडणूकीस उभी करण्याचा घाट घातला. आक्का करमरकर निवडूक लढविण्यास तयार नव्हती. लोकाग्रहास्तव तिने निवडूक लढवली आणि कॉंग्रेस उमेदवाराचा दणदणीत पराभव करुन ती निवडून आली. कॉंग्रेसची उमेदवार बुलढाण्यातील प्रसिद्ध वकीलांची पत्नी, हायस्कूल पर्यंत शिकलेली तसेच निरनिराळ्या संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या होत्या. सौ. गौरबाई करमरकरांच्या समाजकार्याची मतदारांनी पावती दिली. ह्या विजयी उमेदवाला पहिला हार कॉंग्रेसच्या पराभूत महिला उमेदवाराने घातला. स्वतः पराभूत होऊनही केवढा मनाचा मोठेपणा! ह्या बाईंनी दाखविला.

निवडणूकीच्या पत्रकांचा फक्त रु.१७/= एवढाच खर्च सौ.गौरबाईंनी केला होता. मिरवणूकीत मिरवत सौ.गौरबाई गेल्या नाहीत. मिरवणूकीनंतरच्या सभेत व्यासपीठावरुन भाषण करताना आक्का करमरकर म्हणाल्या, “निवडणूक होई पर्यंत पक्षीय राजकारण; निवडून आल्यावर आता मी तुम्हा सर्वांची प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे.“

                            पराभूत उमेदवाराने विजयी उमेदवाराचे सर्वप्रथम केलेले अभिनंदन तसेच पदभार स्वीकारल्यानंतर पक्षीय राजकारण दूर ठेवून समाजसेवा करण्याची वृत्ति हल्ली क्वचित आढळते. निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी, राजकीय पक्षांची चाललेली चढाओढ  आपण सध्या पहातो.

                               १९५२ सालच्या अकोला येथील सभेत जनसंघाची निशाणी घेऊन विजयी झालेल्या बुलढाण्याच्या सौ. गौरबाई करमरकरांचा श्री. अटलबिहारी वाजपेयींनी भरसभेत आपल्या भाषणात कौतुकाने उल्लेख केला. ‘जनसंघाची निशाणी, जनसंघाचे विचार’ ह्यांची निवडणूक विजयातून समाजात होणारी प्रतिष्ठापना ही लोकशाहीची गुरुकिल्ली ठरली. एक प्रवाही शैलीचा वक्ता, संवेदनशील कवी, विचारवंत लेखक, धडाडीचा पत्रकार आणि दूरदृष्टी असलेला लोकनेता  अटलजींच्या भाषणातून वऱ्हाडी माणसाने अनुभविला.   

                               निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या संख्याबलापेक्षा पक्षाची विचारधारा-तत्वप्रणाली समाजात रुजविणाऱ्या अजातशत्रु संघटक कै. अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली.

अनुप्रभा, नाशिक

www.shrigurucharitra.com

Thursday, 26 July 2018

व्रतस्थ (बालवाडी) गुरु : श्रीमती आक्का लेले


                                 “वैनी, का रडवता लेकीला ? काय म्हणते?” हा आवाज कानी पडताच मी मागे वळून पाहिले. आक्का लेले मला विचारत होत्या. मी रोजच्या सारखी माझ्या मुलीची समजूत घालत होते. मी म्हणाले, “अहो काय करायच? तिला इतर मुलांसारखे शाळेत जायचे! ही मुलगी २॥ वर्षांची. हिला शाळेत कोण घेणार? माझा हा रोजचा परिपाठ आहे, तिची समजूत घालणे.” त्या लगेच म्हणाल्या, “मी घेऊन जाईन की तिला शाळेत. मी शाळेतच चालले आहे.” मी त्यांना म्हणाले, “अहो, तिला धड चालता येत नाही.” त्या म्हणाल्या, “त्यात काय ! मी तिला कडेवर घेईन.” लगेच आमचे कन्यारत्न खूष. पाटी- पेन्सिल, दप्तर, डबा वगैरे आयुधांसह सज्ज.

