Saturday, 28 May 2016

‘कमला’ - पुस्तक परिचय

                  इसवी सन १८९५ मध्ये  ‘कृपाबाई सत्यनादन’ ह्या मराठी विदुषीने ‘कमला’ ही इंग्रजी कादंबरी लिहिली. राजहंस प्रकाशन, पुणे यांनी  ‘रोहिणी तुकदेव लिखित’ मराठी अनुवाद २०१२ साली प्रकाशित केला. रोहिणीताईंच्या भावस्पर्शी भाषेतून कृपाबाईंची कादंबरी  वाचकाला अंतर्मुख करते.

                लेखिका कृपाबाईंचा जन्म ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या, ‘हरिपंत व राधाबाई’ ह्या दांपत्याच्या पोटी दि. १४ फेब्रुवारी १८६२ रोजी अहमदनगर येथे झाला. बुद्धिमत्तेचे वरदान लाभलेल्या कृपाबाईंचा विवाह सॅम्युएल सत्यनादन यांच्याशी इसवी सन १८८१ मध्ये झाला. विवाहानंतर पतीबरोबर उटकमंडला गेल्यानंतर, कृपाबाईंनी उटीला मुस्लीम मुलींची शाळा काढली.
                 ‘अॅन इंडियन लेडी’ ह्या टोपणनावाने ‘साउथ इंडियन ऑब्झर्वर’, ‘नॅशनल इंडियन जर्नल’ यांसारख्या नियतकालिकांमध्ये लेखन करणाऱ्या कृपाबाईंची ‘कमला’ कादंबरी १८९३-९४, दरम्यान मद्रास ख्रिश्चन मॅगझिनमध्ये क्रमशः प्रकाशित झाली. खूप तापामध्ये अंथरुणाला खिळून असतानाही कृपाबाईंनी ही कादंबरी ‘कनूर’ मुक्कामी पूर्ण केली.
                   धर्माने ख्रिश्चन, कर्माने मुस्लिम मुलींना शिक्षण देणाऱ्या कार्यकर्त्या, असलेल्या कृपाबाईंनी २००वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील हिंदूसमाजाचे दर्शन ‘कमला’ कादंबरीद्वारे आपल्याला घडविले आहे.

                     २०० वर्षांपूर्वी ‘कमला’ ह्या कथानायिकेच्या विचारांमधून व्यक्त होणाऱ्या कृपाबाई, २१ व्या शतकातील समाजाला मार्गदर्शन करीत आहेत असे वाटते. ह्या कादंबरीत नाशिक जिल्हातील गंगागोदावरीच्या सान्निध्यातील ‘शिवगंगा’ ह्या काल्पनिक नगरात रहाणाऱ्या कमला नामक सासुरवाशीणीची कथा आकार घेते.
              कमलेचे साधे सरळ बालपण गंगागोदावरी उगमस्थानाजवळ असलेल्या एका टेकडीवरच. ह्या ठिकाणाचे लेखिकेने केलेले स्वर्गीय निसर्गाची अनुभुती देणारे वर्णन  काळाच्या ओघात  आपण गमावून बसल्याची खंत मनाला स्पर्श करते.
                कमला तान्ही असताना कृष्णाक्षेत्री तिची आई देवाघरी जाते. पत्नीविरहातून कमलाचे वडिल नारायणबुवा संन्यस्त वृत्तीने लेकीसहित गोदावरी नदी उगमस्थळाजवळील टेकडीवर राहू लागतात. कृष्णाक्षेत्री घडलेला इतिहास माहित नसलेल्या शिवनगरातील  मुलींचे ‘संन्यास्याची मुलगी’ असे टोमणे, कुचेष्टा जत्रेच्या वेळेला कमलेच्या वाटेला येते. ह्या बायकांमध्ये कमलेला नाव ठेवण्यात गंगी व तिची आई आघाडीवर असतात. जंगलातील पारंपारिक पद्धतीने सजलेली कमला, नगरवासीयांचा चेष्टेचा विषय होते.
                   चेष्टा करणाऱ्या गंगीच्या भावाशी कमलेचे लग्न ठरते.  त्याच दिवशी ‘रामचंद्र’ नारायणबुवांना येऊन भेटतो. कमलेच्या आयुष्यात न डोकावता, तिला न भेटता, तिची काळजी घेण्याचे वचन नारायणबुवांना देऊन रामचंद्र निघून जातो.
                  कमलेचे लग्न शिवगंगा नगरातील काशिनाथपंतांच्या गणेशाशी होते. गरीब संन्याश्याची मुलगी असलेल्या, कमलेच्या विरोधात बोलणाऱ्या गंगी व तिच्या आईची कमला सून होते. कादंबरीत हिंदू पद्धतीने केलेल्या लग्नसमारंभाचे यथार्थ वर्णन आढळते.
             शहरात इंग्रजी शिकणारा ‘गणेश’ बायकोचे नाव घेताना म्हणतो,
“ताऱ्यात ताऱ्यात माणके, फूलात सर्वश्रेष्ठ फूल कमल, माझी पत्नी”
उखाणा ऐकून लोक हसतात. एक म्हातारी बाई म्हणते, “ताऱ्यात माणकं कुणी कधी पाहिली आहेत काय ? आणि फुलात सर्वश्रेष्ठ फूल गुलाब, तुझे कमळ नव्हे.”
              थोडक्यात इंग्रजी शिकून व्यवहारज्ञान येत नाही हे लेखिकेने येथे नकळत दाखवून दिलेले दिसते.
               कमला उखाण्यात नवऱ्याचे नाव गुंफते.२००वर्षांपूर्वीच्या समाजाला धक्का बसतो. लोक तिला बेमूर्वत पत्नी समजतात.
          वडिलांकडून धुळाक्षर शिकलेल्या कमलाला लिहिता-वाचता येत असते.

