Saturday, 15 October 2016

‘वाचन प्रेरणा दिन - को जागरती’

                          आज दि. १५ ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती तसेच भारतीय क्षेपणास्त्रशास्त्राचे जनक डॉ. अब्दुल कलामसाहेब यांची जयंती. हा दिवस ‘वाचक प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचे शिक्षणखात्याने ठरविल्याची बातमी वाचनात आली. मोबाईल - गुगल युगातील हा उपक्रम स्तुत्य आहे, परंतु ऑक्टोबर महिना म्हणजे सहामाही परिक्षांचे दिवस. अभ्यासाच्या ताणाने थकलेले विद्यार्थी तसेच पेपरच्या गठ्यांनी बेजार झालेले शिक्षक, ह्यांना वाचनाची प्रेरणा ह्या एका दिवसात देता - घेता येईल का ? एखाद्या खाऊन अजीर्ण झालेल्या माणसासमोर पंचपक्वानाचे ताट ठेवल्यावर ती व्यक्ती अन्नग्रहण करु शकेल का ?
                             ‘गोष्टी युक्तीच्या सांगेन चार’ अशा सेवानिवृत वयातील आमची पिढी. स्वाभाविकच बालपणी अनुभवलेली वाचन प्रेरणा स्रोत आठवू लागते. आत्मप्रौढी म्हणून नाही परंतु आमच्या गुरुजनांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजविलेल्या वाचन प्रेरणेचा इतिहास साकारायचा हा एक छोटासा प्रयत्न.
                             इयत्ता दुसरी, मुरलीधर मंदिर (सांगली) ह्या वर्गात वाचन ह्या शब्दाची प्रथम ओळख करुन दिली ती आमच्या फडकेबाईंनी. शाळा सुटायच्या आधी त्या आम्हाला अवांतर पुस्तके वाचून दाखवायच्या. नुकतीच अक्षर ओळख झालेला आमचा वर्ग अवाक होऊन ते वाचन ऐकायचा. त्या पुस्तकातील गोष्टीत रमायचा. आपल्यालाही फडके बाईंसारखे वाचता आले पाहिजे, ह्या जिद्दीतून मिळेल ते चिटोरे, दुकानावरच्या पाट्या असा वाचन प्रवास सुरु झाला. एकदा आमच्या वाड्यातील कोणाचे तरी तोंड आले म्हणून ‘तवकील’  पाहिजे होते. मोठ्या लोकांच्या गोष्टी ऐकून आम्ही तत्परतेने माहिती पुरविली, “आम्ही एक पाटी ‘वकील’ म्हणून वाचलेली आहे. बहुतेक पाटी लिहिताना, ते लोक ‘त’ लिहायचे विसरुन गेले असतील. मोठ्या लोकांनी आम्हाला हसून खेळायला पिटाळले.
                                  वडिलांच्या  सांगलीतील आत्याबाईंना देवाज्ञा झाली. आत्येसासूबाईंचे करण्यासाठी सांगलीला ‘गुंजूमामा करमरकर’ वाड्यात राहिलेली आमची आई बुलढाण्याला आली. इतके दिवस आमचे वडिल एकटेच बुलढाण्याला नोकरी निमित्त्य रहात होते. आम्ही मुले बुलढाण्याच्या शाळेत
जाऊ लागलो.
                        एडेड स्कूल मधील इयत्ता ५वीतला  गणिताचा तास खूप आवडायचा. डोंगरेसर गणित विषय  संपवून  गोष्ट सांगायला सुरवात कधी करतात? इकडे लक्ष असायचे. आमचे डोंगरेसर ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकातील  प्रसंग, गोष्टी आपल्या ओघवत्या भाषेत रंगवून सांगायचे. सर्व वर्ग शांतपणे ऐकत असे. शाळा सुटण्याची बेल झाली की गोष्ट बंद. मनात उद्याच्या गोष्टीचे वेध लागायचे.
                                   चांगल्या लेखनाचे संस्कार व्हावेत म्हणून आमच्या वर्तकबाई अभ्यासक्रमा व्यतिरिक्त पुस्तकांत असलेली सकाळ, संध्याकाळ,
नदीकिनारा ह्यांचे वर्णन असलेले परिच्छेद पाठ करावयास सांगत. प्रसंगानुरुप त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी निबंधात करावा, असे शिकवित. आपोआप पाठांतर व अवांतर वाचनाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असे. आमचे मराठी विषयाचे पेपर नामजोशीसरांनी तपासले. माझा पेपर देताना सर म्हणाले, “ह्या पेपरचा प्राणी   खूप हुशार आहे. ‘प्रवासवर्णन’ ह्या निबंधात संध्याकाळचे वर्णन घालण्यासाठी प्रवासाची गाडी लेट केली आहे.
                   बालवयात अशा लेखन करामती करत असताना, न कळत माझा कविता - कथा लेखन असा प्रवास सुरु झाला.
                          एकदा आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला पत्र लेखनिक म्हणून आम्ही भावडांनी भूमिका बजावली. पोस्ट कार्डावर तिने सांगितलेला मजकूर मी लिहिला. स्वतःच्या बाहेरगावी असलेल्या घरधन्यास (यजमानांना) पत्र लिहिताना, दर एक वाक्यानंतर ‘तुम्ही खुशाल आम्ही खुशाल’ अशी खुशाली लिहिण्यास ती बाई सांगत होती. पत्र लिहून पूर्ण झाले. पोस्टकार्डावर नाव लिहिण्याची वेळ आली. त्याकाळी नवऱ्याचे नाव बाई उच्चारायला तयार होईना. तिने मला सांगितले, “उडत ते, उडत ते !” आम्ही भावंड हे कोडे सोडवायला बसलो. कोणीतरी म्हणाले, “कबुतर”. बाई म्हणते, “हां बरोबर” पण परत आपले साभिनय “उडत ते, उडत ते!” सुरु झाले. आम्ही  भावंडे तिला पक्ष्यांची नावे सांगत होतो. कोड सुटत नव्हते. तेवढ्यात कोणीतरी म्हणाले, “कावळा”. बाई म्हणाली, “जवळ आले, जवळ आले”. तेवढ्यात दुसऱ्याने सांगितले, “पोपट”. बाईचे उत्तर “दूर गेले, दूर गेले”. ‘चिऊताई’ कोणाला आठवेना. कावळा म्हणजे उत्तराच्या जवळ आलो, ह्या  clueवरुन अखेरीस ‘चिमणी’ आठवली. चिमणरावांना खुशालीचे पत्र टाकायला, आमची कामवाली खुषीत रवाना झाली.
                                   आपल्यासारखे ह्या कष्टकरी वर्गाला लिहिता वाचता यायला पाहिजे, असे त्याकाळी वाटायला लागले. आमची मॅट्रिकची परीक्षा झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘साक्षरता प्रसाराचे वर्ग’ आमच्या शाळेत जाहीर झाले. मी   ह्या वर्गात दाखल झाले.  आम्ही अभ्यासक्रम पूर्ण केला. उत्साहाने आजूबाजूच्या घरातून पाटी-पेन्सिली गोळा करुन, आम्ही  झोपडपट्टीत बायकांना शिकवायला गेलो. त्या संसारी बायका अ,आ, इ, ई --- गिरवायला वैतागल्या. “इथे पाटी गिरवत बसलो तर घरी भाकऱ्या कोण करणार ?” असेम्हणून पाट्या तेथेच टाकून निघून गेल्या, पण हा प्रसंग आम्हाला खूप काही शिकवून गेला असावा.

