Sunday, 23 July 2017

मायबोलीचे भुक्कड ६

३ कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
 म्हाइंभट (तेरावे शतक) :  मराठीतील पहिले चरित्रकार महानुभाव पंथाचे प्रवर्तक. महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी. चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्याने अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लिहिला. नंतर ‘गोविंदप्रभूचरित्र’ही लिहिले. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाजजीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने ‘लीळाचरित्र’ हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे.
               कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही, हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी ‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ सांगितलेला आहे. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे हे, प्रस्तुत लीळेतून पटवून दिले आहे.
---------------------------------------------------------------------------------
              डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उद्याचे मातीकाम होत होतेः ते सी बाजत होतेः तेणे भक्तीजनासी व्यापार होववे नाः आन भट व्यापार करु लागले नाथोबाय म्हणीतलें:  नागदेयाः तू कैसा काही हिंवसी ना तवं भटी म्हणीतलें:  आम्ही वैरागीः काइसीया हिवुः यावर सर्वज्ञे म्हणीतलें: वानरेयाः पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडेः हाही एकू विकारुचि कीं गाः यावरि भटी म्हणीतलें: जी जीः निर्विकार तो कवणः सर्वज्ञें म्हणीतलें वानरेयाः पोर जीव वीकारावेगळा केव्हळाही जालाचि नाहीः मा तु काई वेगळा अससिः हो कां जीः यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त निरोपिलाः कव्हणी एकू कठीया असे भोगस्थानाची सुश्रुषा करीः झाडीः सडा संमार्जन करीः ते देखौनि गावीचे म्हणतिः कठीये नीके करीत असा बरवे करीत असाः ते आईकौनि दीसवडीचा दीसवडी हात हात चढवीः तयासि देवता आपुले फळ नेदीः तयासि कीर्तीचेचि फळ झालेः
लीळाचरित्र उत्तरार्ध : एकांक लीळा क्र. १२०
संपादक – प्रा. पुरुषोत्तम नागपुरे
शब्दार्थ :-
ग्राम =गाव
ठायी = समोर
उद्या = सकाळी
ते= तेव्हा
सी = थंडी
तेणे =त्यामुळे
व्यापार = काम
आन = आणि / परंतु
वैरागी = तपश्चर्या करणारे
काइसीया = कशाला
वानरेया = माकडा
सर्वज्ञ = स्वामी
गा = अहो
कव्हणी= कोणी
सुश्रुषा =  सेवा
कठीया = मंदिराचा पुजारी
निका= चांगला
बरवा = सुंदर
भोगस्थान =दैवतस्थान
दीसवडीचा दीसवडी= रोजच्या रोज
हात हात चढवीः = काम वाढवू लागला
नेदणे = न देणे