                   लग्नानंतर आपल्या सासऱ्यांना अध्ययनात-वाचनात मदत करणारी कमला, मामंजींचा कौतुकाचा विषय होते. कमलाशी सासूबाई सुरवातीला प्रेमाने वागतात.
                     कमलेचे अस्तित्व गंगीला (कमलेच्या नणंदेला) खुपू लागते. गंगीच्या कान भरण्याने, कमलचा सासुरवास सुरु होतो. सासरे अलिप्त होतात. २ वर्षांनी इंग्रजी शिक्षण पूर्ण करुन आलेला गणेश, सुरवातीला कमलला इंग्लिश शिकविण्यास सुरवात करतो.  घरातील वातावरण बघून आईला खूष करण्याचा स्वार्थी विचार करुन कमलपासून अलिप्त होतो.
                        पुढील आयुष्यात गंगी लग्न होऊन निघून जाते, पण तिने पेरलेली कटुता कमी न होता वाढत जाते. कमलला गणेशच्या आयुष्यातून दूर करण्याच्या हेतूने, गणेशला कमलचा नणदोई (मोठ्या नणंदेचा नवरा) स ई नावाच्या नर्तकीच्या जाळ्यात अडकवितो.
                       अशी ही कमल, गणेश, सई, रामचंद्र ह्या चार पात्रांभोवती फिरणारी कथा आजच्या २१व्या शतकात घडाणाऱ्या घटनेची गोष्ट आहे, असे वाटते.
                         सईच्या नादाने गणेश स्वतःच्या बायकोवर व्यभिचाराचा आरोप करतो. कथेची नायिका असलेली कमल स्वतःचा आत्मसन्मान जपते. पतीचा त्याग करुन सासू सासऱ्यांकडे मुलासहित परत येते.
                कमलच्या वडिलांना देवाज्ञा होते. नारायणबुवांच्या संन्यस्त्य वृत्तीने त्यांनी असलेल्या संपत्तिचा उपभोग घेतलेला नसतो. हे धन कमलला मिळणार आहे, ही बातमी सासरी समजते. पैसेवाल्या सूनेचे सासरी स्वागत होते. आयुष्यात एकाकी पडलेला गणेश, कॉलऱ्याच्या साथीत पंचत्वात विलीन होतो. “आपण पतीला अव्हेरल्यामुळे, त्याचे आयुष्य संपले”; असे विचार कमलच्या मनात यायला लागतात.
                           दोन वर्षे सर्व स्थिरस्थावर झाल्यावर ‘रामचंद्र’ कमलकडे तिच्या आईची संपती घेऊन येतो. तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त करुन, ह्या रुढीपरंपरांच्या बंधनातून मुक्त हो. आपण आपले वेगळे विश्व उभारुया. या कानाच त्या कानाला कळणार नाही, अशी मागणी घालतो.
                        दोनशे वर्षांपूर्वी पारंपारिक चौकटीतून बाहेर पडून नवऱ्याचा त्याग करणारी नायिका, रामचंद्राची मागणी नाकारुन, सामाजिक बांधिलकी जपण्याचा मार्ग स्वीकारते. कमला आपली सर्व संपत्ती परोपकारार्थ खर्च करते. आपले सर्व उर्वरित आयुष्य विधवांच्या आणि अनाथांच्यासाठी वेचते. रामचंद्र संन्यस्त वृत्तीने जंगलात राहून, औषधपाण्या द्वारे लोकांची सेवा करतो.