                                      लग्नानंतर नासिकला घराजवळ रहाणाऱ्या माझ्यापेक्षा वयाने  ज्येष्ठ बाईंनी “माझी मॅट्रिकची शिकवणी घ्याल का ?” म्हणून मला विचारले. साक्षरता प्रसार मोहिमेतील संसारी बायकांचा अनुभव गाठीशी असल्याने, मी त्यांना सांगितले, “सांसारिक जबाबदारी सांभाळून तुम्ही शिकणार तसेच मध्यंतरीच्या काळात तुमची खूप गॅपही गेली आहे. मी शिकवीन पण तुम्ही एक वर्षात मॅट्रिक न होता २-३ वर्षांत पास होऊ शकाल.” ह्या मध्यमवयीन विवाहित बाई जिद्दीने माझ्याकडे शिकवणीला यायला लागल्या. मला एक शांत, सोज्वळ, सुंदर विद्यार्थिनी मिळाली. ३ वर्षांनी ह्या बाईंना मी परीक्षेला बसण्यास सांगितले. बाई मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांनी मॉन्टेसरीचा कोर्स करुन सर्व्हिस केली. सेवानिवृत्त झाल्या. सध्या त्या हयात नाहीत परंतु जन्मभर त्या मला मान द्यायच्या. त्यांच्या नाती म्हणायच्या, “आजी, ह्या काकू तर तुझ्यापेक्षा कितीतरी लहान आहेत त्या कशा तुझ्या बाई?”
                               सारडा कन्या विद्यामंदिर, पुष्पावती विद्यालय, भोसला मिलिटरी स्कूल ह्या शाळांमध्ये B.A. झाल्यानंतर शिक्षिका म्हणून काम केले. B.Ed.झाल्यावर गव्हर्न्मेंट गर्ल्स हायस्कूल (नासिक) ह्या शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाले. ह्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी, सहकाऱ्यांनी, मुख्याध्यापिकांनी माझे शिक्षकी जीवन समृद्ध केले. कुसुमाग्रजांची मानसकन्या नासिकची प्रतिथयश कवयित्री ‘रेखा भांडारे’ शाळेत १० मिनिटांच्या सुट्टीत, मधल्या सुट्टीत स्वतः केलेली कविता दाखवायला यायची. रेखा भांडारे तसेच विद्या टिळक, डॉक्टर वृंदा भार्गवे ह्या लेखिका घडताना आम्ही अनुभवल्या आहेत. शिक्षणतज्ज्ञ भावना ताई भार्गवे विविध पुस्तकांचे परीक्षण शिक्षकांना सेंट्रल हॉलमध्ये सादर करायला सांगत. ह्या उपक्रमातून अवांतर ‘वाचन प्रेरणेची ज्योत’ शाळेत सतत तेवत असे.
                            रोजच्या वर्तमानपत्र वाचनातूनही मनुष्याला ‘वाचन प्रेरणा’ मिळू शकते. वयानुसार वाचनाच्या आवडी बदलतात. बालवयात परीकथा, राजा- राणीच्या गोष्टी, किशोरवयात वीरपुरुषांची चरित्रे, शौर्य कथा; तरुणाईत विज्ञान कथा, कादंबऱ्या, नाटके, रहस्यकथा; मध्यम वयात पुस्तकांची परिक्षणे,  नाटक सिनेमांची समीक्षा; सेवानिवृत्तीनंतर पुराणकथा, दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग वगैरे थोडासा अध्यात्माकडे कल झुकतो. काहींचा ओढा ‘भक्ती’ ह्या सदरात मोडतो तर काहींचा कल ‘अंतिम सत्य काय?’ ह्या प्रश्नाचे उत्तर शोधतो.
                                  मी रोज वर्तमानपत्र वाचते व त्यातील बातम्या इतरांना सांगते, हा माझा स्वभाव. सेवानिवृत्तिनंतर रिक्षाने गावातील कामे करीत असताना, एक रिक्षावाला माझ्या सहवासात आला. माझे काम संपेपर्यंत माझ्या पिशवीतील लायब्ररीचे पुस्तक वाचता-वाचता, त्याला वाचनाची गोडी लागली. त्याने ही दैनंदिन पेपर विकत घ्यायला सुरवात केली. सध्या त्याने रिक्षा व्यवसाय बंद करुन, व्हॅनने शाळेची मुले ने-आणण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. संध्याकाळी वस्तीतील लोकांना तो पोथ्या, दासबोध वगैरे वाचून दाखवितो.