भाषांतर :-
         डोमगावी स्वामींच्या समोर सकाळच्या वेळी मातीकाम (बागकाम वगैरे) होत होते. तेव्हा थंडी वाजत होती, त्यामुळे भक्तजनांना काम करता येत नव्हते. परंतु भट (नागदेवाचार्य) काम करत होते. नागोबाए (भक्ताचे नाव),” नागदेवा, तुला थंडी कशी वाजत नाही ? (तुला थंडी वाजत नाही का?) तेव्हा नागदेवाचार्य म्हणाले, “आम्ही तपश्चर्या करणारे, आम्हाला थंडी कशी वाजेल?”  यावर स्वामी म्हणाले, “भटो, वानरेया (कौतुकाने माकडा) स्वतंत्र जीवाला वैराग्य मिरवायला आवडते. अहो, हा सुद्धा एक विकारच आहे.” यावर भट नागदेवाचार्य म्हणाले, “जी जी (स्वामी स्वामी) असा कोण आहे ? ज्याला विकारच नाही.” स्वामी म्हणाले, “भटा, वानरेया (कौतुकाने माकडा) स्वतंत्र जीव हा विकारापासून वेगळा नाही मग तू काय वेगळा आहेस ? “ “हो का?” असे भट म्हणाले. यावर स्वामींनी प्रसिद्धी हवी असणाऱ्या मंदिराच्या पुजाऱ्याचा दृष्टान्त सांगितला. कोणी (कोणी  एके काळी) एक पुजारी होता. तो दैवतस्थानाची (देवतेची) सेवा करी, झाडी (मंदिर झाडायचा), सडा रांगोळी करायचा. ते बघून गावातले म्हणायचे, “पुजारी चांगले काम करीत आहे. सुंदर करीत आहे.” हे ऐकून रोजच्या रोज तो पुजारी काम वाढवू लागला. त्याला (पुजाऱ्याला) देवता आपुले फळ देत नाही. कीर्ती हेच त्याचे फळ झाले.
{ तात्पर्य :- लोकांनी वाहवा केल्यामुळे, मंदिराच्या पुजाऱ्याने आपले काम वाढविले. पूजा करण्यामागचा मुख्य हेतू (मोक्ष मिळविण्याचा)बाजूला राहिला. लोकांनी केलेली वाहवा वाढत गेली म्हणजे पुजाऱ्याला फक्त कीर्ती - प्रसिद्धी मिळत गेली.}
स्वाध्याय : -
प्रश्न १ कोणांस उद्देशून म्हटले आहे ते लिहा
१ वानरेया - नागदेवाचार्य
२ सर्वज्ञ - स्वामी
३ गोसावी - स्वामी
प्रश्न २ आकृती पूर्ण करा
स्तुतीप्रिय
कठीयाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये
मोक्ष मार्गाचे (ज्ञानमार्गाचे)   
प्रश्न ३  : प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोणतेही काम करु नये.
प्रश्न ४ : पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा
कठीया = पुजारी
सी = थंडी
काइसीया = कशाला
कव्हणी = कोणी
                  इयत्ता ९वीच्या पाठ्य पुस्तकातील धड्याचे भाषांतर, महानुभावपंथीय गुरु आदरणीय डोळसकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. अमोल गेटे (मराठी साहित्याचे गाढे अभ्यासाक) ह्यांनी करुन दिले. श्री. डोळसकर बाबांना दंडवत तसेच श्री. अमोल गुटेसाहेबांना  मनःपूर्वक  धन्यवाद.
                   तेराव्या शतकातील चक्रधर स्वामींचे लीळा चरित्र हा मराठी भाषेतील आद्य चरित्र ग्रंथ.  लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, श्रीगुरुचरित्र, तुकाराम गाथा, दासबोध अशा अनेक प्राचीन ग्रंथातील ग्रंथभांडार शालेय शिक्षणात समाविष्ट करताना, कठीण शब्दांचे शब्दार्थ धड्याखाली दिल्यास, शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना समजणे सोपे होईल.
                      मराठी साहित्याच्या ग्रंथ भांडार तसेच इतिहासातील शिवशाही त्याच्या मूळ अर्थासकट- उद्देशांसकट नवीन पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शिवशाहीचे स्वप्न साकारण्याकरिता, सांगावेसे (भुक्कड*६)वाटते,
शिकण्या येतील लेक बालके
तीच लेकरे जाण सखे
जरीपटक्याचे दिवस आणण्या जगी
तयाची आण मायबोलीच्या मुखे

समाप्त
अनुप्रभा, नाशिक

संदर्भ:-
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ‘कांचनसंध्या’ कवितेतील  शेवटचे (६वे) कडवे
शिणुनी येती गुरें-पाखरें 
तीच लेकरें जाण सखे,

दिवस जरेचे आले जरी 
त्या काठ जरीचा लावू सुखें...!