                                    रोज आक्का तिला घेऊन शाळेत जाऊ लागल्या आणि तिला शाळेची गोडी लागली. आपण ऐकतो की, मुले शाळेत जाताना रडतात, हटून बसतात, ऐन शाळेच्या वेळी त्यांच्या पोटांत दुखते, कधीतरी डोके दुखते म्हणतात. पण मला मात्र असा अनुभव कधीच आला नाही, ह्याचे कारण शाळेची गोडी लावणाऱ्या आमच्या ‘आक्का लेले’. इतकी वर्षे लोटली. माझ्या मुलीचे (अनुराधाचे) शिक्षण संपून ती आपल्या व्यवसायांत रमली.
                                           आक्कांची माझी बऱ्याच वर्षांत भेट-गाठ नाही. पण अधून-मधून त्या माझ्या मनांत डोकवतात. त्यांचा विचार जरी माझ्या मनांत आला की, माझ्या मनःचक्षूसमोर त्यांची ठेंगणी- ठुसकी, सावळी, नीटनेटकी साधी व स्वच्छ सुती नऊ वारी पातळ नेसलेली, केसांचा अंबाडा घातलेली मुर्ति उभी रहाते. खर सांगायचे तर त्यांचे पूर्ण नाव ही त्याकाळात कुणाला माहित नव्हते. ‘त्यांचे शिक्षण किती झाले आहे ?’ हा प्रश्नही आमच्या मनात येत नसे. एवढेच माहित होते की त्या विधवा आहेत व राणी भवनमध्ये लहान मुलांना शिकवितात. त्या त्यांच्या दोन भावांमध्ये रहातात. त्यांचे भाऊही फार सज्जन व सरळमार्गी होते. बहिण-भावांचे नाते अतुट कसे असावे ? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे लेले कुटुंब. आक्का तशा अबोल होत्या. कोणाशी मैत्रीचे संबंध त्यांनी जोडले नाहीत, पण कोणाशी वाद-विवाद केले नाहीत. स्वतःच्या दोन भावजयींशी त्या जुळवून घेत. त्या दोघी जावा आक्कांना मानाने वागवत असत. त्यांच्या घरांतून कोणाचे चढलेले आवाजही कधी ऐकू आले नाहीत. आक्का म्हणजे शांत सागर.

                             रोज सकाळी १०:४५  वाजता त्या शाळेत जावयास निघत त्यांच्या बरोबर आजूबाजूचा परिसरातली ४-५ छोटी मुले असत. त्यांत माझी मुलगी. एकवेळ घड्याळ चुकेल पण आक्कांची शाळेत जायची वेळ मात्र ठराविक. त्यांच्या जाण्या-येण्यावरुन लोक आपली घड्याळे लावत असत. ‘आपल काम बर की आपण बरे’ हे आक्कांच्या जीवनाचे तत्त्व असावे.

                                 आक्का जन्मजात शिक्षक होत्या. मुलांचे ‘मानसशास्त्र’ हा शब्द त्यांना माहितही नसेल, पण प्रत्यक्ष कृतीतून त्यांचे बालमानसशास्त्रावर आधारित अध्यापन दिसत असे. हसत-खेळत अध्यापन हा त्यांच्या अध्यापनाचा केंद्रबिंदू होता. मुलांना त्या अभिनयासह गाणी शिकवत, गोष्टी सांगत, श्लोक शिकवित, विविध खेळ शिकवित असत. अशा अनेक उपक्रमांतून मुलांवर चांगले संस्कार करण्याचे कार्य त्या करित असत. हल्लीच्या अभ्यासक्रमातून पाठांतर नाहीसे झालेले आहे. पाठांतरातून मुलांचे शब्दोच्चार सुधारतात, स्मरणशक्ती वाढते, शब्दसंपत्ती वाढते, ह्याची त्यांना जाणीव होती. हल्ली शिक्षकांचा समाजातर्फे, शासनाद्वारे ‘आदर्श शिक्षक’ म्हणून सत्कार होतो. मला वाटते त्या काळी ही प्रथा नव्हती. आक्कांचा शासनातर्फे समाजाकडून सत्कार न होऊ देत, पण त्यांच्या सहवासांत आलेल्या विद्यार्थ्यांच्या इतकेच नव्हे तर पालकांच्या मनात त्यांनी मानाचे स्थान पटकाविले आहे.