                            शाळा कॉलेज शिकून सुस्थापित आयुष्य जगणाऱ्या प्रजेच्या ह्या गोष्टी.  अंगठेबहाद्दर प्रजेला साक्षर करण्यासाठी अ, आ, इ ---- क, का कि, की  ------ बाराखडी पद्धत कंटाळवाणी ठरते. आमच्या घरी काम करणाऱ्या दोन बायकांना २-३ महिन्यात वाचायला शिकविताना मी वेगळी पद्धत वापरली. मी प्रश्न विचारत असे, “आज स्वयंपाक काय केला?” भाजी, भाकरी, भात, भरीत ह्या उत्तरातून ‘भ’ हे अक्षर शिकविल्यावर, ‘रवा’ ह्या शब्दासारखे रवा, खवा, हवा, तवा ही उत्तरे देण्यात त्यांना गंमत वाटायची. ‘वा’ अक्षर घटले जायचे. अशा पद्धतीने भाज्यांची, फळांची, फुलांची नावे करता - करता त्या स्वतःहून घरच्या लोकांची नावे लिहू लागल्या.
दोघींच्यापैकी एका बाईने पेपरमध्ये येणाऱ्या लहान मुलांच्या गोष्टी, पाककृती वगैरे वाचून स्वतःचे लेखन वाचन वाढविले. आजही ती नवीन वाचलेल्या गोष्टी लोकांना सांगते.
दुसरी बा ई २-२॥ महिन्यात वर्तमानपत्रातील ठळक बातम्या वाचत असे. तिच्या एका पत्रकार नातेवाईक बाईने तिला विचारले, “तुला कोणी शिकविले, इतक्या थोड्या दिवसांत?” पण तिने आपले वाचन वाढविले नाही. मी तिला सांगितले, “मुले अभ्यासाला बसली की, तूही काहीतरी वाचत जा. अडले तर मुलांना विचार.” पण तिने मनावर घेतले नाही. बसवरच्या पाट्या वाचता येणारी व्यक्ती अक्षर ओळख विसरायला लागली.
                           जीवनात आलेले हे साक्षरता प्रसारातील अपयश आमच्या काळातील पाठांतराचे महत्त्व अधोरेखीत करते. शाळा सुटण्याच्या आधी १० मिनिटे वर्गातून पाढे म्हणण्याची प्रथा होती. ‘२९ साते किती?’ ह्याचे उत्तर मागची पिढी अजूनसुद्धा पटकन देते. मेंदूरुपी संगणकाला पाढे, कविता ह्या ड्र्रिलची बालपणी गरज आहे.
                       आमचे शिक्षक अ व ब  कडी अशा मुळाक्षरांच्या भेंड्या (सध्याची अंताक्षरी) घेत असत. क, ख, ग --- ह्या शब्दांनी सुरु होणाऱ्या कविता अजूनही आठवतात. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीत ‘जात, भाषा प्रांत’ भेद विसरुन सहभागी झालेला समाज ‘यशोधन’ पुस्तकातील कवितेत साकारलेला आहे.
                               औरंगजेबाच्या पंज्यातून सहिसलामत बाहेर पडलेल्या बाल संभाजीराजांना सांभाळणाऱ्या  उत्तरप्रदेशातील ब्राह्मणाचे काव्यरुपी  मनोगत:-
कोणाचे तरी पोर, म्हणूनही माझेच हे पाडस
संभाजी नच हा करु, कसे हे घातकी धाडस
ह्याचा घेशील का मुका, न इतके ताटात एका बसू
झाला रे भ्रष्ट तया द्विज, कुणी आम्ही द्विजा त्या हसू
                                       कळत न कळत वाचन - पाठांतरातून भाषेची शुद्धता, स्पष्ट उच्चार, शुद्ध आचार प्राप्त होतात. डॉक्टर अब्दुल कलाम यांचे भारतीय महासत्तेचे स्वप्न साकार करण्यासाठी आमच्या पिढीला मिळाला तसा “दैनंदिन वाचन प्रेरणा दिन” २१शतकातील विद्यार्थ्यास  मिळावा ह्या सदिच्छा.
               