                       ‘रामचंद्र व कमला’ ह्यांच्या दिव्यप्रेमाची गंधवार्ता लोकांना न कळू देणारी लेखिका, २१व्या शतकातील सैराटलेल्या समाजासमोर ‘कमला’ कथेद्वारे आदर्श ठेवते.



संदर्भ :-
ISBN No: 
 ISBN 978-81-7434-562-2
 कमला (राजहंस प्रकाशन, पुणे)
अनुवादरोहिणी तुकदेव (मूळ लेखिका: कृपाबाई सत्यनादन )

अनुप्रभा, नाशिक


॥ जय गुरुदेव दत्त॥

Monday, 9 May 2016

अक्षय्य त्रेता युग :-

त्रेतायुगस्य प्रथम दिने, होती अक्षय्य तृतीया ।
धर्मशास्त्रातूनी पूर्वज सांगती, नश्वर ही काया॥
तीळतर्पण - कथन सांगे, गत जीवांचे सद्गमन।
बीजांकुरीत - वचनी नांदे, त्रेतायुगाचे पुनरागमन॥

                            आज अक्षय्य तृतीया, त्रेता युगाचा वाढदिवस. 
आजच्या दिवशी तीळ-तर्पण विधीद्वारे पूर्वजांना सद्गगती मिळावी, म्हणून श्रद्धेने प्रार्थना करतात. ह्या विधीमध्ये एका ताटलीत तीळ ठेवतात. ह्या तीळामध्ये श्रीविष्णु व ब्रह्मा यांची तत्वे येण्यासाठी ह्या दोन्ही देवतांना प्रार्थना करतात. दुसऱ्या ताटलीत आपल्या पूर्वजांना येण्याचे आवाहन करतात. आवाहन केल्यानुसार, आपले पूर्वज सूक्ष्म रुपांत आलेले आहेत; ह्या भावनेने पहिल्या ताटलीतील श्रीविष्णु व ब्रह्मा तत्व भारीत तीळ व अक्षता दुसऱ्या ताटलीतील पूर्वजांच्या चरणावर अर्पण करतात. हे सात्विक तीळ पूर्वजांना अर्पण करताना, त्यावरुन हळूवारपणे पाणी ताटलीत सोडावे. त्यावेळी पूर्वजांना सद्गगती द्यावी, अशी प्रार्थना  श्रीविष्णु किंवा ब्रह्मा ह्या देवतांना करावी; असे प्राचीन शास्त्र सांगते.
एकंदरीत पूर्वजांचे ऋण मानण्याची कल्पना त्रेतायुगापासून सुरु झालेली दिसते.
धर्मशास्त्र सिद्धांतानुसार ब्रह्मदेवाने पृथ्वीतलावर जीवसृष्टी निर्माण करुन क्रमाक्रमाने चार युगे पाठविली, असे श्रीगुरुचरित्रकार सांगतात.
                                     ब्रह्मदेवाने सर्व प्रथम ‘कृत युग’ पृथ्वीवर पाठविले.
कृत युगाच्या प्राचीन वर्णनानुसार, ह्या युगाच्या वाणीत असत्यवचन कधीही नव्हते. त्यामुळे कृत युगास ‘सत्य युग’ असेही नाव आहे. ही युगमुर्ती वैराग्यपूर्ण ज्ञानी असून, तिचा यज्ञोपवित (जानवे) हा अलंकार होता. तिच्या हातात कंकणासारख्या  रुद्राक्ष माळा होत्या.
                        कृत युगाच्या वरील वर्णनानुसार आदि मानवाचे समाज जीवन सत्याच्या बैठकीवर सुरु झाले असावे, असे दिसते.
                            मानवी स्वभावात  सत्य व असत्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू   दिसतात. त्यामुळे सत्याची बैठक आधारित समाज निर्माण होणे, ही गोष्ट अशक्य आहे; असे समाजधुरिणांच्या लक्षात आलेले असावे.   त्यामुळे सत्व गुणी कृतयुग फारच थोडा काळ पृथ्वीवर होते, असे श्रीगुरुचरित्रांत म्हटले असावे.