                                विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाची गोडी निर्माण झाल्यावर; त्या अक्षर-ओळख,अंक-लेखन शिकवित असत. तसेच मुलांची पहिलीच्या अभ्यासक्रमाची तयारी आक्का करुन घेत असत. त्याकाळी जु. स. रुंग्ठा हायस्कूलच्या आदर्श प्राथमिक शाळेत ह्या मुलांची पहिलीची परिक्षा घेतली जायची. स्वतः आक्का विद्यार्थ्यांना रांगेने नेऊन ह्या परिक्षेला बसवत असत. माझ्या मुलीचे शिक्षण ह्याच तऱ्हेने झाले. तिच्या वर्गातली सर्व मुले-मुली १लीची पास होऊन नव्या शाळेतील दुसरीत गेली. आम्हा पालकांना कोणताच त्रास झाला नाही.

                                  हल्ली आपण पहातो, शाळेत प्रवेशासाठी पालकांना किती खटपटी लटपटी कराव्या लागतात. काही ठिकाणी पालकांचे इंटरव्ह्यू, त्यानंतर डोनेशन त्यात वशिलेबाजी ---- ह्या सर्व चक्रातून फिरल्यावर बालकाचा नंबर लागून शाळा-प्रवेश. ‘मूल जन्माला येण्याआधी शाळेत प्रवेश घेऊन ठेवावा’, हा विनोदही सध्या प्रसिद्ध आहे.

                               माझ्यामते शिक्षक जन्माला यावा लागतो.कोणालाही शिक्षक होता येत नाही. शिकविणे ही कला आहे. ही कला ज्याला आत्मसात करता येते, तोच खरा शिक्षक. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या आक्का लेले.

पुष्कळवेळा वाटते, भारतात उत्तम शिक्षक निर्माण झाले तरच अभिमानाने म्हणू शकू भारत माझा महान.

श्रीमती प्रभा आठवले

माजी शिक्षिका, ग. ग. हायस्कूल, नाशिक

Monday, 23 July 2018

माझी आत्या - एक समर्पित जीवन


                           

                          ‘लेले आक्का, लेले बाई, आत्याबाई’ अशा अनेक नावांनी माझी आत्या प्रसिद्ध होती. कारण ती होतीच तशी, तिने आपले सगळे आयुष्य जणु दुसऱ्यासाठी समर्पित केले होते.

                              माझ्या आठवणींमध्ये माझी आत्या म्हणजे आमच्या घरातील एक सदस्यच होती. तिचे वेगळे असे घर नव्हते, कारण ती

विधवा होती आणि माझ्या जन्माच्या आधीपासूनच आमच्या घरी ती रहात होती.

                             ती जरी भाऊ - भावजयीमध्ये रहात होती, तरी तिचा भार तिने त्यांच्यावर कधी पडू दिला नाही. दि. १७ ऑगस्ट १९१५ रोजी जन्मलेल्या आत्याचे शिक्षण ७वी पर्यंत झाले होते. त्यामुळे ‘राणी भवन’ येथे ती बालवाडी शिक्षिका म्हणून तिची नेमणूक झाली होती. नंतर तिला १लीचे वर्ग पण शिकविण्यास दिले गेले. काही वर्षे ती ‘रिमांड-होम’ मध्ये पण शिकविण्यास जात असे. तसेच आमच्या घराजवळील लहान मुलांच्या १ली ते ४थी पर्यंतच्या शिकविण्या ती घेत असे. तिने १९४० साली ‘सृष्टी निरीक्षण’ म्हणून एक परिक्षा दिली होती. त्या परिक्षेत तिला ५०% मार्क मिळाले होते.