* भुक्कड = निरुद्योगी बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )

॥ जय श्री गुरुदेवदत्त॥

Sunday, 9 July 2017

मायबोलीचे भुक्कड (५) : घंटा वाजे घणघणा

घंटानाद देई स्मृतीस उजाळा
खुणावते मनी मज मम शाळा
सक्षमतेचे गिरविले इथे धडे
शाळा आमुची आम्हा आवडे
                         शालेय शिक्षणाने मिळालेली सक्षमता कुठे तरी कमी पडत आहे का? गंगा सफाईसाठी भारतीय पंतप्रधानांना इस्त्रायलसारख्या वाळवंटातील चिमुकल्या देशाची मदत घ्यावी लागत आहे. गंगा, गोदा, ब्रह्मपुत्र, सिंधू, यमुना, कावेरी, कृष्णा अशा महान नद्यांनी सुजलाम असलेल्या देशात स्वतःचे तंत्रज्ञ शास्त्रज्ञ हे स्वच्छता अभियान पेलू शकत नाहीत का? समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य गोड पाणी बनविण्याचे इस्त्रायलयचे संशोधन अभिनंदनीय असले तरी व्यावाहारिक आहे का? भारतीय उपखंडावर मान्सून पावसाचा जन्म भारतीय उपखंडाला वेढणाऱ्या अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर ह्या त्रिसमुद्रांनी होतो तर हिमालय पर्वत परतीच्या मान्सून पावसाची कृपा करतो.
                     समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरणे किंवा समुद्रात शिव स्मारक बनविणे म्हणजे आपणच ह्या सुजलाम् सुफलाम् देशाचे वाळवंटात रुपांतर करणे होईल का ? तसेच समुद्रातील मत्स्य मगर वगैरे जलसृष्टीने व त्यावर जीवन जगणाऱ्या कोळीबांधवांनी कुठे जायचे?
                            इस्त्रायलने वाळवंटात नंदनवन निर्माण केले तर आपल्या देशाची वाळवंटाकडे नेणारी घोडदौड का होत आहे ?
                             २१व्या शतकातील इंग्रजाळलेल्या शिक्षणातून झालेली देशाची दुरावस्था पाहिल्यावर, २०व्या शतकातील मराठी भाषिक शाळांची उणीव प्रकर्षाने जाणवते. बालपणीच्या शाळेची घंटा आजही मनाला साद घालते.
 घंटेला सांगावेसे वाटते,
                       घण   घण  घंटा   वाजली  आणि  घटें,  मला  तुझ्या  आगमनाची  चाहूल लागली.  तुझे  आगमन  किती  सुखद  वाटते  सांगू !  
तुझा  मधूर  आवाज  आसंमतात  घुमतो. ‘परमेश्वर  हा  नादब्रह्मात  असतो’,  असे  म्हणतात. तो  दृश्य  स्वरुपात  दिसत  नाही पण  तुझ्या  आवाजात  त्याचे  अस्तित्व  जाणवते. घंटे,  तुझे  मानवी  जीवनात  स्थान  जाणवते. कोणत्याही  पूजेची  तयारी  तुझ्याशिवाय  पूर्ण  होत  नाही. पूजा  संपल्यावर,  तुझ्या  तालावर  आरती  म्हटली  जाते.  देवाची  भक्ती  संगितातून   व्यक्त होते. आरती  तालासुरात  म्हणण्यास  इतर  वाद्यांची  साथ  आवश्यक  असते,  पण  तू  नसलीस  तर  त्या  आरतीत  ताल - सूर  हरवल्यासारखा  वाटतो.  घरातील  देवघरात  घंटी,  तुझे  आस्तित्व  प्रामुख्याने  आढळते .
                              स्थल - काल  परिस्थितीनुसार  तुझ्या  आकारात  बदल  झालेले  असतील. लहान  घंटा, मध्यम  घंटा,  मोठी  घंटा,  स्टीलची  घंटा,  तांब्या-पितळेची  घंटा,  चांदीची  घंटा,  सोन्याची  घंटा  असे  बदल  आढळतील.  पण  मूळ  गाभा  असतो,  तुझा  कर्णमधूर  आवाज.