                                  मानवी बुद्धीने शेती ह्या उपजिविकेच्या साधनाचा शोध लावल्याने, पोटासाठी भटकणारा मनुष्य एका जागी स्थिरावू लागला. त्यातून निर्माण होणाऱ्या समाजाची धारणा करण्यासाठी ‘धर्म’ ही कल्पना उदयास आलेली दिसते. असे हे शेती व धर्म ह्यांच्या निर्मितीतून समाजास स्वास्थ्य निर्माण झाले.
                           मानव वंशाने केलेली ही असाधारण प्रगती प्राचीन धर्म ग्रंथांनी ‘त्रेता युग’ ह्या नावाने अधोरेखित केली.
                            स्वास्थ्य लाभलेल्या समाजाचे द्योतक म्हणून त्रेता युगाचे स्थूल शरीर, हातात यज्ञ सामुग्री तसेच बैल धरलेले असे वर्णन आहे. सदैव धर्मप्रवर्तक संदेश देणारे त्रेता युग एका हातातील यज्ञ सामुग्रीतून, कर्मकांडाची कल्पना निर्माण करणारे असावे. त्रेता युगाच्या दुसऱ्या हातात बैल धरलेला आहे. ह्याचा अर्थ जमीन नांगरण्यासाठी मनुष्याने बैलाला माणसाळलेले दिसते.
                              स्वाभाविकच सत्य-असत्य कल्पनांच्या द्वंद्वात भिरभिरणाऱ्या माणसाला धर्माचा आधार मिळाला, तसेच शेती व्यवसायाने मानवी जीवनातील पोटासाठी असलेली वणवण थांबली.
                                 त्रेता  युग आनंदात सुमारे १२,९६,००० सौर वर्षे भूतलावर नांदले, असा उल्लेख प्राचीन धर्मग्रंथात  आढळतो.
                        ‘कृत युग’ ह्या प्रथम युगाचा जन्म दिवस तसेच त्रेता युगाचा अंत ह्यांची नोंद प्राचीन शास्त्रांत असल्यास, आपल्या सारख्या सर्व सामान्यांना माहित नाही.
                         त्रेता युगाचा खरोखरच अंत झाला असे म्हणता येईल का? आजही भारत वर्ष शेतीवर उपजिविका करतो, तसेच प्रत्येक भारतीय आपापल्या धर्माचे पालन करतो.
                             त्रेता युगातील धर्म व शेती ह्या दोन्ही मार्गांनी माणसाला   स्वास्थ्य आले. त्यातूनच मानवी मनांत स्वामित्वाची भावना निर्माण झाली.  स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी माणसाच्या बुद्धीने शस्त्रांची निर्मिती केलेली दिसते. हातांत आलेल्या शस्त्रांमुळे मानवी मनातील पाप – पुण्य, उग्र –शांत, निष्ठुर - दया ह्या भावनांचे अविष्कार माणसाच्या वागण्यातून व्यक्त व्हायला लागले.
                             सत्वगुणी मानवी मनातील विरुद्ध भावनांची नोंद प्राचीन धर्म ग्रंथांनी द्वापार युगाच्या वर्णनांत घेतलेली दिसते. द्वापारयुग हे एका हातात खड्ग (तलवार) व खट्वांग (बाजेच्या खुरासारखे) आयुध धरलेले व दुसऱ्या हातात धनुष्य बाण असलेले होते. त्याचे मन उग्र-शांत, निष्ठूर-दयावान ह्या दोन्ही स्वभावाचे होते.
                          पुण्य व पाप समान दृष्टीने पहाणारे शुद्ध स्वरुपाचे द्वापार युग भगवान श्रीकृष्ण अवतार संपल्यावर संपले, असे प्राचीन शास्त्र मानते.
गीतामृत देणारा भगवान श्रीकृष्ण अवतार समाप्त झाल्यावर, मनुष्याचे सारथ्य हरविले.