                         घरातील सर्व वरची कामे ती करत असे. उदा. पिण्याचे पाणी भरणे, कपडे धुणे, कपड्यांना इस्त्री करणे. मला आठवते की, आम्हा सर्व भावडांच्या शाळेच्या युनिफॉर्मला १५ ऑगस्ट व २६ जानेवारी ह्या दिवशी ती इस्त्री करुन देत असे. तसेच वडील व काकांच्या कपड्यांना  आठवड्यात एकदा इस्त्री ती करत असे.

                        फावल्या वेळांत शिवण काम करत असे. आम्ही दोघी बहिणी व आमच्या चुलत दोन बहिणी ह्यांचे फ्रॉक कापड विकत आणून ती स्वतः शिवत असे. घरात दोघी वहिनी (माझी आई व काकू) असल्यामुळे स्वयंपाकाची वेळ तिच्यावर फारशी कधी आली नाही. परंतु अडचणीला मात्र ती स्वयंपाक करत असे. अशा तऱ्हेने ती कधीही रिकामी बसली नाही. आजारपण तिला माहित नव्हते.

                     आमच्या घरात आम्ही १३ माणसे रहात होतो. आम्ही सख्खे व चुलत मिळून ८ भावंडे, माझे आई-वडील काका-काकू व आमची आत्या  – ‘कै. पार्वती शंकर लिमये’.

                          माझ्या जन्मापासूनच ती आमच्या घरी होती. त्यामुळे असेल पण, आत्या  ही प्रत्येक घरी कुटुंबात असतेच, असा माझा समज होता. नवरा गेल्यानंतर ती भावांच्या आधाराने राहिली. तिला स्वतःचे मूल-बाळ नव्हते. तिची १ मुलगा व १ मुलगी अशी  दोन सावत्र मुले होती. तिचा सावत्र मुलगा वर्षातून एक-दोनदा तिला भेटायला यायचा. काही भेट-वस्तु, साडी वगैरे गरजेच्या वस्तू तिला देऊन जायचा. तो इंजिनिअर होता. पुण्याला मोठ्या पोस्टवर त्याला नोकरी होती. आता हयात आहे की नाही हे मला माहीत नाही.

                            सावत्र मुलीकडे मात्र ती जात असे. सावत्र मुलीची कोठुरला मोठी शेतीवाडी होती. तिचे कुटुंब पण मोठे होते. त्या मुलीचे आमच्या घराशी चांगले संबंध आहेत. लहानपणी आम्ही आत्याबरोबर सुट्टीत कोठुरला जात असू.

                             ती कधीही कुणाशी भांडली नाही. तिचा पूर्ण दिवस कामात व्यस्त असे. काही वर्षांनी शाळा वगैरे बंद झाल्यावर ती घरी कधीच स्वस्थ बसली नाही. माझ्या मोठ्या चुलत भावाने गाई-म्हशींचा धंदा  सुरु केला. गाई म्हशींचे शेण काढणे, गोठा स्वच्छ ठेवणे ह्यासारखी कामे  तिने आनंदाने केली. ह्या कामात तिला कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही.

                                आज मला कळते की, तिने स्वतःसाठी कधीच काही घेतले नाही. नोकरी करीत होती तरी छान-छोकी केली नाही. स्वच्छ नऊवार पातळ, स्वतः शिवलेले पोलके, केसांचा अंबाडा, हातात फक्त घड्याळ - बस ह्या व्यतिरीक्त कुठलेही दागिने नाही की भारीतली साडी नाही. तिची रहाणी स्वच्छ व टापटीप होती.

                                   ती कधीही रिकाम्या हाताने नातेवाईकांकडे जात नसे. तिचा खाऊ ठरलेला असे. शेवपापडी, दहीवडे दत्त-जयंतीला पेढे, गोळ्या- बिस्किटे. आम्ही घारपुरे घाटाच्या बाजूला रहात होतो, तेव्हा ती रोज पायी रविवार कारंजा येथील तेल्या रामाच्या दर्शनाला जाई व घरी परताना घरच्या देवासाठी फुलपुडा घेऊन येत असे.

                      अशा ह्या शांत स्वभावाच्या कष्टाळू आणि प्रेमळ आत्याला मी कधीही विसरु शकत नाही.