                             कोणत्याही  देवळात  मूर्तीची  पूजा  सकाळ -संध्याकाळ  होत  असते  व  शेवटी  आरती  व  प्रसाद  असतो.  आरतीची  घंटा  ऐकल्यावर,  भाविकांना  धन्य  वाटते.  मनात  म्हणतात, “चला,  देवाची आरती  तरी  मिळाली”, ही  एक  श्रद्धाभावना  असते. जीवनात  श्रद्धा  असणे  फार  महत्वाचे  असते.
                            घंटे,  गौरी  आणि  गणपतीचे  आगमन  व विसर्जन  तुझ्याशिवाय  होऊच शकत  नाही.  गौरी  गणपतीचे  आगमन  तुझ्या  सहवासात  मोठे  आनंदाने  होते. विसर्जनाच्यावेळी  तू  घण - घण  आवाज  करत  त्यांच्याबरोबर   जातेस.  त्या  आवाजात  निरोपाची  भावना  असते तसेच    पुढल्या  वर्षी  लवकर  येण्याचे  आश्वासन  असते.  तू  भक्तांच्या  भावना  जाणून  घेतेस.
                           इतिहासात  तुला  किती  मानाचे  स्थान  आहे  म्हणून  सांगू! तू  पराक्रमाचे  प्रतिक  आहेस.  तुला  तर  माहिती  आहे,  चिमाजीप्पा  या  शूर  वीराने  वसईच्या  लढ्यातून  तुला  सुरक्षित  आणून,  नाशिकला  नारोशंकराच्या  मंदिरात  ऊंच  जागी बसवली  आहे. तू  शौर्याचे  प्रतिक  आहेस,  ऊंचावर  बसून  तू  समाजाला  क्षात्रतेजाचे  महत्व  सांगत  तू  अहोरात्र  उभी  आहेस.  स्वातंत्र्य  टिकवायचे  असेल  तर  क्षात्रतेज  प्रज्वलित  झाले  पाहिजे.  हा महान  संदेश  तू  अखंड  देत  आहेस.  देश  सबल  व्हावयास  पाहिजे.  दुर्बलांच्या  शब्दाना  काहीही  किंमत  नसते. हेच  तुझ्या  जीवनाचे  ध्येय  आहे.  तू  बोलत  नाहीस  पण  आवाजातून  जीवनाचा  मंत्र  देत  आहेस.
                            घंटे,  तुझी  महती  किती  सांगू ! तू  जगाला  जागृतीची  जाणीव  करून  देतेस.   तू  जणू  म्हणते  आहेस,  “डोळे  उघडून  पहा,  सांगायचे  काय काय ?” तू  देवळात  जाऊन  बसलीस  पण  तुझा  सर्वत्र  संचार  मला दिसतो. तू  शैक्षणिक  क्षेत्रातही  प्रवेश केलास. घंटा   वाजली  की  मनाला  ह्या  ठिकाणी  जवळपास  मंदिर  किंवा  चर्च  आहे,  ह्याची  जाणीव  होते.  आपोआप  भाविकांची  पाऊले  त्या  बाजूला   वळतात. तसेच  घंटा  वाजली  की,  शाळेची  जाणीव  होते.  अर्थात  ह्या  दोन  घंटामध्ये  बारीक  फरक  जाणवतो,  शेवटी  तीच  तू  असते.
                          शाळा  सुरू  होताना, घंटा  वाजते.  पाटी  दप्तर  घेतलेली    बालके,  आनंदाने  शाळेत  प्रवेश  करतात.  उत्साही  वातावरण  असते.  प्रार्थना  निरनिराळे  विषय- मराठी,  इंग्लिश,  हिंदी,  संस्कृत, इतिहास,  भूगोल,  नागरिकशास्त्र,  सायन्स  जीवनावश्यक  विषय    इतकेच  काय  कलाविषय जे  मानवी  जीवनाला  समृद्ध  करतात.  संगित, चित्रकला, पाककला  वगैरे  व  शेवटी   खेळाचा  तास   जो  सर्वांचा  आवडता  विषय.ह्या  सर्वाची  सुरुवात  घंटे तुझ्या  आवाजाने  होते   व  समाप्तीही  तुझ्या  निरोपाच्या  घंटेने  होते.  पाटी दप्तर  घेतलेली  मुले,  आनंदात  घराकडे  धूम  पळतात.  तुझे  एकंदर अस्तित्वच  चैतन्यपूर्ण  असते. 