   ॥ जय श्रीगुरुदेव दत्त॥
                                                                            प्रभा आठवले
                                                                   सेवानिवृत्त शिक्षिका, नाशिक
www.shrigurucharitra.com





Sunday, 14 August 2016

‘शास्त्रीय कुंभ : सिंहस्थ, नाशिक’

                            दि. ११ ऑगस्ट २०१६ रोजी, नाशिक येथील सिंहस्थाची समाप्ती पारंपारिक प्रथेने झाली. गोदावरीमातेच्या मंदिराची कवाडे नाशिककरांनी श्रद्धेने बंद केली. गोदावरी मातेचे दर्शन पुढील सिंहस्थात एक तपाने होणार ! ह्या परंपरेमागे काही भौगोलिक इतिहास आहे का ? परंपरा ही श्रद्धेने जपावयास हवी, परंतु त्यामागचे सत्य शोधून काढावयास हवे.
                      वास्तविक दर वर्षी आषाढात येणारा गोदावरीचा पूर ही आमच्या नाशिकमधील एक पर्वणी असते.  नाशिकला आषाढमहिन्यात (जुलै अखेरीस) १-२ वेळेला ‘देता किती घेशील, तू दो कराने’ असा प्रचंड पाऊस पडतो. ह्या पावसाने तुडुंब भरलेली गोदामाय आपल्या बहिणीसह(उपनदी-नासरडीनदी) नाशिककरांना भेटायला येते. तिच्या पूररेषेच्या आतील सर्व गोष्टी   वाहून नेते.
                  प्राचीन काळी पाण्याच्या गरजेपोटी, गोदावरी नदीकाठी वसलेले जुने नाशिक जलमय होते. नासरडी नदीच्या पुराचे पाणी कांबळेवाडी, द्वारका ह्या भागाला भेट देते.
                    गोदावरी नदीने स्वतःचा गाळ कापत कातळ गाठलेला असल्याने, नदीचे पात्र रुंदावण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे, असे भूगर्भशास्त्र सांगते. गोदावरी नदीच्या जन्मकथेनुसार, प्राचीन काळी गौतम ऋषींनी ह्या नदीचा उगम शोधला. त्या काळात नाशिक क्षेत्री प्रचंड दुष्काळ पडलेला होता. गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावरील जटामंदिर, गंगाद्वार, गोमुख, कुशावर्त त्र्यंबकेश्वर अशा विविध ठिकाणी असलेली गोदावरी नदीची उगम स्थाने शोधली.   
                      भूगर्भशास्त्र अनुमानानुसार, (सुमारे ६कोटी वर्षांपूर्वी) दख्खनचे पठार निर्मितीच्या वेळी झालेल्या ज्वालामुखीतून ब्रह्मगिरी, अंजनेरी, निलय ह्या पर्वतरांगांची निर्मिती झाली. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हारसाने, ब्रह्मगिरी पर्वत रांगा आच्छादित झाल्या. ह्या लाव्हारसात पावसाचे पाणी धरुन ठेवण्याची क्षमता आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर पसरलेला लाव्हा रस  नदीला पाण्याचे स्त्रोत पुरवितो. ब्रह्मगिरी पर्वतावरुन ही नदी तीन  प्रवाहात उतरते. ह्यापैकी एका प्रवाहातून वैतरणा नदी तयार होते. उरलेल्या दोन प्रवाहातून तयार होणारी गोदावरी नदी, चक्रतीर्थ स्थानापासून सलग प्रवाहित होते.
                    ब्रह्मपुराणात ह्या इतिहासाचे खूप सुंदर वर्णन आहे. सृष्टि निर्माण कर्ता यज्ञ करण्यास बसला. त्याने कुशामध्ये (गवतामध्ये) वर्षा ऋतु ठेवला. सृष्टी निर्माण कर्त्याच्या यज्ञातून ब्रह्मगिरी पर्वत निर्माण झाला. ह्या वर्णनातील सृष्टी निर्माण कर्त्याचा यज्ञ म्हणजे ज्वालामुखी  व कुशामधील (गवतामधील) वर्षाऋतु म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावरील लाव्हारस असावा, असे दिसते.
                     जटामंदिर ह्या स्थानी लाव्हारसात असलेल्या चिरांमुळे जटासदृश्य रचना दिसते, म्हणून ह्या स्थानास ‘जटामंदिर’ म्हणत असावेत.
                           त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थानी सतत गोदावरीचा प्रवाह उगम पावताना दिसतो.
त्र्यंबकेश्वर= त्रि +अंबक (अंब=पाणी) + ईश्वर
                 ज्योर्तिलिंग स्थानी शंभू महादेवाची पिंड नसून ब्रह्मा (उत्पत्ति),  विष्णु (स्थिती= पालनकर्ता)  व  महेश (तम= संहारक) अशी तीन स्थाने आहेत.
               त्र्यंबकेश्वर स्थानास प्राचीन काळी ‘त्रिकालसंध्या क्षेत्र’ असे नाव होते. ह्या ठिकाणी अंजनेरीच्या पायथ्याशी रहाणारे लोक जप, ध्यान-धारणा करण्यासाठी दिवसा जात असत. शिवाजी महाराजांनी जव्हार मार्गे सुरत- स्वारीवर जाताना, त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वराची व्यवस्था ठेवण्यासाठी, अंजनेरी डोंगराच्या पायथ्याशी रहात असलेल्या गावकऱ्यांना त्र्यंबकेश्वरी वसविले. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या ज्योर्तिलिंग व्यवस्थेतून ह्या क्षेत्राचे ‘त्र्यंबकेश्वर’ नाव प्रचलित झाले. पुढील काळांत पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर बांधले.
                   उत्पत्ति, स्थिती, लय ह्या सृष्टीच्या तीन स्थिती नाशिक क्षेत्रानी अनुभवल्या असाव्यात, असे पुराणातील संदर्भानुसार व नाशिक येथे आढळणाऱ्या चिकण मातीच्या प्रचंड ढिगांवरुन दिसते.
             ब्रह्म पुराण अध्याय ८९ श्लोक क्रमांक ४५ नुसार
अरुणावरुणानद्योर्गड्गायां संगमः शुभः।
देवानां तत्र तीर्थानामागतानां पृथक्पृथक्॥८९-४५॥
              ह्या श्लोकाचा अर्थ  = अरुणा व वरुणा ह्या नद्यांच्या संगमस्थानी गंगा नदीचा होणारा संगम शुभ आहे. त्या ठिकाणी त्या संगमस्थानी देव परत-परत येत असत.
                     अरुणा व वरुणा यांच्या नाशिकक्षेत्री असलेल्या संगमात गंगा नदी उगम होत असावी. रामकुंड येथे गोदावरी नदीचा प्रवाह दक्षिणेकडे वळत असल्याने ह्या नदीस ‘दक्षिण वाहिनी गंगा’ म्हणतात. पुराणकाळात नाशिकक्षेत्री मोठे जलाशय असावे.  हे सरोवर निर्माण करणारी अरुणा नदी काळाच्या ओघात लुप्त झालेली दिसते.
                  ‘वरुणा नदी कुशावर्ती’असे श्रीगुरुचरित्रकार म्हणतात. (अध्याय १५-ओवी क्रमांक  ३१,४५) 
                        पुराणकालीन तसेच श्रीगुरुचरित्रकालीन असलेली वरुणा नदी म्हणजे आजची गोदावरी नदी असावी असे दिसते.
                      नैसर्गिक किंवा मनुष्य निर्मित आपत्तीतून,अरुणा नदी लुप्त होणे, नाशिक येथील सरोवर नष्ट होऊन गौतम ऋषींच्या काळात लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागणे,  ह्या घटना घडल्या असतील तर सध्याची गोदाकाठची तसेच ब्रह्मगिरीवरील जंगलतोड व मनुष्य निर्मित सिमेंट जंगल (सध्या नदीतीरावर होणारी बोअरवेलसहित सुसज्ज घरे तसेच सुशोभिकरण करताना होत असलेले कॉंक्रिटीकरण) नाशिकच्या सर्वनाशास कारणीभूत ठरतील.
                      नाशिकचे सेवाव्रती होमिओपाथिक डॉ. रत्नाकर पटवर्धन यांचे अप्रकाशित संशोधन ‘तळ्यातील शहर –नाशिक’  गोदावरीनदीची भौगोलिक माहिती देते.  