सौ. सुरेखा खरे

इंदिरा नगर,नाशिक

Sunday, 10 December 2017

अतिथी देवो भव।


{सत्य घटनेवर आधारित कथा}

                                     त्यादिवशी भोसला मिलिटरी स्कूलमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळेतील विद्यार्थीवर्ग, अध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग सर्वजण कामात दंग होते. मधूनमधून मुख्याध्यापकांची फेरी होत होती व ते सूचना देत होते. कोणी शाळेची स्वच्छता करण्यात दंग होते, तर कोणी वर्ग सजावटीत दंग होते. अध्यापक वर्ग मुलांच्या कामावर लक्ष ठेवून बोर्डवर सुविचार, सुभाषिते विद्यार्थ्यांकडून लिहून घेत होते. कर्मचारीवर्ग घोडे व घोड्याची पागा, कवायतीचे ग्राऊंड, मेसची जागा, शुटींगचे ग्राऊंड स्वच्छ करण्यात गढला होता.

                  उद्या ब्रिटीश अधिकाऱ्याची शाळेला अचानक भेट होणार होती. ते १९४२ साल होते. देश गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीने भारावलेला होता. इंग्रजांची सत्ता उखडून टाकून देश स्वतंत्र करावयाच्या ईर्षेने भारतीय जनता पेटून उठली होती. असहकाराचे अस्त्र पुकारले गेले. सत्याग्रह, मोर्चे, प्रभात फेऱ्या, रेल्वे रूळ तोडणे, टेलीफोनच्या तारा तोडणे असे अनेक मार्ग हाताळण्यात आले. इंग्रज राज्यकर्ते  धरपकड, गोळीबार, लाठीमार वगैरे अनेक तंत्राचा वापर करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न  करीत होते.

                          अशा तंग वातावरणात ब्रिटीश अधिकाऱ्याची शाळेला भेट होती. ‘सत्तेपुढे शहाणपण काय कामाचे!’ ब्रिटीश अधिकाऱ्याचे स्वागत करणे, संस्थेला प्राप्त होते.

                  दुसरे दिवशी ब्रिटीश अधिकाऱ्याचे लवाजम्यासह आगमन झाले. मिलिटरी स्कूल असल्यामुळे लष्करी पद्धतीने शिस्तीत स्वागत झाले. बॅंड पथकाच्या साथीने कवायत, राईडिंग, स्वीमिंग, शुटींग वगैरे उपक्रम क्रमाक्रमाने दाखविण्यात आले. नियोजनबद्ध कार्यक्रम पाहून पाहुण्यांच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते.

                       कार्यक्रम संपल्यावर सर्व विद्यार्थी असेंब्लीत एकत्रित झाले. व्यवस्थित युनिफॉर्ममधले शिस्तीत बसलेले विद्यार्थी, कार्यक्रमाची शोभा वाढवित होते. सर्वत्र शांतता होती.

                               मुख्याध्यापकांचे पाहुण्यांसमवेत व्यासपीठावर आगमन झाले. कार्यक्रमाची सुरुवात झाली. इतक्यात विद्यार्थ्यांमधून एक मोठा आवाज आला, ‘गांधीजी की जय।‘ समारंभाचा बेरंग झाला. ब्रिटीश अधिकारी रागाने लाल झाले. मुख्याध्यापक व अध्यापकवर्ग गोंधळून गेला. ताबडतोब कार्यक्रम आटोपता घेतला गेला.

                        संपूर्ण शाळा गोंधळून गेली. ‘ब्रिटीश सरकार काय निर्णय

घेईल ?’ मोठा प्रश्न निर्माण झाला. म्हणतात ना, ‘ज्याच्या हाती सत्ता, तो मारी लत्ता’.

                       त्यादिवशी तब्येत बरी नसल्यामुळे, ‘डॉक्टर मुंजे’ ह्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.अखिल भारताचे एक छोटेसे जिवंत प्रातिनिधिक चित्र असलेल्या ह्या शाळेची विद्यार्थी संख्या जेमेतेम १०० होती. काही वर्षे ही विद्यार्थी संख्या ६० - ६५ पर्यंत कमी होती.