                               काळाप्रमाणे  तुझे  रुप  बदलले.  तू दुचाकीवर-  सायकलवर  जाऊन  बसलीस.  सायकलची  घंटी  वाजली  की, तुला  रस्त्यावर  सायकल  चालवावयास  अडथळा होत  नाही.  देशाच्या  स्वच्छता  अभियानात  तू  प्रवेश  केलास. गावाची  स्वच्छता  करण्यासाठी   कचरापटी  गोळा  करण्यासाठी  तू  घंटागाडीत  जाऊन  बसलीस  पण  काहीवेळा  तू गैरहजर  का रहातेस ? मला  कारण  काही  समजत  नाही ?
                               हळू   हळू  तुझे  स्थलांतर  निरनिराळ्या  ठिकाणी  दिसू  लागले.  तू स्कूटर, मोटारसायकल, रिक्षा  तसेच  कारमध्ये  जाऊन  बसलीस.  वेगवान  जगात  तू  मागे  राहिली  नाहीस. तुझे  नाव  तेवढे  बदलले.  लोक  तुला  हॉर्न  म्हणू  लागले.  तू  जमिनीवरच  काय  तुला  पाण्यातही  जीवनकार्य  करावयाचे  होते.  तू  जहाजावर  ‘भोंगा’ ह्या  स्वरुपात  बसलीस. 
                             बदलत्या  काळाप्रमाणे  तू  विद्युत  उपकरणात  प्रवेश  केलास. घड्याळात  ‘गजर’  हे  नाव  धारण  केलेस.  जीवनात  धड्याळ  फार  आवश्यक  आहे. दिवसाची  सुरुवात  घड्याळ व त्याचा  गजर  ह्यांच्या 
तालावर  होते. 
                             घंटे,  तुझे  जीवनकार्य    किती  मोठे  आहे  म्हणून  सांगू !  पण  तुला  त्याची  जाणीव  आहे  का नाही  मला  माहित  नाही. तुझी  महती  वर्णन  करण्यास  माझ्याजवळ  शब्द  अपूरे  पडतात.
                          जीवाचे  जीवनकार्य  संपल्यावर  त्या  जीवाला  निरोप  देण्याची  वेळ  आल्यावर,  मृत्यूची  घंटा  वाजते,  असे  म्हणतात.  जीवन  हे  क्षणभंगूर  आहे,  जीवनात  सत्कर्म  करा,  वगैरे  तत्वज्ञान भारतीय  संस्कृती  सांगते. 
                     ही   मृत्यूची  घंटा  केव्हा  वाजते?  त्याची  जाणीव  त्या   जीवाला  नसते.  त्यावेळी  तू  फारच  अदृश्य  स्वरुपात  असतेस,  कोणालाच  दिसत  नाहीस. तुला  निश्चित  माहित  असते.  आत्मा  अमर  आहे.  ‘पुनरपि  जननं  पुनरपि  मरणम्’  त्यामुळे  तुझे  कार्य  अमर  आहे.
                      प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज ह्यांनी प्रदुषणामुळे मानव जात नष्ट होण्याचा इशारा दिलेला आहे. जलतज्ज्ञ श्री.राजेंद्रसिंहजींनी गोदावरीस सिमेंटच्या विळख्यापासून वाचवा, अन्यथा गोदा प्रलयाची शक्यता वर्तवलेली आहे. ह्या सर्व धोक्याच्या घंटाचा नाद समजण्यासाठी, ह्या मातीतल्या  मायबोलीतून शिक्षणाची गरज सांगताना म्हणावेसे वाटते,
                         ‘ हे कर्मयोगिनी घंटे, परत एकदा आपल्या माय मराठी शाळांमधून तुझा आवाज दिमाखात ऐकू येऊ दे. मायबोलीच्या तीर्थक्षेत्री घडणारी गणित – शास्त्र - इंग्रजी ह्या विषयांची त्रिस्थळ यात्रा (भुक्कड ५) *        
हीच आपुली तीर्थत्रिस्थळी
वाहील आपुल्या जळी-मूळी
असू दे तिथे घंटेचा हिंदोला
मिळविण्या महासत्तेच्या माला
अनुप्रभा, नाशिक
॥ जय  श्री  गुरुदेवदत्त ॥
* संदर्भ:-
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ‘कांचनसंध्या’ कवितेतील  पाचवे  कडवे
 इथेच अपुली तीर्थत्रिस्थळी
वाहे अपुल्या मुळी तळी
असू तिथे सखिओला वट मी
आणिक तू तर देव तळी
* भुक्कड = निरुद्योगी, बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )
  हिंदोल = गायनातील एक राग