                  डॉ रत्नाकर पटवर्धन साहेब (सेवानिवृत्त भूगर्भ शास्त्रज्ञ, मेरी नाशिक) तसेच जलतज्ज्ञ डॉ. राजेन्द्रसिंहजी अशा तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्यातून नाशिक शहर विकसित करणे, हीच गोदावरीप्रती कृतज्ञता.
                                                        www.shrigurucharitra.com

Saturday, 16 July 2016

गुरुपौर्णिमा ----- १००वर्षांपूर्वीची काव्यबद्ध गुरुवंदना

          गुरुवंदना
                         {चाल - आनंदाने पुसे पार्वती}
धाव धाव रे आता तवपदी दे ठाया।
निजकृपेची नौका करुनी तारी रे गुरुराया॥धृ॥
दिवसामागूनी दिवस चालले सकल आयुष्याचे
मदांध होऊनी नाही गाईले हरी गुण वाचे
भवसागरी संसारात बुडाले हे मन साचे॥१॥
धाव धाव रे ----- धृ
चुकले मुकले बघुनी सर्व विषय वैभवाचे
अवघे गुण सर्वही मानले विषय-शाश्वतेचे
नाही पुजिले गेले क्षण वाया आयुष्याचे॥२॥
धाव धाव रे ---- धृ
काही आठवले मनी कळे भजन करु हरीचे
कर धरुनी शरण रिघुनी अनन्य भावे साचे
विषय त्यजूनी या देही गुण गाऊ प्रभूचे॥३॥
धाव धाव रे ---- धृ
तल्लीन होऊन भक्तीने गुण गाऊ संतराया
कृपाप्रसादे प्रसन्न चित्ते असू दे तव छाया
दे मज शक्ती बोल राधेचे तव गुण गाया ॥४॥
धाव धाव रे ---- धृ
                            ------ कवयित्री कै. राधाबाई आठवले

Wednesday, 6 July 2016

जरंड्याचा वायूसुत - १००वर्षांपूर्वीचे काव्यदर्शन


                                  (चाल: ‘चरण कमल ज्याचे’ ह्या गाण्याप्रमाणे)
ध्यायी मना हृदयात
जरंड्याचा वायूसुत॥धृ॥

कवणेकाळी प्रगटला
ठाव नाही लागला
राघवाची गात लीला
बैसलासे डोंगरात॥ १॥
ध्यायी मना ---॥धृ॥

हिरवीगार वनस्पती
भोवती शोभे अती
पहाताची होय शांती
चित्ताशी आल्हादीत॥२॥
ध्यायी मना ---॥धृ॥

पाठीमागे राम उभे
पुढे ब्रह्मचारी शोभे
भक्तांची वाट बघे
रात्रंदिन तिष्ठत॥ ३॥
ध्यायी मना ---॥धृ॥

सान थोर दर्शनासी
जन येती अहर्निशी
अभय वाटे त्यासी
वज्रदेही रक्षीत॥ ४॥
ध्यायी मना ---॥धृ॥

सप्ताहामध्ये उत्सवासी
बहूत जन मुक्कामासी
सकळांना भोजनासी
बलभीम पुरवित॥ ५॥
ध्यायी मना ---॥धृ॥

रुद्र पूजा करुनी
वस्त्रे भूषणे सजवूनी
पक्वान ताटे दर्शवूनी
आरती करुनी समर्पित॥ ६॥
ध्यायी मना ---॥धृ॥

चैत्रमासी पौर्णिमेला
अंजनीसुत जन्मला
काय वर्णू जन्मलीला
इच्छिलेले पुरवित ॥ ७॥
ध्यायी मना ---॥धृ॥

मारुतीराया तुझी किर्ती
जाणे एक सीतापती  
तिथे मानवाची मती  
मंद मंद चालत॥ ८॥
ध्यायी मना ---॥धृ॥

जन्मताक्षणी भास्कराला
फळ म्हणूनी धरीला
थक्क करी स्वमातेला
धन्य जगी हनुमंत॥ ९॥
ध्यायी मना ---॥धृ॥

तूच माझी जनक जननी
किती अंत पहासी अजूनी
राधेवरी कृपा करुनी
दावी खूण अंतरात॥ १०॥
ध्यायी मना ---॥धृ॥
                 ---- कै. राधा आठवले
कै. राधा आठवले (माझी आजी - वडिलांची आई) ही कवयित्री माहेरची सातारच्या मारुतीभक्त कै. नाना कुमठेकरांची कन्या ‘सोनु ताई’. असे सांगतात की, सुवर्ण कांती वर्णाची ‘सोनुताई’ अंधारात उभी असली तरी तिच्या पिवळसर गोऱ्या रंगामुळे स्पष्ट  दिसायची. ह्या सोनुताईला पोथ्यापुराणे वाचता- वाचता मिळालेली प्रचंड शब्दसंपत्ती तसेच यमक जुळविण्याची कनकशुद्ध काव्य प्रतिभेची  प्रचिती ‘जरंड्याचा वायूसुत’ या कवितेत  येते.
                     ------- अनुराधा आठवले (घाणेकर), नासिक