                         देशाला स्वातंत्र्य मिळविण्याकरता व देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याकरिता, ऐन परकीय अंमलात १९३७ साली डॉक्टर बा. शी. मुंजे ह्या द्रष्ट्या नेत्याने ही शाळा नाशिक येथे स्थापन केली. ब्रिटीश सरकारचा अतिशय जाच असताना, डॉ मुंजेंनी ही शाळा एका विशिष्ट्य हेतूने काढली व चालविली. डॉक्टर साहेबांचे लक्ष्य भारतीय सैन्याचे भारतीयकरण करण्याकडे व तसेच अन्य सरकारी कारभारांत लागणाऱ्या अधिकाऱ्यांत योग्य असे भारतीय तरुण निर्माण करण्याकडे होते. त्या काळच्या लोकसभेत त्यांनी महनीय कामगिरी केली. त्यामुळेच ब्रिटीश सरकारलाही मनांतून इच्छा नसतानाही ह्या शाळेला परवानगी द्यावी लागली.

                    डॉक्टर साहेबांच्या कार्यप्रणालीत ‘शाळा व राजकारण’ ही दोन भिन्न गाठोडी होती. ते आपल्या भाषणांत सांगत असत, “मी माझे राजकारणाचे गाठोडे नाशिकरोड स्टेशनवर ठेवून शाळेत येतो व परत राजकीय कामासाठी जाताना, स्टेशनवरुनच ते गाठोडे उचलून नाशिक बाहेर जातो.” राजकारणाचा वारा न लागलेली शस्त्र व शास्त्र पूजक संस्था धर्मसंकटात पडली होती. डॉक्टरसाहेबांची झालेल्या प्रकारावर प्रतिक्रिया काय असेल?

                          शस्त्र सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे ‘डॉक्टर मुंजे’ तर अहिंसेचे पुजारी ‘गांधीजी’ दोघांचे राजकीय मार्ग भिन्न, परंतु ‘भारतीय स्वातंत्र्य मिळविणे’ हे एकच ध्येय.

                    डॉक्टर साहेबांनी त्या विद्यार्थ्याला बोलावून घेतले. बिछान्यावर झोपलेले डॉक्टरसाहेब त्या मुलाला म्हणाले, “तू तुझ्या वयाप्रमाणे योग्यच केले. मी तुझ्या वयाचा असतो तर हेच केले असते. परंतु एक लक्षात घे, ते इंग्रज अधिकारी आपल्या शाळेत पाहुणे म्हणून आले होते. आपली भारतीय संस्कृती सांगते, ‘अथिती देवो भव।‘ घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान करणे चूक आहे. जीवनांत पुन्हा अशी चूक करु नकोस.”

                       डॉक्टर साहेबांच्या खोलीतून तो रामदंडी विद्यार्थी एक नवीन धडा घेऊन बाहेर पडला. शाळा पूर्ववत चालू झाली. डॉक्टरसाहेबांनी प्रकरणावर पडदा कसा टाकला? हे कोणालाच समजले नाही.

                                ब्रिटीश सरकारच्या जाचाबरोबर, पराकोटीचा आर्थिक ताण सहन करीत असलेल्या भोसला शाळेने, अनेक भूमीगत स्वातंत्र्यसैनिकांना लपण्यासाठी आश्रय देऊन स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले.

                        इंग्रजी ‘कॅडेट’ शब्दास भारतीय प्रतिशब्द ‘रामदंडी’ वापरुन डॉक्टर मुंजेंनी ‘पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा आदर्श’ विद्यार्थ्यांसमोर ठेवला. भोसला मिलिटरी स्कूलच्या माजी रामदंडींनी भारतीय लष्कर, सरकारी विभाग, शिक्षण क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, वैद्यकीय व्यवसाय, शेती अशा विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाद्वारे डॉक्टर मुंजेचे सक्षम भारताचे स्वप्न साकारलेले आहे.
श्रीमती प्रभा आठवले

माजी शिक्षिका, ग. ग. हायस्कूल, नाशिक