Saturday, 24 June 2017

मायबोलीचे भुक्कड ४ :-

शिक्षणातील 3 G
                          ‘गणित विषय ऐच्छिक होऊ शकतो का?’ असा प्रश्न उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाला विचारल्याची चर्चा, सध्या वर्तमानपत्रातून वाचावयास मिळते. मनुष्य सुशिक्षित अथवा अडाणी असला तरी रोजच्या जीवनात गणिताची गरज पडत असते.
                              घरगुती प्लंबिंगच्या कामातील गणिताचे महत्त्व गृहिणीला समजले नाही तर होणारा गोंधळ मी पाहिलेला आहे. एक वकीलबाई प्लंबरकडून घरात काही सुधारणा करुन घेत होत्या. वकीलबाईंना ड्रेनेजसाठी लागणाऱ्या स्लोपचा खर्च प्लंबर सांगत होता. वकील असलेल्या गृहस्वामिनीला पाण्याच्या उताराचे गणित कळत नव्हते. त्यांना वाटत होते, ‘हा प्लंबर आपल्याला हिशोबात गुंडाळतोय. नाहक जास्त खर्च करायला लावतोय.’ हिशोबात झालेल्या कटकटीतून गृहस्वामिनी गरजल्या, “तुला माहित आहे का? मी वकील आहे!” प्लंबरसाहेबही इरेला पेटले ते म्हणाले, “तुम्ही वकील असाल तर मी प्लंबिंगमधला फौजदार आहे.” फौजदारसाहेब काम अर्धवट टाकून निघून गेले.
                              ह्या प्रसंगातील वकीलबाई हल्लीच्या शॉर्टकट अभ्यासक्रमानुसार १२वी नंतर डायरेक्ट वकील झालेल्या आहेत. पदवी शिक्षणात निरनिराळ्या विषयांची तोंड ओळख होत असल्याने, अमेरिकेत पदवी प्राप्त केल्यानंतर वकील, डॉक्टर, इंजीनिअर ह्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो.
                                आधुनिक जगाबरोबर आपला विद्यार्थी रहावा म्हणून १९७५साली १०+२ अभ्यासक्रमाद्वारे शिक्षणक्षेत्राने अमूलाग्र क्रांती केली. ह्या अभ्यासक्रमांत एक विषयात नापास होऊनही, पास करणारी ढकलगाडी बंद झाली. विविध विषयांच्या अभ्यासांत भर पडून, विद्यार्थ्याला भावी संगणकयुगासाठी सक्षम बनविण्याचे प्रयत्न झाले.
                                 १०+२ अभ्यासक्रमानुसार इयत्ता सातवीत ‘सेट थिअरी’ ह्या विषयाचा नव-गणितात समावेश झाला. ‘सेट थिअरीची जीवनांत गरज नाही. नाहक विद्यार्थ्यांवरचा बोज वाढविलेला आहे’, अशी घरा-घरांतील वडिलधाऱ्या  मंडळींची टीका-टिपण्णी आम्ही विद्यार्थ्यांनी ऐकली.
                              आमच्या ग. ग. शाळेतील पांगारकरबाई(छोट्या केळकरबाई), वैद्यबाई, डांगेबाई ह्या गणित- शास्त्र विभागाच्या  शिक्षकांनी  सेट थिअरी स्वतः शिकून आम्हाला अप्रतिम शिकवली. सेट थिअरीच्या बळावर संगणक क्षेत्रात क्रांती(Image Processing)होऊन आंतरिक्षक्षेत्र(चंद्र-मंगळमोहिम),तसेचआंतरजालक्षेत्र(Facebook,Whatsapp,Website)  विकसित झाले. आधुनिक तंत्रज्ञानाची फळे चाखणारी तसेच आधुनिक तंत्रज्ञानांत काम करणारी आमची पिढी, शालेय जीवनातील शिक्षकांची सदैव ऋणी आहे.