Saturday, 2 July 2016

निसर्गदत्त लोणार : वैज्ञानिक तीर्थक्षेत्र (भाग ३ रा)

 लोणार निसर्गशास्त्र न्यास:-
                       लोणार या ठिकाणी शास्त्रीय पर्यटन, ही संकल्पना कृतीत आणणारा जागतिक दर्जाचा  ‘लोणार न्यास’ उभारल्यास लोणारवासीय व तेथील निसर्ग सुस्थापित होऊ शकतील.
                      न्यास उभारणे म्हणजे मंत्रांनी देवाच्या मूर्तीच्या अवयवांवर देवत्वाची स्थापना करणे.
लोणार न्यासातील देवता असेल तिथला निसर्ग. निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळा, हेच निसर्गदेवतेचे अवयव. प्रयोगशाळांमध्ये होणारे विविधांगी संशोधन हेच ह्या न्यासातील मंत्र होत.
१)         रसायन शास्त्र :
                   लोणार सरोवराचे रसायनशास्त्र सांगते की, लवण म्हणजे मीठ. लवणयुक्त पाण्याचे सरोवर म्हणून ह्या सरोवरास पूर्वजांनी ‘लोणार सरोवर’ हे नाव दिले असावे.
                    ह्या सरोवराच्या पाण्यातील मीठ व सोडा यांचा उगम कोठे आहे ? अशा प्रकारे समुद्राव्यतिरिक्त इतर ठिकाणी कृत्रिम मीठ निर्मिती करता येईल का ?

                         हे पाणी अल्कालाइन(pH11)आहे. पावसाळ्यात ह्या पाण्याची pHकमी होते. ह्या पाण्याचा फेस चांगला होतो, त्यामुळे पूर्वी स्थानिक लोक शांपू बनवित असत.
                     नैसर्गिक साधनांद्वारे केमिकल न वापरता साबण,  शांपू बनविण्याचा मार्ग.
  
                             लोणार सरोवराच्या खाऱ्या पाण्यात खरच प्लास्टिक विरघळते का ?  अशा प्रकारे पॉलिमर ह्या पाण्यात विरघळण्याचे शास्त्रीय कारण काय व ह्या मिश्रणातून जैविक इंधन मिळविता येईल का ? अशाप्रकारचे प्रयोग पुण्यनगरीतील (पुण्याचे) शास्त्रप्रेमी मंडळींचे चालू आहेत. हे लोक दर महिन्याला लोणारला भेट देऊन तिथे पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करुन घेऊन, परत पुण्याला जाऊन त्यांचे प्रयोग करतात. त्यांच्या ह्या परिसर स्वछतेच्या मोहिमेमुळे लोणार प्रदुषित झालेले नाही.
                          लोणार न्यासानी ह्या प्रयोगांची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास, जैविक इंधन विषयक संशोधनाची प्रगती लवकर होईल तसेच न्यास निर्मितीतून उपलब्ध होणारे शास्त्रीय पर्यटन येथे प्लास्टिकचा  (कॅरीबॅगचा) कचरा निर्माण करणार नाही.
         अशा अनेक प्रश्नांची उत्तरे रसायन शास्त्र प्रयोगशाळेत मिळू शकतील.

२ )  भूगर्भशास्त्र :
                          सुमारे ५लाख ७०हजार वर्षांपूर्वी  अवकाशातून झालेल्या उल्कापातात एखाद्या ग्रहाचे तुकडे  झालेल्या दगडांच्या माऱ्यात प्रचंड उष्णता निर्माण झाली असावी. ह्या उष्णतेने येथील वाळूचे काचेत रुपांतर केल्याने, इथे काचमिश्रित माती आढळते.                          
                         अशा प्रकारची काचमिश्रित माती चंद्राच्या पृष्ठभागावर आढळते. कारण अति प्राचीन भारतीय धर्मशास्त्र चंद्राला पृथ्वीचा मुलगा मानते. श्रीगुरुचरित्र आशय अध्याय ४था तसेच आधुनिक शास्त्राच्या अनुमानानुसार, मंगळसदृश्य ग्रह पृथ्वीवर आदळून पृथ्वीनिर्मितीच्या वेळी पृथ्वीचा एक तुकडा अवकाशात जाऊन ‘चंद्र’ हा पृथ्वीचा उपग्रह तयार झाला असावा. चंद्रनिर्मितीच्या भौगोलिक घटनेच्या वेळी निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेने चंद्रावरची माती काचमिश्रीत आहे.
                               भविष्यात अंतराळ संशोधनासाठी मानवी वसाहत  चंद्रावर निर्माण करणे, ही काळाची गरज आहे. ह्या थांब्यामुळे अंतराळातील दूरच्या मोहिमा मानवास करता येतील. चंद्रावर जर शेती करता आली तरच ह्या मानवी वसाहती स्वयंपूर्ण होऊ शकतील. ह्या शेतीच्या प्रयोगासाठी लागणारी  चंद्रसदृश्य कृत्रिम वातावरण निर्मिती लोणार न्यासात करता येईल. ह्या शेतीच्या प्रयोगासाठी लोणारची काचमिश्रित माती (चंद्राच्या भूपृष्ठभागावर अशीच काचमिश्रित माती आहे) खूप मोठे योगदान ठरेल.

                     लोणार येथे झालेल्या उल्कापातातील दगडात चुंबकत्व आहे. ह्या दगडाचा उपयोग करुन झोपलेल्या स्थितीत ठेवलेली वीर मारुतीची मुर्ति, मोठा मारुती मंदिरात आढळते. लोणारवासीयांच्या मते, ह्या मारुती जवळ चुंबकसूची नेली असता, ती उलटी फिरते. अशा ह्या लोणारच्या चुंबकत्व असलेल्या दगडाचा शास्त्रीय अभ्यास लोणार न्यासात करता येईल.
                          ‘मोठा मारुती मंदिर’ हे बुलढाण्याच्या कानिटकर कुटुंबाच्या मालकीचे आहे. कानिटकर कुटुंबाने डोळस श्रद्धेने
श्री शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत ह्या मारुतीरायाच्या मुर्तिवरचा शेंदूर दूर केला. वीर मारुतीची विलोभनीय मुर्ति आपल्याला दर्शन देतेच तसेच अवकाशातून भेट मिळालेल्या चुंबकत्व असलेल्या दगडांचा शास्त्रीय अभ्यास करा, असा संदेशही देते.