                  श्रीगुरुचरित्रातील वर्णनानुसार, ब्रह्माने कलियुगाला पृथ्वीवर जाण्यासाठी बोलाविले. विचारहीन अंतःकरणाचा, पिशाच वदनाचा, खाली मान घातलेला, जागोजागी धडपडणारा, क्रूर, वैराग्यशून्य, आपल्याबरोबर कलह-भांडणे-द्वेष घेऊन, डाव्या हातात शिश्न धरुन ब्रह्मासमोर आला. उजव्या हातात जीभ धरुन, अतिशय आनंदाने नाचत, दोषाचीही स्तुति करित, पुण्य-पापाची भेसळ असलेला, कलि वाकुल्या दाखवत, हांसत-रडत, जीभ-तोंड वाकडे करीत ब्रह्मासमोर उभा राहिला व विचारु लागला, “आज्ञा काय ?”
                                     ब्रह्माने विचारले, “लिंग व जीभ हातांत का धरली आहेस ?’
कलियुग ब्रह्मास म्हणाले, “मी सर्व लोकांना जिंकीन. जे लोक लिंग व जीभ यांचे रक्षण करतील, त्यांच्यासमोर मी हारीन.”
                               एकंदरीत आजच्या कलियुगात कामवासना व वाणी तसेच जिभेचे चोचले (आहार) यांच्यावर संयम पाळल्यास कलियुगाचा त्रास होणार नाही, असे आपण अनुभवातून म्हणू  शकतो.
                              मनुष्य मनात कलिचा प्रवेश होऊ नये, ह्यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे.
                                  फास्ट फूडच्या जमान्यात जीभेवर संयम नसल्याने तरुण पिढी  मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार ह्या रोगांची शिकार होताना दिसते. कामवासनेवर नियंत्रण नसल्याने, रोज एखादी तरी बलात्काराची भयानक बातमी ऐकायला मिळते. एडस् सारख्या भयानक रोगाचा विळखा समाजाभोवती वाढताना दिसतो.
                                समाजाची अधोगती थांबविण्यासाठी त्रेतायुग निर्मिती करणाऱ्या पूर्वजांची आज खरच गरज आहे. आजच्या दिवशी पूर्वजांचे ऋण मानताना, ‘त्यांनी धर्म निर्मिती करुन समाजशास्त्र कसे निर्माण केले असावे?’ हे शिकण्याची गरज आहे.
                          प्राचीन ग्रंथ संस्कृतमध्ये असतात. त्यांची इंग्रजी भाषांतरे अथवा गोषवाऱ्यास भारतीय मनोभूमीचा आधार मिळू शकत नाही. वेद, उपनिषिद इत्यादी ग्रंथ मुखोद्गत पद्धतीने पिढ्यांपिढ्या जसेच्या तसे आपण जपले आहेत. परंतु ह्या महान ग्रंथांमधील ज्ञान-भांडार शब्दार्थासकट मराठी तसेच इतर भाषांमध्ये उपलब्ध झाले तर नासा, इस्त्रो ह्यांच्या संशोधन कार्यात मोलाची भर पडेल.
                            तसेच धर्म व त्यातील योग्य-अयोग्य रुढी, परंपरा ह्यांच्यावर प्रकाश पडू शकेल. बदलत्या काळाप्रमाणे मनुष्याने धर्म,देश ह्यांच्या संविधानांत सुयोग्य बदल करणे गरजेचे आहे. ही गोष्ट झाली त्रेता युगाच्या धार्मिक हाताची !
                           त्रेता युगाचा बैल धारी हात सांगतो, ‘भारत हा शेती प्रधान देश आहे’. औद्योगिक प्रगतीबरोबर शेती व्यवसायातील केमिकलचे प्रदूषण संपवून, आधुनिक शेती भरभराटीस न आणणाऱ्यांना, सांगावेसे वाटते;
More you Crop, More you Yield
Less you Crop, Less you Yield
Never you Crop,Never you Yield
॥ जय श्रीगुरुदेवदत्त॥