                    मध्यंतरी शाळेत जाण्याचा प्रसंग आला. मन विषण्ण झाले. आमच्या शाळेचे वैभव असलेली बाग, ‘संगीत- शिवण -होमसायन्स -ड्रांईंग हॉल; डबल बार, सिंगल बार इत्यादी खेळाची साधने; व्हॉलीबॉल तसेच खोखोचे मैदान ह्या गोष्टी अदृश्य कश्या झाल्या? मुख्य म्हणजे ब्रिटीशकालीन वारसा लाभलेला, आमच्या व्यक्तिमत्वाचा  अविभाज्य भाग असलेला, सेंट्रल हॉल कुठे गेला? काळाच्या ओघांत शाळेचे रुप बदलले. परंतु आमचे शिक्षक सेवानिवृत्तिनंतरही शाळेत येऊन ज्ञानदानाचे काम करीत आहेत, हे पाहून मन नतमस्तक झाले.
                                जिना चढून गेले तर शेलारबाईंनी प्रथम स्वागत केले. सेवा निवृत्तीनंतरही शेलारबाई विद्यार्थिनींचे नुकसान होऊ नये म्हणून शाळेत गणित-शास्त्र पूर्वीच्याच उत्साहाने शिकवीत होत्या. शाळेत झालेल्या गप्पांमधून समजले वैद्य बाई, गीतेबाईंची आई - अंजना वाघ बाई, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका म. न. पा. शाळा क्र. ११ (१९८२ साली आदर्श शिक्षिका - धर्माधिकारी पुरस्काराने सन्मानित) ह्यांच्या सारखे अनेक शिक्षक सेवानिवृत्तिनंतर शाळेत शिकविण्यास येत आहेत.
                             आमची ग. ग. ही सरकारी शाळा असताना, शिक्षकांची वानवा का? सरकारी शाळा असल्यामुळे, आमच्या शाळेला निधीची कमतरता कधीच भासली नाही. २०व्या शतकांत प्रशिक्षित शिक्षकांसहित, शाळेचे रुप सदैव अत्याधुनिक होते. त्या काळात ‘शाळेसाठी देणगी किंवा पालक सभा’ ह्या गोष्टींचा जन्म झाला नव्हता. शाळेची फी इयत्ता ५वीला नाममात्र रुपये ५/= होती. दरवर्षी आठ आणे फी (५० पैसे) फी वाढायची. शिक्षकांच्या पाल्यांना फी माफ नव्हती. आमचे शिक्षक एक पैसा ही जास्त न घेता शनिवार-रविवार तसेच इतर वारी जास्त वेळ शिकवायचे. कोणतीही फी न आकरता, आमची स्कॉलरशिप,  टिळक-महाराष्ट्र विद्यापीठ(गणित, इंग्रजी), हिंदी विशारद तसेच ड्रॉईंगच्या परिक्षांची तयारी करुन घेत असत. ग. ग. हायस्कूलचा ह्या परिक्षांमधील निकाल अत्युत्तम लागायचा. शाळा बाह्य विश्वातील ह्या विविध परिक्षांमुळे आम्हा विद्यार्थिनींचे गणित तसेच इंग्रजी  व्याकरण खूप पक्के झाले.
                              आमच्या शाळेत अभ्यासाबरोबर खेळ, नाट्य, संगीत,  शिवण इत्यादी क्षेत्रातील गुणी विद्यार्थिनींना खूप प्रोत्साहन नेहमी मिळत असे.