                        कमी पावसाच्या ह्या प्रदेशात पर्यटकांना   आकर्षित करणारे धबधबे नाहीत. लोणार सरोवरास पाणी पुरवठा करणारी ‘सीता धारा’ ही छोटी नदी गोमुखातून एखाद्या मोठ्या नळासारखी अव्याहत पाणी देते. ह्या नदीचे पाणी गोड असून हा झरा उन्हाळ्यात आटत नाही. ह्या नदीच्या माध्यमातून निसर्ग लोणार सरोवर हा अमूल्य ठेवा जपताना दिसतो.
                          सीता धारा ह्या गोडपाण्याच्या नदीच्या दृष्टीने लोणार सरोवर हा समुद्रच आहे. जशी सागराला नदी मिळते, तेवढ्याच वेगाने सीता धारा ही नदी लोणार सरोवराला पाणी पुरविते. निसर्गातल्या गोड्या पाण्याच्या नद्या,खाऱ्या पाण्याच्या जलाशयाकडे (तो जलाशय समुद्र असो किंवा लोणार सरोवर) वाहतात. ह्या मागे   भौगोलिक कारण आहे का? व असल्यास त्याचा आपल्याला नदी जोडणी प्रकल्पात उपयोग करता येईल का?

३) सूक्ष्मजीव शास्त्र :
                २००७ साली ह्या खाऱ्या पाण्याचे केलेल्या संशोधन निष्कर्षानुसार ह्या खाऱ्या पाण्यात हवेतला नायट्रोजन स्थिर करणारे सूक्ष्म जीव बॅक्टेरिया आढळून आलेले आहेत.
                  भातासारख्या वनस्पतींना हवेतला नायट्रोजन थेट वापरता येत नाही. आकाशात वीज चमकते किंवा जंगलात वणवे पेटतात, तेव्हा निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे हवेतला नायट्रोजन हा वायू अलग होतो. बॅक्टेरिया हे सूक्ष्म जीव तो शोषून त्याचे वनस्पतींना उपयोगी असणाऱ्या नायट्रेटसारख्या रेणूंत रूपांतर करतात. हा नायट्रेट मिळाल्याने भात पिकतो. अशाप्रकारे इतरही वनस्पती हा नायट्रेट वापरतात, परंतु ह्यासाठी आकाशात वीज चमकून पाऊस पडावा लागतो.
                          लोणार  सरोवरातील पाण्यात हवेतला नायट्रोजन स्थिर करणारे बॅक्टेरिया आहेत. ह्या सूक्ष्मजीवांची प्रयोगशाळेत पैदास करुन त्यांचा उपयोग पृथ्वीवरील वनस्पती, शेती संवर्धनासाठी होईल. तसेच भविष्यातील अंतराळातसुद्धा हे जीवसृष्टीचे अमृत नेता येईल. लोणारच्या खाऱ्या पाण्यात समुद्रासारखे मासे आढळत नाहीत. परंतु  हे नायट्रोजनयुक्त अमृत देणारे सूक्ष्म जीव लाखो वर्षांपासून नांदत आहेत. त्यांच्या अस्तित्वामुळे ह्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराभोवती बाभूळ, चिंच, साग, वनौषधी असलेले जंगल उभे राहिले असावे.
                    ‘वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड’ ही म्हण शब्दशः ह्या भागात आपल्याला अनुभवायला मिळते. हे सूक्ष्मजीव प्रयोगशाळेत पैदा करुन, देशात हरितक्रांती करण्याचा प्रयत्न होऊ शकेल.
                   सीता धाराच्या  कुंडात मनुष्यप्राणी, मजा करण्याच्या हेतूने तसेच पुण्य मिळविण्याच्या हेतूने, स्नान करताना आढळतो. ह्या स्नानातून क्षणिक आनंद  मिळविताना, माणसाच्या शरिरावरचे हजारो बॅक्टेरिया सीता धारा ह्या स्वच्छ पाण्याच्या नदीला अशुद्ध बनवितात. हेच अशुद्ध पाणी लोणार सरोवराला पाणीपुरवठा करते. आपल्या शरीरात हजारो बॅक्टेरिया अन्न पचविण्यापासून अनेक कामे करीत असतात. १००किलो वजनाच्या माणसातील १० किलो वजन ह्या बॅक्टेरियांचे असते. स्नानातून त्वचेवरचे बॅक्टेरिया धुतले जातात. आपण स्वच्छ होतो, परंतु लोणार सरोवरात आपण आपली घाण मिसळून, तेथील नायट्रोजन रुपी अमृत देणाऱ्या सूक्ष्म जीवांना आपण धोका पोहोचवितो.
                         मानवनिर्मित अशुद्ध पाण्यामुळे लोणार सरोवरातील सूक्ष्मजीव सृष्टीस निश्चित धोका पोहोचत असणार. सीता धारा कुंडात स्नान करणे तसेच ह्या कुंडाच्या काठावर श्राद्ध विधी करणे त्वरित थांबविणे अत्यंत गरजेचे आहे
                           अशा प्रकारे रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना भौतिकशास्त्र प्रयोगशाळेची जोड दिल्यास, अंतराळातील इतर ग्रहांवर मानवी वसाहत निर्माण करण्याचे संशोधन लोणार येथे होऊ शकेल, तसेच इथे येणाऱ्या संशोधकांना परिपूर्ण प्रयोगशाळा मिळू शकेल.
                             शेती हा मुख्य व्यवसाय असलेले लोणार हे छोटे गाव श्री बुकदाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली  ‘पर्यटन स्थळ’ ह्या नव - संहितेत स्वतःला वसवू पहात आहे. ह्या परिसराची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती सविस्तर देणारी पुस्तके लोणारचे शिक्षक श्री. बुकदाणेसर यांनी मराठी व इंग्रजी भाषेत लिहिलेली आहेत.श्री. बुकदाणेसरांचे विद्यार्थी असलेली चैतन्य कायंदे (मोबाईल नंबर 8856028467, 8888264934)सारखी गाईड म्हणून कार्यरत असलेली तरुण पिढी ह्या न्यासात नोकरी मिळाल्यास घरची शेती सांभाळून जीवनात सुस्थिर होऊ शकेल.  
                            अशी ही जागतिक प्रयोगशाळा निर्माण झाल्यास तिला कोणत्याही  महात्म्याचे नाव देऊ नये.  लोणार निसर्ग न्यास किंवा तत्सम नावातून प्राचीन लोणार सरोवर  जागतिक वैज्ञानिक तीर्थक्षेत्र बनविणे, लोणारवासीयांच्या तसेच विज्ञानप्रेमी मंडळीच्या प्रयत्नांतून साकार होऊ शकेल.
                                                                             समाप्त
॥ जय श्रीगुरुदेवदत्त॥