१९७५साली महाराष्ट्र बोर्डाची शेवटची ११वी मॅट्रिकची परिक्षा झाली. ११वी मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना  ‘गणित’ विषय सोडून मॅट्रिक पास होण्याची सवलत होती. गणितात कच्च्या असणाऱ्या मुलींना गणित विषय मिळाला नाही की, दरवर्षी शाळेत थोडा गोंधळ व्हायचा. काही पालक आपल्या मुलींना दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या गावी पाठवून मॅट्रिक करवून घ्यायचे. काही विद्यार्थिनी धुसफुसत गणित विषय सोडून, मॅट्रिक परिक्षा पास व्हायच्या. कला शाखेत जाऊन B.A. करणाऱ्या ह्या मुलींना पुढील जीवनांत  नोकरीचे दरवाजे बंद व्हायचे. गणिताविना भविष्यातील अंधकाराच्या भितीने ह्या मुली बिथरायच्या. एकदा ह्या सर्व परिस्थितीचा उद्रेक झाला. चिडलेल्या काही विद्यार्थिनींनी वर्गातील शिक्षकांच्या टेबल खुर्चीला खाज-कुइली लावली होती. शिस्तप्रिय शाळेच्या इतिहासाने एक कटू प्रसंग अनुभविला.
                      १९८०पर्यंत नाशिकमधील शिक्षणक्षेत्रांत अग्रगण्य असलेल्या ग. ग. शाळेतील विद्यार्थिनींचे आई-वडील सुशिक्षित सुस्थापित मध्यमवर्गातील होते.   ह्या पालकांमध्ये आपल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्याची कुवत होती.
                                 २१व्या शतकात ग. ग. तसेच इतर मराठी माध्यमाच्या शाळांचे चित्र बदलेले आहे. ह्या शाळांमध्ये  येणाऱ्या विद्यार्थिनींचे पालक पोटाला चिमटा देवून आपल्या कन्येचे भविष्य घडत आहेत. शिक्षणाचा गंध नसणाऱ्या पालक पिढीला गणिताचे भविष्यातील महत्त्व कळणार नाही. शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थी जीवनाचे कधीही भरुन न निघणारे नुकसान होत आहे. गणिताचा बागुलबुवा  दूर झाल्यास, सध्याचा विद्यार्थी सहज पदवीधारक होईल. अशा प्रकारे प्राप्त झालेली पदवी स्वतःचे पोट भरु शकत नाही, हे समजल्यावर वेळ हातातून निघून गेलेली असेल. त्यावेळी बेकार असलेल्या तरुणाईचा उद्रेक झाल्यास,समाज धुरिणांचे हताश उद्गार (कविवर्य बा भ बोरकरांच्या शब्दसामर्थ्याचा आधार) ऐकावयास मिळतील   
उभ्या जगाचे अश्रू  पुसाया
जरी आपुले हात उणे
तरी समुद्रायणी प्रमाणे
पोसू तटिची म्लान तृणे
हे भीषण भविष्य टाळण्यासाठी आमच्या ग. ग .हायस्कूल, नाशिक  सारख्या सर्व मराठी माध्यमाच्या शाळांना समाजाने तसेच सरकारने गतवैभव प्राप्त करुन द्यावे.     प्रशिक्षित गुरुजनांद्वारे ह्या शाळांचा विद्यार्थी घडविल्यास, तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण-गंगा पोहोचेल.
सर्व शिक्षण अभियानाद्वारे भावी पिढ्यांच्या शिक्षणातील 3G  (गणिताची गणिती गरज) भागवावी, ही न्याय-देवतेला प्रार्थना.
अनुप्रभा नाशिक


संदर्भ :-
दिव्यमराठी बातमी दिनांक २० ज़ून २०१७ (पान क्रमांक ७, नासिक सिटी)

लोकसत्ता :- दिनांक २१ जून २०१७
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ‘कांचनसंध्या’ कवितेतील चौथे  कडवे
उभ्या जगाचे अश्रू  पुसाया
जरी आपुले हात उणे
तरी समुद्रायणी प्रमाणे
पोसू तटिची म्लान तृणे
* भुक्कड = निरुद्योगी बुभुक्षित (भुकेला हपापलेला गरजू )