काळाराम मंदीर दर्शन - काव्य चित्र ---- दिनांक : रामनवमी, १९२५


(चाल  :-  ‘गोपीनाथा आले’ या गाण्याप्रमाणे)  
मंदबुद्धी स्तवू आता वर्णवेना तुजला
राघवा रे, तुझे चरणी मनू माझा वेधला
घनःश्याम तुझा महिमा त्रिभूवनी गाजला
नको नको अंत पाहू प्रकाशावे मतीला॥धृ॥

जाऊन पाहू आता पंचवटीच्या रामाला
शामसुंदर मूर्ती उभी सीतेसह शोभला
महाद्वारी दास मारुती उभा ठाकला
दक्षिणेस गणपती सव्यभागी बैसला
उत्तरेसी दत्तात्रेय आशीष देत राहिला
पूर्व पुण्याई आजी दर्शन लाभ जाहला॥ १॥
मंदबुद्धी स्तवू आता -----                ॥धृ॥

रचना नक्षीदार कोरीव असे मंदीराला
सुवर्ण कळस लकलकीत झळके शिखराला
चहूबाजूनी ओवऱ्या बांधल्या यात्रेकरु मुक्कामाला
वैकुंठची भूलोकी अवतरले वाटते मनाला
प्रसन्न वदने शांत चित्ते वंदिते प्रभूरामाला
कृपादृष्टीविना अन्य नको वरदान मजला॥२॥
मंदबुद्धी स्तवू  आता -----------         ॥धृ॥
 
प्रातःकाळी नरनारी येती त्वरे काकड्याला
स्तुतिस्तोत्रे म्हणूनी आळविती राघवला
मुखमार्जन सारुनी प्रक्षाळीती चरणाला
नानापरीचे पोशाख घालीती शोभतसे रामाला
परोपरीची पक्वाने अर्पिती रामचंद्रा नैवेद्याला ॥३॥
मंदबुद्धी स्तवू  आता ----------                ॥धृ॥ 

चैत्रमासी शुक्लपक्षी उत्सवात सर्व दंग
मंडपात नित्यनेम होत असे किर्तन रंग
लहान थोर यात्रेकरु समवेत घडतसे सत्संग
नवमी दिवशी जन्मोत्सवी आनंदोत्सव पाहिला
स्त्री पुरुषांची दाटी सभा मंडप भरला॥४॥
मंदबुद्धी स्तवू आता   -----------         ॥धृ॥  

चौऱ्या छत्रचामरे दिसताती चहूबाजूला
विविध हंड्या झुंबराची शोभा दिसे मंदिराला
परब्रह्म पहाताची पुष्पे गुलाल वाहिला
हळदीकुंकवाची घाई सुंठवडा प्रसाद दिधला
वाजंत्री वाजताती नाद न मावे गगनाला॥५॥
मंदबुद्धी स्तवू आता ---------            ॥धृ॥  

पारण्याला दशमीस येती सर्व भोजनाला
चारी वर्ण तृप्त होऊनी आत्माराम तोषविला
पुण्यकाल एकादशीसी सभारंभ पाहिला
रामसीता गर्जनाने मिरविती रथाला
पालखीचा थाट मोठा नादध्वनी गाजला॥६॥
मंदबुद्धी स्तवू आता -----------          ॥धृ॥

चौऱ्याऐंशी फिरता बा जीव बहूत शिणला
रामनाम वदे वाणी, दोष जाती लयाला
रामनाम ऐकूनीया, हर्ष मनी जाहला
अज्ञान भ्रांती छेदूनिया, पावन करी देहाला
निरंतर तवपदी ठेवी, या भक्त राधेला॥७॥
 मंदबुद्धी स्तवू आता  ----------         ॥धृ॥

                                 ----   कै. राधाबाई  आठवले


                       माझे आजी-आजोबा (कै. राधाबाई व कै. दत्तात्रय आठवले) हे इसवी सन १९२५ साली रामनवमी उत्सवासाठी नासिकला कारवार, कर्नाटक येथून  आले होते.  फक्त ६ महिने शालेय जीवनाची ओळख झालेल्या, माझ्या आजीचे शिक्षण पोथ्या पुराणे वाचता येण्यापूरते मर्यादित होते. स्वतःच्या काव्यरचना तिला दुसऱ्याकडून लिहून घ्याव्या लागत.
             त्या देवभोळ्या मनाने रामदर्शन घेत असताना तत्कालिन (१९२५ साल) रामनवमी वातावरणाचे केलेले अचूक वर्णन !

                          अनुराधा आठवले (घाणेकर),नासिक